esakal | माणूस घडविण्याचा वसा घेतलेले भामरागडमधील कृतिशील शिक्षक विनीत पद्मावार
sakal

बोलून बातमी शोधा

bhamaragad

अगदीच मोजके शिक्षक हे खडतर आव्हान स्वीकारतात. त्यापैकी एक शिक्षक भामरागड तालुक्‍यात आहेत. त्याचे नाव आहे विनीत बंडू पद्मावार.

माणूस घडविण्याचा वसा घेतलेले भामरागडमधील कृतिशील शिक्षक विनीत पद्मावार

sakal_logo
By
अनिकेत आमटे संचालक, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा

संवेदनशील, कृतिशील, निर्व्यसनी आणि विद्यार्थ्यांबद्दल कळकळ असणारे चांगले शिक्षक आयुष्यामध्ये अनेक चांगली माणसे निश्‍चितपणे घडवीत असतात. दरवर्षी त्यांच्या हाताखालून अनेक विद्यार्थी शिकून बाहेर पडतात. शासनाचा जिल्हा परिषद शाळा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. काही अपवाद वगळले तर सध्या महाराष्ट्रात अनेक शिक्षक उत्तम कार्य करताना दिसत आहेत. अतिदुर्गम भागात काही शाळांची स्थिती फारच वाईट आहे. अशा गावांत वीज नाही, पावसाळ्यात रस्ते बंद आणि मोबाईल नेटवर्क नाही. अशी गावे शिक्षकांसाठी खरे आव्हान असते. अगदीच मोजके शिक्षक हे खडतर आव्हान स्वीकारतात. त्यापैकी एक शिक्षक भामरागड तालुक्‍यात आहेत. त्याचे नाव आहे विनीत बंडू पद्मावार. जन्म ठिकाण घाटंजी, जिल्हा यवतमाळ. वडील खासगी प्रिंटिंग प्रेसमध्ये अगदी कमी पगारावर काम करीत होते. शिक्षण बारावी आणि कलाशाखेत पदवी. तसेच डी.एड. बारावीमध्ये असताना 2002 साली अकाउंट विषयात 99 टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम आले होते. 15 जानेवारी 2007 ला जिल्हा परिषद शाळा बेजूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली.
गावात राहायची सोय नसल्याने भामरागड येथे राहून रोज बेजूरला जाणे-येणे करून शिकविण्यास सुरुवात केली. भामरागडपासून बेजूर पाच किलोमीटर अंतरावर आहे. रोज सायकल घेऊन शाळेत न चुकता जाणे सुरू झाले. पावसाळ्यात बेजूरला पोहोचणे कमालीचे अवघड. भामरागडजवळील पर्लकोटा नदी आणि बेजूरजवळील मोठे नाले अनेकदा पुराच्या पाण्याने भरून वाहतात. अशा वेळी या शिक्षकाची फार घालमेल व्हायची. हे तयार होऊन शाळेला जायला निघायचे आणि कधी नदीच्या तर कधी नाल्याच्या जवळ येऊन पूर कधी ओसरेल याची वाट बघत थांबून राहायचे. अनेकदा कंबरभर पाण्यातून त्यांनी नाले पार करून शाळा गाठली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांची ही धडपड असे. बेजूर शाळेत त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम राबविले आहेत. सुरुवातीच्या काळात शाळेची इमारत सुंदर दिसावी म्हणून उत्तम रंगरंगोटी करून घेतली. शैक्षणिक तक्ते रंगविले. भिंतीवर सुविचार सुंदर हस्ताक्षरात पेंट करवून घेतले. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रसन्न वाटावे ही अपेक्षा होती. गावातील शाळा गडचिरोली जिल्ह्यातील लोक वर्गणीच्या माध्यमातून निर्माण झालेली पहिली डिजिटल इंटरॅक्‍टिव्ह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. यात आम्ही लोकबिरादरी प्रकल्पामार्फत 21 हजारांची देणगी दिली होती. तसेच माजी शिक्षण आयुक्त भापकर साहेबांनीसुद्धा 20 हजारांची देणगी दिली होती. गावातील व तालुक्‍यातील काही दिलदार मंडळींनी पण मदत केली. डिजिटल शाळेसाठी एक लाख रुपयांचा निधी उभा केला गेला. त्यातून जिल्ह्यात पहिला मान यांना मिळाला. 2016 मध्ये याची दखल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवाद साधून घेतली. महाराष्ट्राच्या तेव्हाच्या शिक्षण आयुक्तांनी या शाळेला भेट दिली. त्यांच्या "गुणवत्तेचे शिलेदार' या पुस्तकात बेजूर शाळेचा आणि विनीत यांचा उल्लेख केला आहे. बेजूरची शाळा जिल्ह्यात नावारूपास आली. विद्यार्थी उत्तम शिक्षण घेत होते. सर्व सुरळीत चालू असताना विनीत यांची बदली झाली. 30 मे 2018 रोजी त्यांनी कोईनगुडा गावातील जिल्हा परिषद शाळा येथे कामाला सुरुवात केली. हे गाव भामरागडपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. पण, पावसाळ्यात येथेही अनेकदा पुरामुळे पोहोचणे अवघड होते. पर्लकोटा नदी आणि गावाच्या शेजारून वाहत जाणारा मोठा ओढा अनेकदा पावसाळ्यात अडसर ठरतो. पण, प्रबळ इच्छाशक्ती असलेली मंडळी कुठल्याही शाळेत शिक्षक म्हणून गेलीत तरी आमूलाग्र बदल घडवितात. या गावातील शाळेतसुद्धा अतिशय सुंदर कार्य सुरू आहे. गावकऱ्यांची संपूर्ण साथ आहे. येथील शाळेच्या इमारतीची स्लॅब अतिशय खराब आणि कधीही पडेल अशी अवस्था झाली होती. विनीत यांनी सर्व गावकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना नवीन स्लॅब टाकावी लागेल असे सांगितले. गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे गावातल्या पैशांनी जुनी स्लॅब पाडून नवीन स्लॅब टाकून दिली. त्यांनी गावाकरिता वाचनालयाची सुरुवात केली. शाळेत वाचनालय सुरू केले. जिल्हास्तरीय ग्रंथालय स्पर्धेत या शाळेचा पहिला नंबर आला. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान 50 पुस्तके वाचली आहेत. येथे प्रचंड प्रमाणावर शैक्षणिक साहित्य तयार केले. काही विकत घेतले आणि गावातील सुशिक्षित नागरिकांनी शाळेला दान दिले. शाळेसाठी संगणक मिळविले. त्याचा वापर उत्तम व्हायला लागला. तब्बल 54 पर्यंतचे पाढे विद्यार्थ्यांना पाठ झाले आहेत. इंग्लिशसुद्धा चांगले सुधारते आहे. रोज रात्री सर्व विद्यार्थी एकत्र येऊन एकाच ठिकाणी अभ्यास करतात. विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय नृत्य व सांस्कृतिक स्पर्धेत गेली तीन वर्षे पहिले बक्षीस मिळाले आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी तसेच गट शिक्षण अधिकारी, सभापती यांनी या शाळेला अनेकदा भेट दिली आहे. सनदी अधिकाऱ्यांची (आयएएस) 18 जणांची चमू भामरागड तालुक्‍याच्या अभ्यास दौऱ्यावर आली असताना त्यांनी या शाळेला 2019 मध्ये भेट दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या सहलीसाठी आर्थिक मदत मिळवून दिल्याने येथील सर्व विद्यार्थी नागपूरला जाऊन वेगळी दुनिया बघून आले. शाळेत माध्यान्ह भोजन दिले जाते. त्यासाठी लागणारा भाजीपाला शाळेतील परसबागेत पिकविला जातो. तसेच एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रमसुद्धा राबविला जात आहे. अजूनही विविध प्रकारचे उपक्रम शाळेमार्फत राबविले जातात. 2018-19 या वर्षासाठी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विनीत यांना मिळाला आहे. "शिक्षण माझा वसा' हा राज्यस्तरीय युवा पुरस्कारसुद्धा त्यांना प्राप्त झाला आहे. विनीत पद्मावार यांचा विवाह लोकबिरादरी आश्रमशाळेतील कृतिशील शिक्षिका विजया किरमीरवार यांच्याशी झाला आहे. या दोघांच्या हातून असेच कार्य पुढेही जोमाने सुरू राहील याची सगळ्यांना खात्री आहे. अनेकांनी अशा शिक्षकांकडून प्रेरणा घेऊन कार्य करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामीण-आदिवासी क्षेत्रातील शैक्षणिक विकास जलद गतीने होणार नाही.

loading image