Krishna Janmashtami : नातं गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याचं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Importance of Krishna Janmashtami and Gopalkala

पंढरपुरात गोपाळपूर या वाडीत आषाढी- कार्तिकी पौर्णिमेस काला होतो. वारीला आलेली सगळी यात्रा त्या काल्याला जमते. काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय वारकरी पंढरपूर सोडत नाहीत...

Krishna Janmashtami : नातं गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याचं!

गोकुळाष्टमी :

सोडिल्या शिदोरी । काला करी दही भात ।। 
घ्या रे अवघे समस्त। हरी गोपाळासी देत।। 
काही न ठेवा उरी। आजि देतो पोटभरी।। 
सेना बैसला द्वारी। प्रसाद वाढितो श्रीहरी।। 

संत सेना महाराजांचा हा काल्याचा अभंग होय. एक छोटासा, सरळ अर्थ प्रतिपादणारा, पण भावार्थगर्भ प्रासादिक असा हा अभंग आहे. सगळे गोपाळ एकत्रित आले आहेत. त्यांनी शिदोऱ्या सोडल्या आहेत. दहीभाताचा काला केला आहे आणि हा काला श्रीकृष्ण भगवान समस्तांना मोठ्या प्रेमाने देत आहेत. सगळ्यांना मी हा काला पोटभर देत आहे; काहीही शिल्लक ठेवायचा नाही, असं परमेश्‍वराने ठरविले आहे. प्रेमाने आग्रह करून देव अवघ्यांना प्रसाद वाटत आहे. सेना महाराज आपल्या अभंगाच्या अखेरच्या कडव्यात म्हणतात, की, सेना महाराज प्रसादाच्या अपेक्षेने दाराशी सले आहेत आणि श्रीहरी प्रसाद वाटत असल्यामुळे अर्थातच तो मिळणार आहे.

महाराष्ट्रातील या वैष्णवांच्या उत्सवाद्दल आपण वारंवार विचार केला आहे. विविध खाद्यपदार्थ दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र करून कालविणे म्हणजे काला होय. याला दहीकाला असेही म्हणण्याचा प्रघात आहे. श्रीकृष्णाने व्रजमंडलात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांनी मिळून एकमेकांच्या मुखात काला भरवत त्याचे भक्षण केले. यामुळे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याचीही प्रथा पडली. आपण विचार करीत आहोत, तो वारकरी संप्रदायातील वैष्णवांच्या काल्याचा.

पंढरपुरात गोपाळपूर या वाडीत आषाढी- कार्तिकी पौर्णिमेस काला होतो. वारीला आलेली सगळी यात्रा त्या काल्याला जमते. काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय वारकरी पंढरपूर सोडत नाहीत. महाराष्ट्रातील संतांनी काला या प्रक्रियेला फार मोठे वैशिष्ट्यपूर्ण स्थान दिले आहे. काल्याचे कीर्तन म्हणून संप्रदायात एक महत्त्वाचा आचारधर्म मानला जातो. पारायणादि सप्ताहानंतर समाप्तीप्रसंगी काल्याच्या सेवनाने उपवासाचे पारणे सोडले जाते. या प्रथेचा सामाजिक अंगाने यापूर्वी याच स्तंभात विचार केला आहे.

सांस्कृतिक अंगाने विचार करता येऊ शकतो. रोटी व्यवहाराचे सामाजिक जीवनातील महत्त्व फार आहे. सगळ्यांनी समानतेने एकमेकांना काला भरवणे व तेही मध्ययुगीन कालखंडात ते सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे महत्त्वाचे प्रागतिक पाऊल म्हटले पाहिजे. हा अभंग प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे भावार्थगर्भ व प्रासादिक आहे. सेना महाराजांना परमेश्‍वरीकृपेचा प्रसाद हवा आहे. भगवान श्रीकृष्ण समस्तांना काला प्रसाद म्हणून वाटतात व आपणास तो प्राप्त होईलच ही स्वतःला वाटणारी खात्री त्यांनी इतरांना कथन केली आहे. परमेश्‍वरापाशी कृपेचा जेवढा प्रसाद आहे, तो त्यांना वाटायचा आहे. त्यांना तो काहीही उरवून ठेवायचा नाही आहे. सगळ्यांनी तृप्त होईपर्यंत तो खावा, असे त्यांना वाटत असल्यामुळे सेना महाराजांनी इतरांशी संवाद केला आहे.