esakal | जंगल मंगल : कठीण उभ्या चढाईचा देखणा राजगड
sakal

बोलून बातमी शोधा

जंगल मंगल : कठीण उभ्या चढाईचा देखणा राजगड

जंगल मंगल : कठीण उभ्या चढाईचा देखणा राजगड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोलापुरातील शिवतेज ट्रेकर्सने राजगड मोहीम आखली होती. या मोहिमेत सात वर्षांच्या मुलांपासून ते चाळीस वर्षाच्या तरुणांपर्यंतच्या युवकांनी सहभाग नोंदविला होता. त्यासाठी २५ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास सोलापूरहून २२ जण या राजगड मोहिमेसाठी सहभागी झाले होते. गाडी रात्री सोलापूरहून निघाली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. आमची गाडी सकाळी सहाच्या सुमारास पाली दरवाज्याच्या पायथ्याला येऊन पोहचली होती. गडाच्या पायथ्याला आता हॉटेलची सोय झालेली आहे. गाडी लावण्यासाठी प्रशस्त पार्किंगची सोयदेखील ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे.

लहान मुलं आमच्यासोबत असल्याने आम्हाला काळजी घ्यायची जबाबदारी होती. तसेच मी, सुनील, महादेव व विनायक शिवाय या गडावर कसे पोहचायचे हे इतर जणांना माहीत नव्हते. त्यामुळे महादेव आणि सुनील यांनी लहान मुलांची जबाबदारी घेत लहान मुलांना सोबत घेऊन गड सर करण्यास सुरवात केली. राहिलेली बाकी मंडळीपण त्यांच्यासोबत चालू लागली. पाली दरवाज्यातून गडावर जाण्यासाठीचा सोपा मार्ग असला तरी चढाई मात्र ६० ते ७० अंशात असल्यामुळे सर्वांची दमछाक होत होती. कारण या मोहिमेत नवीन युवा वर्गाचा समावेश होता. काही तरुण याआधी कधीही गडावर न गेलेले मंडळी असल्यामुळे थोडा त्रास सहन करत आलेले होते.

दोन तासांच्या चढाईनंतर आम्ही पाली दरवाज्यात प्रवेश केला. सर्वांनी पाली दरवाजाला नतमस्तक होऊन गडप्रवेश केला. सुरवातीला आम्ही सर्वांना चोर दरवाजाचे दर्शन घडवून दिले. त्यानंतर पद्मावती तलाव, पर्यटक निवास पाहून झाल्यानंतर शिवाजी महाराजांची पहिली पत्नी, शंभू महाराजांच्या आऊसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. समाधीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही पद्मावती मंदिराचे दर्शन घेऊन शिवतेज ट्रेकर्सनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पद्मावती मंदिराच्या समोर एक सीताफळचे झाड लावून वृक्षारोपण केले. त्या लावलेल्या झाडाचे रक्षण करण्याची जबाबदारी गडाच्या पायथ्याला राहणाऱ्या नागरिकांकडे सोपविण्यात आली.

वृक्षारोपण केल्यानंतर गडावर तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली. तेथून पुढे रामेश्वर मंदिराचे दर्शन करून गडावरील सदर, दारूगोळा कोठार, राजवाड्याचे अवशेष पाहून घेतले. थोडं पुढे गेल्यावर आम्ही सर्वजण गुंजवणे दरवाजा पाहण्यासाठी गेलो. रस्ता थोडा खडतर होता, गुंजवणे दरवाजाला जाण्यासाठी फक्त एका तारेला धरून उतरावे लागते. त्यामुळे लहान मुलांना हळूहळू माझ्यासोबत घेऊन खाली उतरून गुंजवणे दरवाजा पाहून घेतला. पुढे मग आम्ही सुवेळा माची पाहण्यासाठी निघालो. गुप्त द्वार, हत्ती प्रस्तर, गड गणपती, चिलखती बुरुज पाहून झाल्यानंतर आम्ही परत सदरकडे पोहचलो. थोडा आराम घेऊन आम्ही सोबत आणलेल्या जेवणाची सर्वांनी पंगत मांडली. थोडासा आराम करून काहीवेळाने आम्ही सर्वजण गड उतरण्यास सुरवात केली. हळूहळू चालूनदेखील आम्ही एक तासात गडउतार झालो. गडाच्या पायथ्याशी आल्यावर लहान मुलांना उसाचा रस पिण्यास दिला. उसाच्या रसाने लहान मुलांच्या अंगात एक ऊर्जा निर्माण झाली. त्याच उर्जेने आम्ही परत सोलापूरला परतीच्या मार्गी लागलो.

लहान मुलांचे विशेष कौतुक विराज, शिवतेज, मल्हार, समर्थ, नरेंद्र, निरंजन, प्रथम, यशराज, साई, राकेश तसेच प्रशांत कांचन, शिवाजी सुरवसे, रवी काळे, शुभम विभूते, निमिष सुतार, देविदास कदम, विनायक ढेपे, सोमानंद डोके, रामलिंग चोरघडे, महादेव डोंगरे, डॉ. सुनील पिसके यांचेही कौतुक करावेसे वाटते.

-संतोष धाकपाडे, सदस्य, वाईल्ड लाईफ कॉन्झरव्हेशन सर्कल,

सोलापूर, मो. ९७६५४३९९०३

loading image
go to top