esakal | तालिबान, पाकची भूमिका आणि भारत
sakal

बोलून बातमी शोधा

India-pakistan-taliban

तालिबान, पाकची भूमिका आणि भारत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तालिबान, पाकची भूमिका आणि भारत

- करण थापर

तालिबाननं काबूलवर अगदी नाट्यमय रीतीनं मिळवलेल्या विजयातून दोन प्रश्न उपस्थित होतात. पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ची यामध्ये काय भूमिका आहे आणि आपल्याला तालिबानच्या नेतृत्वाबद्दल काय माहीत आहे? मी तुम्हाला केंद्रीय सचिवालयातील रिसर्च अँड ॲनॅलिसिस विंगचे (रॉ) विशेष सचिव राणा बॅनर्जी यांनी दिलेली माहिती इथं सांगणार आहे. खूपच थोड्या लोकांना यापेक्षा अधिक माहिती असण्याची शक्यता आहे.

तालिबान १.०

तालिबानचा जन्म सन १९९४ च्या शरद ऋतूमध्ये कंदाहारपासून ५० किलोमीटर अंतरावरील ''व्हाइट मॉस्क'' इथं झाला. त्या वेळी या गटात कट्टर मुस्लिमांचा समावेश होता व त्यांचा उद्देश अफगाणिस्तानातील हमरस्त्यांवर खंडणी गोळा करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचा होता. मुल्ला अब्दुल समद हा त्यांचा प्रमुख होता. मुल्ला उमर - खिलजी होटक - हा कमांडर होता. सोव्हिएत रशियानं सन १९८० मध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतला, तेव्हा उमर हा युनूस खालिजच्या ''हिज्ब-ए-इस्लामी'' या संघटनेचा सदस्य होता.

एका स्फोटामध्ये त्यानं एक डोळा गमावला होता. मुजाहिदीनांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून तो आपल्या धर्मापासून दूर झाला होता. तालिबान हा त्याचा पुढचा पडाव होता. पाकिस्तानचा काफिला अफगाणिस्तानात पकडला गेला, तेव्हा पाकचे तत्कालीन गृहमंत्री नसीरुल्ला बाबर यांनी तालिबानकडं मदत मागितली. तालिबान्यांनी मदत केली आणि त्या बदल्यात पाकिस्ताननं त्यांना पाठिंबा आणि मदत दिली. सुरुवातीच्या काळात अफगाणिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष बुऱ्हानुद्दीन रब्बानी यांनीही तालिबानला पाठिंबा दिला. गुलबुद्दीन हिकमतयार यांच्याबरोबरच्या सततच्या शत्रुत्वामध्ये रब्बानी यांच्यासाठी तालिबान हे उपयोगी अस्त्र होतं.

मात्र, पाकिस्तानची मदत अधिक महत्त्वाची होती. ''स्पेशल सर्व्हिस ग्रुप''चे माजी अधिकारी असलेले व नंतर हेरातचे महावाणिज्यदूत झालेले कर्नल सुलतान अमीर तरार यांनी तालिबान्यांना लष्करी प्रशिक्षण दिलं. पाकिस्तानच्या ‘आयएसआय’नं त्यांना पैसा पुरवला. कंदाहारच्या बोगद्यांमध्ये लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा तालिबान्यांना दिला गेला.

तालिबान्यांनी सन १९९६ मध्ये काबूलवर ताबा मिळवला. या काळात त्यांची पाकिस्तानवर असलेली भिस्त खूप मोठ्या प्रमाणावर वाढली. बॅनर्जी यांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘अधिकारी, साध्या कपड्यांतील त्यांचे सहकारी आणि सरकारी अधिकारी हे तालिबानच्या पहिल्या राजवटीचा कणा होते. ही स्थिती केवळ काबूलमध्येच नव्हे, तर इतर सर्वच प्रांतांत होती.’’ पाच वर्षांनंतर तालिबानी राजवट कोसळल्यानंतर पाकिस्तानं तालिबान्यांसाठी आपले दरवाजे खुले केले. मीरान शाह, पेशावर आणि क्वेट्टा येथे निर्वासितांचे तळ आणि सल्लामसलतकेंद्रे उभारली गेली.

तालिबान्यांनी अमली पदार्थांच्या तस्करीचा मार्ग स्वीकारला आणि पाकिस्तान त्यांच्याकडून फायदा मिळवत राहिला. अमेरिकेची वक्रदृष्टी इराकवर पडल्यावर तालिबान्यांनी अफगाणिस्तानात परतण्यास सुरुवात केली व पाकिस्ताननं त्यांना मदत आणि सुरक्षा पुरवली. तालिबान्यांची मुलं पाकिस्तानमधील शाळांत शिकली व जखमी तालिबान्यांवर पाकिस्तानातील रुग्णालयांत उपचार केले गेले. अमेरिकेला या सगळ्याची कल्पना होती. मात्र, अमेरिकेनं कोणतीही कारवाई केली नाही.

अमेरिकेचं कराची-तोरखम मार्गावर अवलंबून असण्यामध्ये याचं उत्तर सापडतं. आताच्या स्थितीत, तालिबानचं अफगाणिस्तानवरील नियंत्रण वाढतं आहे, त्याचबरोबर पाकिस्तानचा खोडसाळपणाही वाढतो आहे. ‘एम१६’चे माजी प्रमुख सर रिचर्ड डिअरलव्ह यांनी सन २०१२ मधील काबूलच्या पतनाचं वर्णन ‘तालिबानला पुढं करून पाकिस्ताननं केलेला हल्ला’ असं केलं आहे. त्यामुळेच जेव्हा मुल्ला बरादर कंदाहारमध्ये पोचला तेव्हा ‘आयएसआय’चे प्रमुख फैज हमीद त्याचं स्वागत करण्यासाठी सीमा ओलांडून अफगाणिस्तानात पोचले. दोघांनी मिळून मशिदीत नमाज पढला.

तालिबानी नेतृत्व आणि भारत

आता दुसरा प्रश्न. तालिबानी नेता असलेल्या दाढीधारी व फेटाधारी व्यक्तीबद्दल आपल्याला काय माहीत आहे? सध्याचा नेता हिब्तुल्लाह अखुंदजादा कंदाहारच्या पंजवाई जिल्ह्यातील नुरझाईचा रहिवासी आहे. त्याचे वडील स्थानिक मशिदीचे मौलवी आहेत. तालिबानच्या पहिल्या राजवटीत तो काझी न्यायालयांचा प्रमुख होता. मुल्ला मन्सूर हा तिसरा नेता मारला गेल्यावर, दुसरा पर्याय नसल्यानं अखुंदजादाची नेतेपदी वर्णी लागली. मात्र, महत्त्वाचं म्हणजे तो आयएसआयला मान्य असलेला नेता आहे. बॅनर्जींच्या मते तो एकांतवास पसंत करणारा नेता आहे. ‘बीबीसी’च्या म्हणण्यानुसार, त्याचं एकच छायाचित्र उपलब्ध आहे. मात्र, त्याच्या भूमिगत राहण्यामागील आणखी एक कारण म्हणजे, उपदेशक असलेला त्याचा भाऊ क्वेट्टा येथील मशिदीतील स्फोटात मारला गेला. अखुंदजादा इथंच नमाज पढायचा. असं भूमिगत राहणं त्याला सुरक्षितही वाटत असावं, कुणास ठाऊक!

मुल्ला बरादर हा पोपलझाई (अफगाणिस्तानातील दुर्राणी पश्तून) आहे. त्यामुळे तो ‘खानदानी’ ठरतो. तो तालिबानच्या तीन डेप्युटी कमांडरपैकी एक आहे, मात्र, दोहा येथील चर्चेत सहभागी तो महत्त्वाचा संवादकार आहे. असं म्हणतात की त्याची पत्नी मुल्ला उमर याची बहीण आहे. बरादर या शब्दाचा फारसीतील अर्थ ‘भाऊ’ असा होतो आणि हे नाव त्याला मुल्ला उमरनंच दिलं. त्यानं करझाई यांच्याशी चर्चेची तयारी दाखवल्याच्या गुन्ह्याबद्दल पाकिस्तानातील तुरुंगात आठ वर्षं शिक्षा भोगली. आता त्याला माफी दिली गेली आहे, त्याचा गुन्हा विसरला गेला आहे की ही जखम त्यांना खुपते आहे? दुसरा डेप्युटी कमांडर आहे मुल्ला याकूब. हा मुल्ला उमरचा मुलगा आहे. तो सर्वांत तरुण आहे व त्याचे फील्ड कमांडर्स आणि भारतीय दूतावासावर हल्ला करणाऱ्या गटाच्या सिजाउद्दीन हक्कानी यांच्याशी जवळचे संबंध आहेत.

''हक्कानी नेटवर्क'' ही भारताची सर्वांत मोठी डोकेदुखी आहे. बॅनर्जी यांच्या मते, ''हक्कानी''चा संस्थापक जलालुद्दीन याला अनेक बायका व सात मुलं आहेत व त्यानं एकेकाळी अमेरिकेसाठी काम केलं आहे. हक्कानींनी तालिबान प्रथम सत्तेत आल्यावर त्यांच्याशी संधान बांधलं. जलालुद्दीननं मंत्री म्हणून काम पाहिलं असलं तरी असं सांगतात की, हमीद करझाई यांनी त्याला आपलंसं करण्याचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. आज हा गट ‘आयएसआय’च्या अत्यंत जवळचा आहे. मात्र, हक्कानींनी कायमच सर्व बाजूंनी आपले फासे टाकले आहेत व आताही ते तसेच करतील, यात कोणतीही शंका नाही. बॅनर्जी म्हणतात, हक्कानीनं तालिबानला धमकावलं आहे. सिराजुद्दीन या सध्याच्या प्रमुखाकडं काबूलच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. ‘इसिस’नं केलेले हल्ले त्याच्याकडून चूक झाल्याचं दर्शवतात की यात आणखी काही मोठी गुंतागुंत आहे?

(सदराचे लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

(अनुवाद : महेश बर्दापूरकर)

loading image
go to top