
जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने मागील आठवड्यात २०२८मध्ये होत असलेल्या लॉस एंजिलिस ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंग या खेळाच्या समावेशाला हिरवा कंदील दाखवला. जगभरातील बॉक्सिंगपटूंसाठी ही आनंदाची बातमी ठरली. भारतातील खेळाडूंनाही यामुळे दिलासा मिळाला; पण भारतात बॉक्सिंग या खेळाला सध्या तरी पोषक वातावरण उपलब्ध नाही. ‘भारतीय बॉक्सिंग संघटने’ची (राष्ट्रीय संघटना) निवडणूक निर्धारित वेळेमध्ये पार पडलेली नाही. यंदा २८ मार्च रोजी ही निवडणूक होणार होती; पण आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रीय संघटनेचा पाय खोलात गेला असल्यामुळे देशातील संबंधित संघटनेवरही परिणाम होत आहेत. याचा फटका खेळाडूंना बसत आहे.