आनंदाच्या चाहुलीचा दसरा...

दसरा म्हणजे ऋतू बदलाची चाहूल. दसरा म्हणजे हिवाळ्याच्या सुरवातीची चाहूल. दसरा म्हणजे उसाच्या पेरात गोडी भरण्याची चाहूल. दसरा म्हणजे कापसाची बोंडं उलण्याची चाहूल.
Dasara Festival
Dasara FestivalSakal

दसरा म्हणजे ऋतू बदलाची चाहूल. दसरा म्हणजे हिवाळ्याच्या सुरवातीची चाहूल. दसरा म्हणजे उसाच्या पेरात गोडी भरण्याची चाहूल. दसरा म्हणजे कापसाची बोंडं उलण्याची चाहूल. दसरा म्हणजे तुरीच्या शेंगात सोले भरल्याची चाहूल. दसरा म्हणजे रानभर साळीच्या सुगंधाची चाहूल.

दसरा म्हणजे मोठ्या पेरणीची सुरवात करण्याची चाहूल. दसरा म्हणजे महानुभावांसाठी वीजनाची चाहूल. दसरा म्हणजे पैलवानांसाठी खुराक खाऊन मेहनत करण्याची चाहूल. दसरा म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या लागण्याची चाहूल.

दसरा हा असा शेतकऱ्यांसाठी चाहुलींचा सण असतो. आणि ही सगळी चाहूल आनंदाची असते. म्हणून दसरा हा आनंदाच्या चाहुलीचा सण आहे. पुढे दिवाळीच्या रूपाने आनंद आपल्यासमोर झगझगीत रूपात साक्षात उभा राहतो. त्याची चाहूल दसरा तुम्हाला आधीच देत असतो. शेतकऱ्यांच्या मनात असा रानभर दसरा फुललेला असतो आणि मग प्रत्यक्षात दसरा येतो.

एके काळी लढाया करणं हाही शेतकऱ्यांसाठी पोटापाण्याचाच भाग होता. तेव्हा पावसाळा संपवून सुरू झालेल्या नव्या ऋतूत युद्धावर निघण्याचा दिवस म्हणजे दसरा समजला जात असे. त्याला महाभारताचाही संदर्भ होता. पांडवांनी शमी वृक्षावर ठेवलेली शस्त्रे याच दिवशी हातात घेतलेली होती.

आता युद्धं इतिहासजमा झाली असं म्हणता येणार नाही, पण युद्धासाठी स्वतंत्र सैनिक असतात. ते पूर्ण वेळ तेच काम करतात. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. पण पूर्वी पावसाळ्यात घरी राहून, शेतीची सगळी कामं करून, सुगी संपवून मग युद्धावर निघणे असा शेतकऱ्यांचा क्रम होता.

पावसाळ्यातल्या गढूळ नद्या आता निर्मळ होऊन वाहू लागतात. नदीकाठच्या गवतावर दव पडून ते अधिकच हिरवं होऊ लागतं. गाईगुरांसाठी हे गवत म्हणजे मोठा मेवा असतो. ह्या मेव्यात आपली गुरं चारणं ही गुराख्यांसाठी परमानंदाची गोष्ट असते.

अशावेळी गवतात गुरं चरत असताना नेमक्याच फुटू लागलेल्या कापसाच्या बोंडातला शुभ्र कापूस वेचून, तुरीच्या ओळीची एक कांडी घेऊन, त्यात एक कच्च बोंड खूपसून त्याचं छान घिरटं करणं आणि फुललेल्या पहिल्यावहिल्या कापसाचं सूत कातणे हा गुराख्यांचा एक आनंदाचा उद्योग असतो.

याच घिरट्याच्या सुतातून आमची आजी वाती तयार करायची आणि दसऱ्याच्या दिवसापासून या नव्या कापसाच्या वाती घरच्या देवाच्या दिव्यात आणि देवळातल्या दिव्यातही लावायची. कापसाचा पहिला उपयोग अशा प्रकारे देवासाठी व्हावा म्हणून दसऱ्याच्या दिवसाची निवड आजीने केलेली असायची.

याच काळात आमच्यासाठी शेतात सर्वत्र गोडवा भरलेला असायचा. झाडाला लागलेली मोहोळं असतील किंवा शेतातल्या उसाच्या कांड्यात आलेला गोडवा असेल, हा आमच्यासाठी मोठा मेवा असायचा. सणावाराला घरात होणाऱ्या लाडूपेक्षाही हा गोडवा आमच्यासाठी अधिक मोठा असायचा. दसऱ्याच्या दिवशीच पहिल्यांदा ऊस तोडून देवासमोर त्याचे मखर केले जायचे.

नंतर तोच ऊस खाण्यासाठी वापरला जायचा, ऊस खायला सुरवात व्हायची. त्यामुळे दसरा हा आमच्यासाठी गोडव्याचा मुहूर्त असायचा. त्या दिवसापासून चोरून लपून न खाता राजरोसपणे शेतातला ऊस तोडून आम्ही खाऊ शकायचो. तिथून पुढे जणू उसाचा खुराकच आम्हाला लावलेला असायचा.

रोज सकाळी उठून एक ऊस खाल्ला, की दात स्वच्छ आणि मजबूत होतात असं सगळे जण म्हणायचे. त्यामुळे रोज सकाळी उसाचा खुराक आम्ही आवर्जून खायचो. गालगुच्चे घेऊन आजी म्हणायची, उसाच्या खुराकानं कसे गाल गोबरे झालेत.

दसऱ्याच्या दिवसात कापसाच्या मधोमध पेरलेल्या तुरीच्या ओळीतल्या शेंगा सोल्यांनी भरलेल्या असायच्या. त्यामुळे तुरीच्या शेंगांचाही खुराक सुरू व्हायचा. दिवसभर शेतात तुरीच्या शेंगा खाणे, संध्याकाळी घरी आईने केलेले तुरीच्या सोल्यांचे खळबट खाणे, यामुळेही तोंडाला वेगळीच चव यायची.

सोबतच खाता येत नसल्या तरी रानात पिकलेल्या साळीचा सुगंध सर्वत्र दरवाळायचा. त्यामुळे पोट भरत नसले तरी मन भरून जायचे. खूप आनंद वाटायचा. जणू हा आनंद दसऱ्याचाच एक भाग होता.

दसरा जवळ आला, की बाबा खारीक-खोबऱ्याचं पोतं घरी आणायचे. अण्णा, दादा ते खारीक-खोबरं खाऊन अंगमेहनत करायचे. दादाचा अंगमेहनतीवर जास्त जोर होता. तो सूर्यनमस्कार, जोरबैठका आणि उठाबशा भरपूर करायचा. त्याची सुरवात याच दिवसांपासून होत असे. त्यामुळे पिळदार शरीराचा दादा गावोगावच्या जत्रांमधून कुस्त्याही खेळायचा. आधीच रुबाबदार असलेला दादा या काळात आणखीच रुबाबदार दिसायचा.

होळीच्या दिवशी पेटलेल्या गवरीने पोळलेलं हीव गावाबाहेर जाऊन मारुतीच्या पारामागं अंगावर पांघरूण घेऊन लपून बसायचं, ते थेट दसऱ्याच्या दिवशी हळूच अंगावरचं पांघरूण काढून हळूहळू गावात शिरतं, असं आजी त्यावेळी आम्हाला सांगायची. आजीच्या सांगण्यानुसार खरंच दसऱ्यापासून थंडीची सुरुवात व्हायची. हीव वातावरणात भरून राहायचं. दव पडायला सुरवात व्हायची. पाऊस पडणे थांबलेले असायचे.

रब्बीच्या पेरणीला आमच्याकडे मोठी पेरणी म्हणायचे आणि त्यावर येणाऱ्या सुगीला मोठी सुगी म्हणायचे. मोठ्या पेरणीत पेरलेली मोठी ज्वारी केवळ दवावर यायची. भरघोस दाणे धरायची. अशी या दवाची किमया होती. एका अर्थानं वरून पडणारा पाऊस संपल्यानंतर धरणीने आपल्या पिलासारख्या पिकांना आतून सोडलेला पान्हा म्हणजे दव असायचं.

या मोठ्या पेरणीसाठी हस्ताच्या उन्हात तापलेली जमीन वापशावर यायची आणि पेरणी सुरू व्हायची, ती दसऱ्याच्या आसपास. या पेरणीसाठी ज्वारीचं बियाणं गोमूत्र आणि शेणात घोळसून पेरलं जायचं. त्यासाठी पहाटेच उठून गोमूत्र गोळा करण्याचं काम आम्हाला करावं लागायचं. गोमूत्र गोळा करण्यासाठी घरोघरची मुलं बाहेर पडायची. गाईच्या शेणामुतातलं हे बियाणं निर्जंतुक व्हायचं आणि आपोआपच त्याला पौष्टिक खतही मिळायचं.

दसऱ्याच्या आसपासच शाळेला सुट्ट्या लागायच्या. त्यामुळे रानभर हुंदडण्यासाठी सगळा दिवस मिळायचा. शाळेची कटकट नसायची. दसऱ्याच्या आसपासच बहिणींना दिवाळीसाठी आणण्याचे वेध लागायचे. त्यासाठी अण्णा किंवा दादा गाडी जुंपून, शिदोरी घेऊन बहिणींना आणायला निघायचे. त्यांच्या गाडीत बसून लहाना मुराळी म्हणून मीही जायचो.

तेव्हा शिवारातल्या चकारीतून जाणाऱ्या बैलगाडीत बसून वेगवेगळ्या गावची शिवारश्रीमंती न्याहाळता यायची. दसऱ्याचा आनंद सर्वत्र शिवारात भरलेला असायचा. त्या आनंदानं माणसांचे चेहरेही फुललेले असायचे. त्यामुळे दसऱ्याची चाहूल म्हणजे आनंदाची चाहूल.

'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' असं आमच्या तिसरीच्या पुस्तकात एका पाठात लिहिलेलं होतं. ते आम्हाला तंतोतंत खरं वाटायचं. कारण दसरा कितीतरी प्रकारचा आनंद घेऊन यायचा. अशावेळी आम्हाला आमच्या पुस्तकातली कविता आठवायची,

आनंदी आनंद गडे,

इकडे तिकडे चोहीकडे

वरती खाली मोद भरे

वायु संगे मोद फिरे

नभात भरला, दिशात उरला,

मोद विहरतो चोहीकडे,

आनंदी आनंद गडे

ही बालकवींची कविता देखील दसऱ्याच्या याच दिवसावर आधारित असावी, असं आम्हाला वाटायचं. आमचा सगळा गाव जवळजवळ महानुभावांचा होता. त्यामुळे आमच्या गावात नवरात्रांमध्ये देवीचं फार काही केलं जात नसे. उलट नवरात्रीच्या दिवशी सगळे महानुभाव विजनाला निघून जात. लीळाचरित्रात चक्रधर स्वामींनी, 'या दिवशी गावात थांबू नका, लोक हिंसा करतात, गावोगाव काराणं होतं, हाले मारले जातात, त्यामुळे त्या दिवशी शक्यतो गावात थांबू नका.' असं सांगितलं होतं.

म्हणूनच या दिवशी महानुभाव लोक विजनात म्हणजे शेतात दूर कुठेतरी निघून जातात. दिवसभर तिथेच राहतात. त्या दिवशी गावातलं पाणीही पीत नाहीत. त्या निमित्ताने आमच्या लहानपणी ही एक छान सहल व्हायची. सगळं घरदार शेतात आलेलं असायचं. तिथेच धपाट्यांचा स्वयंपाक केला जायचा. दही, धपाटे, केळी असं जेवण केलं जायचं. दिवसभर रानातच हुंदडायला खूप छान वाटायचं. त्यामुळे दसरा जवळ आला की आम्हाला वीजनाचाही आनंद मिळायचा. खूप मजा यायची.

प्रत्यक्ष दसऱ्याच्या दिवशी रानात उभे असलेल्या सर्व पिकांचे तुरे आणून लोक गावातल्या मंदिरासमोर बांधायचे. त्यामुळे एका अर्थाने ते गावातलं कृषी प्रदर्शनच असायचं. त्यात प्रत्येकाच्या शेतातली पिकं पाहायला मिळायची. कोणाच्या शेतात कोणती पिकं किती जोमानं आलेली आहेत, याची चर्चा व्हायची. कौतुक व्हायचं. कधी कधी चिंता व्यक्त केली जायची. पहिलंवहिलं पीक देवाला वाहिल्याचा आनंद मिळायचा. उर्वरित पिकं जोमानं येतील, देवाचा आशीर्वाद मिळेल अशी आशा असायची. त्यामुळे दसरा हा एका अर्थाने शेतकऱ्यांचा सण होऊन जायचा.

दसऱ्याला असलेले ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ लोकांना माहीत होतेच असं नाही. पण दसऱ्याच्या भोवती शेतकरी अशा प्रकारे आपल्या जीवनाची छान गुंफण करून घ्यायचा. त्यामुळे दसऱ्याचे शहरांमधून होणारे कुठलेच उपक्रम गावात होत नसत. शहरांमधून वेगवेगळ्या नव्या व्यवसायाचे मुहूर्त होतात. गावात तसली काही भानगड नसे.

कारण शेती सोडून इतर कुठला व्यवसाय तिथे नव्हता. त्यामुळे दसरा हा सण शंभर टक्के शेतीशी जोडून घेतला जायचा. शेतीतला आनंद या सणाने आणखीच द्विगुणीत व्हायचा. त्यामुळे रानावनात भरून राहिलेला आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा.

दसऱ्याच्या निमित्ताने दसरा काढणे असाही एक प्रकार होता. घरातलं प्रत्येक चिंधीचिरगुट धुतलं जायचं. पावसाळ्यात वाळणार नाहीत म्हणून कधीच धुता न आलेल्या गोधड्या धुतल्या जायच्या. वाळवल्या जायच्या. हस्ताच्या उन्हात निर्जंतुक व्हायच्या. मठातले बुवाजी त्यांच्या पोथ्यांना हस्ताचं ऊन द्यायचे. हे हस्ताचं ऊन म्हणजे जणू जमिनीतलं बी रुजवण्यापासून पृथ्वीवरच्या सगळ्या जंतूंना नष्ट करणारं निर्जंतुकीकरणच असायचं.

एका अर्थाने दसरा म्हणजे रोगराई संपून पूर्णपणे निरोगी दिवस सुरू होण्याचा मुहूर्त असायचा. खरोखरच तिथून पुढं माणसं फारशी आजारी पडत नसायची. एकतर वातावरणातही आनंद भरलेला असायचा आणि त्यांच्या मनातही आनंद भरलेला असायचा. त्याचा परिणाम म्हणून माणसं आपोआपच सुदृढ आणि निरोगी होत जायची. हा असा तनामनाला आनंद देणारा सण म्हणजे दसरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com