इनर इंजिनिअरिंग : स्पष्टतेरहित आत्मविश्वास अनर्थ

मला आत्मविश्वास आणि स्पष्टता यांमधील फरक जाणून घ्यायचा आहे.
 इनर इंजिनिअरिंग
इनर इंजिनिअरिंगsakal

प्र. मला आत्मविश्वास आणि स्पष्टता यांमधील फरक जाणून घ्यायचा आहे.

सद्गुरू : असे म्हणूया की, माझी दृष्टी ठीक नाही, मला स्पष्टपणे दिसत नाही आणि मला गर्दीमधून पुढे जायचे आहे. पण मला खूप आत्मविश्वास आहे. जर मी चालत राहिलो तर काय होईल? पुष्कळ लोक त्यांच्या आयुष्यात असेच चालत आहेत, कारण त्यांच्यात आत्मविश्वास आहे. त्यांना काहीही दिसत नाही, परंतु त्याने काही फरक पडत नाही, त्यांच्यात आत्मविश्वास आहे. हे तुमच्यासाठी आणि तुमच्या भोवतालच्या सर्वांसाठी घातक आहे. माझी दृष्टी स्पष्ट असल्यास मी संपूर्ण जमावातून कोणालाही स्पर्श न करता चालत जाईन. ती स्पष्ट नसल्यास आणि माझ्याकडे स्पष्टता नाही हे कळण्याइतकी नम्रता माझ्यात असल्यास मी मदत घेईन आणि सावकाश जाईन. ज्याची दृष्टी स्पष्ट आहे, त्याच्या इतक्या जलद गतीने मी जाणार नाही, पण निदान मी सावकाश पुढे जाईन.

लोकांना वाटतं आत्मविश्वास हा स्पष्टतेसाठी एक प्रकारचा पर्याय आहे - नाही. असे समजा जेव्हा तुम्हाला आयुष्यात मोठे निर्णय घ्यायचे असतील, मग ते व्यावसायिक असोत किंवा कुटुंबाशी निगडित असोत, तुम्ही एक नाणे हवेत उडवून पाहा, ‘छापा आला तर आपण हे करू, काटा आला तर आपण ते करू.’ हे पन्नास टक्के वेळा काम करून जाईल! तुम्ही फक्त पन्नास टक्के वेळाच बरोबर असल्यास तुम्ही दोनच व्यवसाय करू शकाल - तुम्ही हवामान तज्ज्ञ होऊ शकता किंवा ज्योतिषी! तुम्ही इतर कोणत्याही नोकरीत असल्यास बहुतांशी तुम्हाला काढून टाकतील.

आपल्याला हवे तसे आयुष्य आपल्याला हवे असल्यास पहिली आणि महत्त्वाची आवश्यकता म्हणजे आपल्याला काय हवे आहे याबाबत स्पष्टता असणे. हे साध्य करण्यासाठी अगदी साध्या सोप्या क्रिया मोठा बदल घडवू शकतात. दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर खाटेवर मांडी घालून बसा, हात खुले करून बसा, डोळे मिटा आणि तुम्ही जे नाही त्या सर्व गोष्टींकडे पाहा. तुम्ही जे जमवले त्याची दखल घ्या - तुमचे घर, कुटुंब, नाती, शिक्षण, शरीर, कपडे - सर्वकाही. त्याबद्दल कृतज्ञ व्हा. त्याच वेळी जे तुम्ही नाही त्याला, ‘‘हे मी जमवलेले आहे,’’ असे म्हणून ओळखा आणि मानसिकदृष्ट्या ते बाजूला ठेवा.

जे तुम्ही जमवले ते तुमचे होऊ शकते पण ते कधीच तुम्ही होऊ शकत नाही. दररोज दहा मिनिटे सकाळी आणि दहा मिनिटे रात्री यासाठी द्या. ह्यामुळे स्पष्टता येईल. एखाद्याला गुरूकडून योग्यप्रकारे दीक्षा मिळाली असल्यास ही विशिष्ट प्रक्रिया नवीन आयाम गाठू शकते. पण अशी संधी तुमच्या आयुष्यात येईपर्यंत तुम्ही हे स्वतःच करू शकता. ती नक्कीच तुमच्या स्पष्टतेवर मोठा प्रभाव पाडू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com