शालेय उपक्रमात अशैक्षणिक कामांचा अडथळा

गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाबद्दल विविध तक्रारींचा सूर समाजमाध्यम, तसेच वृत्तपत्रांमधून आपण वाचत आहोत.
School Activities
School Activitiessakal
Updated on

- सुदाम कुंभार, sudamgk91261, @gmail.com

दैनंदिन शालेय कामकाजाचे पाच ते साडेपाच तास जर शिक्षक विविध ऑनलाइन कामांमध्ये व्यस्त राहिले, तर त्यांच्याकडून अपेक्षित असलेले शैक्षणिक काम अथवा अध्ययन कशा प्रकारे साध्य होईल, याचा विचार करण्याची गरज आहे. शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे व त्यामधून शिल्लक राहिलेला वेळ ते मुलांना खऱ्या अर्थाने देऊ शकतात का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाबद्दल विविध तक्रारींचा सूर समाजमाध्यम, तसेच वृत्तपत्रांमधून आपण वाचत आहोत. त्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे, २३ ऑगस्ट २०२४ रोजीचा शासन निर्णय... ज्यामध्ये शिक्षकांना देण्यात येत असलेल्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामांची यादीच जाहीर करण्यात आली आहे. त्यात शिक्षकांनी कोणते शैक्षणिक आणि अशैक्षणिक काम करावे यावर एकदाचे शिक्कामोर्तब झाले.

सद्यःस्थितीत शाळाप्रमुखांकडून विविध प्रकारची माहिती तातडीने मागविण्यात येते. अर्थात शाळाप्रमुख ही जबाबदारी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकारी शिक्षकांच्या सहाय्याने करून घेत असतात, परंतु या ठिकाणी हा विचार होत नाही, की दैनंदिन शालेय कामकाजाचे पाच ते साडेपाच तास जर शिक्षक या विविध ऑनलाइन कामांमध्ये व्यस्त राहिले, तर त्यांनी नियोजन केलेले अथवा त्यांच्याकडून अपेक्षित असलेले शैक्षणिक काम अथवा अध्ययन निष्पत्ती कशा प्रकारे साध्य होईल... त्याचा प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार सर्व बालकांना बरावीपर्यंतचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, सर्व शैक्षणिक पायाभूत सुविधा पुरविणे, अध्यापन शास्त्र आनंददायी आणि रंजक बनविणे, घोकंपट्टीसारखे तंत्र दूर ठेवणे इत्यादी शिक्षकांचे काम आहे. मात्र, ते करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळतो का, त्यांच्यावर लादलेली अशैक्षणिक कामे व त्यामधून शिल्लक राहिलेला वेळ ते मुलांना खऱ्या अर्थाने देऊ शकतात का, याचा विचार होणे हे जास्त महत्त्वाचे वाटते.

मूल कसे शिकते, शिकण्यासाठी त्याला कोणत्या साधनांची गरज आहे, त्याला मार्गदर्शकाची गरज हवी आहे का? मूल कृतीतून शिकत आहे; तर त्यासाठी खरेच त्याच्या कृतींचे निरीक्षण केले जातेय का? बी. एड./डी. एड.च्या अभ्यासक्रमांमध्ये प्रयत्न आणि प्रमाद - चुका करत करत शिकणे, कल्पना करत शिकणे मुलांना कल्पनाविश्वात राहण्यासाठी संधी देणे, कल्पनाविश्वात त्यांना घेऊन जाणे, मोठ्यांच्या सहाय्याने शिकणे व तशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणे आणि नेहमीच्या शिक्षण पद्धतीनुसार पाहणे, ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे, कृती, अवतीभवती ऐकलेल्या चांगल्या शब्दांचा संग्रह, वाचनाच्या सवयी आणि हे सर्व करण्यासाठी त्यांना दिलेली प्रेरणा आणि तशा प्रकारचे शाळेतील वातावरण इत्यादी सर्व बाबींचा खऱ्या अर्थाने शिक्षकांना आढावा घेण्यासाठी वेळ आहे का, हा प्रश्नसुद्धा निरुत्तरितच राहतो.

तरीही विविध प्रकारच्या अशैक्षणिक कामांमध्ये व्यस्त राहूनसुद्धा महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थिसंख्येत केलेली लक्षणीय वाढ, इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात मुले प्रवेशित करणे, ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण, स्थलांतरित मुलांचे शिक्षण, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या नियमित प्रवाहात आणण्याचे त्यांचे कार्य सुरूच आहे व असे बालरक्षक शिक्षक जिल्ह्याजिल्ह्यांत पाहायला मिळत आहेत. सध्या स्वच्छता अभियान तथा आदर्श शाळा अभियान हे उपक्रम सुरू आहेत. जसे की राज्यातल्या शाळाशाळांमध्ये उपक्रमांचा महापूर सुरू आहे, असे म्हटले तर नक्कीच वावगे ठरणार नाही.

खरोखर, जर शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून पूर्णतः मुक्त करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ही अध्ययनातील एक तातडीची अन् आवश्यक व अनिवार्य पूर्व अट आहे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. गणित शिक्षकांनी मजबूत पायाभूत ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत. आज दैनंदिन खडू-फळा अध्ययन-अध्यापन पद्धतीसोबतच तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध साधन म्हणून उपयोग करणे अनिवार्य वाटते. आजही काही शाळांना ते शक्य नाही; परंतु जे उपलब्ध आहे त्याचा योग्य वापर करण्यावर भर देणे तेवढेच गरजेचे वाटते.

पायाभूत भाषा साक्षरतेचा विचार करता विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड, शब्दसंग्रह वृद्धिंगत करणे, आकलनयुक्त वाचन, तसेच अस्खलित वाचन, भाषेतील विविध ध्वनीची जाण, भाषेच्या लेखी स्वरूपाची जाणीव, दैनंदिन व्यवहारातील, तसेच मौखिक भाषेचा विकास आणि वाचनाची आवड निर्माण करणे यांसारखे उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने शिक्षक राबवू शकतात. त्यासाठी अशैक्षणिक कामे अनिवार्य करण्यापेक्षा विविध घटकांवर आधारित, तसेच विषयनिहाय तयार केलेल्या शिक्षक मार्गदर्शिका शाळांपर्यंत पोहोचवून त्याचे वाचन आणि अंमलबजावणी शिक्षकांसाठी सक्तीची करावी.

आज विविध समाजमाध्यमांचा प्रभाव लहानांपासून थोरांवर खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. अगदी सर्व वयोगटांतील मुला-मुलींचे व्हिडिओ आज आपणास यू-ट्युब तथा इन्स्टाग्रामसारख्या माध्यमातून पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांमध्ये ही आवड आपण वेगळ्या प्रमाणेसुद्धा वृद्धिंगत करू शकतो. शाळेतील विविध उपक्रमांच्या माध्यमातून, तसेच व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करता प्रत्येक शाळा स्वतःचे न्यूज चॅनेल सुरू करू शकते.

त्या माध्यमातून प्रत्यक्ष बातम्या सादरीकरणाचे कौशल्य, वाचन कौशल्य, उच्चारण, पेहराव, आवाजातील चढ-उतार, गंभीर तसेच मनोरंजनात्मक बातम्यांचे सादरीकरण, त्यादरम्यान चेहऱ्यावरील भाव इत्यादी बऱ्याच गोष्टी शालेय स्तरावर आपण विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत करू शकतो. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून मुलांना ही संधी मिळतेच. मात्र, आज बऱ्याच शाळांच्या स्नेहसंमेलनात विविध गाण्यांवर आधारित नृत्यांचेच कार्यक्रम सादर केले जातात.

जॉन होल्ट यांच्या मते, खरे तर मुलांना शिकवण्याची गरज नाही. त्यांना शिकण्यास प्रवृत्त करण्याची, तसेच त्यांना संधी देण्याची गरज आहे. मुले त्यांच्या गतीने शिकतात आणि त्यांच्या आवडीने त्यांना हवे असलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करतात तेव्हाच ते सर्वोत्तम शिकतात व त्यालाच शिकणे असे म्हणतात. मुलांना शिकण्यासाठी जबरदस्ती करण्याची गरज नाही.

जॉन होल्ट असेही नमूद करतात, की मुलांना नवीन गोष्टी करायला नक्कीच आवडतात; परंतु त्यांना त्या करायला जर कोणी शिकवल्या तर त्यात ते रुची घेतीलच हे मात्र नक्की सांगता येणार नाही. त्यासाठी एकूण शालेय कामकाजाच्या साडेपाच तासांच्या कालावधीमध्ये, शिक्षकांच्या नियोजनामध्ये ते खऱ्या अर्थाने शैक्षणिक कामात व्यस्त असतील तेव्हाच बालकांचे शिकणे आणि शिकण्यास प्रेरणा देणे या क्रिया घडू शकतील.

शिक्षकांनी नियोजित असलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून फक्त उपक्रम घेणे; पण त्यामध्ये मुलांचा सक्रिय सहभाग आहे किंवा नाही हे न पाहता केलेली सक्ती म्हणजे मुले तो उपक्रम किंवा त्या प्रकल्पात अपयशी होऊ शकतात... कारण, सूचना न समजणे, त्यांच्या आवडीचा विषय नसणे किंवा काय साध्य करायचे याची जाण नसणे आणि त्यातून फक्त वेळ वाया जातो. अशा प्रकारचे उपक्रम मुलांना देऊ नयेत की ज्यामधून काहीही साध्य होणार नाही.

शिक्षकांनी दैनंदिन अध्ययन-अध्यापनाशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास किंवा तशी आवड निर्माण करण्यासाठी पूर्वीच्या एका जुन्या पाठ्यपुस्तकातील उपक्रम म्हणजे, की गाव शाळेत जाते. म्हणजे शाळेच्या परिसरात, संपूर्ण गावामध्ये व्यवहारातील शब्द भिंतीवर, झाडांवर इत्यादी सर्व ठिकाणी लिहिल्यामुळे जाता-येता त्या शब्दांची उजळणी होते. खऱ्या अर्थाने जे शाळेत शिकतो ते गावातून फिरतानासुद्धा मुलांना अशा प्रकारचे शब्द वाचायला, पाहायला आणि अनुभवायला मिळतात.

विद्यार्थ्यांच्या निकोप वाढीसाठी स्वच्छतासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी वृद्धिंगत करण्यासाठी १४ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या शासन परिपत्रकातील स्वच्छतेच्या सवयींबाबत जागरूकता निर्माण करण्याकरिता शाळेत घ्यावयाची १२ सत्रे नमूद केलेली आहेत. त्यामधील हाताच्या स्वच्छतेचे एक गीत आहे...

सर्वात आधी होतो... हात ओला

मग हातावर नाचतो... साबण रंगीला

शाब्बास, हाताला मिळते मग... हाताची साथ

नंतर, मग वळून पुढे-मागे... खेळे हात

अरे, खेळा खेळा खेळा दहा... बोटांत शिरून

मग चालवा नखांची... छन छना छन चक्कर

हात करती पाण्यात छम छम छम

कारण स्वच्छ हातामध्येच आहे दम!

यासारख्या किंवा यावर आधारित मुलांच्या दैनंदिन स्वच्छतेबाबत विविध उपक्रम आयोजित करता येऊ शकतात.

आज अभिनय, तसेच मॉडेलिंग क्षेत्राचेसुद्धा मुलांना खूप आकर्षण असते. शाळेत अशा स्पर्धा किंवा उपक्रम घेण्यास नक्कीच हरकत नाही.

दैनंदिन अध्ययन-अध्यापनातून ज्याची कृती सुंदर तो सुंदर/जिची कृती सुंदर ती सुंदर या उक्तीप्रमाणे सौंदर्य फक्त म्हणजे फक्त दिसण्यातच नसते, तर ते कृतीतूनसुद्धा आपल्याला साकारता येते ही जाणीव मुलांमध्ये बिंबवता येऊ शकते. मात्र, खऱ्या अर्थाने जेव्हा शिक्षक अशैक्षणिक कामातून मुक्त होतील त्याचवेळी त्यांना प्रभावी ई-लर्निंग, शाळेचा बोलका परिसर, शाळेचे आनंददायी फलक, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा, भाषा समृद्धी, भारतीय संस्कृतीची ओळख, बालसभा, समाजोपयोगी वस्तूंची निर्मिती, शिक्षक तथा इतरांना वाचता येईल यासारखे मुलांचे हस्ताक्षर सराव वर्ग, प्रयोगशाळेतील साधनांचा प्रभावी वापर, वाचनालयातील पुस्तकांचे वाचन इत्यादी उपक्रम प्रभावीपणे राबवता येतील.

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यातील तरतुदींनुसार शिक्षकांना खऱ्या अर्थाने विज्ञान, गणित, कला, क्रीडा, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांतील विविध सामाजिक आणि अर्थिक पार्श्‍वभूमीतील प्रतिभावान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीसुद्धा शिक्षकांना पुरेसा वेळ मिळेल.

(लेखक निवृत्त प्राचार्य तथा विक्रोळीतील विद्या विकास एज्युकेशन सोसायटीत मुख्य शैक्षणिक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com