खावे  नेटके... एक खाद्यभ्रमंती!

जगभरात ६ मे रोजी ‘जागतिक नो डाएट डे’ पाळला जातो. अनेक जण आहाराच्या बाबतीत प्रचंड काळजी घेतात.
International No Diet Day may 6th health diet combination
International No Diet Day may 6th health diet combinationSakal

- प्रसाद कुळकर्णी

जगभरात ६ मे रोजी ‘जागतिक नो डाएट डे’ पाळला जातो. अनेक जण आहाराच्या बाबतीत प्रचंड काळजी घेतात. आहाराचं पालन करणं म्हणजे शरीराचं आरोग्य समजून नीट खाणं-पिणं. त्यासाठी डायट केलं जातं; परंतु कधी तरी जिभेचे लाड पुरवणंही गरजेचं असतं. अशांसाठी एक खाद्यभ्रमंती, ‘जागतिक नो डायट डे’निमित्त...

जगभरात सोमवारी, ६ मे रोजी ‘वर्ल्ड नो डाएट डे’ पाळला जाईल. त्यनिमित्त खाण्या-जेवण्याची नेमकी कॉम्बिनेशन्स वाचायला काहीच हरकत नाही. अशा कॉम्बिनेशन्सची आपल्याला एवढी सवय झालेली असते की त्या जागी दुसरं काही आलं तर ते आपल्याला रुचत नाही. 

म्हणजे बघा, मेथी किंवा लाल माठाच्या परतून केलेल्या खमंग भाजीचा दरवळ नाकात शिरताच पोटात भुकेने कालवाकालव सुरू होते.  जोडीला तव्यावरची गरम ज्वारीची भाकरी, शेंगदाण्याची चटणी आणि त्यावर साईचं दही. काय बेत जमतो सांगू? पण हीच पालेभाजी,  टोमॅटोचं सार आणि वाफाळलेल्या भातासोबत पानात आली तर सगळाच मूड ऑफ होतो. इथे बटाट्याची काचरीच हवी.

भाकरीसोबत पालेभाजी खुलते; पण खमंग झुणका असेल तर काय सांगू महाराजा! तेल लावत गेली ती पंचपक्वान्नं. साबुदाणा खिचडीसोबत एक वेळ चहा नसला तरी चालतो. त्या जागी वेलदोडे घालून केलेली कॉफी जमून जाते; पण कांदेपोहे, बटाटेवडा आणि भजीसोबत चहा नसेल तर काय मज्जा येणार सांगा? 

सारस्वतात चण्याच्या डाळीची आमटी किंवा सोललेल्या मुगाच्या मुगागाठी करतात. पण कट्टर सारस्वताच्या घशातून ही दुरदुरीत रसदार आमटी नुसती उतरत नाही. जिभेचे चोचले बघा किती! त्यामध्ये काजुगर, ओल्या नारळाच्या कातळ्या पाहिजेतच.

पण खरं तर मऊ भात, त्यावर कढवलेल्या तुपाची धार, त्यावर भरपूर मेतकूट आणि तोंडी लावायला पोह्याचा पापड. अहो, एवढ्या साध्या जेवणाचा काय मस्त बेत जमून जातो. सुख सुख म्हणजे दुसरं काय असतं?

उकडीचे मोदक हा पदार्थ ज्याने कुणी शोधलाय त्याचे मोदकासहित पाय धरावे असं मला वाटतं, पण ती उकडही योग्य व्हायला हवी आणि हाताच्या तळव्यांना चटके खात ती व्यवस्थित मळायलाही हवी. गणेश चतुर्थीला मोदक बनवायला सुरुवात झाल्यापासूनच मला ते माझ्यासमोर केळीच्या

पानावर दिसू लागतात. आता त्याच्या कळ्या बिळ्या फार सुबक सुंदर असाव्यात या मताचा मी अजिबात नाही. मोदक दिसायला नाही चवीला सुंदर झाला पाहिजे. मऊ लुसलुशीत मोदकाची पारी, तिच्यात लिंबाएवढा गुळचुनाचा गोडमिष्ट गोळा आत गेला की हातावर फिरवत फिरवत आणि सगळ्या पाकळ्यांना एकत्र करत तो छान गोंडस पांढऱ्याशुभ्र मोदकाचं रूप घेतो आणि उकडपात्रात स्थानापन्न होतो.

 स्वादासाठी पात्रात खाली हळदीचं पानही ठेवतात. आता तुम्ही म्हणाल समोर केळीच्या पानावर इतर सगळ्या पदार्थांसहित तो आला की लगेच खायचा. घाई अजिबात करायची नाही. आधी त्यांच्याकडे कौतुकाची नजर टाकायची आणि मग त्याला मधून अलगद फोडायचं, पण तेही पूर्ण नाही बरं... फोडताच आतल्या चुनाचा सुगंध मन मोहून टाकतो.

थोडं मनाला आवरायचं आणि दोन चमचे कढवलेलं तूप हळुवार त्यात सोडायचं आणि मग अर्धा भाग अलगद जिभेवर ठेवायचा. अहो, सगळे अष्टसात्विक भाव जागृत होतात त्या चवीने. पुढे आपल्या तब्येतीनुसार मनसोक्त खायचं. सगळं जेवण झाल्यावर शेवटी खायला एक मोदक ठेवायचा. तो खाल्ल्यावर दुसरं काहीही तोंडात टाकायचं नाही. ती जिभेवरची चव जाऊ द्यायची नाही. असो,

आता पुरणपोळी की गुळपोळी?  यामध्ये प्रत्येक जण आपापली आवड सांगेल. पण मला म्हणाल, तर गुळपोळीच भावते. फक्त इथे तिच्यासोबत कढवलेलं तूप न घेता, रवाळ घट्ट तुपाबरोबर गुळपोळीचा खुसखुशीत तुकडा लावून खायचा. पुरणपोळी खाण्यापेक्षा मला डाळ, गूळ घालून शिजल्यावर त्याचं वाटून पुरण बनवलं की त्याचा मोठासा गोळा तुपात चांगला भिजवून खायला फार आवडतो. 

हल्ली ‘केरीनो रस’ नावाखाली आयता विकत मिळणारा आमरस गल्लोगल्ली दुकानात मिळतो. मँगोलाची थोडी जाडसर आवृत्ती असं फार तर त्याला म्हणता येईल. याला कुणी आमरस म्हणतात का? आमरस कसा, हात रसाने पूर्ण माखायला हवा. भांड्यात रस काढून झाला की ते हात चाटणं यासारखा आनंद नाही. 

रस काढल्यावर त्यातल्या गुठळ्या अजिबात मोडायच्या नाहीत. त्यात साखर आणि थोडं तूप (कढवलेलं) घालायचं. आता कुणी म्हणेल, वेलची पूड? काही जण म्हणतील, मिरपूड? अरे काय आहे हे? आपल्याला आमरस हाणायचाय. हे सगळं घालून औषधी चाटण करायचंय का? तर त्यावर म्हणतात, ‘मग बाधत नाही.’  माफ करा, पण बाधतो त्यांनी खाऊच नये. पोळ्यांची चवड, आमरस आणि चव बदलायला काहीतरी सोबत, बस्स, आनंदाचे डोही आनंद तरंग!

आता गाजर हलवा हा आमच्याकडे फक्त गाजर, तूप, साखर आणि दूध एवढ्या घटकांनीच बनतो आणि तसाच आवडतो. त्यामध्ये भरपूर सुका मेवा वगैरे कोंबून तो फक्त श्रीमंती होतो आणि मूळ गाजर आणि तुपाचा स्वादच हरवून जातो.

तुपात गाजर शिजल्यावर त्यात घातलेल्या दुधाचा गाजर तुपासह जो स्वाद दरवळतो त्याशिवाय हलव्याला दुसऱ्या कशाचीही जरूर नसते (अर्थात हे आमचं मत). पण दुधी हलव्याचं तसं नसतं. आधी दुधी कोवळा मिळायला हवा. तो जून असेल तर हलवा चवचवीत होतो. इथे मात्र मावा हवाच. मावा, साखर आणि चारोळी बस्स. एवढ्यावर तो अगदी चविष्ट होतो.

केळ्याचं शिकरण हा प्रकार मला लहानपणापासून अगदी आज साठी पार केलीय तरी मनापासून आवडतो; पण याचंसुद्धा एक तंत्र आहे.  दुधात भराभरा केळं कापून घातलं, साखर घातली की झालं... असं होत नाही. खवय्यांनी नीट लक्ष द्या.

सर्वप्रथम लहानशा; पण खोलगट भांड्यात दूध घेऊन त्यात साखर घालायची (कमी-जास्त तुमच्या तब्येतीप्रमाणे) आणि ती पूर्ण विरघळेपर्यंत ढवळायची. त्याला केळी जरा पिकलेलीच लागतात. नंतर केळ्याचे पातळ गोल काप एका भांड्यात करून घ्यावे आणि चमच्याने मस्त स्मॅश करावे.

मगच ते दुधात घालून पुन्हा एकदा चांगले ढवळावे. केळ्याचा गोडवा पूर्णपणे दुधात उतरल्यावर शिकरण ओरपण्याची मज्जा काही औरच आहे. माझी मामी केळ्याचं रसायण करायची. रसायण म्हणजे नारळाचं दूध काढून त्यामध्ये केळ्याचे काप घालून बनायचं. अर्थात त्यावेळी नारळ स्वस्तही होते आणि त्याच्या रसाला गोडी अन् दाटपणा असायचा. 

रसायणात साखर न घालता गूळ घातला तर फारच चवदार. दूध झालं, नारळाचा रस झाला आता तिसरा प्रकार केळ्याचं रायतं. दह्यात केळ्याचे काप, मिरची, साखर-मीठ घालून रायतं छान लागतं. आमच्याकडे संकष्टीला इतर पदार्थांबरोबर केळ्याचं रायतं हमखास असायचं.

सारस्वतांच्या घरात बनणाऱ्या माशाच्या आमट्या म्हणजे काय सांगू महाराजा... नारळाच्या रसातल्या या कोळंबी, पापलेट, रावस या माशांची आमटी एकदा खाल्ल्यावर कुणीही तिच्या प्रेमात पडणारच. अट्टल मासेखाऊ सारस्वत, ही आमटी (गोव्यात याला हुमण म्हणतात) भात आणि तळलेला माशाचा तुकडा एवढ्या जेवणावर जीव टाकतो.

पदार्थ रुचकर होतो तो त्यामधल्या सगळ्या घटकांमुळे नाही तर तो बनवणाऱ्या गृहिणीच्या हातामुळे. त्या हाताला चव असते. हाताची चव आणि आपल्या माणसांना चविष्ट आणि पोटभर खाऊ घालण्याचा तिच्या मनातला भाव हे त्या पदार्थात उतरतात आणि तो चवदार होतो.  नाहीतर पुस्तकात असतंच की लिहिलेलं, अर्धा इंच आलं, पाव इंच अमुक, सव्वा दोन चमचे तमुक. या सगळ्यातून एक काहीतरी आकाराला येतं खरं; पण ते खाल्ल्यावर वाह! मस्तच! हे मात्र उत्स्फूर्तपणे

येत नाही.

बरेच जण गोडाचा शिरा करतानाही त्यामध्ये बदाम, पिस्ते, काजूचे तुकडे असं काय काय घालतात, पण फक्त पिकलेलं केळं आणि वेलची पूड घालून केलेला गोडाचा शिरा (यालाच काही प्रसादाचा शिराही म्हणतात) आणि सोबत शक्यतो कैरीचं लोणचं. सकाळी केलेला शिरा संध्याकाळी आणखी चविष्ट होतो, कारण केळं जसजसं त्यात मुरत जातं तसतशी त्यांची चव अधिकच यम्मी होते.

दूध-पोहे यासारखा पौष्टिक आहार नाही. ‘जागतिक नो डायट डे’ला हा विचार नको करायला, पण कॉर्नफ्लेक्स किंवा ओट्स खाण्यापेक्षा दूध- पोहे खरंच चांगले. दूध-पोहे-साखरेचं चांगलं मिश्रण झालं की त्यावर साय पांघरायची आणि मग सावकाश खायचं. काय सांगू तो आनंद. तर मुद्दा काय, खाताना पदार्थांचं व्यवस्थित कॉम्बिनेशन करून त्याचा आनंद घ्या.

kprasad1959@gmail.com (लेखक ललित, वैचारिक आणि व्यक्तिचित्र लेखनासह संगीत कार्यक्रमाचे निवेदन करतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com