अजूनही नाटक जिवंत आहे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Pether

मराठी नाटकांसाठी सुसज्ज नाट्यगृहे नाहीत, रसिक मिळत नाहीत, अशा असंख्य अडचणी असल्या, तरी सुमारे पावणेदोनशे वर्षांहूनही अधिक काळाचा इतिहास असलेले मराठी नाटक आजही जिवंत आहे.

अजूनही नाटक जिवंत आहे!

मराठी नाटकांसाठी सुसज्ज नाट्यगृहे नाहीत, रसिक मिळत नाहीत, अशा असंख्य अडचणी असल्या, तरी सुमारे पावणेदोनशे वर्षांहूनही अधिक काळाचा इतिहास असलेले मराठी नाटक आजही जिवंत आहे. त्याचं नेमकं गमक काय आहे, कलावंतांच्या काय समस्या आहेत, राज्य नाट्य स्पर्धेत काय सुधारणा करायला हव्यात, शालेय अभ्यासक्रमात नाट्यशिक्षणाचा समावेश, भारतीय रंगभूमीवर मराठी नाटक कुठे आहे, व्यावसायिक, संगीत, प्रायोगिक नाटकांची बलस्थाने काय आहेत, अशा विविध प्रश्‍नांवर प्रख्यात प्रयोगशील दिग्दर्शक, संवेदनशील अभिनेते अतुल पेठे यांची ‘मराठी रंगभूमी दिना’निमित्त ही खास मुलाखत...

विष्णुदास भावे यांच्या नाटकाचा मराठी रंगभूमीवर पहिला प्रयोग सादर होऊन आता १७९ वर्षं झालीत. बदलत्या मनोरंजन माध्यमांच्या काळातही मराठी नाटक अजूनही टिकून आहे... काय वाटतं?

अतुल पेठे - सर्वप्रथम मराठी रंगभूमीदिनाच्या सर्व कलाकारांना आणि रंगभूमी जगवणाऱ्या आमच्या प्रेक्षकांनाही मन:पूर्वक अभिवादन. आभार. मला असं वाटतं की जगभर रंगभूमीचं महत्त्व आपण जाणतो. ती एक जिवंत कला आहे. जिवंत माणसांनी जिवंत माणसांसमोर सादर केलेली. त्यामुळे जोपर्यंत जिवंत माणसं आहेत, तोपर्यंत ही कला अमर राहणार आहे. तिला मृत्यू नाही. माणसाला कुठल्याही प्रकारे अभिव्यक्त व्हायचं असतं आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्यांशी संवाद साधायचा असतो. या संवाद साधण्यामध्ये त्याला शब्दांची जशी गरज पडते, तशी शरीराची पण गरज पडते. या दोन्हींचा समुच्चय नाटकातील जिवंतपणात आपल्याला बघायला मिळतो. नाटकामध्ये तर आपण सारे एका छोट्याशा जागेत एकत्र असतो. एकाच वेळी, एका काळामध्ये, एकाच अवकाशामध्ये आपण श्‍वास घेत असतो. म्हणजे रंगमंचावरचा कलाकारही श्‍वास घेत असतो आणि प्रेक्षकही श्‍वास घेत असतो.

अनेकदा ते श्‍वास अनेकदा ऐकायलाही जात असतात. ही फार मोठी मजा या कलेच्या माध्यमात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नाटक जिवंत राहण्यातलं हे पहिलं गमक आहे. आपण जसजसे उत्क्रांत होत गेलो, नवनवीन शोध लागत गेले तसतसे करमणुकीची (तथाकथित करमणुकीची) साधनं वाढत गेली. संवादाची माध्यमं वाढत गेली, यात काही शंका नाही. काही वेळा टेक्नॉलॉजी प्रभावी झाली आहे. तंत्राधिष्ठित गोष्टीपण अनेक तयार झाल्या. लोकांना त्या-त्या काळात असं वाटलंही की, रंगभूमी मरेल का? सिनेमा आला तर रंगभूमी जाईल का? टीव्ही आला तर रंगभूमीवर त्याचा काय परिणाम होईल? परंतु आपल्याला असं दिसतं, की रंगभूमी जिथं होती, तिथेच निष्ठेने आणि ठामपणे उभी आहे. कदाचित माझ्या मते आता दोन पावलं पुढे सरकली आहे. कारण लोकांना एकत्र येण्यातली जी गम्मत आहे, ती आता अधिक वाटायला लागली आहे. मधल्या कोरोना प्रकरणानंतर तर प्रायोगिक रंगभूमीला चांगले दिवस येताहेत. नवीन मुलं नाटकात येत आहेत. काम करताहेत. काही व्यावसायिक नाटकांना अतिशय उत्तम गर्दी होतेय. मी परवा ‘चारचौघी’ बघितलं, ‘आमने-सामने’ बघितलं, त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद होता. मला असं वाटतं की लोकांना याची गरज आता जास्त पडायला लागलेली आहे. कितीही संक्रमणं येवोत, मराठी रंगभूमी किंवा जगातली रंगभूमी टिकून राहतेच. त्याचं कारण त्याचा जिवंतपणा हे आहे.

विष्णुदास भावेंचा संगीत नाटकांकडे कल होता. एकेकाळी हीच संगीत नाटकं मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ ठरली; मात्र अलीकडे संगीत नाटकांचे प्रयोग फक्त राज्य शासनाच्या स्पर्धेपुरतेच उरले आहे, याबद्दल काय वाटते?

- एक म्हणजे आपण विष्णुदास भावेंना मान देतो आणि तो दिलाच पाहिजे; पण त्याचबरोबर हाच मान महात्मा जोतिराव फुलेंनाही आपण द्यायला पाहिजे. कारण ‘तृतीय रत्न’ नावाचं अत्यंत महत्त्वाचं नाटक त्यांनी त्या काळात लिहिलं आहे. ‘तृतीय रत्न’चं महत्त्व अशासाठी आहे, कारण ते पहिलं राजकीय नाटक आहे. त्याची लिखित संहिता आहे; परंतु ती संहिता सादर न झाल्यामुळे आपण काहीसं त्याला बाजूला लोटलं होतं. विष्णुदास भावेंनी रंगभूमीला व्यावसायिक स्वरूप देणं, तिची वेगवेगळी स्वरूपं बघणं महत्त्वाचं आहे. त्यांनी अगदी मुंबईपासून वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये ती नाटकं सादर केली. आपल्याडे संगीत रंगभूमीचा उदय झाला, कारण आपल्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं प्राबल्य प्रचंड होतं. पलुस्करांपासून अनेक लोक त्याच्यामध्ये होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे गायक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने आपल्याला बहाल केले होते. त्या वेळी दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व असे अनेक उत्तम गायक आपल्याला लाभले होते. रंगभूमीवर गाणं त्या कथानकाचा भाग होतं. आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या कथानकाच्या शैलीमध्ये म्हणजे दशावतार, तमाशा या लोककलांमधला एक अविभाज्य भाग संगीत आहे, नृत्य आहे, नाट्य आहे; पण आपल्याकडे नृत्यापेक्षा संगीताला जास्त महत्त्व वेगवेगळ्या प्रकारे आलेलं आहे. एकतर संगीतामुळे वेगवेगळ्या प्रकारची गंमत त्या नाटकाला येते, हे आपण पाहतोच. मला असं वाटतं, संगीत रंगभूमीने बरोबर ते उचललं.

नाटक आणि संगीत यांचा मेळ घालत लोकांना रिझवून ठेवण्यासाठी, कथानक पुढे नेण्यासाठी संगीताचा वापर केला. हे जसं सत्य आहे, तसंच त्या गायकाचं गाणं ऐकवणं. कारण गाते उत्तम गळे होते. केशवराव भोसल्यांचा आवाज चांगला होता. बालगंधर्वांचा आवाज तर अद्‌भूतच. गोविंदराव टेंबेंसारखे लोक असतील, अशी अनेक नावं आहेत. त्यातले खाडिलकर, किर्लोस्कर, देवल यांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे असं झालं की, काही काळानंतर विद्याधर गोखल्यांनीसुद्धा संगीत नाटकं पुनरुजीवित करण्याचा प्रयत्न केला; परंतु ज्या अर्थानं संगीत रंगभूमीचा विकास व्हायला पाहिजे होता, तो विकास म्हणजे फक्त पेटी, तबला, व्हायोलिन यांच्यापुरता मर्यादित न राहता सांगीतिक विचार असायला हवा होता. एखाद्या नाटकात संगीत का असतं आणि ते कशासाठी असतं, संगीताचं स्थान काय आहे, याचा महत्त्वाचा विचार आपल्याकडे पंडित भास्कर चंदावरकरांनी केला. तो तुम्हाला ‘घाशीराम कोतवाल’सारख्या नाटकातनं दिसतो.

काही प्रमाणात तो ‘तीन पैशाचा तमाशा’ किंवा जितेंद्र अभिषेकींसारख्या महत्त्वाच्या गायकाने जे योगदान दिलं, त्यांचं आपण ‘लेकुरे उदंड जाली’ बघितलं आहे. हा नवीन विचार भास्कर चंदावरकर आणि जितेंद्र अभिषेकी यांच्यानंतर तितक्या समर्थपणे झाला नाही. ती रंगभूमी तिथंच टाचून राहिली. आपण जरी ‘कट्यार काळजात घुसली’चं नाव घेत असलो, तरी त्यातला मुख्य नायक हाच गायक आहे. त्यामुळे त्यात संगीत येणं वेगळं आणि ‘घाशीराम कोतवाल’मधलं संगीत किंवा ‘महानिर्वाण’मधलं संगीत हे अतिशय वेगळं आहे. कारण ते त्या त्या काळातील परिमिती वाढवणाऱ्या गोष्टी होत्या. मला असं वाटतं की, जुनीच पदं म्हणजे सौभद्र, संशयकल्लोळमधली आजचे गायक गातात आणि फार तर त्याच्यामागे गिटार लावतात. हा काही मी प्रयोग समजत नाही. मला असं वाटतं की त्या संगीताची नवीन पुनर्बांधणी आपापल्या काळानुसार, जसं कवितेमध्ये, साहित्यामध्ये, सिनेमामध्ये आशय आणि तंत्र याचा विचार केला गेला, तो विचार एकजीव झाला. त्याप्रमाणे आपल्याकडे संगीताचा विचार मात्र तितक्या प्रखरपणे चंदावरकर आणि अभिषेकींनतर आणि काही प्रमााणात अनंत अम्मेम्बल, आनंद मोडक यांच्यानंतर झाला नाही. भावी काळामध्ये मात्र जी नवीन मुलं आहेत, ती याचा नक्की विचार करतील, अशी मला खात्री वाटते.

आजच्या घडीला नाटकाची व्यावसायिक आणि प्रयोगिक अशा स्वरूपात विभागणी झाली आहे. त्यातही स्पर्धात्मक आणि हौशी असाही प्रकार आहेच. त्यांची मराठी रंगभूमीसाठीची उपयुक्तता काय? ही बलस्थाने म्हणता येतील?

- मला या सर्व प्रकारची नाटक महत्त्वाची वाटतात आणि ती सारी रंगभूमीसाठी उपकारक आहेत. आपण त्याला विल्हे लावणं असा मराठीत शब्द आहे, विल्हे का लावायची तर त्याला सोपं जातं. कामगार रंगभूमीवरची नाटकं, आंतरबँक, राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, व्यावसायिक, धंदेवाईक, प्रायोगिक अशी अनेक नाटकं मराठी रंगभूमीवर होतात. अल्टिमेटली प्रत्येक जण चांगलं नाटक करण्याच्या शोधात असतो. मला असं वाटतं की, कुठल्याही प्रकारे कोणी नाटक केलं आणि ते चांगलं होण्याच्या दिशेने पाऊल असेल, तर मी त्याचं कायम स्वागत करत आलो आहे. एक संपूर्ण रंगभूमी म्हणून मी त्यांच्याकडे बघतो आणि हे उपकारक आहेत.

एकेकाळी राज्य नाट्य स्पर्धा ही रंगकर्मींची प्रयोगशाळा होती, त्या स्पर्धेकडे आज आपण कसं बघता?

- मला वाटतं महाराष्ट्र शासनाची ही स्पर्धा भारतातील अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. ती घेणारे लोकंसुद्धा काही वेळा निष्ठेने घेत असतात. त्याचे फायदेही झालेले आहेत. काही संक्रमणाचा काळ असतो, तोच तोचपणा येत राहतो. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाने त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कार्यशाळा घेणं, काही आत्ताचे जे चांगले लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीतकार, आमचा प्रदीप मुळेसारखा माणूस असेल, ज्यांनी ३०० नाटकांचं नेपथ्य केलं, तुम्हाला अशी माणसं सापडणार नाहीत. अशा सर्वांकडून वेगवेगळ्या घटकांचा परिचय करून द्यायला हवा. १९९० नंतरची जी पिढी आहे, जिला मिलेनियम पिढी म्हणतात, त्यांचं झालं असं की, विविध नाटकांना ते एक्स्पोज न होता, विविध टीव्ही मालिका, सिनेमे, ओटीटी प्लेटफॉर्म यांना ते परिचित आहेत. त्यांना नाटकामध्ये काय करावं लागतं, नाटकासाठी तपश्‍चर्या काय करावी लागते, नाटकासाठी साधना काय करावी लागते, नाटकासाठी तयारी काय करावी लागते याची जाण, याचं शिक्षण, याची दृष्टी देण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट त्या स्पर्धेमध्ये उत्तम परीक्षक असणं. परीक्षण नीट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे संबंधित खात्याने या स्पर्धेचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे.

थिएटरचं जसं मेन्टेनन्स करावं लागतं, तसं विचाराचंसुद्धा परत परत मूल्यमापन करून मेन्टेनन्स करावं लागतं. आपण नेमकं काय करतोय, काय करायला हवं, काय जुनं झालं, हे बघणं अत्यंत आवश्‍यक आहे. तेच राज्य नाट्य स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या संबंधित विभागानेही करणं गरजेचं आहे. कारण ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे, जिथे लोक नाटक करतात आणि प्रेक्षकही तयार होतात. आयोजन, नियोजन, आशय या सर्वांचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे. काही स्कॉलरशीप देणं, काही अटी घालणं आवश्‍यक आहे. मकरंद साठे, राजीव नाईक, शफाअत खान, प्रेमानंद गज्वी, चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासारख्यांना एकत्र बोलावून या स्पर्धेला अधिक चिंतनाचं, अभ्यासाचं, गांभीर्याचं व्यापक रूप कसं देता येईल, हा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आज जे नवीन दिग्दर्शक आहेत, मोहित टाकळकर, आलोक राजवाडे, धर्मकीर्ती सुमंत यांनाही बोलावलं पाहिजे. गावागावांत काम करणारी माणसं आहेत, शंभू पाटीलसारखा जळगावात काम करतो, कणकवलीचे उदय पंडित, भुसावळचे अनिल कोष्टी, गोव्यात काही रंगकर्मी काम करतात, हे जे लोक आहेत, यांनाही नेमकं काय वाटतं, याचं चिंतन शिबिर होणं गरजेचं आहे. प्रोजेक्ट म्हणून, सरकारी काम म्हणून, फंड संपवायचा आहे म्हणून या स्पर्धेच्या आयोजनाकडे बघितलं जाऊ नये.

वेगवेगळ्या विद्यापीठांतर्गत नाट्यविभाग आहेत, त्या नाट्यशिक्षणाने मराठी रंगभूमीच्या कक्षा रुंदावल्या?

- मला वाटतं होय. पूर्वी कमलाकर सोनटक्के असताना औरंगाबादच्या विद्यापीठात आपल्याला चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवींसारखे अनेक उत्तम दर्जाचे लोक मिळाले. त्यामुळे रंगभूमीचं शिक्षण फार महत्त्वाचं वाटतं. पुण्यामध्ये ललित कला अकादमीमध्ये सतीश आळेकर मुख्य होते, आज प्रवीण भोळे आहेत. तिथून मुक्ता बर्वे, उपेंद्र लिमयेंसारखे कलावंत मिळाले आहेत. छोट्याछोट्या संस्थांनी थिएटर स्कूल तयार केल्या आहेत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मुंबईमध्ये वामन केंद्रे होते, त्यांनी ते केंद्र चांगलं चालवलं. केंद्रं महत्त्वाची आहेत, नवीन शिक्षक चांगले असले पाहिजेत. मुलांना नवीन शिकायला मिळालं पाहिजे. अभ्यास करायला मिळालं पाहिजे. भारतभरातलं नाटक, त्याचप्रमाणे जगभरातलं नाटक त्यांना बघायला मिळेल, थिएटर फेस्टिवल्स होतील, हे बघितलं पाहिजे. आपली खरी अडचण अशी आहे की, राष्ट्रीय पातळीवरचं काहीही माहिती नाही. काहीही संवाद नाही, तर हा संवाद कसा वाढेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा संवाद कसा वाढेल, आपल्याला नाटकं कशी बघायला मिळतील, हे खरं आव्हान आहे. त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

नाट्यकला ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाची गुरुकिल्ली ठरू शकते; परंतु शालेय अभ्यासक्रमात या कलेला स्थान मिळाले नाही. त्याबद्दल काय वाटतं?

- आपल्याकडे एक अज्ञान आहे, कलेबद्दल आपल्या समाजाचा दृष्टिकोन आवश्‍यक तेवढा व्यापक झालेला नाही. कला म्हणजे छंद वाटतो लोकांना. कलेसाठी आपल्याला काही बुद्धी लागते, असंही आपल्याला वाटत नाही. क्रिकेटमधला पैसा दिसायला लागला, प्रसिद्धी दिसायला लागली. त्यामुळे काही आई-वडील मुलांना शिकू नको, खेळ, असं म्हणायला लागलेत. म्हणजे खेळाचे प्रशिक्षण घेणे अत्यावश्‍यक आहे. त्याप्रमाणे या ज्या विविध कला आहेत, तुमच्या शालेय शिक्षणामध्येच त्यांचा अंतर्भाव केला, तर आम्ही जसं म्हणतो ‘थिएटर ॲज अ थिरपी’ ही एक सांघिक कृती आहे. त्याच्यातून तुमचा वाचिक अभिनय सुधारतो. शरीराविषयीचा अवेअरनेस वाढतो, तुमचं मन, बुद्धी, स्मरणशक्ती असे विविध पैलू कलेतून आत्मसात होतात. आपली पंचेंद्रिये सजग असणं, जागृत असणं महत्त्वाचं आहे. कला पंचेंद्रियांना लखलखित करत असते. पंचेंद्रिय लखलखित होणं म्हणजे तुम्ही माणूस म्हणून समृद्ध होणं.

नाटकाचा प्रेक्षक अद्यापही विशिष्ट वर्गापुरताच, शहरापुरताच मर्यादित राहिला आहे, प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रसिकता रुजवायला आपण कुठे कमी पडतो?

- मी सहमत आहे. अद्यापही मराठी नाटक जास्तीत जास्त मध्यमवर्गापर्यंतच सीमित आहे, याची खंत आमच्या सर्वांनाच आहे. वेगवेगळे स्तर आपल्या समाजात आहेत. आम्ही त्यांच्यापर्यंत नाटक पोहचवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही ‘रिंगण’ नावाचं नाटक केलं होतं. ते नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा निषेध म्हणून केलं होतं. आता आम्ही मानस नावाची एक ॲक्टिविटी सुरू केली आहे. त्याच्यातून समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांपर्यंत आपल्याला जाता येईल का, मानसिक आरोग्य म्हणजे काय, हे तपासून पाहतो आहोत. ‘सत्यशोधक’, ‘दलपतसिंग येती गावा’ या नाटकांतून विविध स्तरापर्यंत आपल्याला पोचता येईल, हाच प्रयत्न होता. ‘सत्यशोधक’चा प्रयोग एकदा एका मुस्लिम संस्थेनं घेतला होता. समोर सर्व मुस्लिम स्त्रिया बघून आम्ही थक्क झालो. त्या वेळी लक्षात आलं की, हा एक आपल्या समाजातील महत्त्वाचा घटक आहे, त्याला आपण विसरून गेलो होतो. आपण म्हणतो प्रेक्षक नाहीत; पण आपणही आपले प्रेक्षक नव्याने घडवले पाहिजेत. नव्या प्रेक्षकांपर्यत गेलं पाहिजे, असा त्या दिवशी माझ्यापुरता तरी एक धडा मिळाला. मला असं वाटतं की, छोट्याछोट्या स्तरावर आपण पोहचायचं कसं, याचा खरोखरच विचार केला पाहिजे. शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयानेही याचा विचार करणं अत्यंत आवश्‍यक आहे. कारण कला ही माणसाला समृद्ध करते, एका महत्त्वाच्या प्रवाहात आणते, विकास नावाच्या गोष्टीला ती व्यापक बनवते. त्यामुळे आपल्या समाजात असणाऱ्या विविध स्तरांपर्यंत कला पोचली पाहिजे. आपल्याकडे तर नको असलेले जातीचे स्तर आहेत, धर्माचे आहेत, आर्थिक आहेत, भाषेचे आहेत. ते सर्व ओलांडून आपण माणसांशी संवाद केला पाहिजे. नाटक त्यांना दाखवलं पाहिजे. त्यांना नाटक लिहायला, करायला प्रवृत्त केलं पाहिजे. ते होईल तेव्हा मराठी रंगभूमी सर्व बाजूंनी विकसित होईल.

नाटक लिहिणे, ते दिग्दर्शित करणे, रंगमंचावर सादर करून ते रसिकांपर्यंत पोहचवण्यात व्यत्यय किती प्रकारचे आहेत? ते दूर करण्यासाठी काय करायला हवे?

- कुठलंही क्षेत्र असलं तरी त्यात आव्हानं असतातच. तसंच नाटकाचंही आहे. आज चांगल्या लेखकांची, दिग्दर्शकांची, प्रशिक्षित अभिनेत्याची आमच्याकडे कमतरता आहे. चांगले प्रशिक्षित असतील, तर त्यांना सिनेमा करण्यावाचून पर्याय नसतो. कारण त्यांना जगायचं असतं. कारण जगण्यासाठी पैसा हवा असतो. प्रयोगिक नाटक काही तुम्हाला जगायला पैसा मिळवून देत नाही. कलाकारांना एक स्थैर्य हवं. वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशीप सुरू करणं, थिएटरसाठी सबसिडी मोठ्या प्रमाणावर देणं, फेस्टिवल्स आयोजित करून कलाकार जगतील, असं बघितलं पाहिजे. हा झाला वैयक्तिक भाग. दुसरं म्हणजे थिएटर्सची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्याचं कारण नाटक हा ज्यांचा प्राण आहे, ते लोक चालवत नाहीत; तर नोकरी करणारी सरकारी माणसं चालवतात. थिएटरमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना मान देणं, ते येतील, असा भवताल तयार करणं गरजेचं आहे. तिथे चित्रकलेचे प्रदर्शन व्हावं, संगीताची मैफल व्हावी. पुस्तकांचे प्रदर्शन भरवावे, भारतभरातील वेगवेगळ्या नृत्यांचे कार्यक्रम घ्यावेत, मॉडर्न आर्टचे महोत्सव आयोजित करावेत, यातून थिएटरचा भवताल कलामय होईल. वेगवेगळ्या कला त्या कॅम्पसचा, परिसराचा एक भाग असला पाहिजे. लोकं सहज गप्पा मारताहेत, नाटकावर चर्चा करताहेत, वादविवाद करताहेत, हेसुद्धा फार देखणं असतं. याशिवाय मासिकं असणं महत्त्वाचं आहे. थिएटरच्या संदर्भात फक्त ‘रंगवाचा’ नावाचं मासिक कणकवलीवरून निघतं. छोटीछोटी थिएटर्स तयार केली असली पाहिजेत, त्यांचा मेन्टेनन्स केला, तर तो रंगभूमीसाठी ऑक्सिजन ठरेल.

जागतिक रंगभूमीच्या तुलनेत भारतीय रंगभूमी आणि भारतीय रंगभूमीवर आपले मराठी नाटक कुठे आहे?

- जागतिक रंगभूमीवरचा इतका काही माझा अभ्यास नाही. जगातलं नाटक मी बघितलं नाही. काही ठिकाणचं नक्की बघितलं आहे. अलीकडेच लंडनला गेलो तेव्हा तिथली नाटकं बघितली. फ्रान्समध्ये बघितली; परंतु मराठी रंगभूमीवर आत्तापर्यंत झालेली नाटकं मला अत्यंत महत्त्वाची वाटतात. ती अनेकदा भाषेचा अडसर असल्याने जगभरात पोचली नाहीत, असं मला वाटतं, जसं साहित्याचं झालं आहे; पण मला असं वाटतं, आपलं मराठी नाटक भारतात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मराठीमध्ये आता जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग होतात, ती मला महत्त्वाची गोष्ट वाटते. तेंडुलकर, आळेकर, एलकुंचवार यांच्यानंतर माझे जे समकालीन लेखक आहेत, आमची जी पिढी आहे, जयंत पवार, संजय पवार, प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, राजीव नाईक, मकरंद साठे हे भारतीयस्तरावरचे महत्त्वाचे नाटककार आहेत. चंद्रकांत कुलकर्णीसारखा माणूस आहे, ज्याने ७०-८० नाटकं केली. विजय केंकरेंसारखा माणूस असेल, या सर्वांची कामं फार महत्त्वाची आहेत; परंतु इथे योग्य मूल्यमापन न झाल्यामुळे त्या कामांचं महत्त्व, त्या कामांना नेमकं स्थान अजून तरी लोकेट झालं नाही. कदाचित येत्या काळात लोकांचं लक्ष जाईल; पण प्राप्त परिस्थितीमध्ये भारतीय रंगभूमीवर मराठी नाटक अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कारण आम्ही जेव्हा फेस्टिव्हल्सला जातो, तिथे जो मान मिळतो, प्रेक्षक येतात आणि आमचं नाटक बघतात, त्याच्यावर लिहितात, हे मला महत्त्वाचं वाटतं.

जागतिकतेच्या तुलनेतसुद्धा मला असं वाटतं, ज्या फॅसिलीटीज काही ठिकाणी आहेत, त्यातलं सगळं थिएटर श्रीमंत नाही. ते सबसिडीवर चालतं. आपल्यासारखीच तिथे बोंबाबोंब आहे; पण काही ब्रॉडवेची नाटकं असतील, तर लांबी, रुंदी, उंची आणि असलेल्या सोयीसुविधा या जेवढ्या वाढत जातील, तेवढ्या एका बाजूने नाटक करण्याच्या शक्यता वाढत जातील. अर्थात त्याच्यामुळेच नाटक चांगलं होईल, याची ग्वाही देता येत नाही. म्हणून मी असं म्हणतो की, छोट्या स्तरापासून मोठ्या स्तरापर्यंत थिएटर्स पाहिजेत. ते थिएटर्स चालवणारी माणसं कलेविषयी ममत्व असणारी हवी. सातत्यानं थिएटरची जोपासना करणारी माणसं पाहिजेत. थिएटर जपणारी माणसं पाहिजेत. मला असं वाटतं की, मराठी नाटक हे खरोखर जागतिक रंगभूमीवरचं एक महत्त्वाचं विधान होऊ शकतं. स्टेटमेंट होऊ शकतं आणि ते होण्याची ताकद मराठी रंगभूमीमध्ये निश्‍चित आहे.

(मुलाखतकार : महेंद्र सुके)