न्यूनगंड बाळगू नका! (कौस्तुभ दिवेगावकर)

Kaustubh-Divegaonkar
Kaustubh-Divegaonkar

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
कौस्तुभ दिवेगावकर, आयुक्त, लातूर महापालिका

कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता परीक्षेला सामोरे गेलो. पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरलो. जिद्द सोडली नाही. पुन्हा अभ्यासाला लागलो. यूपीएससी परीक्षेत 2012मध्ये महाराष्ट्रात प्रथम, तर देशात 15व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. प्रशासकीय सेवेत अवघ्या पाच वर्षांत आदिवासी, शहरी, ग्रामीण व मंत्रालयस्तरावरील कामाचा अनुभव घेतला.

प्रशासकीय क्षेत्रात येण्याचा निर्णय कोणत्या टप्प्यावर घेतला?
- मी लातूर जिल्ह्यात वाढलो, शिकलो. माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. काही कारणामुळे मला इंजिनिअरिंग सोडावे लागले. लहानपणापासून वाचनाची आवड होतीच. त्यात मराठी साहित्यात आवड असल्याने मी मराठी विषय घेऊन बीए, एमए पूर्ण केले. यूपीएससीची तयारी करताना सोबत सेट, नेट पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेत असतानाच प्रशासकीय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी अभ्यास कसा केला?
- यूपीएससी करायचीच, हे ध्येय समोर ठेवून अभ्यास करीत राहिलो. वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला. इतिहास या वैकल्पिक विषयात प्राचीन भारताचा व आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करताना मान्यवर अभ्यासकांचे लेख वाचले. ताज्या घडामोडींसाठी विविध नियतकालिकांचे वाचन केले. एनसीईआरटी, महाराष्ट्र बोर्ड, एनबीटीच्या पुस्तकांमुळे विविध विषयांचा पाया पक्का झाला.

प्रशिक्षणाचा अनुभव कसा होता?
- शारीरिक क्षमतेचे प्रशिक्षण दिले जाते. शेतीपासून ते विज्ञान तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन होते. महसूल कायद्याची माहिती दिली जाते. भारत दर्शन हा वेगळा अनुभव तेथे मिळतो. प्रत्येक राज्यातील नामांकित संस्थांना भेटी, तज्ज्ञांशी चर्चा घडवून आणली जाते. सीमेवर लढणाऱ्या जवानांसोबतही काही काळ राहायला मिळते. या प्रशिक्षणात देशाची ओळख होते.

प्रत्यक्ष अधिकारी म्हणून काम करण्याचा अनुभव कसा आहे?
- नागरिकांच्या आशा-आकांक्षा, लोकप्रतिनिधी, धोरण, मर्यादित मनुष्यबळ याचा समन्वय साधत काम करावे लागते. ठाणे जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना वाळू तस्करी, आदिवासींच्या जमिनीचे प्रश्‍न सोडवले. पर्यावरण विभागाचा सहायक सचिव म्हणून वनहक्क कायदा, घनकचरा व्यवस्थापन यात काम करता आले. गडचिरोलीत अप्पर जिल्हाधिकारी व आदिवासी विभागाचा प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले. "पेसा', वनहक्क कायद्याची अंमलबजावणी केली. जळगावमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना जलयुक्त शिवार, घरकुल योजनेत जिल्ह्याला पहिल्या तीनमध्ये आणले. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल केल्या. या कामाचा लातूरमध्ये महापालिका आयुक्त म्हणून काम करताना फायदा होत आहे.

स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना काय सांगाल?
- स्पर्धा परीक्षांत सातत्य आणि संयमाचा कस लागतो. यूपीएससीच्या अभ्यासक्रमाचा आवाका व मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यानुसार संदर्भ साहित्य निवडणे, स्वत:च्या नोट्‌स काढणे, क्‍लासेसच्या गाईड्‌सचा उपयोग मर्यादितच करावा. संदर्भ ग्रंथांमधून विषयाचे सखोल आकलन होते. कमी वेळात व गतीने लेखन करता आले पाहिजे. आपल्याला समजलेला विषय सोप्या शब्दात व संदर्भ देऊन मांडता आला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com