आयपीएल, एमपीएल आणि टी-२०

क्रिकेटचा सरळ साधा खेळ गुंतागुंतीचा करून ठेवणारे संघ अपयशाच्या गटांगळ्या खात डुबले आणि काहीसा धाडसी खेळ करत सुधारणेचा ध्यास ठेवणारे संघ यशाचा मार्ग शोधत पुढं गेले.
ipl 2024 mpl icc t 20 cricket match sport
ipl 2024 mpl icc t 20 cricket match sportSakal

प्रदीर्घ काळ चाललेली टाटा आयपीएल स्पर्धा अखेर संपली. समाधानाची बाब अशी, की ज्या दोन संघांनी खेळात सातत्य राखत कमाल कामगिरी केली तेच दोन संघ अंतिम सामन्यात एकमेकांना भिडले. आकडेवारीचे किंवा क्रिकेटबद्दल मैदानाबाहेर काथ्याकूट करणारे प्रशिक्षक अपयशी ठरले.

क्रिकेटचा सरळ साधा खेळ गुंतागुंतीचा करून ठेवणारे संघ अपयशाच्या गटांगळ्या खात डुबले आणि काहीसा धाडसी खेळ करत सुधारणेचा ध्यास ठेवणारे संघ यशाचा मार्ग शोधत पुढं गेले. खेळाच्या अतिरेकानं दूरचित्रवाणी संचावर सामने पूर्णपणानं बघणारे प्रेक्षक कमी झाले तसेच प्रक्षेपणाचे हक्क चढ्या भावानं विकत घेतलेल्या कंपन्यांना अपेक्षित प्रमाणात जाहिरातदार लाभले नाहीत. एकंदरीत बरंच काही या सर्व स्पर्धेतील निकालातून शिकायला मिळालं.

आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा घाट घालण्यात आला होता. जवळपास दशकापूर्वी जेव्हा पहिल्यांदा अशी स्पर्धा भरवण्यात आली तेव्हा सामने पुण्यात डेक्कन जिमखाना, पीवायसी क्लबच्या मैदानावर भरवले गेले.

जी मैदानं पुणे शहराच्या मध्यभागी आहेत. एमपीएलला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यावर संयोजकांनी दुसऱ्या वर्षी स्पर्धा नेरूळच्या डीवाय पाटील मैदानावर भरवली आणि तिथंच मोठी चूक झाली, प्रेक्षकांनी अर्थातच अत्यल्प प्रतिसाद दिला.

इतकंच नाही तर या स्पर्धेसाठीचे चेंडू इतके खराब ( मऊ) होते की फलंदाजांना मोठे फटके मारणं जमलंच नाही. परिणामी स्पर्धा रंगली नाही. चांगली लय पकडलेली एमपीएल स्पर्धा नंतर काही वर्ष भरवली गेली नाही

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल झाला. अध्यक्षपदी विराजमान झालेल्या रोहित पवार यांनी उचल खाऊन २०२३ मध्ये परत एकदा एमपीएल स्पर्धा भरवण्याचा विचार पक्का केला. क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेच्या अश्वावर आरूढ होत महाराष्ट्रातील विविध क्रिकेटप्रेमी व्यावसायिकांनी नव्यानं चालू होणार्‍या एमपीएल स्पर्धेत भाग घेताना चढ्या भावाने संघ विकत घेताना मोठी बोली लावली.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने संयोजन करताना मोठा धोका पत्करला कारण स्पर्धा पावसाळा चालू होताना भरवली गेली होती. पावसाने व्यत्यय आणल्यानं काही महत्त्वाच्या सामन्यांना धक्का लागला. ज्यात अंतिम सामनाही होता. खूप जाहिरात करून स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करून देण्याचे प्रयत्न केले गेले, ज्याला खूप यश मिळालं नाही.

२०२४ मधील महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धा नुकतीच चालू झाली असताना स्पर्धेवर पावसाचं सावट कायम असेल. त्यापेक्षा खरी मोठी समस्या अशी आहे की कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार्‍या संघ मालकांना उत्पन्न कुठून आणि किती होणार.

गेल्या वर्षीची आणि यंदाची स्पर्धा संघटनेच्या गहुंजे मैदानावर भरवली जाणार असल्यानं प्रेक्षकांचा प्रतिसाद किती मिळणार याची चिंता आहे. संघ मालकांकडून दणदणीत उत्पन्न होत असताना स्पर्धेचा प्रचार-प्रसार होण्यासाठी संघटनेकडून केले जाणारे प्रयत्न आणि खर्च तुटपुंजा आहे. त्याचा विपरीत परिणाम स्पर्धेची जाहिरात मोठ्या प्रमाणात होण्यावर होत आहे.

स्पर्धा नव्यानं सुरू करताना मोठी गुंतवणूक करणार्‍या संघ मालकांना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं शब्द दिला होता, की तुम्ही केलेली गुंतवणूक परत मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. २०२३ आणि २०२४ च्या एमपीएल स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून संघ मालकांना काही आर्थिक दिलासा मिळायची शक्यता कमी आहे.

‘आयपीएल’ स्पर्धा यशस्वी झाली कारण बीसीसीआयनं अत्यंत विचारपूर्वक स्पर्धेचा प्रचार प्रसार केला. आयपीएल स्पर्धेदरम्यान खेळले गेलेल्या क्रिकेटचा दर्जा नेहमीच उत्तम राहिला आहे. स्पर्धा झपाट्यानं लोकप्रियतेची कमान चढत गेल्यानं होणाऱ्या आर्थिक फायद्यातील ठरलेल्या टक्केवारीचा हिस्सा बीसीसीआयनं तत्परतेनं संघ मालकांना दिलेला आहे.

दुसर्‍या बाजूला आयपीएल स्पर्धेला मिळणार्‍या प्रेक्षकांच्या दणदणीत पाठिंब्याने संघ मालकांना आपापल्या संघासाठी प्रथितयश प्रायोजक मिळवणं कठीण गेलं नाही. या सर्वांचा सकारात्मक परिणाम असा झाला, की केलेल्या मोठ्या गुंतवणुकीचा घसघशीत परतावा मिळाल्यानं सर्व संघ मालक फायदा कमावू लागले.

एमपीएल स्पर्धा भरवताना महाराष्ट्र क्रिकेट संघटना नक्कीच कमी पडत आहे. ज्यामुळं संघ मालकांना केलेल्या गुंतवणुकीचा आर्थिक थेट परतावा मिळायचा मार्ग दिसत नाही. हैराण करणारी बाब अशी,

की आपापल्या धंद्यात प्रत्येक गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळण्यासाठी काटेकोर असणारे संघ मालक एमपीएलमध्ये मोठा खर्च करून त्याचा योग्य आर्थिक मोबदला मिळत नसून एमसीएला थेट सवाल करत नाहीत. संघ मालक होण्याची शेखी समाजात मिरवण्याची आणि स्वत:ची हौस भागवण्यातून मिळणाऱ्या आनंदातून समाधान मानणारे संघ मालक मला तरी बुचकळ्यात पाडत आहेत.

२०२४ मधला ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्‍वकरंडक वेस्ट इंडीजसोबत अमेरिकेत भरवला जात आहे. देश म्हणून अमेरिका जितका सुनियोजित आहे तितकंच वेस्ट इंडीज निवांत आणि अव्यवसायिक असतं. एकच लक्षणीय बदल असा आहे,

की यंदाच्या स्पर्धेत ‘आयसीसी’नं तमाम सहकारी राष्ट्रांच्या संघांना मुख्य विश्‍वकरंडक स्पर्धेत थेट खेळण्याची संधी दिली आहे. तब्बल २० संघ या विश्‍वकरंडक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अमेरिकेतील तीन शहरांत आणि सहा कॅरेबियन बेटांवर मिळून ५५ सामने या स्पर्धेत रंगणार आहेत.

यापूर्वीच्या आठ स्पर्धेत वेस्ट इंडीज आणि इंग्लंड संघांनी प्रत्येकी दोन वेळा विजेतेपद पटकावलं आहे. भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघांनी प्रत्येकी एकदा विजेतेपदाच्या करंडकावर नाव कोरलंय.अर्थ स्पष्ट आहे, की बाकी स्पर्धांच्या तुलनेत टी-२० विश्‍व करंडक स्पर्धा तमाम संघांना समान संधी देत आली आहे. यंदाची स्पर्धासुद्धा तशीच असेल कारण चांगले ४-५ संघ चांगली ताकद बाळगून मैदानात उतरणार आहेत.

भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंपैकी एकही खेळाडू आयपीएल अंतिम सामन्यात खेळत नव्हता हा मजेदार योगायोग होता. बऱ्याच लोकांच्या मनात अशी शंका डोकावत आहे, की मुंबई इंडियन संघाकडून खेळताना कर्णधार पदावरून नाराजी नाट्य झालेले रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या उलट भूमिकेत दिसणार असल्याने काय होणार भारतीय संघाचे.

मला इतकाच भरवसा द्यावासा वाटतोय, की रोहित शर्माची भारतीय संघावरची पकड चांगली मजबूत आहे आणि हार्दिक पंड्याला सर्वच स्तरावर आलेले मोठे अपयश त्याला योग्य जागी ठेवण्यात कामाला येईल. त्याचबरोबर प्रशिक्षक राहुल द्रविड योग्य तयारी करून घेत संघातील वातावरण उत्तम ठेवून संघातील तमाम खेळाडूंना चांगली कामगिरी करायला योग्य प्रोत्साहन देईल.

२०१३ नंतर भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेत निर्भेळ यश लाभलं नाहीये. विजेतेपदाचा उपवास भारतीय संघ कसा सोडतो हे अनुभवायला मी तुमचा प्रतिनिधी म्हणून अमेरिका-विंडीज दौऱ्यावर आलोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com