पोलादी कोंदणातील संवेदनशील माणूस !

खाकीतील कणखर पुरुष म्हटले, की ‘आयर्नमॅन’ आयपीएस कृष्ण प्रकाश यांचे नाव सर्वात आधी घेतले जाते.
IPS Krishna Prakash
IPS Krishna Prakash sakal

उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भारतीय पोिलस सेवेतील पहिले ‘आयर्नमॅन’ पद मिळवले तेव्हाच ते अनेकांचे आयडॉल ठरले. जागतिक स्तरावर महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव उंचावणारे निर्भीड, खमके आणि स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे कृष्ण प्रकाश यांचा प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

मूळचे झारखंड हजारीबागचे रहिवासी असलेले कृष्ण प्रकाश १९९८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात रुजू झाल्यापासून त्यांनी हैदराबाद, गडचिरोली, नांदेड ग्रामीण, मालेगाव, बुलडाणा, अमरावती ग्रामीण, सांगली, नगर, मुंबई, पुणे गुन्हे अन्वेषण विभाग आदी ठिकाणी काम करताना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील संवेदनशील-अतिसंवेदनशील शहरांमध्ये प्राणपणाने कर्तव्य बजावत त्यांनी वर्दीची शान राखली आहे. सध्या ते पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदी कार्यरत आहेत. ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक देऊन सन्मानित करण्यात आले. मे २०१८ मध्ये प्रशंसनीय सेवेसाठी त्यांना डीजीएस चिन्ह प्रदान करण्यात आले.

कोविडच्या संकटकाळात पोलिस कुटुंबीयांना मूलभूत सुविधा आणि शहरात बाहेरगावावरून आलेल्या तरुणांना सर्व प्रकारची मदत पोहोचवण्याबरोबरच आरोग्यविषयक जनजागृती करण्यातही त्यांचा मोठा हातभार होता.

मालेगाव दंगलमुक्त

हिंसाचार आणि जातीय संघर्षामुळे नेहमी चर्चेत राहिलेल्या मालेगावमध्ये कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती झाली तेव्हा आव्हानात्मक परिस्थिती होती. नागरिकांमध्ये जातीय सलोखा निर्माण करून अशांतता दूर करत, कृष्ण प्रकाश यांनी प्रस्थापित केलेल्या शांततेमुळे मालेगावात आजतागायत एकही जातीय दंगल घडलेली नाही. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून त्यांना महात्मा गांधी शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगली आणि नगरमध्ये जास्तीत जास्त गावे तंटामुक्त करण्यासाठीही त्यांनी घेतलेला पुढाकारही गौरवास पात्र ठरला.

गडचिरोलीतील तरुणांचा आधार

कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीत चौकटीबाहेर जाऊन केलेली सेवाही उल्लेखनीय ठरली आहे. त्यांनी भिल्ल आणि पारधी समाजाचे पुनर्वसन करण्यासाठी केलेले प्रयत्न विशेष कौतुकास पात्र ठरले. पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक साह्य, गडचिरोलीसारख्या राज्यातील अतिदुर्गम भागातील तरुणांना शिक्षण व रोजगारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. कृष्ण प्रकाश यांनी समाजभान जपत आतापर्यंत सामूहिक विवाह सोहळ्यामधील तब्बल ५१ जोडप्यांचे पालकत्व स्वीकारले आहे.

तृतीयपंथीयांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार

कृष्ण प्रकाश यांनी अलीकडेच ‘बदलाव’ उपक्रमाअंतर्गत तृतीयपंथीयांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे. पिंपरी-चिंचवडमधील सुमारे तीनशे तृतीयपंथीयांची कार्यशाळा घेऊन त्यांना कायद्याची आणि त्यांच्या अधिकारांची माहिती दिली. त्यांना रोजगार मिळावा म्हणून विविध शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर तृतीयपंथीयांची आरोग्य तपासणी आणि आजारावरील उपचारांची मोफत सुविधा त्यांना मिळवून दिली. विशेष म्हणजे तृतीयपंथीयांना पोलिस मित्र बनवून ग्राम सुरक्षा दलात सहभगी करून घेण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत.

खराखुरा ‘आयर्नमॅन’

कृष्ण प्रकाश यांची ‘आयर्नमॅन’ म्हणून सगळीकडे ख्याती आहे. सडेतोड वृत्ती, करारी बाणा आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता बेधडक अन् कठोरपणे निर्णय घेण्याची क्षमता असलेला पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे; पण वर्दीआडच्या त्यांच्या हळव्या मनाचे दर्शनही अनेकदा झाले आहे. जागतिक स्तरावरील तीन खडतर टप्प्यांची आव्हानात्मक ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस’ त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण करून जगभरात देशाचे आणि महाराष्ट्र पोलिसांचे नाव सुवर्णाक्षरांत कोरले आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या स्पर्धेचे आव्हान त्यांनी लीलया पेलले. ३.८६ किलोमीटर पोहणे, ४२ किलोमीटर धावणे आणि १८० किलोमीटर सायकल चालवणे असे स्पर्धेचे स्वरूप असते. कृष्ण प्रकाश यांनी १४ तास आठ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करून वयाच्या ४२ व्या वर्षी ‘आर्यनमॅन’चा किताब मिळवला.

लहानपणीच्या पळापळीचे श्रेय

‘आयर्नमॅन’ स्पर्धेच्या प्रेरणेमागचा कृष्ण प्रकाश यांचा किस्साही मजेशीर आहे. ते मूळचे झारखंडच्या हजारीबागचे. या छोट्या जिल्ह्यात त्यांची शाळा घरापासून चार किलोमीटर अंतरावर होती. मोठे कुटुंब असल्यामुळे घरात सकाळी लवकर जेवण किंवा नाश्ता नसायचा. त्यामुळे सकाळी लवकर गेले की दुपारी जेवणासाठी घरी येण्याखेरीज पर्याय नसायचा. दुपारी पाऊण तासाच्या सुट्टीत अवघ्या वीस मिनिटांत ते शाळेतून पळत घरी येऊन पुन्हा परत जायचे. दररोजच्या अशा पळापळीमुळे शाळेत मला ‘तीव्रगामी’ नाव पडले होते, असेही कृष्ण प्रकाश गमतीने सांगतात. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी म्हण आहे. कृष्ण प्रकाश यांनी स्वकर्तृत्वाने ती सिद्ध केली आहे.

सायकलिंग, पोहणे आणि धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कृष्ण प्रकाश यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. ‘रेस्ट अॅक्रॉस वेस्ट अमेरिका स्पर्धे’तही त्यांनी यश संपादन केले आहे. दीड हजार किलोमीटर अंतर सायकलिंगची स्पर्धा असून तिचा मार्ग पश्चिम अमेरिकेच्या चार राज्यांतून जातो. त्या मार्गावर काही ठिकाणी अतिउष्ण; तर काही ठिकाणी अतिशय थंड प्रदेश लागतो. स्पर्धा पूर्ण करायला तब्बल ९२ तास लागतात. कृष्ण प्रकाश यांनी ती ८८ तासांत पूर्ण करून तिथेही यश मिळवले. सायकलिंगमध्येही नवीन विक्रम साकारला.

साहित्यातही चौफेर मुशाफिरी

वाचनाची प्रचंड आवड असणाऱ्या कृष्ण प्रकाश यांचे हिंदी, मराठी, इंग्रजी आणि उर्दू भाषेववरही प्रभुत्व आहे. आपल्या लेखनकौशल्यातून त्यांनी अनेक कविताही शब्दबद्ध केल्या आहेत. त्यांच्या साहित्यातील योगदानामुळे महाराष्ट्र उर्दू अकादमी पुरस्कार आणि विश्व हिंदी साहित्य पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आयपीएस परीक्षेच्या मुलाखतीमधील त्यांचा किस्साही प्रसिद्ध आहे. परीक्षकाने त्यांना किती गुण देऊ म्हणजे तुम्ही अधिकारी व्हाल, अशी विचारणा केली. त्यावर कृष्ण प्रकाश म्हणाले, की अधिकारी झालो अथवा नाही, हे महत्त्वाचे नाही. मात्र, माझ्या क्षमतेएवढेच गुण द्या. परीक्षकांना त्यांचे उत्तर आवडले... पटलेही. त्यांना १९८ गुण मिळाले आणि ते आयपीएस झाले.

जीवन म्हणजे कसोटी क्रिकेट आहे. जर तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये धावा करू शकला नाहीत, तरी हरकत नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला द्विशतक ठोकण्याची संधी असते, असा कृष्ण प्रकाश यांचा यशाचा मूलमंत्र आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. सत्याच्या मार्गावर चालण्याचा त्यांचा दृढनिश्चय अनुकरणीय असाच आहे.

कोविड काळात पोलिस वॉरियर्सनी केलेल्या कार्याचे कौतुक कृष्ण प्रकाश यांनी कवितेतून शब्दबद्ध केले आहे. ते म्हणतात,

लड़ रहा हूँ जंगे जिगर से,

जब की जीत मिराज है आखिर

फिर भी हार न मानी हमने,

कुर्बानी ही इम्तियाज़ है आखिर

खाकी ही ईमान है अपना,

खाकी ही मजाज़ है आखिर...

‘मटणवाले चाचा’ बनून घेतली पोलिसांचीच परीक्षा

  • कृष्ण प्रकाश आपल्या खास आणि डॅशिंग शैलीसाठी ओळखले जातात. याची प्रचीती त्यांनी पिंपरी-चिंचवडवासीयांना आपल्या कामातून आणून दिली आहे.

  • वेष बदलून शहरातील गुन्हेगारी परिस्थितीचा आढावा घेणे आणि आपल्या कर्मचाऱ्यांबरोबरच अधिकाऱ्यांवरही वचक ठेवणे ही त्यांच्या कामाची विशेष हातोटी.

  • पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांना गुन्हेगारीला आळा घालण्यात मोठे यश आले आहे. शहरातील सर्व अवैध धंदे बंद झाले आहेत.

  • सामान्य नागरिकांना पोलिस योग्य पद्धतीने सेवा देताहेत का? सामान्य नागरिकांचे त्यातून समाधान होतेय का? हे अनुभवण्यासाठी स्वतः कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर केले. चक्क ‘मटणवाले चाचा’ बनून त्यांनी पोलिसांची परीक्षा घेतली.

    खाकीतील कणखर पुरुष म्हटले, की ‘आयर्नमॅन’ आयपीएस कृष्ण प्रकाश यांचे नाव सर्वात आधी घेतले जाते. विशेष म्हणजे, जेव्हा पोलिस खात्यातील संवेदनशील अधिकाऱ्यांची नावे घेतली जातात तेव्हाही त्यांचेच नाव अग्रस्थानी असते. सतत हसतमुख असलेले कृष्ण प्रकाश आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे पोलिस दलातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व मानले जाते. धडाकेबाज कारवायांसाठीही त्यांचे नाव घेतले जाते. नियमांचे पालन करणारे शिस्तप्रिय पोलिस अधिकारी अशी आदर्श प्रतिमा जपत कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे.

    - कृष्ण प्रकाश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com