#ShirolCancer पाणी प्रदुषण, रसायनांचा अतिवापर हीच कारणे

#ShirolCancer पाणी प्रदुषण, रसायनांचा अतिवापर हीच कारणे

शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित... 

प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सरचे अठरा हजार रुग्ण आहेत का? खरी परिस्थिती काय आहे ? त्याची कारणे काय?

उत्तर : अठरा हजार पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती प्रसारमाध्यमातून आली. त्यावेळेस शिरोळ तालुका चर्चेत आला. पण मला असं वाटतं की 18,000 हा आकडा अवास्तव आहे, अतिरंजित आहे. दुसऱ्या बाजूला एका संस्थेने किंवा संघटनेने हा आकडा केवळ 242 आहे, असे जाहीर केले. हा आकडाही बरोबर नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक रुग्ण असावेत असे मला वाटते. शिरोळ तालुक्यामध्ये काहीही कारण नसताना कॅन्सरचे रुग्ण आढळत आहेत, असे जेव्हा निदर्शनास आले त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले. यामागचे नेमकं कारण काय आहे? याचा अभ्यास संघटनेने सुरू केला. विविध कारणे पुढे आली. इडियुपॅथीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले असल्याचेही पुढे आले. याच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या घरातील उदाहरण देऊ इच्छितो. माझ्या पत्नीला पाच वर्षांपूर्वी फुप्फुसाचा कॅन्सर झाला होता. फुप्फुसाचा कॅन्सर स्त्रियांमध्ये खूप किरकोळ असतो. हा कॅन्सर मुख्यतः धुम्रपानामुळे होतो. पण आम्हाला कोणतेही व्यसन नाही. मी स्वतः धूम्रपान विरोधी काम करतो. त्यामुळे हे कारण असण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही राहातो त्या परिसरात सुताचा धागा करणारा कारखाना नाही, रासायनिक कारखाना नाही आणि मग हा कॅन्सर कशामुळे झाला असेल?  यासाठी आम्ही मुंबई येथील कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घेतला. तेथील डॉक्टरांनी सविस्तर माहिती आमच्याकडून घेतली. कारणाच्या मुळाशी जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि कोणतेच कारण आढळत नाही म्हटल्यावर ईडीयुपॅथी हे कारण पुढे केले. माझ्या पत्नीने आग्रहाने त्या डॉक्टरांना विचारले माझ्यामध्ये या कॅन्सरचं कारण काय असू शकतं ? यावेळी मुंबईच्या तज्ज्ञांनी हे कारण सांगितले ते खूप महत्त्वाचे होते. ते म्हणाले, सध्या फळभाज्या, पालेभाज्या यांच्यावर कीटकनाशकांची फवारणी केली जाते किंवा पिकांना प्रदूषित पाणी दिले जाते. त्याच्यामुळे प्रदुषणाचे तसेच किडनाशकाचे अंश खाद्मामध्ये येतात. हे कारण असू शकते. अर्थात हे कारण अजून जागतिक पातळीवर सिद्ध झालेले नाही. जागतिक पातळीवर संशोधन सुरू आहे आणि निश्चितपणे आम्हाला तो संशय आहे.

प्रश्न : रासायनिक खते आणि प्रदूषित पाणी यामुळे  कॅन्सर होतो असे तुम्हाला वाटते का?

उत्तर : 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.  भारताची 1950 साली 40 ते 45 कोटी लोकसंख्या होती. त्यावेळी 51 लाख टन अन्नधान्य पुरत नव्हतं. देशात गहू, ज्वारी आयात करावी लागली. 1965-67 मध्ये हरितक्रांती झाली. अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली.  2013 साली 263 लाख टन तर 2018 मध्ये 277 लाख टनांपर्यंत उत्पादन वाढले आहे. आपण निर्यात करायला लागलो आहोत. स्वयंपूर्णतेच्या दिशेने जाऊ लागलो, पण दुर्दैवाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. घामाचा दाम मिळण्यासाठी लढाई सुरू आहे .

हरितक्रांतीमध्ये हायब्रिड बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके याचा वापर अतिरिक्त झाला आणि त्याचे दुष्परिणाम आता भोगावे लागत आहेत. जमीन निकृष्ट दर्जाची झाली प्रचंड प्रमाणात कीटकनाशक वापरल्यामुळे किड-रोगात प्रतिकार क्षमता वाढली. त्यामुळे जास्तीत जास्त कीटकनाशके वापरावी लागली आहेत. पाण्याचे प्रचंड प्रमाणात मोठं प्रदूषण झाले आहे. हायब्रीड बियाणांचा वापर होत आहे. पारंपारिक बियाणे नसल्यामुळे प्रत्येक वेळेस नव्याने बियाणे घ्यावी लागत आहेत. त्यामुळे भांडवली रासायनिक खतांचा, बियाणांचा, कीटकनाशकांचा भांडवली खर्च वाढत चालला आणि तो शेतकऱ्यांना परवडत नाही. उत्पादन जास्त वाढावे म्हणून खते, किडनाशकांचा वापर आणखीनच जास्त होऊन लागला. या दुष्टचक्रात शेतकरी अडकला. त्यामुळे हे संकट उभे राहिले. जमीन, हवा प्रदूषित झाली. पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे जमिनीत उगवणारे अन्न प्रदूषित झाले. अन्नसाखळी प्रदूषित झाली. मानवी जीवनाला हे किती घातक आहे याचा आता विचार करायला लागेल.

प्रश्न : रासायनिक खतामुळे, कीटकनाशकांमुळे जमिनीत अंश राहतो का ? रायचूर विद्यापीठाने जे संशोधन केले आहे. त्यात तथ्य आहे काय?

उत्तर :आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रायचूर युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्री सायन्सेसच्या प्रयोगशाळेत कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा या चार नद्यांचे पाणी, शिरोळ तालुक्यातील काही भागातील पालेभाज्या, फळभाज्या यांची तपासणी करण्यात आली. यात असा निष्कर्ष निघाला की मानवी आरोग्याला धोकादायक ठरतील अशा रसायनांचा अंश या जमिनीत आहे. हा निर्णय कृषि शास्त्राज्ञानी दिला आहे. 

प्रश्न: कॅन्सर रजिस्ट्री सर्व्हे सरकारच्या बाजूने कसे सुरु आहेत ?

उत्तर : सरकारी हॉस्पिटलची मदत घेऊन सरकारी पद्धतीने सर्व्हे केला. यामध्ये 1400 हा आकडा जाहीर करण्यात आला. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी तज्ज्ञांची चर्चासत्रे घडवून आणली. यामध्ये कृषी तज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीत या विषयाची मांडणी झाली. यामध्ये रासायनिक खतामुळे, केमिकल्समुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे, असा निष्कर्ष निघाला. समतोल पद्धतीने खतांच्या निर्धारित डोस प्रमाणात वापरला तर रसायन मुक्त उत्पादन घेता येते यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

प्रश्न : शेतकऱ्यांना रासायनिक खते वापरू नका हे पटवण्यासाठी काय उपाय कराल?  उत्पादन सेंद्रिय पद्धतीने करण्यासाठी कशी समजूत घालाल?

उत्तर : जनजागृती करणे आहे  हा उपाय आहे.  कृषि तज्ज्ञ डॉ. एच. एम. देसरडा, राज्य नियोजन मंडळ सदस्य यांच्या मते सेंद्रिय शेतीसाठी 100 टक्के अनुदान देण्यात यावे. मात्र हे होण्यास वेळ लागेल. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर विवेकाने, संयमाने व्हायला हवा. परदेशात फवारणी करताना कोणता रोग झाला आहे, हे बघून डोस दिला जाते. भारतात असे कायदे, निर्बंध, नेटवर्क सुरू केले पाहिजेत. 

प्रश्न : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने रासायनिक अंश असणाऱ्या फळांची, फळ भाज्यांची यादी जाहीर केली होती. तो नेमका प्रकार काय?

उत्तर : हा प्रश्न सर्व बागायती शेतकऱ्यांचा आहे. जगभरातील हा प्रश्न आहे. सध्या जगभरात यावर संशोधन सुरू आहे. मे 2016 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्धी पत्रक काढले. यामध्ये अन्नध्यान्यात किटकनाशनकाचा अंश येतो त्याचा थेट संबंध कॅन्सर होण्याशी आहे  त्यामध्ये त्यांनी दोन विभाग केले. एक हाय रिस्क आणि दुसरं लो रिस्क. जे अगोदरपासून हाय रिस्कमध्ये आहेत ते कमी प्रमाणात वापरावेत. अमेरिकेतील आयएई ही संस्था कॅन्सरवर काम करते. त्यांनी एक पत्रक जाहीर करून कोणत्या फळभाजीमुळे कोणता कॅन्सर होणार हे सांगितले आहे. त्यांनी प्रबोधनासाठी दोन याद्या जाहीर केल्या. एक डर्टी डझन यादी दुसरी क्लीन फिफ्टी. जास्त धोकादायक आणि कमी धोकादायक अशी यादी जाहीर केली. डर्टी डझनमध्ये सर्वात जास्त धोकादायक सफरचंद व कमी धोकादायक बटाटा आहे.  क्लीन फिफ्टीयादी मध्ये पंधरा पदार्थांची यादी तयार केली. यामध्ये कांदा हा पहिल्या क्रमांकावर तर मशरुम हा शेवटच्या क्रमांकावर आहे. आपल्या देशात अशी यादी तयार होणे गरजेचे आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय आहार संशोधन केंद्र व कृषी विद्यापीठाने यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com