Rural Life
Rural LifeSakal

कोरोनाकाळातलं सुरक्षित ग्रामीण जीवन !

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्याचा सामना करत आहे. हा तडाखा अगोदरच्या टप्प्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक तीव्र आणि वेगवान आहे.

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्याचा सामना करत आहे. हा तडाखा अगोदरच्या टप्प्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक तीव्र आणि वेगवान आहे. यंदाची सर्वांत अधिक काळजी करण्याची बाब म्हणजे ग्रामीण भागात होत असलेला कोरोनाचा प्रसार. विशेषत: दुर्गम भागातील ग्रामस्थांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण अधिक आहे. दुसरीकडे सध्या देशातील शेतकरी वर्ग हा मशागतीची कामे, बाजार आणि मशागतीनंतरच्या प्रक्रियेत व्यग्र असून यादरम्यान उन्हाळी कामांना देखील सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं रोजंदारीचा हा सध्याचा काळ अत्यंत अटीतटीचा असून या काळात अनेकांना शेती आणि शेतीबाह्य कामे करण्यास बऱ्यापैकी वेळ उपलब्ध असतो. तथापि देशात कोरोना संसर्गाचा प्रसार वेगाने होत असताना त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी सजग राहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

अलीकडच्या एका संशोधनातून कोरोनाचा प्रसार हवेतूनही होत असल्याचे सांगण्यात आले. याचाच अर्थ, आपण एका खोलीत एखाद्या व्यक्तीशी जवळून संवाद साधला नसला तरीही कोरोनाची लागण होऊ शकते. सुदैवाने, अन्य ठिकाणांपेक्षा ग्रामीण भागातील कोरोना प्रसाराची जोखीम कमीच राहिली आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक होणार नाही आणि कोणीही त्याच्या तावडीत सापडणार नाही, यासाठी अजूनही आपण अधिक खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी तीन महत्त्वाचे नियम असून त्यासंदर्भातील माहिती जागतिक आरोग्य संघटना, सरकारी यंत्रणा आणि अन्य संघटनांकडून वारंवार दिली जात आहे. हे नियम म्हणजे मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे. प्रत्यक्षात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात जनजागृती कमी असते, परंतु कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर तेथे रुग्णवाढीचा दर अधिक दिसून येत आहे. त्यामुळे हे नियम तेथेही लागू होतात. महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे झाल्यास, राज्यात नव्याने रुग्णवाढीचा वेग हा २३ टक्क्यांपेक्षा अधिक असून याचा अर्थ कोविडच्या आघाडीवर अधिक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोना संसर्गाची लाट आल्यानंतर इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्चने (आयसीएआर) कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना जारी केल्या. शेतीची कामे करताना शेतकऱ्यांत, शेतमजुरांत कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी अतिरिक्त उपाय सांगितले आहेत. या सूचनांचे पालन करत शेतीची कामे अधिक सुरक्षित करणे गरजेचे आहे.

१) शेतीविषयक कामातील सुरक्षितता

शेती आणि शेतीवर आधारित असलेले कामे ही मोकळ्या हवेत होतात आणि येथे अधिक सुरक्षित वातावरण तयार करायला हवे. कोविड प्रतिबंधक उपायांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. शेतात काम करताना एकमेकांपासून पुरेसे अंतर राखणे आणि स्वच्छता बाळगणे अशी काळजी घ्यायला हवी. शेतीची कामे करणाऱ्या व्यक्तींनी कोरोनाच्या लक्षणांवर लक्ष ठेवावे, जेणेकरुन इतरांना त्याचा त्रास होणार नाही. ‘आयसीएआर’ने दिलेल्या सल्ल्यानुसार, दोन व्यक्तींत चार ते पाच फुटांचे अंतर असावे, शेतीची उपकरणे विशेषत: भाड्याने आणलेल्या उपकरणांचे नियमित सॅनिटायजेशन करणे आवश्‍यक आहे.

२) शेतीतील समस्यांवर तोडगे

बियाणे आणि लागवडीपासून ते काढणीपर्यंत आणि त्यानंतर शेतीच्या विविध कामांसाठी सरकारकडून आता व्हर्च्युअली माहिती आणि मदत केली जात आहे. सरकारच्या किसान सुविधा ॲप दहा लाख जणांनी डाउनलोड केले असून त्यावरुन हवामान आणि बाजारातील माहिती शेतकऱ्यांना मिळत असते. या ॲपशिवाय श्राव्य संदेश, व्हिडिओ आणि ऑडिओ कॉन्फरन्स किंवा मोबाइल चॅटवर आधारित सेवेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ‘रिलायन्स फाउंडेशन’ हे देशभरातील ३९ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोचले असून त्यांनी मोबाईल आणि डिजिटलच्या माध्यमातून शेतीविषयक मदत केली आहे. ‘सी-जिनेट स्वरा’ संस्था इंटरनेटच्या आधार न घेता आदिवासी समुदायापर्यंत पोचली असून त्यांनी या समुदायापर्यंत त्यांच्या भाषेत माहिती आणि बातम्या पोचवल्या आणि पोचवत आहेत.

३) एकत्र येण्यावर निर्बंध

सुरवातीच्या काळात कोरोना साथीमुळे नागरिक गावाकडे परतले. पण कालांतराने रोजीरोटीसाठी शेतीकामे सुरू झाली आणि काहींचे स्थलांतरदेखील पुन्हा सुरू झाले. सध्याच्या काळात सोशल डिस्टिन्सिंगचे नियम पाळणे आवश्‍यक आहे. कोविडच्या लक्षणांवर लक्ष ठेवणे, बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्याची तात्काळ चाचणी करणे विशेषत: परगावातून आलेल्या व्यक्तीची चाचणी करणे गरजेचे आहे.सध्याच्या काळात गटचर्चा आणि एकत्र बसून चर्चा करणे या गोष्टी संपूर्णपणे टाळायला हव्यात.

४) बाजारपेठ, मशिनरी आणि खरेदी

रोजीरोटीसाठी सध्याचा अतिशय कठिण काळ आहे. अनेक प्रदेशात सामूहिक शेतीचा प्रयोग केला गेला आहे. या पुढाकारामुळे केवळ श्रमशक्ती कमी लागत नाही, तर शेतीमालास चांगला भाव मिळण्यास मदत मिळते आणि वाहतूक खर्चही कमी होतो. याशिवाय शेतीमालाचे व्यवहार करताना एकत्रितपणे आणि सामूहिकरीत्या वाटाघाटी करण्याची संधीही मिळते. उदाहरण घ्यायचे झाल्यास सीएचसी ॲप हे अनेक राज्यांत भाडेतत्त्वावर मिळणाऱ्या शेतीच्या उपकरणाची माहिती देण्याचे काम करते. या ॲपमुळे उपकरणासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी प्रत्यक्षपणे प्रवास करुन स्वत:ला जोखमीत टाकण्याची गरज नाही. महाराष्ट्रात बाजारपेठेत प्रवेश करताना शेतकऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य केले आहे.

५) संवेदनशील क्षेत्राकडे विशेष लक्ष

सध्याच्या काळात मानवी आरोग्याची अधिक काळजी घेतली जात असताना शेतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या पशुधनास मात्र पुरेशा प्रमाणात आरोग्य सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय चाऱ्याची कमी उपलब्धता आणि भाववाढ देखील पाहावयास मिळत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी डेअरी उत्पादने विशेषत: दूध हे महत्त्वाचा घटक ठरत आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक बनलेल्या डेअरीला विशेषत: पशुधन, दुधास सुरक्षितता प्रदान करणे गरजेचे आहे.

६) कृषी विज्ञान केंद्राचे सहकार्य

इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्चच्या (आयसीएआर) मार्गदर्शक सूचना कृषी विज्ञान केंद्रामार्फत सर्व राज्यात स्थानिक भाषेत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपल्या जवळ असणारे कृषी विज्ञान केंद्र हे केवळ नियमित शेतीविषयी माहिती देणारा माहितीचा स्रोत नसून आरोग्य सुरक्षेविषयी मार्गदर्शक सूचना देणारे महत्त्वाचे केंद्र आहे. याशिवाय ‘एम-किसान आयसीटी’वरुनही सुरक्षिततेविषयीच्या सूचना देखील उपलब्ध आहेत. सध्याच्या महासाथीच्या काळात उपजीविकेपेक्षा आरोग्य आणि सुरक्षिततेविषयीची माहिती यास प्राधान्य द्यायला हवे. देशासाठी अन्न उत्पादित करत असताना शेतकऱ्यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

(लेखिका कृषिक्षेत्राच्या अभ्यासक आणि रिलायन्स फाउंडेशनमध्ये काम करतात )

(अनुवाद : अरविंद रेणापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com