मराठी वाचनाचा ध्यास 

जयश्री कुलकर्णी
सोमवार, 17 एप्रिल 2017

जगात कुठेही मुलांना वाचनाची गोडी लागायला हवी असेल, तर सुरवात पालकांनी करावी लागते. अगदी एक वर्षाच्या बाळालाही गोष्ट सांगताना हातात गोष्टीचं रंगीत चित्रांचं पुस्तक उघडूनच गोष्ट सांगायला हवी.

रोजच्यासारखीच संध्याकाळी पाय मोकळे करण्यासाठी मी बाहेर पडले होते. काही अंतर गेल्यावर जवळून जाणाऱ्या शाळकरी मुलींच्या घोळक्‍यातल्या एकीचे शब्द सहजच कानावर पडले. 

''अगं, लास्ट सॅटरडेला ना आमच्या स्कूलमध्ये डान्स कॉपिटिशन होते. मीपण पार्टिसिपेट केलेलं. डे आफ्टर टूमारो, आइज सेरेमनी आहे. आय एम व्हेरी एक्‍साइटेड यू नो?'' 

माझ्या कानावर ही वाक्‍यं पडली. अन्‌ ही नेमकी कोणती भाषा असावी या गोंधळात पडले. बहुधा मराठी असावी... पण ही असली आंग्लवस्त्रांकित मराठी? मायबोलीचं हे 'लेटेस्ट व्हर्जन' पाहून मी अचंबित तर झालेच; पण मनोमन खंतावलेही. आता यापुढे आपली ज्ञानोबा तुकारामांची; केशवसुत गडकऱ्यांची भाषा अशीच 'फॅन्सी ड्रेस' करून वावरताना दिसणार असेल, तर कुठंतरी काहीतरी चुकतंय हे नक्की असं वाटून मी काही वेळ विचारातच गुंतून चालत राहिले. 

सध्या मराठी भाषिकांची वाचनाबद्दलची आवड झपाट्याने कमी होत चालली आहे, असा तक्रारवजा नाराजीचा सूर विविध माध्यमांतून अन्‌ चर्चासत्रातून कानावर येत असतो. त्यातही बालवाङ्‌मयाकडे खूपच दुर्लक्ष होतंय; दर्जेदार निर्मिती रोडावली आहे, यावर भर दिला जातो. 

आमच्या लहानपणी ना. धो. ताह्मणकरांची चिंगी आणि गोट्या, यांनी आम्हाला वेड लावलं होतं. रॉबिनहूड, तीन शिलेदार, फास्टर फेणे यांसारख्यांची भा. रा. भागवतांनी घडवून दिलेली जवळीक भारावून टाकणारी होती; पण गेल्या काही दशकांत बालवाङ्‌मयाची खूपच उपेक्षा झाली हे खरं आहे. याबाबत लेखक, प्रकाशक आणि पालक सहमती दर्शवीत असले तरी या परिस्थितीला जबाबदार कोण, याबद्दल मात्र सोयीस्कर मतभेद आहेत. 

जगात कुठेही मुलांना वाचनाची गोडी लागायला हवी असेल, तर सुरवात पालकांनी करावी लागते. अगदी एक वर्षाच्या बाळालाही गोष्ट सांगताना हातात गोष्टीचं रंगीत चित्रांचं पुस्तक उघडूनच गोष्ट सांगायला हवी. 

माझ्या ओळखीची एक आई आपल्या मुलीला अशाच पद्धतीने दररोज गोष्ट सांगायची. गोष्ट सांगताना पुस्तकातल्या ओळीवर बोट फिरवायची. ती मुलगी दीड - पावदोन वर्षांची झाल्यावर तिला जसं बोलता येऊ लागलं तशी ती आता आईच्या हातातलं पुस्तक घेऊन स्वतःच त्यातली गोष्ट बिनचूक सांगू लागली. तिला अक्षरओळख नव्हती, पण पहिली ओळ म्हणजे - एक होता राजा; दुसरी ओळ - तो जंगलात गेला; तिसरी ओळ - त्याला एक हत्ती दिसला, हे तिला अनेकदा पाहून पाठ झालं होतं. आज ती मुलगी दहा वर्षांची आहे. तिला वाचनाची विलक्षण आवड आहे आणि तिची भाषाही तिच्यावयाच्या इतर मुलांपेक्षा खूपच प्रगल्भ आहे. 

मुलांमध्ये ही आवड निर्माण होण्यासाठी जसा पालकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा तसाच लेखक/ प्रकाशक यांचाही दृष्टिकोन आणि प्रस्तुतीकरण महत्त्वाचं ठरते. 
अगदी लहान मुलांसाठीची पुस्तकं भरपूर रंगीत चित्रं असलेली, सोप्या भाषेतली, सहजासहजी न फाटणारी, न चुरगळणारी असायला हवीत. वाढत्या वयानुसार पुस्तकातल्या कथानकांची शब्दयोजना आणि विषयांचं वैविध्य वाढत जायला हवं.

अमेरिकेतल्या एका पुस्तकांच्या भल्यामोठ्या दुकानात जायचा योग आला. तिथली लहान मुलांसाठीची पुस्तकं, अगदी मोठ्यांनाही मोह पडावा इतकी वाचनीयच नव्हे तर प्रेक्षणीय आणि श्रवणीयही होती. पुस्तकांच्या पानापानांतून रंजन ओसंडत होतं. एका पुस्तकाचं पहिलं पान उघडलं अन्‌ काजवे चमचम करायला लागले. पुढच्या पानावरची फुलपाखरं आपले रंगीत पंख हलवायला लागली. प्राणीकथेच्या एका पुस्तकातली गाय स्पर्श केल्याबरोबर हंबरायला लागली. झाडावरच्या कोकिळा गात होत्या, तळ्यातले मासे चक्क पोहत होते. साहजिकच मुलं ही अशी पुस्तकं अगदी झोपेपर्यंत हातची सोडणारच नाहीत. 

मी आपल्याकडच्या काही प्रकाशकांशी याबाबत बोलले. त्यांनी मला व्यवसायाचं गणित मांडून दाखवलं. जेमतेम हजार प्रतींची आवृत्ती, मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडतील अशा किंमती, इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठीतल्या पुस्तकांची अनास्था, निर्मिती खर्च, वितरण व्यवस्थेतल्या त्रुटी... वगैरे वगैरे! या सगळ्यात नक्कीच तथ्यांश आहे; पण आपल्या मर्यादित क्षमतेचा विचार करूनही ग्राहकांना चटकन विकत घ्यावीशी वाटतील अशी देखणी, सुंदर पुस्तकं पेश करता येतील असं मला वाटतं. 

पालक आणि प्रकाशक यांच्याइतकाच आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे वाचनालयं. ज्यांना लिहिता वाचता येतं, अशा शालेय वयातल्या मुलांच्या वाचनाच्या सवयीचं व्यसनात रूपांतर करण्यासाठी सुसज्ज, समृद्ध वाचनालयं अलौकिक काय करू शकतात. शिकागोतल्या एका वाचनालयातला बाल विभाग मी जेव्हा पाहिला तेव्हा अक्षरशः स्तीमित झाले. मुलांच्या हाताला येतील एवढ्या उंचीची पुस्तकांनी भरलेली कपाटं, बसून वाचायला योग्य उंचीची मऊशार न टोचणारी आसनं, हवेशीर, स्वच्छ, मोकळी जागा आणि मुलांना हसतमुखाने कसहीली मदत करायला तयार असलेला सेवकवर्ग! 

ही वाचनालयं मुलांसाठी दीर्घ सुटीत खास उपक्रम ठेवतात. सुटीच्या दिवसांत मुलांनी भरपूर वाचन करायचं आणि वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाबद्दल एका तक्‍त्यात अभिप्रायवजा माहिती द्यायची असते. त्यात त्या पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव याबरोबरच त्या पुस्तकातलं काय आवडलं, काय आवडलं नाही आणि का हे लिहून द्यायचं असतं. जास्तीत - जास्त पुस्तकं वाचून उत्तम अभिप्राय लिहिणाऱ्या मुलांना छोट्यांच्या छानशा कार्यक्रमात प्रतिकात्मक सुवर्णपदक, रौप्यपदक आणि कांस्यपदक देऊन त्यांचं जाहीर कौतुक केलं जातं. किती सुंदर कल्पना! यातून मुलांचं वाचन तर वाढतंच पण भाषाही समृद्धी होते, ज्ञानात फर पडते आणि मुख्य म्हणजे स्वतंत्रपणे विचार करून व्यक्त व्हायला वाव मिळतो. 

याबाबत शाळाही मागे नाहीत. नुसतीच पाठ्यपुस्तकांची उजळणी करत न बसता; मुलांना एखाद्या कथेची आकर्षक सुरवात देऊन - आता ही कथा तुम्ही तुमच्या शब्दांत पूर्ण करा, असं सांगितलं जातं; आणि नंतर प्रत्येकाच्या सर्जनशील प्रयत्नाचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केलं जातं. 

या वाचनयज्ञात लेखकांचा अर्थातच खूप महत्त्वाचा वाटा असतो. एनिड ब्लिटन, हेलन मॉस, बिऍट्रिक्‍स पॉटर यांसारख्यांनी आपलं आयुष्य बालवाङ्‌मयाच्या निर्मितीला बहाल केलं. आपल्या नवनवीन रोमांचकारी साहित्यातून लक्षावधी मुलांना कथावाङ्‌मयाची गोडी लावली. आपल्याकडेही असे मुलांच्या विश्वात रमणारे काही लेखक/ लेखिका झालेत, आहेत. मात्र, त्यांची संख्या आणि व्याप अजूनही खूप वाढायला वाव आहे. 

मला हे माहीत आहे की युरोप - अमेरिकेतल्या सोयी-सुविधा आणि आपल्याकडची परिस्थिती आणि समस्या वेगळ्या आहेत. त्यांना तोंड देतच आपल्याला वाटचाल करायची आहे. हा सगळा विविध घटकांच्या एकत्रित प्रयत्नांतून, परिश्रमातून चालणारा महायज्ञ आहे. वाचनसंस्कृती जपणारा आणि जोपासणारा हा उपक्रम अविरतपणे चालायचा तर नुसत्या चर्चा करून, उत्तरदायित्व ठरवून आणि स्वतः नामानिराळे होऊन भागणार नाही. या पालखीला प्रत्येकाने आपापल्या परीने पुढे नेण्याचा मनःपूर्वक संकल्प आणि प्रयत्न करायला हवा. 

'योग्य वेळी हाताशी धरा' (कॅच देम यंग!) या घोषणावाक्‍याचा आपण व्यक्तीशः आणि समन्वयाने विचार केला तर आपलंही बालवाङ्‌मय आणि लहान मुलांचं विश्व समृद्ध, सुखद होईल असा विश्वास वाटतो.

Web Title: Jayashri Kulkarni writes about Marathi Language