कुतूहलातून विज्ञानाकडे...

‘धडपड प्रयोगशाळा’ हा वयम् चळवळीचा अनोखा शिक्षण प्रयोग. इथं मुलं निरनिराळ्या मॉडेल्सद्वारे विज्ञानाची ओळख करून घेतात. कित्येकदा स्वत: मॉडेल्स बनवतात.
कुतूहलातून विज्ञानाकडे...
Summary

‘धडपड प्रयोगशाळा’ हा वयम् चळवळीचा अनोखा शिक्षण प्रयोग. इथं मुलं निरनिराळ्या मॉडेल्सद्वारे विज्ञानाची ओळख करून घेतात. कित्येकदा स्वत: मॉडेल्स बनवतात.

‘धडपड प्रयोगशाळा’ हा वयम् चळवळीचा अनोखा शिक्षण प्रयोग. इथं मुलं निरनिराळ्या मॉडेल्सद्वारे विज्ञानाची ओळख करून घेतात. कित्येकदा स्वत: मॉडेल्स बनवतात. विज्ञानाचे प्रयोग शिकतात, संकल्पना ओळखीच्या होतात. इथे मुलांना मुक्तपणे प्रश्न विचारायला वाव आहे, स्वतःहून प्रयोग करायची संधी आहे. परिसराबद्दलचे, मानवी शरीरसंस्थेचे, आसपासच्या अनेकविध गोष्टींविषयी कुतूहल वाटणे, कुतूहलातून प्रश्न निर्माण होणे, प्रश्न सोडवण्यासाठी करण्याच्या कृती करणे आणि यातून परिसराचे विशेष ज्ञान होणे. या सर्वांचा अर्थ म्हणजेच ‘विज्ञान’ समजण्याच्या दिशेने प्रवास...

गावात फिरताना एखादं मूल गडा (टायर) फिरवताना दिसतं. कुठे तरी एक चारपाच जणींचं टोळकं ‘सरकबंडी’ खेळताना दिसतं. सरकबंडी म्हणजे लाकडाच्या फळीची घसरगुंडी. टाकून दिलेल्या बाटल्यांची आगगाडी, तिला बाटल्यांच्या बुचाची चाकं असं खेचत नेताना तीनचार बारकी पोरं दिसतात. शेगटाच्या झाडावर चढून निरगुडीच्या काड्यांनी पत्र्याच्या डब्यावर बॅंड वाजवताना दिसतात. व्यवस्थित आतबाहेर करता येईल अशी घरांची हुबेहूब प्रतिकृती मुलं तयार करतात. ही सारी खेळणी त्यांची त्यांनीच बनवलेली असतात. हे सगळं कुठून शिकतात? एकमेकांचं पाहून, स्वत: करून-करून. खेळताना, खेळणी बनवताना त्यांना मज्जा तर येतेच, पण त्यातलं स्वतःचं स्वतः शिकणं जास्त महत्त्वाचं. खेळणी त्यांना जवळची वाटतात, आपली वाटतात. मग शाळेतही ही ‘खेळणी’ बनवणं आणि खेळणं आणता येईल का?

‘धडपड प्रयोगशाळा’ हा वयम् चळवळीचा असाच अनोखा शिक्षण प्रयोग. इथं मुलं निरनिराळ्या मॉडेल्सद्वारे विज्ञानाची ओळख करून घेतात. कित्येकदा स्वत: मॉडेल्स बनवतात. मॉडेल्स बनवताना-करताना विज्ञानाचे प्रयोग शिकतात, संकल्पना ओळखीच्या होतात. इथे मुलांना  मुक्तपणे प्रश्न विचारायला वाव आहे, स्वतःहून प्रयोग करायची संधी आहे. इथे ‘विज्ञान पेटी’ ही केवळ विज्ञान दिनापुरती मर्यादित राहत नाही तर ती त्यांच्या रोजच्या जगण्यात आपसूक येते. परिसराबद्दलचे, मानवी शरीरसंस्थेचे, आसपासच्या अनेकविध गोष्टींविषयी कुतूहल वाटणे, कुतूहलातून प्रश्न निर्माण होणे. प्रश्न सोडवण्यासाठी करण्याच्या कृती करणे आणि यातून परिसराचे विशेष ज्ञान होणे.

या सर्वांचा अर्थ म्हणजेच ‘विज्ञान’ समजण्याच्या दिशेने प्रवास... हे उपक्रम पाठ्यपुस्तके आणि परिसर यांची सांगड घालून तयार केले आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य हे शक्यतो आजूबाजूला मिळणारे असते. शिकणं कुठेही-कसेही घडू शकते, फक्त त्याला आकार देणारे दोस्त पाहिजेत. हे उपक्रम घेणारे ताई-दादा ही मोठ्या दोस्ताची भूमिका बजावतात. विज्ञान प्रयोग दाखवतात, मुलांना स्वतः करण्यास प्रोत्साहन देतात. कधी आपली माती तपासायची असते. कधी आपला श्वास मोजायचा असतो. तर कधी आपण खातो तो दुकानातला खाऊ नक्की कसा-कशापासून बनतो याच्या खोलात शिरायचे असते. घरातल्या कुणाचा रक्ताचा रिपोर्ट असेल तर तो वाचायला शिकायचे असते. आपल्या शरीरात १.५ मीटरचं एक वेटोळे असलेला अवयव आहे, हे पचनसंस्थेच्या मॉडेलमध्ये प्रत्यक्ष पाहिल्यावर मुलांना फार गंमत वाटते!

कुठलेही मॉडेल हे मुलांसाठी आधी खेळणे असते. तसे ते असले तरच ते विविध प्रकारे हाताळण्याची शक्यता वाढते. कारण खेळण्यातून काही शिकण्याचा उद्देश नसतो. म्हणूनच आम्ही सुरुवातीला प्रयोग दाखवताना-मॉडेल करताना वैज्ञानिक संज्ञा टाळतो. हवेच्या दाबाची खेळणी करताना जाणीवपूर्वक दाब/प्रेशर ही संज्ञा येत नाही. मुले साधी बाटली, फुगे यांच्या मदतीने खेळणं तयार करतात. पाण्याचे फुग्यामुळे उडणारे कारंजे मजेशीर वाटते. त्यातूनच पुढे ‘हे असं का झालं’ याकडे वळतो. उपक्रम घेताना आम्ही जाणीवपूर्वक ‘भाषण’ टाळतो. कधी व्हिडीओ दाखवून त्यावर त्यांना कृती- निरीक्षणे- विचार करायला सांगतो. कधी नुसतेच मॉडेल दाखवून मुलं त्यावर काय-कशी कृती करतात हे पाहतो. कधी परिसरातून काही वस्तू गोळा करून त्यावरून चर्चा करत प्रयोगापर्यंत पोचतो. प्रत्येक टप्प्यावर अडचणी-समस्या मुलांची वाट बघत असतात. कोणतंही खेळणं चाललं नाही की त्याला सुरळीत चालतं करण्याचं आव्हान गटांपुढे असतं. हे आव्हान हीच शिकण्याची प्रेरणा ठरते.

‘फुप्फुसं हवा कशी भरून घेतात?’ हातेरी शाळेवर फुप्फुसं कशी काम करतात, यावर चर्चा चालली होती... श्वास घेताना आणि सोडताना नेमकं काय होतं? श्वास घेतो तेव्हा हवा कुठे जाते? यासाठी साधं बाटल्या आणि नळ्यांपासून बनवलेलं फुप्फुसाचं मॉडेल! हे फुप्फुसाचं मॉडेल बनवायला मुलांनी स्केचपेनाच्या कांड्या वापरल्या. गावात आजूबाजूला पडलेल्या प्लास्टिक बाटल्या वापरल्या. फुग्याचा पडदा वर-खाली करून बाटलीतले फुगे फुगताना पाहिल्यावर मुलांना फार गम्मत वाटली! मॉडेल नंतर, आधी त्यांचं खेळणंच झालं ते. त्यांनी स्ट्रॉवर बोट ठेवून पाहिले. ‘‘आता का फुगे फुगत नाहीत?’’ असा आपसूकच प्रश्न आला त्यांच्याकडून.

फुप्फुस या न दिसणाऱ्या अवयवाशी मुलांचं काही तरी जुळलं गेलं. त्यात रस निर्माण झाला. मग यातूनच खोलात शिरता आलं. मॉडेल दाखवून झाल्यावर मुलांनी स्वतःहूनच पाठ्यपुस्तकं उघडली. त्यात दाखवलेले श्वसनसंस्थेचे चित्र आणि स्वतः बनवलेले मॉडेल हातात घेऊन त्यातील साधर्म्य ताडून पाहू लागले. आता मॉडेलमध्ये नसलेल्या फुप्फुसाच्या इतर भागांवरच्या गप्पा रंगल्या. वायुकोष, श्वसननलिका आणि काय काय... एरवी जड जड वाटणारे शब्द- पण त्यांचाही अर्थ आता कळायला लागला.

‘मलाही मूल होऊन खेळावं वाटलं या परिदर्शकाशी (periscope). याआधारे आता मला प्रकाश परावर्तनाची संकल्पना वर्गाला समजावणं सोपं जाईल...’ कोरतड शाळेवरच्या शिक्षकाची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया!

शिक्षकांना वर्गात प्रत्यक्ष शिकवताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शिक्षक प्रशिक्षण-संवाद आयोजित केला होता. विज्ञान शिकवणाऱ्या ९० टक्के शिक्षकांची विज्ञान शाखेची पार्श्वभूमी नसल्याने धडा वाचून दाखवणं, धड्याखालचे स्वाध्याय सोडवणं यापलीकडे ‘विज्ञान शिकणं’ होतच नाही. मग यातून विज्ञान अतिशय अमूर्त वाटायला लागतं. शिक्षकांना शिकवायला आणि मुलांना शिकायला मजा यावी आणि उपयोग व्हावा यासाठी सातवी आणि आठवीच्या अभ्यासक्रमातल्या १७ संकल्पनांवर आधारित विज्ञान मॉडेल्स वयम् चळवळीने जव्हार तालुक्यातल्या २४ जि. प. शाळांमध्ये दिली.

ही विज्ञान मॉडेल्स बनवण्यासाठी आम्ही समाजमाध्यमांवर हाक दिली. त्याला प्रतिसाद म्हणून १५ ते ६० वयोगटातील उत्साही मित्रमंडळी मॉडेल्स बनवण्याच्या कार्यशाळेत सामील झाली. काही शाळांतून स्थानिक मुलंही एक दिवस हातभार लावायला आली. यात कॅलिडोस्कोप, पेरिस्कोप, अणू रचना, पोटातील अवयव, फुप्फुसाचे मॉडेल, चार प्रकारच्या सांध्यांचे मॉडेल, मातीचे थर अशी मॉडेल्स आहेत. त्यावर क्यूआर कोड चिकटवला आहे. जेणे करून शिक्षकांना सहजतेने इतर संदर्भ व्हिडीओ, पाठातील संदर्भ आणि संकल्पना समजून घेता येईल. विज्ञान असं पुस्तकातून उठून सरळ हातात आलं की किती मजा येते हे चोवीस शाळांतील काहीशे मुलं अनुभवत आहेत.

धडपड प्रयोगशाळा म्हणजे विज्ञानाच्या अद्‌भुत दुनियेकडे जाणारी एक वाट आहे. या वाटेवर मुलांच्या सोबत चालू इच्छिणाऱ्या-त्यांना ही वाट अधिक सोपी करून देऊ शकणाऱ्या अनेक विज्ञानप्रेमींची आम्ही वाट पाहत आहोत...

(लेखिका वयम्‌ चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com