‘प्रायोग’शील उकल

अख्ख्या गावासमोर रामखिंडच्या पोरांनी रानभाजी प्रकल्प सादर केला.
Mobile Stand
Mobile StandSakal
Summary

अख्ख्या गावासमोर रामखिंडच्या पोरांनी रानभाजी प्रकल्प सादर केला.

अख्ख्या गावासमोर रामखिंडच्या पोरांनी रानभाजी प्रकल्प सादर केला. जंगलात हिंडणं वेगळं आणि जंगलाच्या नकाशाआधारे, त्यात नेमक्या ठिकाणी भाज्यांच्या जागा दाखवणं हे बारकाईनं टिपण्याचं, दिशांचं भान ठेवून करायचं काम होतं. पोरांनी ते सराईतपणे, ऐटीत, आलेल्या पाहुण्यांना जंगलाच्या नकाशातून समजावलं... या प्रकल्पांच्या निमित्ताने पुस्तकाबरोबरच आपल्याजवळची माहितीही विविध माध्यमातून मांडू शकतो, याचेही प्रयोग करता आले.

आसपासच्या परिसराचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून परिसर अधिक नेमकेपणाने समजून घेणं हे होतं ‘उकल’चं उद्दिष्ट. परिसराचा अभ्यास म्हणजे काय, त्याचे टप्पे कसे ठरवायचे, अभ्यास पद्धती काय वापरायच्या, हे होतं आमच्या पुढचं मोठं आव्हान. माहिती असलेल्या जगाकडून माहीत नसलेल्या जगाकडे जाणं हे शिक्षणाचं सूत्र मानलं जातं. आम्हीही तेच करायचं ठरवलं. मुलांना माहीत असणाऱ्या जगात पक्षी होते, मासेमारी होती, खेळ होते, रानात मिळणाऱ्या भाज्या होत्या. यातून आकाराला आलेल्या प्रकल्पांतून काय पुढं आलं?

आमचा आम्ही बनवला मोबाईल स्टॅंड!

आपल्याकडे शेतीची, शिकारीची, मासे पकडायची कुठली साधनं आहेत? ती कशी बनवतात, काय साहित्य लागतं? कोण बनवतं? मुळात ‘साधन’ म्हणजे तरी काय?

जि.प. बोराळे शाळेतील मुलांनी साधनांचा प्रकल्प केला. शिकार, स्वयंपाक, मासेमारी, शेती यासाठी लागणारी विविध साधने त्यांनी अभ्यासली. साधनांच्या पहिल्या टप्प्यात साधनांची प्रक्रिया उलगडून दाखवणारे व्हिडीओ बनवले. यासाठी त्यांनी त्यांच्या आजीला आजोबाला साधनांची खोलात माहिती विचारून घेतली. त्या निमित्ताने गावातल्या मुडा बनवणाऱ्या (मुडा म्हणजे मासे पकडायचा बांबूचा सापळा) बनवणाऱ्याचीही मुलाखत घेतली.

घरात, गावात, रोजच्या वापरात लागणारी अशी १०१ साधनांची यादी निघाली. या साधनांचा पुढे विस्तृत वर्गीकरण केलं. त्यांचा आकार, वजन, उपयोग, पूर्वी मिळत होतं-आता मिळतं, कोण बनवतं, गावात बनतं का, अशा अनेक निकषांच्या आधारे वर्गीकरण केलं.

व्हिडीओ करताना आपल्या व्हिडीओमधली कुठली माहिती कमी पडली, आपल्याला कुठल्या अडचणी आल्या, आपण सांगितलेल्या साधनांची माहिती बरोबर पोहोचली असेल ना, अशा सगळ्या प्रकारे व्हिडीओचं विश्लेषण झालं. आपण केलेल्या अभ्यासावरून साधनांची आपली व्याख्या काय असेल? आपणही असे एखादे साधन बनवू शकतो का? यावरही चर्चा झाली. या केलेल्या अभ्यासाचाच पुढचा टप्पा म्हणजे आपण स्वतः असं एखादं साधन बनवून पाहणं! आपल्याला व्हिडीओ करताना आलेल्या अडचणींना लक्षात घेता व्हिडीओ शूटिंगसाठी एखादा मोबाईल स्टॅन्ड आपणच बनवू, असं ठरलं.

त्यातही तीन-चार पर्यांयाचा विचार झाला. आधी दोरीवरचा वरखाली होऊ शकणारा स्टॅण्ड बनवला. खोक्याच्या आत मोबाईल ठेवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने दोऱ्या ताणून घट्ट केल्या; पण मग त्यातल्या अडचणी लक्षात घेता दुसरा स्टॅन्ड बनवायला घेतला. नव्याने करायचे बदल लक्षात घेतले. यादरम्यान ट्रायपॉडची रचना नीट पाहून घेतली. ट्रायपॉड कसा वर-खाली होऊ शकतो, कसा मागेपुढे होऊ शकतो हे नव्यानेच उलगडलं. मग शाळेतलाच बांबू आणला, मध्यभागी क्रिकेटचा स्टम्प वापरला. आता हा तीन वेगवेगळ्या उंची साधणारा स्टॅन्ड तयार झाला, यावर खोका ठेवून दोरीने बांधले; पण तरी स्थिर बसत नव्हता. मग लाकडाच्या फळीचा तुकडा वापरायचं ठरलं. सायकलची जाड तार, गलोलीचा रबर असं सगळं घेऊन नेमक्या सांध्यांची रचना केली. अखेर विविध जुगाड करून, कधी मोजून मापून, अडखळत पुढे जात जिद्दीनं स्टॅन्ड पूर्ण केला!

पोरांनीच गाजवला रानभाजी महोत्सव

वयाच्या १२ वर्षांपर्यंत या पोरांच्या ४०च्या वर भाज्या खाऊन झाल्या होत्या.. इतकं वैविध्य. जंगलात भाज्या कुठे मिळतात हे पोरांना पाठ असतं. जंगलात हिंडायला तर आवडतं; पण कमरेएवढ्या गवतात, पावसांत, कसातरी हातात फोन सावरून ॲपमध्ये भाज्यांचं Geo tagging करायचीही वेगळीच गंमत!

मुलांनी रानभाजी प्रकल्पात त्यांच्या जंगलात सापडणाऱ्या भाज्यांचा अभ्यास केला. तब्बल ४३ भाज्या नोंदवल्या. आपण कुठल्या भाज्या किती प्रमाणात खातो, त्या जंगलात नक्की केव्हा सापडतात, त्याला डिरे (मोहोर) केव्हा येतात, कधी त्या खाण्यायोग्य होतात या सगळ्यावर चर्चा चांगलीच रंगली. या निमित्ताने पहिल्यांदाच आपली आई शाळेतल्या शिक्षकाच्या खुर्चीत बसून रानभाज्यांविषयी सांगतीये, हा मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठीही फार वेगळा अनुभव होता.

जंगलातून फुकट आणि बाजारातून विकत असं तक्त्यात मांडताना त्यांच्या लक्षात आलं. जंगलातून फुकट मिळणाऱ्या गोष्टी भरता भरता कागदच संपलाय. कुठल्या भाज्यांचे कुठले भाग खातो, हे मुलं सहज सांगत होती. उदा. टेटूची फुलं, कवदाराची केळी, कडू कांद, मोख्याचा पाला इत्यादी; पण ते आता एका विशिष्ट मांडणीत बसवायचे होते, हे त्यांच्यासाठी नवे आव्हान होते.

या रानभाज्या कशा रांधायच्या, खायच्या असतील, तर त्यासाठी काय काळजी घ्यायची, या प्रक्रिया सांगणारी, रानभाज्यांचे तपशील सांगणारे व्हिडीओ, पोस्टर्स पोरांनी तयार केली. ही पोस्टर्स करताना त्यांना लिहायला जड जाणारे शब्द, एखादी माहिती व्यवस्थित पोचली की नाही, यासाठी लागणारी रचना, प्रक्रियेचा क्रम हे सगळंच ओघाने शिकता येत होतं. ‘आपल्या जंगलात कुठल्या भाज्या कमी झाल्यात, कुठल्या भाज्या खाणं आपलं कमी झालंय, का कमी झालंय’ - माहितीतून, मांडणीतून समोर आलेल्या अशाही प्रश्नांना हात घातला.

मग अख्ख्या गावासमोर रामखिंडच्या पोरांनी रानभाजी प्रकल्प सादर केला. जंगलात हिंडणं वेगळं आणि जंगलाच्या नकाशाआधारे, त्यात नेमक्या ठिकाणी भाज्यांच्या जागा दाखवणं हे बारकाईनं टिपण्याचं, दिशांचं भान ठेवून करायचं काम होतं. पोरांनी ते सराईतपणे, ऐटीत, आलेल्या पाहुण्यांना जंगलाच्या नकाशातून समजावलं.

पालघरबाहेरील पाहुणे, सरकारी अधिकारी, गावातली मंडळी या सगळ्यांसमोर आपला रानभाजी-अभ्यास मांडला. एकत्र भाज्या खात- मनसोक्त गप्पा मारल्या.

आत्तापर्यंत मुलांनी मोबाईल फोन हा केवळ पबजी, टेम्पल रन, व्हाट्‌सॲपसाठी वापरला होता; पण या वेळी तो साधनांचे व्हिडीओ बनवण्यासाठी, रानभाज्यांचं Geo tagging करायला वापरला. केवळ पुस्तकातूनच माहिती वाचली होती; पण या प्रकल्पांच्या निमित्ताने पुस्तकाबरोबरच आपल्याजवळची माहितीही विविध माध्यमातून मांडू शकतो, याचेही प्रयोग करता आले. याच्याही पलीकडे जाऊन काही अंशी स्वत:ही नवनिर्मिती करू शकतो, याचं बळ आलं मुलांकडे! कधी निखळ आनंद, कधी नवी आव्हानं देणारी ही प्रक्रिया फार सुंदर आहे, हे उकलावे तितके थोडेच!

(उत्तरार्ध)

(लेखिका वयम् चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com