अमेरिकेच्या अध्यक्षांचा शपथविधी खेड्यात! (जयप्रकाश प्रधान)

जयप्रकाश प्रधान
रविवार, 9 जून 2019

आपल्याला झगमगती, चमचमती, वलयांकित अशी शहरी अमेरिका माहीत असते. त्या देशाचा ग्रामीण भाग आपल्यासाठी अज्ञातच असतो. मात्र, ग्रामीण अमेरिकेच्या काही भागाचं ओझरतं का होईना दर्शन या लेखातून घडेल...

आपल्याला झगमगती, चमचमती, वलयांकित अशी शहरी अमेरिका माहीत असते. त्या देशाचा ग्रामीण भाग आपल्यासाठी अज्ञातच असतो. मात्र, ग्रामीण अमेरिकेच्या काही भागाचं ओझरतं का होईना दर्शन या लेखातून घडेल...

अमेरिकेसारख्या सर्वात श्रीमंत, सामर्थ्यवान देशाच्या एका अध्यक्षांचा शपथविधी कोणे एके काळी एका छोट्याशा खेड्यात, केरोसिनच्या मिणमिणत्या दिव्याच्या साक्षीनं पार पडला होता!
अविश्वसनीय वाटतंय ना? पण विश्वास ठेवा...हे अगदी खरं आहे.
अमेरिकेच्या दौऱ्यात तिकडच्या ग्रामीण भागांच्या भटकंतीदरम्यान प्रत्यक्ष त्या गावाला भेट देण्याचा, शपथविधीची ती जागा पाहण्याचा योग काही महिन्यांपूर्वी आला होता.
अमेरिकेतल्या न्यू इंग्लंडमधल्या सर्वात ग्रामीण विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "व्हरमॉंट' प्रांतात आम्ही फिरत होतो.
"आता आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी ज्या खेडेगावात झाला तिथं जाणार आहोत...' बरोबरच्या टूरगाईडनं हे सांगितलं तेव्हा मी आणि पत्नी जयंती अचंबितच झालो.
"अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी आणि व्हरमॉंट इथल्या एका खेड्यात...?' आमच्या या आश्‍चर्ययुक्त प्रश्नावर आम्हाला काहीसं रोखत आमचा टूरगाईड म्हणाला : "हो, हो... सारं सांगतो आणि दाखवतोही...'

थोड्याच वेळात आम्ही व्हरमॉंट प्रांतातल्या प्लाय माऊथ नॉच या अगदी छोट्याशा खेडेगावाच्या वेशीवर पोचलो. आजही ते गाव वर्षांपूर्वीचंच वाटत होतं. अमेरिकेचे तिसावे राष्ट्राध्यक्ष कॅल्व्हिन कूलिज्‌ यांचं हे जन्मगाव. संपूर्ण गाव आजही जुन्या काळातल्यासारखं जसंच्या तसं राखण्यात आलेलं आहे. पण एवढ्यापुरतंच त्याचं महत्त्व नाही... या खेडेगावातच त्यांनी "अमेरिकेचे तिसावे राष्ट्राध्यक्ष' म्हणून शपथ घेतली होती.

कूलिज्‌ हे सन 1923 मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. तीन ऑगस्ट 1923 ला ते आपल्या प्लायमाउथ नॉच या गावी सुटी घालवण्यासाठी आले होते...संध्याकाळची वेळ होती. कूल्‌म्÷िमत्रमंडळींबरोबर गप्पा मारत बसले असता वॉशिंग्टन डीसीहून त्यांना एक तातडीचा संदेश आला ः राष्ट्राध्यक्ष वॉरेन हार्डिंग याचं नुकतच निधन झालं असून, अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार, तुम्ही जिथं असाल तिथं त्वरित राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घ्या.' सगळाच गोंधळ झाला...रात्र झाली होती. गावात वीज नव्हती. कूलिज्‌ यांच्या स्वतःच्या घरात केरोसिनचा दिवा लावण्यात आला. त्यांचे वडील हे नोटरी होते. तेव्हा त्यांनीच त्या मिणमिणत्या दिव्यात आपल्या मुलाला अमेरिकेचा तिसावा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ दिली!
आम्ही त्या एकमजली घरात - जिथं प्रत्यक्ष शपथविधी पार पडला - त्या खोलीत प्रवेश केला. अगदी साधी खोली...एक टेबल, एक खुर्ची व केरोसिनचा दिवा आजही तिथं ठेवलेला आहे. अगदी त्या वेळचं दृश्‍य! शपथविधीनंतर पुढल्या वर्षी कूलिज्‌ त्यांच्या गावी पुन्हा आले. तेव्हा याच घरात त्यांनी "उन्हाळ्यातलं व्हाईट हाउस' बनवून कामकाज पाहिलं.

कूलिज्‌ यांचं जन्मघर, तिथलं दुकान, पोस्ट ऑफिसची इमारत आजही अगदी जशीच्या तशी राखण्यात आली आहे. कूलिज याच्या निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कारही इथंच झाले होते.

माणसांचं मांस खाऊन जगणारा "गिर्यारोहक'!

"अन्न-पाण्यावाचून तडफडत असताना, बरोबरच्या पाच गिर्यारोहकांना ठार मारून, त्यांचं मांस खात काही दिवस उदरनिर्वाह करणाऱ्या गिर्यारोहकाच्या कथेवर तुमचा विश्‍वास बसेल का...?' पण कोलोरॅडो स्टेटच्या डोंगराळ भागातली ही सत्यकथा आहे. कोलोरॅडोच्या डोंगराळ भागात फिरत असताना, एका ठिकाणी गाडी थांबली, तेव्हा समोर फलक होता ः आल्फ्रेड पॅकर मॅसॅकर साईट... खाली उतरलो व फलकावरचा मजकूर वाचून हादलोच...युगांडा देशाचे माजी प्रमुख इदी अमीन माणसाचं मांस खात असत असं वाचनात आलं होतं... पण अमेरिकेतला हा प्रकार त्यापेक्षाही भयानक म्हणावा लागेल...
अल्फ्रेड पॅकर हा अनुभवी गिर्यारोहक अन्य पाच नवशिक्‍या गिर्यारोहकांना घेऊन सन 1874 च्या हिवाळ्यात कोलोरॅडोच्या या डोंगराळ भागात आला. ते सहाही जण भीषण हिमवादळात सापडले. बरेच दिवस त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. अखेर एक दिवस पॅकर एकटाच परतला. बाकीचे पाच जण कुठं आहेत, असं विचारता त्यानं सांगितलं होतं की "हिमवादळात कमालीचे हाल होत होते तेव्हा त्या पाच जणानी एकमेकांना मारून त्यांचं मांस खाल्लं.' "आपणही एकाला मारून त्याचं मांस खाल्लं' असं बऱ्याच चौकशीनंतर त्यानं
कबूल केलं. मात्र, "स्वसंरक्षणा'साठी हे कृत्य केल्याचा बचाव त्यानं केला. त्या वर्षीच्या उन्हाळ्यात याच जागी, त्या पाचही जणांचे मृतदेह मिळाले. त्यांची डोकी फोडली गेली होती व शरीरातलं बरंच मांस खाल्ल्याच्या खुणा होत्या. भयंकर हिमवादळात खायला काही मिळत नव्हतं, त्यामुळे बर्फ काढण्याच्या कुऱ्हाडीनं डोक्‍यावर हल्ला करून पॅकरनं एकेकाला ठार मारलं आणि त्याचं मांस खाऊन आपला उदरनिर्वाह केला असं तपासात उघड झालं. त्यामुळे, पाच जणांचा खून केल्याचा आरोप पॅकरवर ठेवण्यात आला; पण तो कोलोरॅडोहून पळून गेला. नऊ वर्षांनी व्योमिंग या स्टेटमध्ये त्याला पकडण्यात आलं. त्याच्याविरुद्ध खटला चालला. त्याला 40 वर्षांची शिक्षा झाली. 15 वर्षं शिक्षा भोगल्यानंतर त्याची पॅरोलवर सुटका झाली. सन 1907 मध्ये तो मरण पावला. मात्र, कोलोरॅडोच्या इतिहासातल्या या कमालीच्या धक्कादायक घटनेबद्दल पॅकरनं अखेरपर्यंत मौन बाळगलं. आता त्या जागेवर या सर्व घटनेची माहिती देणारा मोठा फलक लावण्यात आला असून त्या पाचही जणांची स्मारकं तिथं आहेत.

नाव-गाव माहिती नसतानाही पत्ता मिळाला!

एखाद्या व्यक्तीचं नाव आठवत नाही...गावही माहीत नाही...टेलिफोन नंबर उपलब्ध नाही...फक्त त्या विभागाचं नाव मात्र माहीत आहे...अशाही परिस्थितीत त्या माणसाला शोधून काढता येणं शक्‍य आहे का?...पण अमेरिकी महिला पोस्टमननं ते शक्‍य करून दाखवलं...
मोंटाना स्टेटच्या सिनिक रोडवरून जात असताना अमेरिकी मैत्रीण लुसिलानं समोर "हाय वूड' विभागाचा बोर्ड बघून गाडीला एकदम ब्रेक लावला व शेजारी बसलेल्या जयंतीला ती म्हणाली ः 'तीन महिन्यांपूर्वी आम्ही क्रूजवर गेलो होतो तेव्हा आमच्याबरोबर मोंटानाचं एक शेतकरी जोडपं होतं व ते "हाय वूड' भागात राहणारं होतं. त्यांच्याशी आमची मस्त गट्टी जमली. त्यांची भेट झाली तर काय बहार येईल?...पण लुसिला हिला त्यांचं नाव आठवत नव्हतं. या हाय वूडच्या परिसरात निदान 60-70 लहान-मोठी खेडी असतील. त्यापैकी त्या जोडप्याचं गाव कोणतं याचीही कल्पना नाही. अशा स्थितीत त्यांचा शोध घ्यायचा कसा? वाटेत एक-दोन कुरणात शिरून, त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्नही तिनं केला...
एका शेतकऱ्यानं सांगितलं ः "इथून 20-25 मैलांवर हाय वूड विभागाचं पोस्ट ऑफिस आहे. तिथून काही पत्ता लागतो का ते पाहा...''
आम्ही हजार-दीड हजार वस्तीच्या त्या गावाच्या पोस्ट ऑफिसमध्ये आलो. पांढरीशुभ्र बैठी इमारत. कार पार्किंगसाठी व्यवस्थित जागा. आत शिरलो तर सारा शुकशुकाट होता. तिकीटविक्री, पार्सल यांच्या निरनिराळ्या खिडक्‍या समोर दिसत होत्या. स्वच्छता तर विचारायलाच नको. आम्हाला पाहून दोन महिला-कर्मचारी पुढं आल्या. त्यापैकी एकजण टपालवाटप करणारी "पोस्ट वूमन', तर दुसरी कचेरीत काम करणारी होती.
लुसिलानं हसत हसत तिची अडचण सांगितली. सुदैवानं त्या पोस्ट वूमनचा परिसरातल्या गावकऱ्यांशी रोजचा संबंध वा परिचय होता. तिनं लुसिलाला विचारलं ः "तीन महिन्यांपूर्वी तुमची क्रूज किती दिवसांची होती?'
लुसिला म्हणाली ः "साधारणतः बारा-तेरा दिवसांची...'
त्यावर पोस्ट वूमननं थोडा विचार करून पुन्हा विचारलं ः "त्या दांपत्याचं नाव रॉबर्ट व मेरी होतं का?'
लुसिला उत्तरली ः "अगदी बरोबर...!'
पोस्ट वूमन पुढं म्हणाली ः " "हाय वूड'च्या परिसरातल्या 70-75 गावांत रोज टपालवाटपाचं काम मी करते. त्यामुळे सर्वांना वैयक्तिकरीत्या ओळखते. तीन महिन्यांपूर्वी रोपा गावातल्या रॉबर्टनं मला सांगितलं, होतं ः "आम्ही 12-13 दिवसांच्या क्रूजवर जात आहेत; त्यामुळे या कालावधीत आमचं जे टपाल येईल, ते कचेरीतच ठेवून दे आणि आम्ही आलो की मग आम्हाला दे.' त्यावरून तुम्ही म्हणता ते हेच जोडपं असलं पाहिजे. पोस्ट वूमननं रॉबर्टचा फोन नंबर काढला व त्याला फोन लावला ः "रॉबर्ट, टेक्‍सासची लुसिला व वॉर्नर नावाचं जोडपं तुमच्याबरोबर क्रूजवर होतं का?'
'हो...'' तिनं फोन वॉर्नरच्या हाती दिला...
वॉर्नर व रॉबर्ट यांना झालेला अत्यानंद त्यांच्या संभाषणावरून कळून येत होता... रॉबर्टनं आम्हा दोघांसह सर्वांना घरी येण्याचं आग्रहाचं आमंत्रण दिलं...पण त्यांचं गाव तिथून 30-40 मैलांवर होतं. संध्याकाळ होत आली होती. त्यामुळे एवढ्या उशिरा जाणं काही शक्‍य नव्हतं; पण नाव-गाव काहीही माहीत नसलेल्यांचा पत्ता अमेरिकी पोस्ट वूमनच्या साह्यानं कसा शोधून काढता आला आणि अगदी खेड्यातली अमेरिकी
पोस्टकचेरीही पाहता आली, या आठवणी मात्र कायमच्या लक्षात राहिल्या...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayprakash pradhan write us president swearing article in saptarant