वारसा जपत विकासाच्या वाटेवर

स्वातंत्र्यानंतर या जातसमूहातही शिक्षणाचा प्रसार झाल्याने पारंपरिक मेंढपाळाच्या व्यवसायातून बाजूला होत धनगर समाज शहरांमध्ये स्थिर होताना दिसत आहे.
Dhangar Society
Dhangar SocietySakal
Summary

स्वातंत्र्यानंतर या जातसमूहातही शिक्षणाचा प्रसार झाल्याने पारंपरिक मेंढपाळाच्या व्यवसायातून बाजूला होत धनगर समाज शहरांमध्ये स्थिर होताना दिसत आहे.

सांगलीतल्या शिवाजी मंडईच्या कोपऱ्यावर आपल्या मिनी टेम्पोत डाळिंब, सीताफळांचा स्टॉल लावून कृष्णा कोळेकर बसलेले असतात. त्यांच्या शेजारीच त्यांच्या सौभाग्यवती भागाबाईही असतात. भल्या सकाळी भाकरी बांधूनच ही जोडी येते. रात्री उशिरा घरी परतायचं, हा त्यांचा नेहमीचा शिरस्ता. त्यांचं मूळ गाव कवठेमहांकाळ जवळचं शिरढोण... असंच काहीसं चित्र सांगलीतील सर्व प्रमुख रस्त्यांवर दिसेल. मासाळ, आलदर, सरगर, गावडे... अशा आडनावांची ही सारी माणसं... महाराष्ट्रात आडनाव समजलं की साधारणपणे ज्यांची जात समजते, ते असतात महाराष्‍ट्रातील प्रमुख जात समूहांपैकी एक, म्हणजे धनगर समाजातले. पूर्वी शेळ्या-मेंढ्यापालनासाठी मेंढपाळ नवऱ्यासोबत दऱ्याखोऱ्यांतून ‘ती’ जायची... आणि आताही ‘ती’ आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शहरांमधील बाजारपेठेतही उभी असते.

राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या १७ टक्के असल्याचं सांगितलं जातं. विशेषतः दुष्काळी पट्ट्यात धनगरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आजही आहे. दुष्काळी भागात गेल्या तीस वर्षांत फळलागवडीला प्रोत्साहन मिळत गेलं. डाळिंब, सीताफळ, बोर, द्राक्षं... अर्थात, त्या दुष्काळी भागाचा आदिवासी जातसमूह असलेल्या धनगर समाजाला अशी फळलागवडीची शेती करण्यासाठी पुरेसं अर्थबळ नव्हतं आणि अगदी अशी भरभरून शेतीही नाही....

साहजिकच रोजगारासाठी शहरांकडे झेपावलेला हा जातसमूह गेल्या पंचवीस-तीस वर्षांत फळव्यापारांत दिसतो. फळभाजीपाला बाजार समित्यांमध्ये हमालीसाठी येणारा हा जातसमूह आता व्यापारी अडत्याच्या भूमिकेतही दिसतो. सत्तरच्या दशकात मुंबईत माथाडी कामगार म्हणून स्थिरावलेल्या या समाजाला शिवाजीराव शेंडगे यांच्यासारख्या नेत्यांमुळे राजकीय अवकाश मिळाला.

स्वातंत्र्यानंतरच्या स्थित्यंतरात हा जातसमूह बाजूलाच पडला. शिक्षणापासून कोसो दूर... साहजिकच संधीपासूनही दूर राहिला. अलीकडच्या काळात राजकीयदृष्ट्या संवेदनशील जातसमूह म्हणून त्याची ओळख तयार होत आहे. गेल्या काही वर्षांत धनगर आरक्षणाचा मुद्दा आज राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरला, त्यामुळे त्यांच्या मतांच्या गठ्ठ्याचं महत्त्व लक्षात आलं. पश्‍चिम महाराष्ट्रात १३ दुष्काळी तालुक्यांत त्यात सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यांमध्ये धनगरांची लोकसंख्या पासंगाप्रमाणे निर्णायक ठरते. राजकीय नेतृत्वही या भागातून पुढे आलं. मूलतः हा आदिवासी भटका समाज म्हणून त्याची ओळख आहे.

स्वातंत्र्यानंतर या जातसमूहातही शिक्षणाचा प्रसार झाल्याने पारंपरिक मेंढपाळाच्या व्यवसायातून बाजूला होत हा समाज शहरांमध्ये स्थिर होताना दिसत आहे. बाजार समित्यांमध्ये माथाडी कामगार असलेला हा समाज हमाली करीत आता रस्तोरस्ती फळविक्रीत दिसतो. त्याचवेळी गावाकडे, म्हणजे सांगली जिल्‍ह्याचा पूर्वभाग, सोलापूर आणि उत्तर कर्नाटकात हा समाज शेतीत टिकून आहे. या समाजाच्या वाट्याला पूर्वापार शेतजमिनी कमीच. उपजीविका शेळ्या- मेंढ्यांच्या पालनावर. आजही त्यावरच हा समाज टिकून आहे. किंबहुना भटकंती करीत शेळी-मेंढीपालन करणारा माणूस हमखास धनगर समाजातलाच असतो. इथे त्यांची ‘ती’ मक्तेदारी आजही टिकून आहे. व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’तून माणदेशाचं... धनगरांच्या जनजीवनाचं उत्कट चित्रण झालं. धनगर समाजाचं जगणं या कादंबरीने मराठी साहित्यविश्‍वात आणलं.

आर्थिक स्थित्यंतरं आली की, समाजाच्या चालीरीतींमध्येही आमूलाग्र बदल येतात... मात्र तरीही लग्नसोहळे, जत्रा-यात्रांच्या निमित्ताने शहरात गेलेली कुटुंबं गावाकडे हमखास येतात. जुन्या चालीरीती, परंपरांना चिकटून त्यांचं पालन करताना दिसतात. मेंढपाळीच्या निमित्ताने डोंगरदऱ्यांत फिरणाऱ्या धनगरांसाठी मेंढी, शेळी हेच त्याचं धन. हे धन त्याच्या सर्व रीती-परंपराच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. मूलतः हा समाज लढवय्या आदिवासी समाज... आदिलशाहीत अनेक गावांच्या पाटिलकी या समाजाकडे दिल्या गेल्या, असं मिरजेतील इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर सांगतात. ते म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यातील पेडचे शेंडगे, सलगरचे बंडगर, कवठेमहांकाळ-कोकळेचे ओलेकर अशी कितीतरी धनगर कुटुंबं त्या त्या भागातील पाटील; त्यांच्याकडे देशमुखी होती. अठराव्या शतकात होळकरशाहीपासून हा समाज राजसत्तेत होता. पूर्वापार हा समाज पशुपालनात... भटकंतीत कायम राहिला. व्यावसायिक स्थित्यंतरं झाली तरी पशुपालनाशी निगडित अनेक प्रथा-परंपरा आजही या समाजात अधिक दिसतात. दुष्काळी तालुक्यातील गावोगावच्या जत्रांमध्ये देवाला बोकड-मेंढ्यांचा बळी द्यायची रूढी असो वा डोंगर-दऱ्यांतील भटकंतीत मनाला विरंगुळा म्हणून मुखोद्‍गत राहिलेल्या धनगरी ओव्या आजही म्हटल्या जातात.’’

धनगर समाजातील प्रथा-परंपरांचे अभ्यासक पट्टणकोडोलीचे नारायण मोटे यावर भाष्य करताना म्हणाले, ‘गावोगावीची ओवीकार मंडळं धनगर समाजातील अनेक प्रथा-परंपरांचे वाहकच आहेत. ओवीकार हा कवीच... तो उत्स्फूर्तपणे काव्य लिहितो... गातो. लोककलांचा हा वारसा त्यांनी टिकवून ठेवला आहे. आता गावोगावच्या यात्रांमध्ये ओवीकार मंडळांच्या स्पर्धा होतात. बिरदेव, मंगोबा, खंडोबा, मायाक्का, महालिंगराया अशा लोकदैवतांच्या आख्यानांची यातून मांडणी होते. कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यांमधील शेकडो गावांमध्ये ही ओवीकार मंडळे आहेत. धनगरी ढोल, कैताळवादन, वालुगवादन, गजनृत्य या धनगर समाजातील सांस्कृतिक परंपरा आहेत. त्यांचा खूप मोठा रंजक इतिहास आहे. कवठेमहांकाळ, जत तालुक्यात गावोगाव अशी मंडळे आजही आहेत. पदरमोड करून समाजातील लोक हे सारं करीत असतात. अलीकडच्या काळात या कलांना आकाशवाणी, टीव्हीसारख्या माध्यमांमधून, सांस्कृतिक महोत्सवांमधून स्कोप मिळतोय. गजनृत्य आता सातासमुद्रापार गेलंय.

शहरी समाज त्याकडे उत्सवाच्या निमित्ताने आकर्षित होतोय. यातून त्याला काहीसं व्यावसायिक स्वरूपही येतंय. मात्र, आजही या समाजाच्या उपजीविकेचं मुख्य साधन मेंढीपालनच आहे. डोंगर-दऱ्यांतून भटकंती करणारा मेंढपाळ हा चांगली कमाई करतो, मात्र त्यासाठी तो जे काबाडकष्ट उपसतो, त्याला पारावार नाही. कष्ट आणि अपमान सहन करण्याची त्याची क्षमता आहे म्हणूनच तो टिकून आहे. शासनाकडून डोंगर-दऱ्यांवर चराईबंदी आली. बारमाही शेतीमुळे पड जमिनी नाहीत. गायरान जमिनी, चराऊ कुरणं संपली, त्यामुळे मेंढपाळीसमोर अनंत अडचणी. गावोगाव शेतकरी जमीनदारांच्या रोषाला मेंढपाळांना सामोरं जावं लागतं. हे वाद-तंटे सोडवण्यासाठी माझी राज्यभर भटकंती सुरू असते. विशेषतः सह्याद्रीच्या रांगांमधील... कोकणातील धनगर समाज पावसाळ्यात दुष्काळी पट्ट्यात येतो. सारं कुटुंब पाठीवर बांधून शेळ्या-मेंढ्यांसह त्यांची ही भटकंती अनेक आव्हानांना सामोरं जात सुरू असते. केवळ जगण्यासाठीची हजारो कुटुंबांची ही धडपड आजही सुरू आहे.’

समाज मेंढपाळीसाठी गावपांढरी सोडून भटकंती करायचा. गावी परतायचं ते जत्रा-यात्रेच्या निमित्ताने... मग त्यानिमित्ताने देवाला नैवेद्य... त्या नैवेद्यासाठी पै-पाहुणे यायचे. रात्रभर बिरोबाचा, मंगोबाचा जागर व्हायचा... या प्रथा- परंपरा आज नोकरी- व्यवयासाच्या निमित्ताने गाव सोडलेल्यांमध्येही कायम दिसतात असं निरीक्षण या समाजातीलच तरुण कार्यकर्ते अमोल पांढरे नोंदवतात. जत तालुक्यातील कुडणूर हे त्यांचं गाव. तिथे सरपंच म्हणून ते कार्यरत होते. या समाजातील अनेक निरीक्षणं त्यांनी नोंदवली. ते म्हणाले, ‘‘आजही धनगर समाजातील लग्नसोहळे तीन-चार दिवस रंगतात. वीर खेळवणे, जक्यार काढणे, घुगुळ खेळवणे, दूध शिजवणे, सुवासिनी बसवणे... असे अनेक विधी लग्नाच्या चार दिवसांत होत असतात. यानिमित्ताने वालुग मंडळांचे कार्यक्रम होतात. सिद्ध म्हणजे देवाला आयुष्य वाहिलेला पुजारी लग्नसोहळ्यासाठी हजर असतो. तेच जत्रा-यात्रेत होतं. आरेवाडीच्या दसऱ्यातील नवरात्रीच्या जागरणासाठी राज्यभरातूनच समाजबांधव येतात. तिथं होणारी भाकणूक... देववाणी समाजाला दिशा देण्यासाठीची प्रथा. खरंतर ही परंपरा आली ती भटक्या धनगर समाजाला जगण्याची दिशा मिळावी यासाठी... त्याच्याकडे कोणतं कॅलेंडर कधीच नव्हतं. पाऊसपाणी कसं राहील... सामाजिक वातावरण कसं राहील, या स्वाभाविक कुतूहलाचा हा खरंतर कानोसा. अशा भाकणुकी कोल्हापूर जिल्ह्यात पट्टणकोडोली... कर्नाटक सीमेवरील अप्पाचीवाडीला हलसिद्धनाथ यात्रेत आजही होतात. तंत्रज्ञानाने सारं काही बदललेल्या आजच्या काळात या देववाणीवर धनगर समाजच नव्हे, तर अन्य समाजांचंही लक्ष असतं. धनगर समाजात बदलाचं वारं अन्य जातसमूहांच्या तुलनेत उशिरानेच शिरलं.

हेच चित्र पारंपरिक व्यवसायांशी चिकटून राहिलेल्या अन्य जातिसमूहांतही दिसेल. कारण जातीचं अस्तित्व अर्थकारणाशी निगडित असतं आणि त्या जातीशी निगडित प्रथा-परंपरांचं अस्तित्व कायम राहतं. धनगर समाजात मेंढपाळी टिकून राहिली आणि त्या अनुषंगाने काही व्यवसायही आले. धनगर समाजातील पोटजात सनगर समाज पारंपरिकरीत्या मेंढीच्या लोकरीपासून जेन, घोंगडी तयार करायचा. आजही हा समाज यात दिसतो. आता त्यात तंत्रज्ञान येतंय...

शासनाने रांजणी- कवठेमहांकाळला ‘पुण्यश्‍लोक’ नावाने लोकरीपासूनच्या विविध वस्तू बनवून त्यांचा ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेळ्या-मेंढ्यांच्या मांस निर्यातीच्या व्यवसायाच्या ठिकाणी मोलमजुरी करणारा धनगर समाज आता त्यातल्या व्यापारांकडेही जाताना दिसतोय. या भागातून मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्यांची पैदास होते.

शेळी-मेंढीपालन करणारा हा समाज आता त्यांच्या व्यापारातही दिसतोय, तिथेही तो संधी शोधतोय. इथल्या शेळ्या-मेंढ्यांच्या मटणाच्या चवीचं ब्रँडिंग होतंय. येणाऱ्या काळात धनगर समाजातील मेंढपाळी करणाऱ्या मोठ्या वर्गासाठी हा उद्योग संधीची कवाडं उघडू शकतो. शिक्षणाचा टक्का वाढतोय तसा हा समाज आता सैन्यात, सरकारी नोकऱ्यांत ठळकपणे दिसतो आहे. तोच समाजबांधव गावोगावच्या जत्रांमध्ये कपाळी भंडारा लावून सहभागी होतो. राजकीय मेळाव्यांमधून अस्मिता म्हणून धनगरांचा ढोल आणि घोंगडी पांघरून व्यक्त होताना दिसते, ती त्याची दृश्य ओळख असते, परंपरेतून आलेली. हा बदल धनगर समाजातून सतत प्रवाहित होत आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com