
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
जेसी आयझेनबर्ग या निपुण अभिनेत्याने दिग्दर्शक म्हणून बनवलेला दुसरा चित्रपट म्हणजे ‘अ रिअल पेन’ (२०२४). त्याआधी त्याने ‘व्हेन यु फिनिश सेव्हिंग द वर्ल्ड’ (२०२२) हा चित्रपट बनवला होता. त्याचा हा नवा चित्रपट ‘स्लाइस ऑफ लाइफ’ प्रकाराचा, ट्रॅजि-कॉमेडी प्रकारातील चित्रपट आहे. नेहमीच्या आयुष्यातील घटना, कमीत कमी नाट्यमय पद्धतीने मांडण्याचा प्रकार म्हणजे ‘स्लाइस ऑफ लाइफ’. त्यामुळे पटकथेत नेहमीच्या चित्रपटांपेक्षा कमी घटना घडतात. तर, ट्रॅजि-कॉमेडी म्हणजे एक प्रकारचा कोरडा विनोद; ज्यात गंभीर घटना आणि भावनांचा तळ ढवळून काढला जातो; मात्र त्यातून निर्माण होणारा विनोद खळखळून हसवणारा नसतो, तर बोचरा असतो. सहसा हे दोन्ही चित्रपटप्रकार प्रेक्षकाला आपल्या अंतर्मनात डोकावून पाहायला भाग पाडतात, अस्वस्थ करतात. केवळ मनोरंजनाच्या पलीकडे जात आत्मपरीक्षण करायला लावतात.