हिंदी चित्रपटातील खलनायकाच्या बदलाचा प्रवास

villains
villains

चित्रपटक्षेत्रात व्हिलन ही संकल्पना चित्रपटनिर्मिती सुरू झाल्यापासून झाली आहे; कारण कथा म्हटली की, त्यात एक नकारात्मक (निगेटिव्ह) पात्र आलेच. त्या पात्राच्या उचापतीमुळे चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते आणि शेवटी सत्याचा विजय होतो. तसे चित्रपटाचा नायक त्या खलनायकाच्या सगळ्या कल्पना त्याचे प्लॅनिंग उद्‌ध्वस्त करतो आणि मग हिरो जिंकतो व चित्रपट संपतो. अशाच साधारण  सगळ्या चित्रपटांचा कथापट असतो आणि आपण ते मनोरंजन म्हणून त्याकडे बघतो. ते पण तिकीट काढून जातो. भारतातल्या चित्रपटातले हिरो-हिरोईन म्हणजे जणू देवच, अशी त्यांची लोकप्रियता असते. पण, याच प्रेक्षकांनी खलनायकाची भूमिका करणाऱ्यांनाही खूप प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

"राजा हरिश्‍चंद्र' या पहिल्या चित्रपटात खलनायक म्हणता येईल, असे एक पात्र आहे. अर्थात हे चित्रपटाच्या कथेच्या संदर्भात बोलतोय. राजा हरिश्‍चंद्राची परीक्षा विश्‍वामित्र ऋषी घेतात आणि त्याचा राजाला प्रचंड त्रास होतो. सत्यवचनी राजा असा त्याचा लौकिक असतो. सत्यवचनासाठी त्याच्या मुलाचा प्राण जातो. तारामतीवर संकटे येतात. पण, राजा हरिश्‍चंद्र स्वत:च्या वचनापासून अजिबात परावृत्त होत नाही. शेवटी ऋषी विश्‍वामित्र प्रसन्न होऊन त्याला वैभव, त्याचा मुलगा सगळे परत करतात. आता कथेच्या आणि त्यातल्या पात्रांच्या दृष्टीने विचार केल्यास राजा हरिश्‍चंद्र हिरो आणि विश्‍वामित्र खलनायकी पात्र ठरू शकतात. पण, इथे विश्‍वामित्रांनी त्याची परीक्षा घेऊन त्याचे वैभव परत केले. म्हणून ते खलनायक ठरत नाही. पण, विश्‍वामित्रांच्या मागणीमुळेच राजा हरिश्‍चद्रांची कथा पुढे सरकते. असा हा आपला कळत-नकळत नायक-खलनायक असा चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. हळूहळू चित्रपट मोठा होत गेला आणि त्यातच पात्रे पण मोठी झाली.

खरी लोकप्रियता के. एल. सिंग या पॉप्युलर खलनायकामुळे मिळाली. त्यांचा उदय झाला तो 1938 मध्ये आलेल्या "बागबान' या चित्रपटामुळे. हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर खूप चालला आणि आर. एन. सिंग खऱ्या अर्थाने नावारूपाला आले. सिंग यांना वडिलांप्रमाणे वकील व्हायचे. पण, नियतीने त्यांना चित्रपट क्षेत्रात आणले ते पृथ्वीराज कपूर यांच्यामुळे. मग के. एन. सिंगचे डोळे, त्यांची खास कपड्यांची स्टाइल आणि त्यांची सिगार... हा लूक हिट झाला. सिकंदर, ज्वारभाटा (दिलीपकुमारचा हा पहिला चित्रपट) आवारा, हावडा ब्रिज, चलती का नाम गाडी, आम्रपाली, ऍन इव्हिनिंग इन पॅरिस असे अनेक हिट चित्रपट त्यांना मिळाले. त्यांनी स्वत:चा एक खास प्रेक्षकवर्ग तयार केला होता. तेव्हा तर सिगार ओढणे ही श्रीमंत लोकांची स्टाइल झाली होती. नंतर त्याचेच छोटे स्वरूप असलेल्या सिगरेटचे प्रस्थ वाढले ते प्राणमुळे. त्याची ती खास स्टाइल सिगरेट पकडायची आणि धूर सोडायची स्टाइल सगळ्यांचे आकर्षण ठरले.

सिंग यांच्यानंतर खरा खलनायकी चेहरा प्रसिद्ध झाला तो प्राण यांचाच. प्राण क्रिशन सिकंदर म्हणजेच प्राण. त्यांनी 350 च्या वर चित्रपट केले. खरे तर त्यांची सुरुवात नायक म्हणूनच झाली होती. 1940 च्या आसपास त्यांनी पहिल्यांदा एका पंजाबी चित्रपटात काम केले "यमला जाट'. तेव्हा ते लाहोरला होते. हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता. त्यामुळे तसे ते भारतात होते. पण, फाळणीनंतर ते भारतात आले आणि बॉलीवूडला एक महान खलनायक मिळाला. पडद्यावरील एंट्रीतच त्यांच्या खलनायकी भावना कळायच्या आणि प्रेक्षक त्यांना खरंच वाइट प्रवृत्तीचा माणूस समजायला लागले. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचा विश्‍वास सार्थ ठरवला. प्राण हा स्मार्ट व्हिलन होता. त्यामुळे त्या काळतल्या बहुतेक चित्रपटांमध्ये ते श्रीमंत आणि हिरोइनच्या मागे असायचे. त्या काळात समाज हा नुकत्याच मिळालेल्या स्वतंत्र्याचा आनंद घेत होता. सोबत भूक, दारिद्य्र पण होते. देशाची आर्थिकस्थिती हलाखीची होती. गरीब समाज हा सावकारीच्या विळख्यात होता. त्याचेच प्रतिबिंब चित्रपटांच्या कथेत दिसायला लागले होते. त्याच समाजाचे प्रतीक सिनेमाची कथा होती आणि कष्टप्रद, पिचलेला समाजाचे प्रतीक चित्रपटाचा हीरो असायचा आणि सावकारी, स्त्रीलंपट प्रतीक खलनायक. प्राण असा खलनायक उत्कृष्ट वठवायचा.
त्यांच्या खलनायकी अभिनयाचा धसका लोकांनी एवढा घेतला होता की, मुलांचे नाव प्राण ठेवणे सोडून दिले होते. ही तर प्राण यांच्या कामाची पावतीच म्हणायला हवी. प्राण यांनी त्या काळच्या सगळ्यांच टॉपच्या हीरोबरोबर काम केले. राज कपूरपासून अमिताभ बच्चनपर्यंत. त्यांनी काही चरित्र भूमिकाही केल्या होत्या. काही विनोदीपण केल्या. खलनायक म्हणून त्यांनी स्वत:चा एक दर्जा आणि स्वत:चे नाव चित्रपटक्षेत्रात कोरले. त्यानंतर व्हिलन ही संकल्पना जास्ती क्रूर व्हायला लागली. कारण समाज बदलत गेला आणि अत्याचार, भ्रष्टाचार हा प्रकार वाढीस लागला. चित्रपटातला व्हिलन हा सरकारी अधिकारी किंवा मंत्री, समाजातील नेता दिसायला लागला. यात प्रेम चोप्रा, रणजित, अजित, जीवन अशी बरीच नावे घेता येईल. पण, खलनायकाचे स्वरूप बदलत गेले आणि बहुतेक करून स्मगलर, गुंडा, मोठा बिझिनेसमन असे खलनायक झाले. त्यांना पाठिंबा देणारी राजकीय शक्ती असे खलनायकाचे स्वरूप बदलत गेले. कारण तेव्हापासून भ्रष्टाचार, दुराचार हा वाढीस लागला होता. कंपन्यांचे मालक कामगारांना त्रास देऊ लागले. त्यांचे शोषण होऊ लागले. त्यातूनच मग "अँग्री यंग मॅन'चा उदय झाला. समाज बदलत गेला आणि त्याचेच प्रतिबिंब नायक आणि खलनायक बदलण्यात आले. खलनायकाचे राजकीय रूप साधारण 1970 च्या दशकानंतर सुरू झाले. नंतरच्या काळात राजकीय, सामाजिक नितिमत्ता संपत गेली आणि त्याप्रमाणे चित्रपटातच श्रद्धा आणि त्यातली पात्र पण बदलली. खलनायक अधिक भ्रष्ट आणि लाउड व्हायला लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com