असा झाला चित्रपटातील नायकाचा प्रवास

roll
roll

चित्रपट किंवा नाटक म्हटले की, दोन पात्रे आलीच समजा. एक नायक आणि दुसरी नायिका. तुम्ही कुठलेही साहित्य जरी घेतले, तरी त्यात ही पात्रे असतातच. कधी ती एखाद्या घटनेच्या रूपात किंवा नायकाच्या रूपात. चित्रपटातला नायक हा पण इतर कथा, कादंबऱ्यांत असणाऱ्या नायकाप्रमाणेच असतो. पण, चित्रपट हे दृश्‍यमाध्यम असल्यामुळे चित्रपटाच्या नायकाला लोक हिरो समजतात. कारण तो कथेतील पात्र अभिनय करीत पडद्यावर जगत असतो. त्यामुळे तो प्रेक्षकांना जास्त भावतो.

कथा, कादंबऱ्यातला नायक हा वाचणाऱ्यांच्या मनात असणाऱ्या कल्पनाशक्तीनुसार असतो. चित्रपटाचे तसे नसते. चित्रपटाचा नायक आणि त्याचे नायकपण बघायला एका विशिष्ट ठिकाणी जावे लागते ज्याला आपण थिएटर म्हणतो. सगळ्यांबरोबर बसून त्या वातावरणाचा आनंद घेत आपण तो चित्रपट बघत असतो. सध्या मोबाईलमुळे एकट्यातच हा आनंद घेता येतो. पण, थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघण्याचा आनंद वेगळाच. आणि चित्रपट आपल्या आवडीच्या हिरोचा असेल, तर मग विचारायलाच नको.

ज्यांनी जुना काळ अनुभवला असेल त्यांना बच्चन, राजेश खन्ना यांच्या हाउसफुल्ल चित्रपटांचे तिकीट मिळण्यासाठी केलेली धडपड आणि मग जग जिंकण्याच्या आविर्भावात टॉकीजमधील खुर्चीवर बसून चित्रपट बघणे म्हणजे जणू स्वर्गसुखच.

आता काळ बदलला आहे. थिएटरचे रंग-रूप बदलून सिंगल स्क्रीन थिएटरचा मल्टिप्लेक्‍सपर्यंत प्रवास झाला. पण, हिरोची लोकप्रियता तशीच आहे. त्यांच्याबद्दलचे आकर्षण, त्यांचे चित्रपट, त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा उत्साह, त्यांना भेटल्यावर फोटो काढणे, स्वाक्षरी घेणे हे सगळे तसेच आहे. यात कुठलाच बदल नाही. गरीब, श्रीमंत, उच्च, नीच जातीभेद नाही. हा जातीविरहित, आर्थिक परिस्थितीविरहित, सामाजिक स्थितीविरहित आनंद असतो. जुन्या काळात सतत भेट होत नव्हती; कारण सोशल मीडिया नावाचा प्रकार तेव्हा नव्हताच. तरीही क्रेझ तेवढीच होती जेवढी आज आहे. हा प्रकार जागतिक पातळीवर आहे. चित्रपटाचा हिरो हा एक वेगळ्या अभ्यासाचा विषय ठरू शकतो.

चित्रपटातला हिरो आणि समाज, हा मोठा विषय ठरेल. कारण समाज बदलाबरोबर चित्रपटातला नायक पण बदलत गेला. पण, क्रेझ तशीच. दादासाहेब फाळकेंनी पहिला चित्रपट 1913 साली निर्माण केला "राजा हरिश्‍चंद्र'. यात हरिश्‍चंद्राच्या मुख्य भूमिकेत असणारे दत्तात्रय दामोदर दाबके हे खरे तर आपले पहिले हिरो वा नायक. यामुळे जसे दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटाचे जनक आहेत तसेच या चित्रपटात काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ हेसुद्धा आपापल्या विभागाचे जनक म्हणायला हरकत नाही. दत्तात्रय दाबके हे आपले पहिले नायक... एक मराठी माणूस... प्रवास बघा कुठवर झाला. आज शाहरुख, सलमान, आमीर, रणबीर या नावांमध्ये एक पण मराठी नाव नाही. किंबहुना हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी माणसे खूप कमी आहेत. पण, ते टेक्‍निकल विभागात. पडद्यावर तर बोटावर मोजण्याइतके.

ही चित्रपटसृष्टी एका मराठी माणसाने सुरू केली. त्याने पाया रचला, हेही इंडस्ट्री साफ विसरली आहे. त्याला कारणे खूप आहेत. मराठी हिरोचा चेहरा प्रेक्षकांना का आवडत नाही, यावर एक स्वतंत्र चर्चासत्र होऊ शकेल. पण, सत्य हेच आहे की, मराठी माणूस हिरो नाही.

"राजा हरिश्‍चंद्र'पासून चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. त्या काळचा हिरो हा ग्लॅमर पासून खूप दूर होता. कारण हे चित्रपटाचे तंत्र नवीन होते. त्याची खरी ताकद अजून कळली नव्हती. जसजसे लोकांमध्ये या कलेच्या दृश्‍य स्वरूपाविषयी आधी कुतूहल आणि मग आकर्षण निर्माण झाले तसतसे कलाकारांना ग्लॅमर प्राप्त व्हायला लागले. कारण पडद्यावर काम करणारा हिरो आपल्यापेक्षा वेगळा आहे, हा विचार लोकांच्या मनात घर करून बसला आणि हिरो व हिरोइन यांना ग्लॅमर प्राप्त झाले. चित्रपटाचा प्रवास हा जसा "राजा हरिश्‍चंद्र', "संत तुकाराम', "आलम आरा' असा सुरू झाला. तसा हिरो पण बदलत गेला. "आलम आरा' हा पहिला बोलपट... म्हणजे चित्रपटाला आवाज आला या चित्रपटापासून.

1931 सालच्या या बोलपटात एक प्रेमकथा होती. त्यावेळी समाज पण खूप मोकळा नव्हता. त्या काळी प्रेमविवाह म्हणजे मोठे धाडसाचे काम. प्रत्येकाच्या मनातले हे काम चित्रपटाला हिरो सर्व अडचणींवर मात करून करतो आणि शेवटी नायिकेशी लग्न करतो. हे त्या काळात खूप वेगळे होते. कारण प्रेम करून लग्न करणे म्हणजे पापच, असा समज तेव्हा रूढ होता. आपल्याला आवडणारा पुरुष वा स्त्रीला प्रेमात पाडणे आणि मग लग्न करणे ही एक दिव्य गोष्ट होती. हीच गोष्ट पडद्यावरच्या हिरोने सहज करून दाखवली म्हणून तो लाखो तरुण प्रेक्षकांचा नायक झाला. यानंतर चित्रपटातला हिरो हा रोमॅंटिकच असावा, असा एक अलिखित फतवाच निघाला.

जेव्हा स्वातंत्र्यचळवळ आपल्या ध्येयाजवळ पोचली तेव्हा देशभक्‍ती जागवण्यासाठी काही चित्रपट निघाले. पण, त्यातील बहुतेक चित्रपट प्रेमकथेवरच आधारित होते. म्हणजे पूर्ण चित्रपट नायिकेला आणि घरच्यांना लग्नासाठी तयार करणे यावरच होता. त्यात घरच्यांना आवडणारा खलनायक असायचा. मग नायक सगळ्या अडचणींवर मात करून नायिकेशी लग्न करायचा तेव्हा प्रेक्षकांना मुलगी योग्य वराच्या गळ्यात पडल्याचा आनंद व्हायचा. अशाप्रकारे चित्रपटाचे नायक-नायिका, हिरो-हिरोइन होते. असे चित्रपटाचे हिरो... असा हा प्रवास... बराच मोठा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com