मोबाईल नेमका चालतो कसा?

जागतिक पातळीवर जलद गतीने मोबाईल टेलिफोनी उद्योग वाढणाऱ्या देशांपैकी भारत हा एक आहे. २०२५ पर्यंत अंदाजे ९०० मिलियन स्मार्टफोनधारक असतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
Mobile Work
Mobile WorkSakal
Updated on

- जुही चावला मेहता

या आठवड्यात ईएमएफ रेडिएशनपासून वाचण्यासाठी “Do’s and Don’ts” सांगणार होते; पण त्याआधी मोबाईल नेमका चालतो कसा, हे समजून घेऊ.

जागतिक पातळीवर जलद गतीने मोबाईल टेलिफोनी उद्योग वाढणाऱ्या देशांपैकी भारत हा एक आहे. २०२५ पर्यंत अंदाजे ९०० मिलियन स्मार्टफोनधारक असतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. मोबाईल ग्राहकांच्या वाढीला समर्थन देण्यासाठी अनेक पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते.

ठिकठिकाणी पुष्पगुच्छांप्रमाणे मोबाईल ॲन्टीना आपल्याला आढळून येतात. एकीकडे तंत्रज्ञानात वाढ होत आहे आणि दुसरीकडे मनुष्यांसाठी आणि पर्यावरणासाठी एक नवीन आणि गंभीर वायू प्रदूषण निर्माण करत आहे, या महत्त्वाच्या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो आहे.

तुमचा मोबाईल कसा काम करतो, हे सोप्या पद्धतीने समजून घेऊ. यामुळे मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचा आपल्या पृथ्वीवर आणि पर्यावरणावर कसा परिणाम होतो, ते तुम्हाला समजेल. श्रीमंत किंवा गरीब, तरुण किंवा वृद्ध, पुरुष किंवा स्त्री, शहरात किंवा खेड्यात राहणाऱ्या प्रत्येक सजीवावर या रेडिएशनचा परिणाम होतो आहे.

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत, आपल्याकडे वायर्ड फोन असायचे. ज्या व्यक्तीशी आपण बोलू इच्छितो त्याच्यापर्यंत या ध्वनी लहरी (Sound Wave) तारांद्वारे वाहून नेल्या जात होत्या. आज तारा नाहीत, या ध्वनिलहरी हवेत वाहतात. ध्वनी वाहून नेण्यास सक्षम असलेल्या एअरवेव्हची काही विशिष्ट फ्रीक्वेन्सी असते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, ध्वनिलहरी या हवेमार्फत एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करतात, याला आपण ईएमएफ रेडिएशन, इलेक्ट्रो (जो विजेवर चालतो), चुंबकीय क्षेत्र रेडिएशन (रेडिओव्हेव) असे म्हणू शकतो.

आपला मोबाईल फोन जादूने चालत नाही. तो तंत्रज्ञानाच्या आधारे चालतो. तुमच्या फोनला काम करण्यासाठी इलेक्ट्रिक चार्जिंगची आवश्यकता आहे, ज्यामुळे फोनमधील तंत्रज्ञान कार्यरत होते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला फोन डायल करता, तेव्हा तुमच्या फोनवरून एक ध्वनिलहर हवेच्या माध्यमातून जवळच्या सेल टॉवरच्या दिशेने प्रवास करते.

तिथून एअर वेव्ह एका संगणकीकृत स्विचिंग सेंटरकडे जातात, जे तुमचा डायल केलेला नंबर कुठे आहे हे ठरवतात आणि ध्वनी लाटा हवेतून जवळच्या दिशेने निर्देशित करतात. जोपर्यंत तुमचा कॉल तुमच्या मित्राला लागत नाही तोपर्यंत या लहरी मोबाईल टॉवर्स किंवा ऑप्टिक फायबर केबलद्वारे कार्यरत असतात. या सर्व गोष्टी अतिशय जलद वेगाने होतात.

विचार करा, तुम्ही पुण्यात असाल आणि तुम्हाला सॅन फ्रान्सिस्कोमधील एका मित्राशी संपर्क साधायचा आहे. तुम्ही त्याचा नंबर डायल करता आणि काही सेकंदातच आपला कॉल त्याला जोडला जातो. हजार किमी दूर असलेल्या तुमच्या मित्राशी तुम्हाला मनसोक्त गप्पा मारता येतात.

तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला २२ तासांचा प्रवास करावा लागणार असेल, पण आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही त्वरित रियल टाईममध्ये त्याच्याशी संपर्क करू शकता. मोबाईल येण्यापूर्वी जेव्हाही आपल्याला कोणाशी बोलायचे असायचे तेव्हा ऑपरेटरद्वारे ट्रंक कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला जायचा. यामध्ये बराच काळ जायचा.

तुमचा कॉल कनेक्ट व्हायचा. त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीशी बोलायचा आणि त्यांनी दिलेले उत्तर यामध्ये काही क्षणाचा विलंब असायचा. यामध्ये आवाजाची गुणवत्ता खराब असल्याने फोनवर ओरडून बोलावे लागायचे, पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या गोष्टी सहज-सोप्या झाल्या, आपल्या आप्तेष्टांशी बोलणे सोपे झाले. जसे एखाद्या गोष्टीचे फायदे असतात तसेच त्याचे दुष्परिणामही असतात आणि या तंत्रज्ञानाचे नेमके दुष्परिणाम काय आहेत ते आपल्याला लवकरच समजतील.

आपला मोबाईल नेमका कसा कार्य करतो याविषयी थोडे अधिक जाणून घेऊ. तुमच्या आजूबाजूला पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या जवळपास असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल नेटवर्कला कोणता फोन नंबर कुठे आहे हे कसे कळते?

पूर्वी जेव्हा फोन वायर्ड होते तेव्हा तुमचा फोन तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये असायचा, पण आता तुम्ही घराबाहेर ट्रेन किंवा बसमध्ये आहात, रस्त्यावर चालत आहात, तुमचे मित्र तुम्हाला भेटतात तेव्हा तुमच्याशी फोनद्वारे संपर्क साधणे शक्य झाले आहे. इतकंच नाही तर तुम्ही स्वतःच्या शहरात आहात किंवा मुंबईमध्ये आहात किंवा चेन्नईला जात आहात, तुमच्यापर्यंत पोहोचणे केवळ मोबाईलमुळे शक्य झाले आहे.

तुम्हाला माहिती असेलच लहान मुले जेव्हा वर्गातील बाई हजेरी घेतात तेव्हा ‘हजर मॅडम’ असे मोठ्याने बोलतात, जेणेकरून मॅडमला समजते की कोण आज हजर आहे आणि कोण गैरहजर. आपला मोबाईलसुद्धा अशाच प्रकारे स्वतःच्या उपस्थितीची हजेरी दर ४०-५० सेकंदांनी जवळ उपलब्ध असणाऱ्या मोबाईल टॉवरला देत असतो, मग तुम्ही फोन वापरत असाल किंवा नसाल, पण तो स्वतःची हजेरी लावत असतो.

जेव्हा तुम्ही तुमचा फोन पूर्णपणे बंद करता किंवा ऐरोप्लेन मोडवर ठेवता तेव्हाच ही संपूर्ण प्रक्रिया थांबते. म्हणूनच जेव्हा तुम्ही मोबाईल फोनचा वापर करत नसाल किंवा रात्री झोपताना फोन बंद करण्याचा सल्ला दिला जातो, याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल टॉवरशी सतत संपर्कात असल्यामुळे तुमच्या सभोवताली असणारे ईएमएफ रेडिएशन कमी होते.

साधारण २० वर्षांपूर्वी जगभरामध्ये 2-G मोबाईल फोन आला. यामध्ये केवळ आपण व्हॉईस कॉल करू शकत होतो. कालांतराने 3-G ची घोषणा करण्यात आली, यामध्ये फोनवर बोलणे, तसेच टेक्स्ट मेसेज करणे सोपे झाले. २०१५ मध्ये 4-G चे आगमन झाले, यामध्ये संपूर्ण डेटा, ई-मेल, सोशल मीडिया, व्हिडीओ, विविध ॲप्स अशा अनेक सोई उपलब्ध झाल्या. आता ताजे उदाहरण घ्यायचे म्हटले तर कोरोनाच्या काळात शिक्षणसुद्धा ऑनलाईन झाले. आपला स्मार्टफोन किती काम करतो, हे पाहिलंत ना?

आता साऊंड वेव्ह (ईएमएफ रेडिएशन)च्या प्रमाणाची कल्पना करा. या साऊंड वेव्ह हवेतून प्रवास करतात आणि दररोज यामध्ये झपाट्याने वाढ होते आहे. तुम्ही याचा विचार करू शकता की दिवसेंदिवस हे रेडिएशनचे जाळे आपल्यासभोवताली घट्ट होते आहे. हे रेडिएशनचे जाळे ३० वर्षांपूर्वी अस्तित्वातदेखील नव्हते, पण आपल्यापैकी काहीजण बोलतील की असं कसं, आम्ही तर रेडिओ ऐकायचो, अनेक दशकांपासून रेडिओ कार्यक्रम ऐकत आहोत. तुम्ही बरोबर आहात, रेडिओ हे केंद्रातून श्रोत्यापर्यंत रेडिओ वेव्हचे प्रसारण करण्याचा एक मार्ग आहे. मोबाईल हे दुतर्फा ट्रान्समिशन आहे, ज्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीशी बोलतो आणि त्याला ऐकूसुद्धा शकतो.

तुम्ही जेव्हा फ्रेश वाटण्यासाठी तुमची खिडकी उघडता, तेव्हा तुम्हाला समोरच्या इमारतीवर मोबाईल टॉवर ॲन्टीना दिसतात. तुम्हाला माहिती आहे का, या ॲन्टीना २४ तास कार्यरत असतात. त्या कधीही बंद होत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या सभोवतालच्या परिसरातील प्रत्येक मोबाईल फोनच्या संपर्कात राहणे अनिवार्य असते.

तुम्ही पहाटे तीन वाजता उठता आणि तुमच्या मैत्रिणीला ‘आय लव्ह यू’ म्हणायचे असेल किंवा इतर काही महत्त्वाचे काम असेल तर त्यासाठी मोबाईल टॉवरला सतत कार्यरत राहणे गरजेचे असते. ज्याप्रमाणे ऑफिसच्या ठराविक वेळेत रस्त्यावर ट्राफिक कधी जास्त तर कधी कमी असते, त्याचप्रमाणे मोबाईल टॉवरही कधी जास्त तर कधी कमी वेळेत काम करतात, ते पूर्णपणे कधीच बंद नसतात.

२४ x ७ मोबाईल टॉवरमधून ईएमएफ रेडिएशन सतत बाहेर पडत आहे. जर तुमचे घर मोबाईल टॉवरच्या आजूबाजूला असेल, तर या रेडिएशनचा आरोग्यावर काय परिणाम होतो आहे, याचा नक्की विचार करा.

हुऽऽऽश्‍श! कधी विचार केला होता का की काही सेकंदात जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन लावतो, तेव्हा त्यामागे नेमके काय घडते? आता इथेच थांबते, पुढच्या लेखात तुम्हाला काही मजेशीर एक्पेरिमेंट आणि न विसरता “Do’s and Don’ts” नक्की सांगेन..!

साऊंड वेव्ह हवेतून प्रवास करतात आणि दररोज यामध्ये झपाट्याने वाढ होते आहे. दिवसेंदिवस हे रेडिएशनचे जाळे आपल्यासभोवताली घट्ट होते आहे. जेव्हा तुम्ही तुमचा माेबाईल फोन पूर्णपणे बंद करता किंवा एरोप्लेन मोडवर ठेवता तेव्हाच ही संपूर्ण प्रक्रिया थांबते.

juhichawlaoffice@gmail.com

(शब्दांकन : नीलिमा बसाळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com