आठवणींचा हिंदोळा

प्रत्येक मुलीला, अगदी ती आजी झाली तरी तिच्या मनात माहेरचा एक हळवा कोपरा असतो.
Jyoti Singade-Satav writes memories of her life at her home
Jyoti Singade-Satav writes memories of her life at her home sakal
Updated on
Summary

प्रत्येक मुलीला, अगदी ती आजी झाली तरी तिच्या मनात माहेरचा एक हळवा कोपरा असतो.

- ज्योती शिंगाडे-सातव, पुणे

प्रत्येक मुलीला, अगदी ती आजी झाली तरी तिच्या मनात माहेरचा एक हळवा कोपरा असतो. पुण्यात शनिवारपेठेमध्ये माझे माहेर आहे. माझ्या माहेरच्या घराचं नाव ‘मुक्ताई’. आमच्या घराखाली आमचा कारखाना होता आणि वर आम्ही राहत होतो. माझ्या तीन काकांचा आणि वडिलांचा मिळून एकत्र व्यवसाय होता. आम्ही नऊ चुलत बहिणी, पाच भाऊ आणि आजी-आजोबा असे मोठे कुटुंब होते. आम्ही तीन सख्ख्या बहिणी व एक भाऊ. आम्हाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून माझ्या आई-वडिलांनी खूप काटकसर करून आम्हाला शिक्षण दिले. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तुमची संपत्ती चोरीला जाऊ शकते; पण तुमच्यावर झालेले शिक्षणाचे संस्कार कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तुमचे शिक्षण उपयोगी पडेल,’ असे माझी आई नेहमी म्हणते. शिवाय मुलगा आणि मुलगी हा भेद माझ्या आई-वडिलांनी कधीच केला नाही. आमच्या वार्षिक परीक्षा झाल्या, की आई आम्हाला घरातली कामं शिकवायची, त्यामुळे आम्ही तिघी बहिणी आमच्या सासरी मोठ्या कुटुंबामध्ये मोठमोठ्या जबाबदाऱ्या पेलू शकलो. त्या काळी स्कूल बसेस नव्हत्या, तेव्हा मोठ्या भावंडांबरोबर मी शाळेत जात-येत असे. आम्ही चिंचा, पेरू, गोळ्या घेऊन घरी जाताना खात असू. आमच्या घराच्या गच्चीवर आम्ही क्रिकेट खेळायचो. एक दगड घेऊन त्यावर वर्तमानपत्राचा कागद गुंडाळून, त्यावर सायकलच्या जुन्या ट्यूबच्या पट्ट्या लावून बॉल बनवीत असू, असा बॉल आत्ताच्या मुलाना माहीतच नसेल. कधीकधी एक रुपयाचा बॉल विकत आणत असू. ‘नवरात्री’मध्ये दररोज सगळ्यांच्या घरी भोंडला असायचा, तेव्हा संध्याकाळी खिरापत खाऊनच आमचे पोट भरत असे.

भोंडल्याची सगळी गाणी आमच्या तोंड पाठ असत. थिएटरला जाऊन पिक्चर बघायला आम्हा भावंडाना मोठी मौज वाटे. त्यावेळी बाल्कनीचे तिकीट फक्त तीन रुपये होते. भाड्याने सायकल घेऊन त्यावर मनसोक्त फिरणे हा माझा एक आवडता छंद होता. ती सायकल वेळेत परत द्यावी लागायची, गंमत म्हणजे तेव्हा सायकलचे एका तासाचे भाडे होते फक्त पंचवीस पैसे. आमच्या कारखान्यातील कामगारांना अप्पा (माझे वडील) व काका कायम आपल्या घरातले सदस्यच मानत असत. आंब्याच्या सीझनमध्ये आंबे आणले, की सर्वांत आधी कारखान्यातल्या कामगारांना आंबे दिले जायचे, कारखान्यातील मुले डब्याला सुकी भाजी आणत असत, त्यामुळे दररोज दुपारी माझी आई त्यांना मोठा डबा भरून रसाची भाजी देत असे. दिवाळी आली, की कारखान्यातल्या कामगारांचे आधी बोनस केले जायचे आणि त्यानंतरच आमच्या घरी दिवाळीची खरेदी व्हायची.

वडिलांनी लावलेल्या व्यवसायाच्या रोपट्याचे माझ्या भावाने वटवृक्षात रूपांतर केले. माझी मोठी बहीण साधनाताई आम्हा सर्व भावंडांवर आईसारखेच प्रेम करते, आता तर ती माझ्या आई-अप्पांचीसुद्धा आई झाली आहे. शाळेत रिबीनी लावून घातलेल्या दोन वेण्या, त्यावर घातलेला गजरा, शनिवारवाड्यामध्ये वेचलेली बकुळीची फुले, टेपरेकॉर्डवर गाणी ऐकण्यासाठी जमवलेल्या ‘सोनी’च्या कॅसेट, गणेशोत्सवामध्ये चालत फिरून पाहिलेले सगळ्या मंडळाचे गणपती.... असा आठवणींचा खूप मोठा खजिना आहे. माझे लहानपण हे माझ्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते. खूप समृद्ध आयुष्य जगलो आम्ही. आत्ताही माझ्या गोकुळात मी अगदी आनंदी आहे. म्हणूनच मला माझ्या माहेरा सांगावा धाडावा वाटतो, ‘घाल घाल पिंगा वारा, माझ्या परसात, सुखी आहे पोर सांग, आईच्या कानात.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com