स्मोक अँड फायर! (क. पु. देवधर)

क. पु. देवधर
Sunday, 23 June 2019

'आता तरी तुझ्या आई-बाबांना चांगली झोप येईल ना? तुला सरप्राईज द्यायचं म्हणून मी ही गोष्ट परवा दिवशी फोनवर मुद्दाम सांगितली नाही. आता तुम्ही सगळेजण तुमच्या सोईनुसार साखरपुड्याची तारीख ठरवा...आणि एक लक्षात ठेव, यापुढे तुला तोंड लपवून वागण्याची गरज नाही.''

'आता तरी तुझ्या आई-बाबांना चांगली झोप येईल ना? तुला सरप्राईज द्यायचं म्हणून मी ही गोष्ट परवा दिवशी फोनवर मुद्दाम सांगितली नाही. आता तुम्ही सगळेजण तुमच्या सोईनुसार साखरपुड्याची तारीख ठरवा...आणि एक लक्षात ठेव, यापुढे तुला तोंड लपवून वागण्याची गरज नाही.''

रविवारची सकाळ. स्वातीला जाग आली. झोप छान झाल्याची जाणीव तिला डोळे उघडल्याबरोबर झाली. तसा आनंद तिच्या चेहऱ्यावर उमटला. आणखी काही वेळ असंच आळसात पडून राहायचं तिनं ठरवलं. मात्र, तेवढ्यात फोन वाजला. पटकन फोन उचलून ती म्हणाली :
'हॅलो''
'स्वाती बोलतेय ना?''
'हो. मी स्वातीच. आपण कोण?''
'ओळख पाहू!''
स्वातीनं काही क्षण विचार केला अन्‌ ओळखलं.
स्वाती म्हणाली : 'अय्या, अनू तू! व्हॉट ए प्लीजंट सरप्राईज! कधी आलीस? कशी आहेस?''
'अगं हो...हो...! मी मजेत आहे. कालच आले बोस्टनहून. सकाळी उठल्याबरोबर तुला फोन केला...पण तुला वेळ आहे ना?''
'अगं, म्हणजे काय? आहे की वेळ. चांगल्या दोन वर्षांच्या गप्पा मारायच्या आहेत. आपण असं करू या का, संध्याकाळी आपल्या नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये जाऊ या. तिथं निवांत बोलता येईल.''
'ग्रेट! मीही हेच सुचवणार होते.''
***
स्वाती आणि अनुराधा या दोघी बालमैत्रिणी. अगदी केजीपासूनच्या. दोघींचे आई-वडील सुशिक्षित, सुसंस्कृत व सुस्थितीतले. दोघी बीकॉमपर्यंत एकत्र होत्या. अनूचं लग्न पटकन ठरलं व ती नवऱ्याबरोबर अमेरिकेला गेली. स्वाती एमकॉम करून एका कॉलेजात लेक्‍चरर झाली.
कुणाच्याही आयुष्यात काही घटना अशा काही घडतात की त्यांचे परिणाम दूरगामी तर होतातच; पण ते इतरांनाही भोगावे लागतात. स्वातीचा भाऊ एका सहकारी बॅंकेत ज्युनिअर ऑफिसर होता. संचालकांनी आतबट्ट्याचे व्यवहार केले व बिंग फुटताच त्याचं खापर स्वातीच्या भावावर फोडण्यात आलं.
एक मध्यमवर्गीय, सालस, पापभीरू कुटुंबावर कुऱ्हाड कोसळल्यासारखं झालं आणि नाही म्हटलं तरी या प्रकारामुळे स्वातीचं लग्न जमण्यात अडथळे आलेच.
***
स्वाती आणि अनुराधा जवळपास एकाच वेळी ठरलेल्या ठिकाणी पोचल्या. दोघी एकमेकींना उराउरी भेटल्या. आत जाताना सगळा परिसर अनू डोळे भरून पाहत होती. तिथली टेबलं, वेटर्स व एकूणच वातावरण यातला फरक तिला जाणवत होता. दोघींच्या नेहमीच्या टेबलवर त्या बसल्या आणि काही क्षण एकमेकींकडं पाहतच राहिल्या.
'काय? काही फरक जाणवतोय की नाही?
'हो तर. बऱ्यापैकी जाणवतोय. म्हणजे, सर्व काही तेच आहे; पण वातावरण बदललेलं दिसतंय.''
'तुझं कसं चाललंय तिकडं? एकटं वाटतं असेल नाही? की तिथंही गोतावळा जमवलायस?''
'माझं काय, दीपक एकदा ऑफिसला गेला की मी मोकळी. म्हणजे एकटीच. सर्व सुखसोई आहेत. वेळ जायला साधनंही आहेत; पण खरं सांगू का, अमेरिका म्हणजे "सोन्याचा पिंजरा'! इथं कसं शेजारपाजार, नातीगोती, बोलण्यातला अघळपघळपणा, सणवार... तिथं असं काहीच नाही. माझं राहू दे, तुझं सांग...काही प्रगती? एखादी "गुड न्यूज' देशील म्हणून वाट पाहत आहे मी.''
'अगं, कसलं काय नि कसलं काय! माझ्या भावाबाबत घडलेलं ते प्रकरण तुझ्या कानावर आलंच असेल ना? "बळीचा बकरा' करणं म्हणजे काय याचा प्रत्यय भावाच्या त्या प्रकरणासंदर्भात आम्हाला आला आहे.
माझा तर माणुसकीवरचा विश्‍वासच उडालाय. पैशासाठी इतक्‍या नीच स्तरावर कुणी जाईल याची कल्पनाच आपण करू शकत नाही. शेजारी, नातेवाईक सगळे एकजात सगळा सिनेमा दुरून पाहत होते. सगळ्यांचं एकच म्हणणं : "देअर इज नो स्मोक विदाउट फायर'!
वातावरणातला गंभीरपणा जरासा कमी व्हावा म्हणून अनू म्हणाली :
'ते असू दे. आपल्या बाकीच्या मित्र-मैत्रिणी कशा आहेत? कॉलेज कसं आहे. एनी गॉसिप?''
'अगं, गॉसिप म्हणशील तर विशेष काहीच नाही. नयना, चित्रा, विद्या यांची लग्नं झाली नाहीत. कारण तेच...पुढं पुढं शिकत जायचं आणि मग अपेक्षा वाढत राहतात. त्या पूर्ण करणारा असा कुणी मिळत नाही. आता माझं म्हणशील तर एक गुड न्यूज आहे. एक प्रपोजल आहे. श्रीकांत कामत. देवरुखला कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. आम्ही तीन-चार वेळा भेटलो आहोत. तसं नक्की झालं आहे; पण आम्हीच कुणाला अजून तसं सांगितलेलं नाही.''
अनू एकदम आश्‍चर्यचकित होऊन म्हणाली : 'कोण? नाव काय म्हणालीस?''
'अगं, श्रीकांत कामत. आपल्या पीकेसरांचा पुतण्या.''
'खरं की काय? तो तर आमच्या काकूंचा भाचा. आमच्या घरी नेहमी येणारा.''
भरपूर गप्पा मारून, चेष्टामस्करी, टाईमपास करून दोघी आपापल्या घरी गेल्या.
***
अनुराधा काहीशी घाईघाईतच घरात शिरली. तिला धापा टाकत आलेली पाहून तिची आई म्हणाली : 'अगं, झालंय तरी काय?''
'आई...अगं, आपल्या स्वातीचं जमतंय!''
'वा, छान! कोण आहे मुलगा?''
'अगं, तीच तर गंमत आहे. तो म्हणजे आपल्या काकूंचा भाचा. श्रीकांत. देवरुखचा. मला इतका आनंद झाला हे ऐकून की कधी एकदा तुला येऊन सांगतेय असं झालं होतं मला...म्हणून धापा टाकत आले बघ!''
'चांगली जोडी जमेल हो दोघांची. तुझाच पायगुण म्हणायचा!''
***
अनुराधा आत खोलीत गेली व तिनं लगेच श्रीकांतला फोन लावला.
'हॅलो! श्रीकांत बोलतोय ना?''
'हो. श्रीकांतच बोलतोय मी. आपण?''
'ओळख पाहू.''
'सॉरी, म्हणजे आवाज ओळखीचाच आहे; पण पटकन आठवत नाहीय कोण ते.''
'अरे, मी अनुराधा.''
'हां...हां, म्हणजे बोस्टन? यूएस?''
'बुल्स आय! अगदी बरोबर. मी तुला हा जो फोन केलाय तो "मी तुझ्यावर रागावले आहे' हे सांगण्यासाठी! कारण, एवढी गोड बातमी आणि ती तू आमच्यापासून लपवून ठेवलीस! स्वाती माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. माहीत आहे ना तुला!''
'अगं, हो...हो...सगळं काही सांगतो. जरा दम धर.
"इतक्‍यात कुणाला सांगू नकोस' असं तुझ्या मैत्रिणीनंच मला बजावलं होतं.
आणि तुझा राग म्हणशील तर मी पुढच्या आठवड्यात पुण्याला येणारच आहे, तेव्हा बोलू या निवांत आणि घालवू या तुझा राग.''
'ग्रेट. आमच्याकडंच मुक्कामी ये...''
'नको, तसं नको. मी आपला काकांकडं जाईन. त्यांना कळवून ठेवलंय तसं. उगाच त्यांचा गैरसमज नको व्हायला.''
***
चार दिवसांतच श्रीकांतनं स्वातीला फोन केला.
'हॅलो, मी बोलतोय. येत्या वीकेंडला मी पुण्यात येत आहे. रविवारी सोईनुसार भेटू या. अनुराधालाही सांगून ठेव. ती जरा रागावलेली दिसतेय...आणि हो, एक गुड न्यूजही आहे.''
'कोणती?''
'ते मी आल्यावर सांगेन, तेव्हा कळेलच.''
गप्पांचा विषय जवळजवळ ठरलेलाच होता म्हणून अनूनं स्वाती-श्रीकांतला त्यांच्या घरीच डिनरला बोलावलं होतं.
श्रीकांत आल्या आल्या अनूच्या आईकडं गेला.
'मावशी, नमस्कार करतो.''
- औक्षवंत हो. आणि काय रे, एवढी गोड बातमी आमच्यापासून का लपवलीस बरं?''
'आता समजली ना, काकू?'' श्रीकांत हसत म्हणाला.
'बसा बसा...मी सरबत घेऊन येते. डिनरला अजून वेळ आहे. गप्पा मारा तोपर्यंत निवांतपणे.''
सगळेजण हॉलमध्ये बसले.
श्रीकांत अनुराधाकडं पाहत म्हणाला : 'काय म्हणते अमेरिका? पिझ्झा व बर्गर मानवलेले दिसताहेत. महाराष्ट्र मंडळ, नाटक, भांडणं इत्यादी व्यवस्थित सुरू आहे ना! ग्रीन कार्ड मिळालं की नाही?''
'अरे, हो हो... एकदम किती प्रश्‍न विचारतोयस तिला? आत्ताच तर ती आली आहे. चांगली दोन महिने राहणार आहे.''
'अगं असू दे, स्वाती. ते मी सर्व सांगतेच; पण मी असेपर्यंत तुम्ही काय करणार ते सांगा. एवढी चांगली बातमी ऐकलीय मी. आता अमेरिकेला जाण्यापूर्वीच मला तुमच्या डोक्‍यावर अक्षता टाकायला मिळाव्यात, असं मला साहजिकच वाटत आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीतली अडचणही मी समजू शकते. मात्र, निदान साखरपुडा तरी उरकून टाका पुढच्या दोन महिन्यांत.''
अनूचं हे बोलणं ऐकून स्वाती लाजली.
श्रीकांत म्हणाला : 'अगं, अडचण वगैरे काही नाही. तू एवढी लांबून आलेली स्वातीची सख्खी मैत्रीण. तुझा हट्ट पुरवायलाच हवा. होईल, होईल...तू जायच्या आत साखरपुडा करून घेऊ या.''
स्वाती आश्‍चर्यानं म्हणाली :'अरे, ते कसं शक्‍य होणार? आई-बाबा तयार होतील?''
'म्हणजे, तुझ्या भावाचं प्रकरण ना! मी त्यांची समजूत काढीन.''
'अरे, पण कशी?''
'स्वाती, तू तुझ्या भावाचं प्रकरण सांगितल्यापासून मला शंका होतीच की त्या प्रकरणात काही दम नसणार. मला माणसाचा स्वभाव थोडा-फार कळतो. अगं, त्याच्याकडं नुसती एक नजर टाक. सशासारखा भित्रा दिसतो तो.
अफरातफर करायलासुद्धा "हिंमत' लागते. "धैर्य' लागतं! तो तशा प्रकारचा वाटत नाही. एवढे दिवस मला केवळ शंका होती; पण आता खात्री पटली आहे, की त्यानं ते काम केलेलं नाही...''
'खात्री पटली? ती कशी काय?''
'तुला परवा फोनवर म्हणालो ना मी, की एक गुड न्यूज देतो म्हणून. तोदेखील एक योगायोगच झाला. आमच्या प्रिन्सिपॉलनी सर्व स्टाफला डिनरला बोलावलं होतं. आमच्या कॉलेजचे सर्व अर्थिक व्यवहार ज्या बॅंकेमार्फत चालतात तिथं एक नवीन मॅनेजर आले आहेत. त्यांची ओळख करून देण्यासाठी आम्हा सगळ्यांना बोलावण्यात आलं होतं. ते कुठल्या तरी सहकारी बॅंकेतून राजीनामा देऊन इकडं आलेले आहेत.
"पुण्यासारख्या शहरातून देवरुखला बरं यावंसं वाटलं,'
असं त्यांना कुणी तरी विचारलं.
त्यावर ते म्हणाले :'तसा मी कोकणातलाच; पण सहकारी बॅंकेचा कंटाळा आला. अगदी सहाच महिन्यांपूर्वी एका साध्या-सरळ मुलाला बळीचा बकरा बनवला जात असताना मी पाहिलं. अगदी माझ्या डोळ्यांसमोर. मी नोकरी सोडायचीच म्हणत होतो; पण आयतीच तुमच्याकडं जागा झाली...आणि आलो मी इथं.''
तो बळीचा बकरा करण्यात आलेला मुलगा म्हणजे स्वातीचा भाऊच असल्याचं हळूहळू बाहेर पडणाऱ्या माहितीतून स्पष्ट होत गेलं.
श्रीकांत स्वातीकडं वळला आणि तिला म्हणाला.
'आता तरी तुझ्या आई-बाबांना चांगली झोप येईल ना? तुला सरप्राईज द्यायचं म्हणून मी ही गोष्ट परवा दिवशी फोनवर मुद्दाम सांगितली नाही. आता तुम्ही सगळेजण तुमच्या सोईनुसार साखरपुड्याची तारीख ठरवा...आणि एक लक्षात ठेव, यापुढं तुला तोंड लपवून वागण्याची गरज नाही. तुझे शेजारी, इतर नातेवाईक या सगळ्यांना ठामपणे सांग, "येस, देअर कॅन बी स्मोक विदाउट फायर!'
- स्वातीचे डोळे ओले झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: k p deodhar write smoke and fire article in saptarang