
कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणजे जगण्याचे तत्त्वज्ञान समृद्ध करणारे ज्ञानपीठ! त्यांच्या ‘मन वढाय वढाय’, ‘अरे खोप्यामधी खोपा’, ‘अरे संसार संसार’ या प्रसिद्ध असलेल्या आणि संगीतबद्ध झालेल्या गाण्यांनी मराठी काव्य समृद्ध केले आहे.
जगण्याचे तत्त्वज्ञान समृद्ध करणारे ज्ञानपीठ
- कबीर दास
कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणजे जगण्याचे तत्त्वज्ञान समृद्ध करणारे ज्ञानपीठ! त्यांच्या ‘मन वढाय वढाय’, ‘अरे खोप्यामधी खोपा’, ‘अरे संसार संसार’ या प्रसिद्ध असलेल्या आणि संगीतबद्ध झालेल्या गाण्यांनी मराठी काव्य समृद्ध केले आहे. ही गाणी अनेकांना आजही मुखोद्गत आहेत. कारण त्यांच्या अशा अनेक काव्यपंक्ती जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या आहेत. आज (ता. ३) बहिणाबाईंचा निर्वाणदिन. त्यानिमित्त...
लेखकाचे समृद्ध अनुभवविश्व त्यांचे लेखन समृद्ध करत असते. त्यामुळे लेखनात प्रतिबिंबित झालेल्या जगण्याच्या जाणिवांतून तावूनसुलाखून निघाल्याची अनुभूती आस्वादकांचा वाङ्मयीन परिघ समृद्ध करतो. मग तो लौकिक अर्थाने कोणत्या ज्ञानशाखेत शिकला आहे, हे नगण्य होऊन जाते. अक्षर ओळख नसतानाही मौखिक वाङ्मय निर्मिती करणारांची महाराष्ट्राला मोठी पुरातन परंपरा आहे. असे अनेक मौखिक वाङ्मय निर्माते आपल्यासोबत आपले वाङ्मय घेऊन काळाच्या पडद्याआड गेलेत. ज्यांचे वाङ्मय अक्षरात बंदिस्त झाले ते आज आपल्याला ज्ञात आहेत. अशा परंपरेतील एक मैलाचा दगड म्हणून उभी असलेली खान्देश कन्या कवयित्री बहिणीबाई चौधरी ही महान मौखिक वाङ्मय निर्माती!
ओवी या काव्यवृत्ताचा पिंड हा अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांच्या संगमावर बेतलेला आहे. त्याचा संतमहंतांपासून चालत आलेला वारसा जतन करण्याची जीवननिष्ठा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी बाळगल्याचे दिसून येते.
जळगाव जिल्ह्यातील आसोदा या खेड्यात माता भिमाई उखाजी महाजन यांच्या पोटी जन्मलेल्या बहिणाबाई, नथुजी चौधरी यांच्याशी विवाह होऊन चौधरी झाल्या. मुळात शेतकरी कुटुंबातील असलेल्या बहिणीबाईंना पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी येऊन शेतकरी जीवन जगावे लागले. त्या जाणिवांचा आलेख म्हणजे त्यांची कविता.
जीवनाचे सार अहिराणीसारख्या बोलीभाषेत ओवी वृत्तात गुंफून सहजपणे हे तत्त्वज्ञान जनसमुदायाला सांगणारे एक विद्यापीठ म्हणजे बहिणाबाई चौधरींच्या रूपाने मराठी साहित्याला मिळाले. बहिणाबाईंचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व हे घर, गाव आणि शेत या अनुभवविश्वाच्या मर्यादेतून साकारलेले दिसते. आपल्याच कक्षेतील जीवनाची परिभाषा त्यांनी अत्यंत समरसून मांडली आहे. जे जगल्या, जे अनुभवले, जे पाहिले तेच सूक्ष्मपणे त्यांच्या काव्याने स्वीकारलेले आहे. यातूनच बहिणाबाईंच्या काव्याची शाश्वत मूल्ये जोपासली गेल्याचे दिसून येते. त्यांच्या अनुभवविश्वाचा गाभा हा अनेकदा तीव्र वेदना घेऊन येतो.
वयाच्या तिसाव्या वर्षी आलेले वैधव्य पचवण्याची ताकद त्यांना काव्याने दिली. पती-पत्नीच्या नात्यावर त्या आपल्या कवितेतून प्रकाश टाकतात. या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना त्या धरणी मातेशी संवाद साधतात,
सांग सांग धर्ती माता
अशी कशी जादू झाली
झाड गेलं निधी सनी
मागे सावली उरली
जसे झाड तिथे सावली तसे पती तेथे पत्नी, पण असे घडले की झाड निघून गेले आणि सावली मात्र मागे उरली. या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न त्या करताना दिसतात. डोळे रिते होतात. अश्रू संपून जातात. अंतःकरणातले दुःख मात्र तसेच राहते. हे दुःख व्यक्त करताना त्या म्हणतात,
रडू नको माझ्या जीवा
तुला रड्याची रे सब
रडू हसव रे जरा
त्यात संसाराची चव
आपल्या मनाला समजावण्याचा प्रयत्न बहिणाबाई करतात. दुःख बाजूला सारून कर्तव्याला सामोरे गेलेल्या दिसतात. जीवनाचा प्रवास हा सुखाचा नाही, तो काट्याकुट्यांनी भरलेला आहे याची जाणीव त्यांना होती. आप्तस्वकीयांच्या स्वार्थी वृत्ती त्या जाणून होत्या. बहिणाबाईंच्या या मुख्य, परंतु सुजाण दुःखातून त्यांचा पिंड आणि सामर्थ्य सामावलेले दिसते. बहिणाबाईंच्या काव्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर येताना दिसतात. निसर्गाशी एकरूपता, कर्मनिष्ठेलाच ईश्वरनिष्ठा मानणाऱ्या संसाराचे आणि जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या, विनोदबुद्धी जपणाऱ्या बहिणाबाई धरित्रीच्या आरशात स्वर्ग शोधण्याचा ध्यास जवळ ठेवतात. माहेरची ओढ ही त्यांच्या कवितेत येते.
स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादापेक्षा प्रयत्नवादावर त्या अधिक भर देतात. जीवनात येणाऱ्या संकटांवर मात करत असताना रडत बसल्या नाहीत आणि परिस्थितीलाही दोष दिला नाही, उलट धीराने सामोरे गेल्या. हेच जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यांच्या काव्याचे वेगळेपण बनले आहे. आकाश, जमीन आणि माणूस यांचा विलक्षण खेळ त्यांच्या काव्यामध्ये दिसतो. मनाची, माणसाची आणि माणूसपणाची कविता त्यांच्याकरवी नकळतपणे निर्माण झालेली दिसते. यातूनच त्यांची वाङ्मयीन जडण-घडण झाल्याचे दिसते.
तेराव्या वर्षी विवाहित होऊन वयाच्या तिसाव्या वर्षी वैधव्य आलेल्या बहिणीबाईंना आपली मुलं ओंकार, सोपान व काशी यांचा संभाळ करत असताना आलेले जीवनानुभव शब्दबद्ध करताना ‘संसार कसा’ या विषयावर त्या भाष्य करतात.
‘अरे संसार संसार
नाही रडनं कुढंनं
येड्या, गयातला हार
म्हनु नको रे लोढनं’
संसारातील सुख-दुःखाकडे निकोप वृत्तीने पाहण्याची दृष्टी त्या देतात. जीवनानुभवातील दु:खामुळे संसार अडथळा वाटू लागतो. संसाररूपी मिळालेल्या हारा तु लोढनं म्हणु नको. (लोढनं म्हणजे अवखळ जनावराला प्रतिबंध घालण्यासाठी त्याच्या गळ्यात अडकवलेल्या लाकडाचा तुकडा.) माणूस ‘हार’ हा भूषण म्हणून मिरवण्यासाठी आभूषित करत असतो, त्याप्रमाणे सुख-दुःखाने मढवलेले जगणं अभिमान म्हणून स्वीकारले पाहिजे.
जगी हासून बोलून,
संसार केला गोड
कोण जाणते चतुर,
सले अंतरात खोल
वाट्याला आलेले दुःख गोड करून घेण्यासाठी माणसाला ऊर्जा देणारे हे शब्द जगण्याची उमेद देतात.
जव्हा इमान सचोटी
पापा मधी रे बुडले
तव्हा याच माणसानं
किल्ल्या कुलूप घडले
किल्ल्या राह्यल्या ठिकाणी
जव्हा तिजोऱ्या फोडल्या
तव्हा त्याच माणसानं
बेड्या लोखंडी घडल्या.
या काव्यपंक्तीत व्यवहारी विश्वात माणसाच्या सत्त्वाची कशी परीक्षा पाहिली जाते आहे. माणसानं घरासाठी किल्ल्या कुलपं लावली. कुलपासह तिजोऱ्याच फुटल्या, लोखंडी बेड्या केल्या. याचा अर्थ माणसाला असलेली ‘माझं माझं’ची तृष्णा कधीही मिटत नाही. तो पर्याय काढून पुन्हा उभा असतो; पण स्वार्थ सुटता सुटत नाही.
माणसांमध्ये असलेल्या ‘मी’पणाचा भ्रमाचा भोपळा फोडताना अहंकारी वृत्तीवर प्रहार केल्याचे जाणवते. माणसांमध्ये असलेल्या माणुसकीचा ऱ्हास गर्विष्ठपणाने होतो, याचा प्रत्यय देणाऱ्या
‘अरे मी कोन, मी कोन?
आला मानसाले ताठा
सर्व्या दुनियात आहे
माझ्याहून कोन मोठा?
सर्व्या दुनियेचा राजा
म्हने, ‘मी कोन, मी कोन?’
अशा त्याच्या मीपनाले
मसनात सिव्हासन’
मार्मिक शब्दांत उपरोधात्म भाषा माणसाला शहाणपण शिकवते. त्याच भाषेचा वापर नेमकेपणाने बहिणाबाईंनी केलेला दिसतो. शेवटी काय तर मेल्यानंतर अहंकाराला स्मशानात सिंहासन मिळते. हे भाष्य तत्त्वज्ञानाचा धडा गिरवणारा प्रयोग आहे.
कवी हा काळाच्या बरोबर त्रिकालाबाधित सत्य सांगत असतो. आज होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांचा विचार करताना बहिणाबाईंच्या काव्यपंक्ती आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात.
‘पेरणी पेरणी
देवा तुझी रे करनी
दैवाची हेरनी
माझ्या जीवाची झुरनी’
यामध्ये शेतकरी कसा निसर्गावर अवलंबून असल्यामुळे अनिश्चित जीवन प्रवास करतो आहे, हे त्या सांगतात.
‘नाही अझून चाहूल
नको पाडू रे घोरात
आज निंघाली कोणाची
वाऱ्यावरची वरात?
ये रे वाऱ्या घोंघावत
ये रे खयाकडे आधी
आज कुठे रे शिरला
वासराच्या काना मधी’
शेतकऱ्यांचे जीवनमान हेसुद्धा निसर्गाच्या वाऱ्याबरोबर वाऱ्यावरची वरात कशी झाले हे बहिणीबाई सांगत आहेत. शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे नुसते कष्ट आणि उत्पादन असे मर्यादित नसून त्यातील व्यवहार वगळून त्याचं जिनं कसं विश्वव्यापक आहे, याचं दर्शन घडते.
‘मन वढाय वढाय’, ‘अरे खोप्यामधी खोपा’, ‘अरे संसार संसार’ या त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या आणि संगीतबद्ध झालेल्या काव्यपंक्ती बहुतांश लोकांना माहिती आहेत. त्या गीतांमध्ये असलेले जगण्याचे तत्त्वज्ञान माणसाचे अनुभूतीविश्व समृद्ध करते. या ज्ञानपीठाला निर्वाणदिनी त्रिवार वंदन!
धन्य बहिणाबाई,
काव्य जीवनाचा शोध,
शब्दा शब्दांच्या कुशीत
पेरे जगण्याचा बोध.....
(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)