
शाहीन इंदूलकर - shahin.indulkar@gmail.com
नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत कलावतीदेवीचा गौरव केल्याची बातमी कळली आणि साधारण सात-आठ वर्षांपूर्वी तिची झालेली भेट आठवली. चंदीगडहून फिरोझपूरला त्या दुपारी मी पोहोचले होते. एका धाब्यावर जेवण आटोपून सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आणि वरिष्ठांबरोबर मागच्या कामाचा आढावा घेतला आणि पुढल्या काही दिवसांचं नियोजन त्याच्या गाडीत बसून करत ‘भोलुवाला’नामक गावी पोहोचलो. लांबच लांब गव्हाची आणि सरसोंची (मोहरी) शेती. सभोवताली धुकं पसरलेलं, शेती संपताच पुढे वस्ती सुरू झाली. दुमजली बंगले आणि गच्चीवर विमानाच्या, फुटबॉलच्या आकाराच्या पाण्याच्या टाक्या दिसत होत्या! त्या गावात सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्पाचं काम नुकतंच चालू झालेलं. उत्तर प्रदेशातील एक अनुभवी जुनी संस्था म्हणून ‘श्रमिक भारती’ संस्थेचं नाव होतं; पण पंजाबात काम करण्याची त्यांची पहिलीच वेळ होती. एका मोठ्या बँकेच्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) विभागामार्फत ते काम चालू होतं. मी त्या बँकेची- म्हणजे ‘फंडिंग एजन्सी’ची कर्मचारी होते.