esakal | ...अन् वृद्धाश्रमात जाणारी पावलं घराकडं वळाली
sakal

बोलून बातमी शोधा

 DURGA.jpg

थोडं दुर्गानं, थोडं तिच्या कुटुंबानं चार पावलं मागं जाऊन परिवर्तन घडवलं होतं. दोन्ही मुलांनी आळीपाळीनं तिला सांभाळण्याची जबाबदारी घेतली. एका वृद्धाश्रमात जाणारी पावलं घराकडं वळवल्याचं समाधान मला मिळालं. 

...अन् वृद्धाश्रमात जाणारी पावलं घराकडं वळाली

sakal_logo
By
कल्पना जाखडे

"हॅलो स्नेहा, अगं तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तुझ्याकडे वेळ आहे का थोडा?' 
"हॅलो दुर्गाताई, कशी आहेस? अगं मी जरा कामात आहे. तुला थोड्या वेळात फोन करते. चालेल ना? काही महत्त्वाचं आहे का?'' 
"हो... हो... तसं... महत्त्वाचं.' ठीक आहे. पण नक्की कर बरं का फोन.' 

मी माझं काम आवरून दुर्गाला फोन लावला. तिची एकूणच सध्याची परिस्थिती बघत, फोनसाठी पैसे खर्च करणंही शक्‍य नव्हतं, हे मला माहीत होतं. म्हणूनच मी दुर्गाशी खोटं बोलले, की मी कामात आहे म्हणून. दुर्गाताई आता पंचाहस्तरीतली वयोवृद्धा. नात्याने माझ्या दूरची बहीण. तिची दोन मुलं, एक मुलगी, नात, नातू, सुनांनी भरलेलं घर. दुर्गाताईंचा नवरा स्वर्गवासी होऊन बराच काळ लोटला. एवढा पसारा दुर्गाताईच सावरायची. तिचं शिक्षण बेताचं असल्यानं प्रपंच चालवताना दुर्गाताई खरंच अष्टभुजा आहे, असं वाटायचं. मुलंही फारशी शिकली नाहीत. दुर्गाताई एकटी कमावती असल्याने त्या काळात तिचीच सत्ता घरावर होती. दोन्ही मुलं, सुना तिच्या शब्दाबाहेर नसायच्या. जेमतेम मिळकतीमुळे दुर्गाला स्वतःचं घर करता आलं नाही. ना सोननाणं, पैसा आडका, बँक बॅलन्स. फक्त ईपीएसची तुटपुंजी पेन्शन मिळायची. दोन्ही मुलांना जेमतेम नोकरी. सुना घरबसल्या काहीतरी काम करून कमावतात. आता सुनांचं राज्य नि दुर्गाची प्रजा. दुर्गाची जबाबदारी घ्यायला कुणीच तयार नाही.

दुर्गाचं वय झालेलं. जुन्या काळातली असल्यानं तोंडानं फटकळ. तिनं उर्वरित आयुष्य आपल्या घरात, मुलाबाळांत राहून घालवावं, असं आम्हा सगळ्या भावंडांना वाटायचं; पण हे तिला जमलंच नाही. अगदी काल परवा तिचा बारावीतला नातू तिला आमच्यात राहू नको असं म्हणाला. भरीत भर सूनबाईपण तोंडसुख घेऊ लागल्या. मुलगा उघड्या डोळ्यानं, गप्प राहून त्यांना मूक संमती देऊन, 'तू बाहेर पड,' असं म्हणू लागला. आज दुर्गा हतबल होती. मला म्हणाली, "माझी भिस्त तुझ्यावरच आहे. माझ्यासाठी एखाद्या अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात सोय होते का बघ. स्नेहा तुझं सोशल वर्क चालू असतं ना? मग तुझ्या ओळखीनं अनाथाश्रमाची माहिती काढशील का? अगं, माझं-माझं म्हणताना पोटची मुलं केव्हा परकी झाली ते कळलंच नाही. तुमच्यासारखी संपन्न मनाची, सहकार्याची माहेरची माणसं हेच माझं धन. 

मी थोडा कालावधी जाऊ दिला. तिला मात्र फोन करून आवर्जून सांगायची माझी चौकशी सुरू आहे. पण, एक काम करण्यास मात्र विसरले नाही. दुर्गाताईच्या दोन्ही मुलांना फोन केला. दुर्गाताईच्या वार्धक्‍याची, जबाबदारीची जाणीव करून दिली. आईला तुमच्याजवळच ठेवा. वृद्धाश्रमात नका पाठवू. जरा चार पावलं मागे जाऊ. एकमेकांना ओरबाडण्यापेक्षा थोडं समजून घेऊ, असं बोधामृताचे डोस दिले. 

यावर दुर्गाताईच्या मुलांनी दुर्गाच्या तक्रारींचा पाठच वाचला. मलाही ते बरोबर वाटलं. मुलं 100 टक्के खरंच बोलत होती असं नाही, त्यांचंही वागणं चुकत होतंच. पण टाळी एका हातानं वाजत नाही. म्हणून मी दुर्गाताईलाही चांगलंच फैलावर घेतलं. तिचा स्वभाव आम्हाला माहीत होता. आताच्या 'वृद्धाश्रमाच्या' निर्णयाला दुर्गाताईच जबाबदार आहे असं वाटलं. नव्या विचारांच्या पण धडपडणाऱ्या मुलांच्या संसारात आपणही ओझं न वाटता एकरूप होऊन गेलो. थोडं त्यांना समजून घेतलं. चार पावलं मागं गेलो, 'मी'पणा बाजूला ठेवला तर काय बिघडतं? मुलांच्या दैनंदिनी व्यवहारात लक्ष देऊ नये. वृद्धाश्रमातले नियम काटेकोर असतात. त्यांचं पालन होईल का? तिथल्या सहकाऱ्यांशी पटेल का? असे खूप प्रश्‍न मी तिला विचारून जरा विचारात पाडलं. "दुर्गाताई तू स्वतःत थोडा बदल कर. वागण्यात कडक शिस्त जरूर असावी; पण एका विशिष्ट वयापर्यंतच. जमेल तेवढं अध्यात्म, सामाजिक काम, तोंडाला कुलूप घालून योग्य तेवढंच बोलणं ठेवल्यास घरातली सर्वांत श्रेष्ठ तू ज्येष्ठ होशील. मुलं नातवंडंही स्वभावात बदल करतील. पैसा जवळ नाही, पण तुझा हळवा, प्रेमळ स्वभाव आभाळाएवढा होऊ देत. एवढं बाळकडू वयोवृद्ध दुर्गाताईसही मी द्यायला चुकले नाही. 

दोन महिने गेले नि माझा मोबाईल खणाणला. दुर्गाताईचा नंबर बघून जरा धक्काच बसला. फोन दुर्गाताईंच्या धाकट्या मुलानं केला होता. तो म्हणाला, 'थँक्‍स मावशी.' त्यानं दुर्गाच्या पंचाहत्तरीनिमित्त घरगुती, अत्यंत साधेपणानं वाढदिवस करायचं ठरवलं होतं नि मला अगत्याचं निमंत्रण होतं. थोडं दुर्गानं, थोडं तिच्या कुटुंबानं चार पावलं मागं जाऊन परिवर्तन घडवलं होतं. दोन्ही मुलांनी आळीपाळीनं तिला सांभाळण्याची जबाबदारी घेतली. एका वृद्धाश्रमात जाणारी पावलं घराकडं वळवल्याचं समाधान मला मिळालं. 
 

loading image
go to top