समर्थ कुटुंब - समर्थ सहजीवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Family

कुटुंब हे राष्ट्राचं सर्वांत लहान रूप आहे. घरातील स्त्री ही प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. घरातील प्रत्येक पुरुष घराची अभेद्य चौकट आहे.

समर्थ कुटुंब - समर्थ सहजीवन

- कल्पना क्षीरसागर saptrang@esakal.com

१५ मे जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. कुटुंब म्हणजे काय, त्यातला आधारस्तंभ कोण आणि कुटुंबव्यवस्था कशी, या साऱ्याचा विचार भारतीय संस्कृतीने नेमकेपणाने केलाय. तोच विचार काय आहे त्याचा वेध...

कुटुंब हे राष्ट्राचं सर्वांत लहान रूप आहे. घरातील स्त्री ही प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. घरातील प्रत्येक पुरुष घराची अभेद्य चौकट आहे. घर म्हणजे तरी काय? तर सामाजिक, सांस्कृतिक, भावनिक, बौद्धिक व्यवस्था आहेत त्या सक्षमपणे पार पाडणं. या जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःला, घरातील सर्व घटकांना बाह्यजगाशी स्वतःला अनुकूल बनवणं अत्यंत गरजेचं असतं. याचबरोबर सामाजिक दायित्वाचं भान ठेवणं, स्वतःच्या ज्ञानार्जनाबरोबर अर्थभान कायम ठेवणं; देशव्यापी, वैचारिक प्रवाहाचंही भान ठेवणं कुटुंबातच शिकता येतं. इथं मला विचारपूर्वक समर्थ रामदास स्वामींचा समर्थ सहजीवन यासाठी काही ओव्या सांगायचा मोह जरूर होतो आहे.

मुळी सूक्ष्म निर्माण जाले।

पुढे स्पष्ट दिसोन आले।

उत्पत्तीचे कार्य चाले। उभयतांकरिता ।।३२।।

मूळी शिवशक्ती खरे। पुढे जाली वधूवरे।

चौऱ्यांसि लक्ष विस्तारे। विस्तारली जे ।।३३।।

येथे शिवशक्तीचे रूप केले। श्रोती मनास पाहिजे आणिले।

विवरलियांविण बोलिले। ते व्यर्थ जाणावे ।।३४।।

निसर्गाचे अतिशय लोभस चित्र म्हणजे स्त्री-पुरुष! पण ते तर शिवशक्तीचा रूपविस्तार आहे. हे जर आपल्याला पटतं, तर मग हे पण आत्मसात झालं पाहिजे, की या शक्तीचा विस्तार समर्थ असायला हवा. हा विस्तार म्हणजे कुटुंब आणि कुटुंबाला सक्षम बनवणं म्हणजेच राष्ट्राचा स्वभाव, स्वधर्म, संस्कृती ही वैशिष्ट्यं वाढवण्यासारखीच आहेत. जरा विस्तारानेच बघू या ही वैशिष्ट्यं!

भारतीय कुटुंबव्यवस्था जीवनमूल्यांवर आधारलेली आहे. ही जीवनमूल्यं कुणी एका व्यक्तीने लिहिलेली नाहीत, तर वेदकाळापासून समाज-आरोग्य नितांत, निकोप, निरोगी, निर्भय राहावं यासाठी कुटुंबधर्म म्हणजेच गृहस्थधर्म व्यवस्था प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी अत्यंत विचारपूर्वक निर्माण केली आहे. आता एक छोटीशी यादी करू या की, ही कुटुंबव्यवस्था आपल्याला काय काय देते? बरं हे सगळं नकळत, मुक्तहस्ताने आणि मुख्य म्हणजे आत्मीयतेने देत असते.

आपली कुटुंबव्यवस्था प्रथमतः एक बीज रुजवते की, कुटुंबात व्यक्तीपेक्षा घर, परिवार मोठा असतो. म्हणजे एकमेकांसाठी तडजोड करणं ओघाने आलंच. घरातील सदस्य, इतर घटक यांच्यासाठी सहकार्य करणं ही तर नकळतपणे दिलेली मोठी शिकवणच आहे. इतकंच नाही, तर तडजोड करणं, एकमेकांप्रती संवेदना दाखवणं, भावभावना जपणं, एकमेकांचं हित बघणं असं कितीतरी सांगता येईल. अशा प्रकारची पारंपरिक जीवनमूल्यं जपताना, आधुनिक काळात जगताना काही वैशिष्ट्यपूर्ण विचार करणंही जरुरीचं आहे. बघा हं पटतं का?

नवी पिढी गॅजेटच्या काळातील आहे. हवं म्हणजे हवं, तेसुद्धा आताच्या आता, अगदी ताबडतोब. बरं पुन्हा नकार ऐकायची सवय नाही. म्हणजे प्रयत्न करा, वाट पाहा, यशापयश तुम्ही नका ठरवू; ते काळ, गुणवत्ता ठरवेल, हा समाजशास्त्रीय मंत्र फक्त घरातील लोकच देऊ शकतात.

आज सर्वत्र मुला-मुलींमध्ये उत्कटता, त्यागाचा विचार, संवेदनक्षमता, परोपकार, दयार्द्र बुद्धी जरा कमीच दिसते. किंबहुना शोधावी लागते. आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलं आहे, की समर्थ, सुंदर जीवन जगण्यासाठी I.Q. म्हणजे बुद्‌ध्यांकापेक्षा E.Q. अर्थात भावनांक विकसित झालेला असलाच पाहिजे. समाजात ही जी भावनिक निरक्षरता, संवेदनात्मक अभाव दिसतो, याला कारण कुटुंबपद्धती हे आहे.

- सध्याच्या काळात मुलं-मुली असा फरक कोणत्याही क्षेत्रात फारसा मानला जात नाही. मुलांच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षाही जास्त मुली शिक्षित होत आहेत. चांगली गोष्ट आहे; पण समाजात काही प्रमाणात असहकारिता दिसून येते. म्हणजे तरुणवर्ग अत्यंत शिक्षित झाला, तरी मानसिकतेचं काय? ती कुठे निकोप, सुदृढ आहे? अगदी हेच मूल्य (म्हणजे परस्परपूरकता) फक्त दिलं जातं ते कुटुंबातच!

- सुरेल जगण्यासाठी भावभावनांची चढाओढ कामाची नसते, तर सर्वंकष वैचारिकता हवी, संयम नावाचं मनाचं तरबेज शस्त्र हवंच. ही तर कुटुंबाने द्यायची देणगी आहे.

सहजीवन, समर्थ जीवन यात सहसंवेदना (Empthy) महत्त्वाची असते. आपल्याला एकमेकांच्या भावना जाणून घेता आल्या पाहिजेत. माउलींच्या शब्दांत सांगायचं तर - शब्देविण संवादु । दुजेविण अनुभवू खरंतर यालाच समरस होणं असं म्हणतात. आज समरसता हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे; परंतु कायदा करून कोणतंही मूल्य नाही रुजवता येत. त्यासाठीचा निर्व्याज वातावरणातील भावच आवश्‍यक असतो. हा अभ्यासक्रम जिथं रुजवला जातो ते समर्थ कुटुंबातच! कर्तृत्व फुलविण्याचं हे महत्त्वाचं अंग आहे. एकमेकांना साथ देणं, एकमेकांवर निष्ठा असणं म्हणजे काय असतं बरं? तर एकमेकांच्या नातेधर्म, कार्यधर्म, प्रवृत्तीधर्म यांत समरस होऊन साथ देणंच आहे. मला काय लाभ होणार यापेक्षा माझ्या देण्याने माझ्या साथीने दुसऱ्याला काय लाभ होणार आहे, याचा सकारात्मक विचार करणं म्हणजेच नातेसंबंधांतलं सामर्थ्य व्यक्त करणे होय. हं, एक मात्र आवश्‍यक बाब आहे ती म्हणजे संवाद! संवाद म्हणजे फक्त छान छान गप्पा मारणं, चर्चा करणं, सतत हसत राहणं नाही, तर यात वादही पर्यायाने येणारच. घरातील व्यक्तींचे स्वभाव वेगवेगळ्या प्रकारचे, विरोधाभासी असणारच. विशेष म्हणजे, कर्तृत्व आकाराला येण्यासाठी वादविवादाचीही गरज असतेच. ‘मी म्हणेन तीच पूर्व दिशा’ अशा ठिकाणी ना वाद, ना संवाद. असं घर अशक्त असतं. कारण वाद विकोपाला न नेता सर्वांना सोबत नेणारा मार्ग म्हणजे संवाद होय. तन, मन, बुद्धी, विवेक यांना अष्टावधानी बनवतो तोच हा संवाद. कारण इथं सर्वांचं ध्येय एकच असतं ते म्हणजे, कुटुंबातील प्रत्येकाचं सुख, आनंद!

जन्मल्यापासून अंतिम क्षणापर्यंत माणसाचं शारीरिक पालनपोषण अन्न आणि अन्नातील जीवनसत्त्वाने होतं; पण मानसिक, बौद्धिक, आत्मिक पालनपोषण अदृश्‍य शक्तिरूप जिव्हाळ्याने होतं. इथंच स्वतःचा आदर करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. त्याचबरोबर इतरांना आदर देण्याची वृत्ती निर्माण होते. इथं काही सामाजिक तत्त्वांचा बीजरोपण समारंभ आपोआप होतो.

  • आत्मकेंद्री वृत्ती बहुविध केंद्री होणं

  • एककल्ली स्वभावात लवचिकता येणं. थोडक्‍यात, समजून घेण्याची मनोवृत्ती आकाराला येणं.

  • स्वतःचं म्हणजे स्वभावाचं विश्‍लेषण करण्याची मनोभूमिका तयार करणं. म्हणजे मला हे हवं ते तसंच पाहिजे अशी भूमिका बदलणं शक्‍य होतं. त्याऐवजी मी कसं adjust करू शकतो हा विचार सारखा मनात यायला लागतो.

  • आता स्व-मताकडे तटस्थपणे पाहण्याची गरज कळते, तसंच स्वनिरीक्षण करण्याची सवय विकसित होते. यामुळे होतं काय, तर दुसऱ्याला गृहीत न धरता; बक्षीस, कौतुक याची अपेक्षा न करता मानवी मन समजून घेण्याचा दृष्टिकोन निर्माण होतो. आता नातेसंबंधांची जाण अधिक निर्दोष होऊ लागते.

अगदी विचार केला तर एका प्रश्‍नाचं उत्तर आता आपण सहज देऊ शकतो. प्रश्‍न आहे कुटुंबाचं व्यक्तिमत्त्व म्हणजे काय?

त्याचं उत्तर असं देता येईल -

कुटुंबाच्या बाबतीत खालील बाबी या एका मोठ्या वृक्षाच्या फांद्या आहेत असे लक्षात घेतले तर ही संकल्पना झटकन लक्षात येईल.

सामाजिक आरोग्य, भावनिक संतुलन, शारीरिक आरोग्य, मनाचं आरोग्य, संस्कार, बौद्धिक आरोग्य, आत्मिक बल, आरोग्य

उद्धरेदात्मजात्मं - आत्मिक बल - आरोग्य या साऱ्या बाबी म्हणजे कुटुंब या वृक्षाच्या शाखा आहेत. या सगळ्या अंगांचा विकास करणं जिथं शक्‍य आहे, ते कुटुंबाचं समृद्ध व्यक्तिमत्त्व होय.

समाप्तीकडे जाताना महत्त्वाचे काही पैलू, विचार स्पष्ट करू या. कुटुंब म्हणजे तरी काय? त्यात कोण कोण येतं? आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मावशी, चुलत, मामे, आते भावंडं असे सगळे आहेतच; पण याव्यतिरिक्त टायगर कुत्रा, मनीमाऊ, झाडायला येणाऱ्या मावशी, भांडी घासणाऱ्या ताई, दूधवाला भय्या, पेपर टाकणारे काका, सोसायटीचे सुरक्षारक्षक, वाण सामान देणारे काका सगळे येतात. त्यांच्याशीपण आपण सामाजिक जबाबदारीतून नातं जोडलेलं आहे. आता पुढे जाऊ - बाल्कनीत असणारी तुळस, गुलाबाची रोपटी घराच्या परिघात सामावली जातात. एवढंच कशाला, स्वयंपाकघरातील जुनी-जुनी भांडीपण आपलेपणाचा भाव जागवतात. जुनीपुराणी कढई, पातेली काढली की, भूतकाळ आठवतो. डोळ्यांतच चित्रपट सुरू होतो. ‘जुनेपुराणे कपडे देऊन घेतली बाई एवढी मोठी कढई, तेव्हा याच पातेल्यात लाडवाचा रवापण भाजायची, खूप पाहुणे आले तर खिचडीपण व्हायची आणि हो, रविवार असला की अंघोळीचं पाणीपण तापवता येत होतं. काय असतं, पेहेराव, रीतिरिवाज, परंपरा, धार्मिकता यांत विविधता, भिन्नता असते; पण या सर्वांशी आणि त्या-त्या मानवी स्वभावाशी आत्मीयतेने जुळवून घेणं हेच खरं सर्वांत मोठं समर्थपण आहे. कुटुंब, समाज, राष्ट्र यांचं हे प्रमुख सामर्थ्य आहे, असं म्हणणं निश्‍चितच गौरवाचं आहे. कान देऊन ऐका, आपल्या संस्कृतीत या सर्व जीवनमूल्यांना तुमच्या माझ्या आयुष्यात फ्रेश करता यावं यासाठीच सण, व्रत, वैकल्यं आहेत; पण ते समजून घेतलं पाहिजे. पटतंय ना?

एकमेकांच्या स्पर्शाची हवीशी ऊब।

तुझ्या माझ्या डोळ्यांत शांतवते ऊब।

अरे माणसा, उबेतच माधुर्य असतं।

कधी सुकवू नकोस

ही ऊबच कुटुंबाचं सामर्थ्य असते।

गौरवशाली देशाचं प्रतीक असते।।

Web Title: Kalpana Kshirsagar Writes Able Family Strong Coexistence

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang
go to top