‘प्यार दो, प्यार लो’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kanchan Adhikari writes about human nature

माणसाचा स्वभाव नं कुत्र्याच्या शेपटासारखा असतो. अगदी सरळ पायपात घातलं, तरी हे शेपूट सरळ होऊच शकत नाही...

‘प्यार दो, प्यार लो’

माणसाचा स्वभाव नं कुत्र्याच्या शेपटासारखा असतो. अगदी सरळ पायपात घातलं, तरी हे शेपूट सरळ होऊच शकत नाही. परत बाहेर काढलं, की शेपूट आपलं वाकडं ते वाकडंच. तसंच आहे मानवी स्वभावाचं. दोन वर्षं आपण सर्वांनी लॉकडाउनमध्ये काढली. कितीही मनात आलं, तरी आपण कुणालाही साधं भेटायलाही जाऊ शकत नव्हतो. तेव्हा असं वाटायचं, की कधी ही कोरोनाची आपदा संपते आणि आपण पुन्हा पहिल्यासारखं बाहेर हिंडू फिरू शकतोय. कोरोनाच्या विळख्याने असंख्य घरांतील त्यांच्या प्रेमाची माणसं हिरावून नेली. आपण सर्वांनी आपण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, असे व्हॉट्सॲप संदेशही पाठवले. पण या सर्वांमधून आपण काय शिकलो?

आज मी बघते तेव्हा परत तेच चित्र दिसतंय! हा त्याच्या विरोधात बोलतोय, तो याची उणीदुणी काढतोय. अरे, पण हे असं का? इथे कोण माणूस किती दिवस जगणार आहे, हेसुद्धा माहीत नाहीये. तेव्हा त्याच्या वाईट बाजू दुर्लक्षित करून त्याच्याशी चांगलंच कसं वागता येईल, याचाच फक्त विचार करा ना!

आमची एक किटी आहे. त्यात आम्ही सर्वजणी महिन्यातून एकदा भेटतो. इतक्या अंतरानं भेटत असूनही आता प्रत्येकाला दोनदोनदा मेसेज पाठवावा लागतो. शेवटी मी म्हणाले, ‘‘अगं! दोन वर्षांत आपण कधी बाहेर जायचे कपडेही घातले नाहीत. मेकअप तर दूरच, निदान परमेश्वर कृपेने कोरोनातून वाचलो आहोत, तर भेटूयात. एकमेकींची सुखदुःखं वाटून घेऊयान. सुख वाटण्यानं वाढतं आणि दुःख वाटण्यानं कमी होतं.’’

हे एवढंच नाही, तर एक-दोघींच्यात भाडणंही झाली. ही तिच्याविरुद्ध बोलतेय, तर ती हिच्या. काय अर्थ आहे या सगळ्याला? महिन्यातून एक दिवस दोन तासांत हा एवढा तमाशा कशासाठी?

मी एकदा एका व्यक्तीशी बोलत असताना त्यानं मला खूप छान गोष्ट सांगितली. कधीही कुणाशी मतभेद झाले, तर असा विचार करायचा की पाच वर्षानंतरही आपल्याला या गोष्टीचा त्रास होणार आहे का? तरच त्याला तितकं महत्त्व द्या, नाहीतर बोललेलं विसरून जाणं जास्त श्रेयस्कर. पण म्हणतात ना केलेलं सरतं आणि बोललेलं उरतं. माणूस जेव्हा आपल्याला प्रथम भेटतो, तेव्हा त्यानं काय कपडे, बूट घातलेत, कोणतं नेलपेंट लावलंय, कानात, गळ्यात काय घातलंय, यापेक्षासुद्धा तो तुमच्याशी किती प्रेमाने वागला, हेच लक्षात राहतं. कुठलीही व्यक्ती देवाघरी जाताना बरोबर कुठल्याही प्रकारची संपत्ती नऊ शकत नसते. बरोबर येतं ते लोकांनी आपल्यावर केलेलं प्रेम आणि म्हणूनच सर्वांशी प्रेमाने वागा. शेवटी एकच सत्य - ‘प्यार दो प्यार लो!’

- कांचन अधिकारी

Web Title: Kanchan Adhikari Writes About Human Nature

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :being humansaptarang
go to top