esakal | इंद्रा नुईंचं आत्मचरित्र आणि श्रेय! Indra Nooyi
sakal

बोलून बातमी शोधा

Indra Nooyi

इंद्रा नुईंचं आत्मचरित्र आणि श्रेय!

sakal_logo
By
करण थापर saptrang@esakal.com

इंद्रा नुई यांच्या आत्मचरित्रातील सर्वांत आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे त्यांनी सांगितलेल्या मोहक गोष्टी. त्यामध्ये त्यांच्या आयुष्य आणि कारकिर्दीबद्दल आपल्याला समजतेच, त्याचबरोबर त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि भावभावनाही त्यातून ठळकपणे समोर येतात. इंद्रा यांच्याकडं गोष्टी सांगण्याचं कौशल्य आहे, हे स्पष्टच आहेत. त्यामुळंच त्यांचं आत्मचरित्र ‘माय लाइफ इन फुल’ आनंददायी वाचनाची अनुभूती देतं.

यातील सर्वोत्कृष्ट गोष्ट त्यांनी अनेकदा सांगितली आहे. त्यांना ‘पेप्सिको’च्या अध्यक्षपदी बढती मिळाल्यानंतर त्या आनंदानं उड्या मारत घरी आल्या होत्या व त्यावर त्यांच्या आईच्या प्रतिक्रियेची ती गोष्ट. ‘माझ्याकडं तुला सांगण्यासाठी अत्यंत अविश्वसनीय बातमी आहे,’’ असं इंद्रा यांनी घरात पोचताच आईला सांगितलं. ‘‘मी ‘त्या’ बातमीसाठी थोडी वाट पाहू शकते. तू आधी बाहेर जा आणि दूध घेऊन ये,’’ ही त्यांच्या आईची त्यावरची प्रतिक्रिया होती! इंद्राचे पती राज आधीच घरी आले होते, मात्र ते ‘दमल्यासारखे’ दिसत असल्यानं आईनं त्यांना हे काम सांगितलं नव्हतं. त्यामुळं इंद्राला एक मैल गाडी चालवत जाऊन लिटरभर दूध आणावं लागलं. परत आल्यावर त्या रागानं फणफणत होत्या आणि त्यांनी दुधाची पिशवी टेबलवर जोरात आपटली. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या आईला मोठ्यानं ओरडून सांगितलं, ‘‘मी ‘पेप्सिको’ची अध्यक्ष झाली आहे.’’ यावर त्यांची आई उत्तरली,

‘माझं ऐक, तू ‘पेप्सिको’ची अध्यक्ष किंवा आणखी कोणी झाली असशील, मात्र तू घरी येते तेव्हा कोणाची तरी पत्नी, आई, आणि मुलगी असतेस. तुझी ही जागा कोणीही घेऊ शकत नाही. तेव्हा अध्यक्षपदाचा तो मुकुट गॅरेजमध्येच सोडून येत जा.’

ही आत्मचरित्रातील सर्वांत नाट्यमय गोष्टींपैकी एक आहे व ती अत्यंत नाटकी अंदाजामध्ये सांगितली गेली आहे. त्याच्या जोडीला अनेक हलक्याफुलक्या कथाही आहेत, मात्र त्या फक्त काही गोष्टी उघड करण्यापुरत्या मर्यादित आहेत. यातील माझी सर्वांत आवडती गोष्ट इंद्रा व राज यांनी लग्न करण्याचा निर्णय कसा घेतला, ही आहे.

जेवण संपेपर्यंत लग्न ठरलं!

इंद्रा येल विद्यापीठात विद्यार्थिनी होत्या, मात्र त्या इंटर्नशीपसाठी शिकागो विद्यापीठात होत्या. तिथं त्यांची राज यांच्याशी भेट झाली. पहिल्या भेटीचं वर्णन करताना इंद्रा म्हणतात, ‘‘तो अत्यंत स्मार्ट, प्रचंड वाचन असलेला व श्रीमंत होता. तो दिसायलाही खूपच छान होता.’’ एका शुक्रवारी दोघं जिन वाइल्डर यांचा ‘सिल्व्हर स्ट्रिक’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेले. त्या अनुभवाबद्दल इंद्रा लिहितात, ‘‘आम्हाला तो चित्रपट आवडला. त्यानंतर आम्ही चालत एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि जेवण संपेपर्यंत आम्ही लग्नाची निर्णय घेतला होता!

कोणी कोणाला प्रोपोज केलं? या विषयाची सुरवात कोणी केली? मला माहिती नाही. आज ४२ वर्षानंतरही आम्ही या विषयावर वाद घालत आहोत.’’ मी इंद्रा यांची मुलाखत घेतली तेव्हा ‘याबद्दल तू आणखी काही सांगशील का,’ असं विचारलं. पण तिनं काहीही सांगितलं नाही. मला असं वाटलं, की तिनं हा प्रश्न उडवून लावला. अर्थात, हे तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसंच होतं. तिसरी गोष्ट त्या १३ वर्षं ‘पेप्सिको’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतानाच्या काळातील आहे. खरं तर ती सर्वाधिक आश्चर्यकारक आहे.

संताप किंवा नैराश्य इंद्राला ग्रासू लागताच ती स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घेत असे व मनापासून रडून घेत असे. ‘‘मी माझ्या ऑफिसला जोडून असलेल्या बाथरूममध्ये जात असे, आरशात स्वतःला न्याहाळत असे व मनातील सर्व बाहेर काढत असे. हा क्षण निघून गेल्यानंतर मी माझे अश्रू पुसून टाकत असे, पुन्हा थोडा मेकअप करीत असे, माझे खांदे ठीकठाक करीत असे आणि पुन्हा माझ्या त्याच विश्वात येऊन नेहमीचं काम करायला तयार होत असे,’’ असं इंद्रा लिहितात. एकंदरीतच, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं पद असंच भूषवावं लागतं, असंच त्यांचं मत होतं.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, तर आत्मचरित्रात काही विसंगत गोष्टीही आढळतात. आपण काय लिहितो आहोत व ते लोकांपर्यंत कशाप्रकारे पोचवत आहोत याबद्दल अत्यंत सजग असणाऱ्या इंद्रा यांच्या आत्मचरित्रात या गोष्टी आल्याच कशा, हे मला पचवणं जड जात आहे. पहिली गोष्ट आहे त्यांच्या आईबद्दलची. त्या इंद्रा आणि राज यांच्याबरोबर अनेक वर्षं राहिल्या व त्यांच्या मुलींना लहानाचं मोठं केलं. कोणत्याही भारतीयाला याबद्दल फारसं आश्चर्य वाटणार नाही. मात्र, मला इंद्रा यांच्या पुढील वाक्यमुळं चांगलाच धक्का बसला. त्या म्हणतात, ‘‘माझी आई आमच्यासोबत अनेक वर्षं राहत असताना आम्ही तिला लागणाऱ्या सर्व गोष्टींसाठी पैसा खर्च केला. मात्र, आम्ही तिला मुलांचं संगोपन, स्वयंपाक, घराची स्वच्छता आणि हजारो छोट्या-छोट्या कामांसाठी पगार मात्र दिला नाही !’’ दुसरी गोष्ट खरंतर एका सत्याच्या स्वीकारच आहे. त्याचा उल्लेख शेवटच्या ‘ऋणनिर्देश’ हा भागात दिसतो. या पुस्तकाला आकार देण्याचं व ते लिहिण्याचं काम केलं आहे लिसा कासेनार यांनी. इंद्रा म्हणतात, ‘‘लिसानंच सर्व गोष्टी निवडल्या, संदर्भ तपासले, तुटलेले धागे जोडले, संपादन केले आणि विषयाचा गाभा पकडून एक-एक सुंदर प्रकरण गुंफले. प्रत्येक लेखकाला आपल्या आयुष्याबद्दलच्या सुंदर कल्पना पुस्तकात उतरवण्यासाठी एका लिसाची गरज पडतेच.’’ मग इंद्रा नुई या पुस्तकाच्या लेखिका कशा? आणि मग लिसाचं नाव पुस्तकाच्या मुखपृष्ठावरही देणं गरजेचं नव्हतं का?

(सदराचे लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

(अनुवाद : महेश बर्दापूरकर)

loading image
go to top