नेतानिवडीत आपली चूकच झाली; पण...

आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेचा सातवा वर्धापनदिन साजरा करत असताना, आपण त्यांच्याबाबतीत एवढे निराश का झालो आहोत याचं कारण सापडलं आहे असं मला वाटतं.
Narendra Modi
Narendra ModiSakal

आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेचा सातवा वर्धापनदिन साजरा करत असताना, आपण त्यांच्याबाबतीत एवढे निराश का झालो आहोत याचं कारण सापडलं आहे असं मला वाटतं. आपण २०१४ मध्ये त्यांना सत्ता देताना त्यांच्याकडून एक अपेक्षा केली होती आणि ते ती पूर्ण करतील, यावर पुढील काही वर्षांत अनेकांचा विश्वास बसला होता. आज त्यांच्याकडून नेमकी ‘तीच’ अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. ही अपेक्षा होती ‘नेतृत्वा’ची...

मला काय म्हणायचं आहे ते मी स्पष्ट करून सांगतो. मी केवळ ठामपणा आणि श्रद्धा यांच्याबद्दल बोलत नाही. त्या बाबी आवश्यक आहेतच, मात्र पुरेशा नाहीत. मला म्हणायचं आहे की भविष्याचं चित्र रंगवण्याची क्षमता असणं, ती देशवासीयांच्या मनात रुजवणं आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धाडसानं नेतृत्व करणं याही गोष्टी आवश्यक आहेत. हे वस्तुस्थितीला धरून वाटणार नाही, मात्र ते तेवढं अशक्यही नाही. तुम्ही २०१४ चा विचार करा. तो गैरसमज असला तरी मनमोहनसिंग यांची प्रतिमा ‘लकवा मारलेले पंतप्रधान’ अशीच झाली होती. ते केवळ शांतच बसले नव्हते, तर त्यांच्याच आघाडी सरकारच्या आणि त्यांच्या पक्षाच्याही तुरुंगात अडकले होते. ते स्वतःलाच न्याय देऊ शकत नव्हते, त्यामुळे आपलेही नेते होऊ शकत नव्हते. देशानं त्यांच्याकडे ‘सोनिया गांधी यांच्या हातातील बाहुलं’ म्हणून पाहिलं व ही प्रतिमा पुसून टाकण्यासाठी त्यांनी काहीही केलं नाही.

दुसरीकडे, मोदी यांनी आपण गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना जादूची कांडी फिरवून दाखवल्याचं लोकांसमोर मांडलं. अनेकांनी ते सहज स्वीकारलं आणि त्याबद्दल कोणत्याही शंका विचारल्या नाहीत. कारण, लोकांना एक ‘मसीहा’ हवा होता. मोदी एक स्वयंपूर्ण व्यक्तिमत्त्व होतं आणि ते व्यक्तिमत्त्व स्वतःचे कष्ट आणि हुशारी यांच्या जोरावर पुढं आलं होतं. त्यांना घराणेशाही सांभाळण्याचा कोणताही ताण नव्हता किंवा तडजोडी कराव्या लागतील असा कोणता ‘डाग’ही नव्हता. त्याच्याकडे तुफान वक्तृत्वकौशल्य होतं आणि ते कसं सादर करायचं याची कलाही होती.

त्यांनी २०१३-१४ च्या प्रचारात ‘स्वतःला विकलं’ आणि आपण आनंदानं त्यांना ‘विकत’ घेतलं. मात्र, या सत्याच्या मागं आणखी एक सत्य लपलं आहे आणि ते अधिक महत्त्वाचं आहे.

चुकीच्या व्यक्तीवर विश्‍वास

आपल्यापैकी प्रत्येकानं त्यांच्यात स्वतःला हवं आहे ते पाहिलं, जरी ते प्रत्यक्षात त्यांच्यात नव्हतं. आपण निवडून दिलेले मोदी ही त्यांची कमी व आपलीच निर्मिती अधिक होती! त्यामुळे निराश हाती येणं व भ्रमनिरास होणं स्वाभाविकच होतं. खरे मोदी हे आपण त्यांच्या निर्माण केलेल्या प्रतिमेपेक्षा वेगळे होते व त्यांना स्वीकारताना आपण हे मान्य केलं होतं. मात्र, सुरुवातीच्या काळात आपला त्यांच्यावर एवढा जास्त विश्वास होता, की आपण चुकीच्या व्यक्तीवर विश्वास टाकला असल्याकडेही दुर्लक्ष केलं. आपण त्यांनी उतावीळपणे आणि कोणताही विचार न करता लादलेली नोटाबंदी योग्य असल्याची कारणं दिली व त्यांना माफ केलं. आपण मुस्लिमांवर सामूहिक हल्ले झाल्यानंतर व दलितांवर अत्याचार झाल्यानंतरही ‘प्रत्येक गोष्टीवर पंतप्रधानांनी बोलण्याची गरज नसते,’ असं समर्थन करत शांत बसलो. खरं तर, त्यांनी पौराणिक कथा आणि विज्ञानाची गल्लत केल्यानंतर आपल्यापैकी अनेकांनी त्याकडे सोईस्कर दुर्लक्षच केलं. बराक ओबामा, थेरेसा मे, ‘आसिआन’ देशांचे प्रमुख आणि पश्चिम आशियाच्या सार्वभौम नेत्यांनी त्यांची वकिली केल्यानंतर आपण मोदी महान व्यक्ती असल्याचं समजू लागलो. मात्र, त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख उतरू लागल्यावर व काही वेळा खूपच वेगानं घसरूनही आपण पंतप्रधानांमध्ये एका गुणाची, नेतृत्वाची, कमतरता आहे हे मान्य करण्यास नाखूश होतो, तयारच नव्हतो. त्यांनी पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न पाच वर्षांत दुप्पट करण्यासारखी फसवी स्वप्नं दाखवली. मात्र, अनेकांनी त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहणं नाकारलं. त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या बढाया मारल्या व भारतीयांना चांगलं वाटावं म्हणून शाब्दिक कोट्या केल्या. मात्र, आपण हे केवळ हवेचे बुडबुडे आहेत हे ओळखण्यात अयशस्वी ठरलो. त्यांनी सुधारणांच्या मारलेल्या गप्पा अधिकच दुःखदायक होत्या. कारण, त्यांची आपल्याला खूपच गरज होती आणि त्या त्यांनी कधीच केल्या नाहीत. हे खरं आहे की काही गोष्टींमध्ये सुधारणा व बदल नक्कीच दिसून आले. स्वच्छ भारत अभियान, जनधन योजना, उज्ज्वला योजना, ग्रामीण भागांतील रस्ते आणि घरे, वैद्यकीय विमा योजना व ग्रामीण विद्युतीकरणात प्रगती दिसली. निवडून आलेल्या सरकारचं हे कामच असतं हे विसरून आपण त्यांचं कौतुकही केलं. हे काही फार भव्य यश आहे असं म्हणता येणारच नाही. या गरजू लोकांच्या अगदी साध्या अपेक्षा आहेत. खरं तर यामुळेच आज लोक त्यांना थोडंफार श्रेय देताना दिसतात.

पाय मातीचेच...

कोरोनाच्या माहामारीनं देशाला जोरदार तडाखा दिला आणि आपल्याला समजलं की आपल्या या महान नेत्याचे पायही मातीचेच आहेत. या परिस्थितीत त्यांच्याकडे सांगण्यासारखं नावीन्यपूर्ण काहीच नव्हतं, होता तो केवळ वेडेपणा. त्यांनी आपल्याला थाळ्या वाजवणं आणि मेणबत्त्या पेटवणारं बनवून सोडलं. ‘हे ‘महाभारत’ आपण २१ दिवसांमध्ये जिंकू,’ अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांच्या वक्तृत्वाचा जोरही ओसरला. सुरुवातीचे काही महिने त्यांनी बोलणं बंद केलं नव्हतं, मात्र त्यात दम नव्हता. मला वाटतं, हे त्यांच्या लक्षात आलं आणि लवकरच त्यांनी शांत बसणं स्वीकारलं.

गेल्या वर्षभरात हे स्पष्ट झालं की, ते कायमच अयशस्वी होत असलेले पंतप्रधान आहेत व यासाठी ते स्वतःच जबाबदार आहेत. त्यांना याचा अंदाजच आला नाही की, आपल्याला कोरोनाशी लढण्यासाठी किती लशींची आवश्यकता आहे आणि आपल्याकडे किती उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याकडे आज लशीचा मोठा तुटवडा आहे. त्यांनी आपल्या देशातील लस-उत्पादकांना पाठिंबा देऊन उत्पादन वाढवण्याची गरज होती. हे ‘आत्मनिर्भर’ भारतासाठी योग्यही ठरलं असतं. मात्र, त्यांनी तसं केलं नाही.

त्यानंतर त्यांनी संशोधकांनी दिलेला इशारा धुडकावून लावला आणि मोठ्या राजकीय सभा आणि शाही स्नान वगैरे बाबींमध्ये मश्गुल राहिले. यामुळे कोरोनाच्या आगीत तेल ओतलं जाईल, याची काळजीही त्यांनी केली नाही. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर त्यांनी हा प्रश्न राज्य सरकारांच्या माथी मारला. त्यांनी राज्यांना स्वतःच्या लशी स्वतःच खरेदी करायला सांगितलं. असं करणं महागडे आणि अवघड असल्याचं माहीत असूनही त्यांनी तसा निर्णय घेतला. त्याच वेळी लशी उपलब्ध नसतानाही त्यांनी १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला व परिस्थिती आणखी बिकट करून ठेवली. एकाच झटक्यात त्यांनी कठीण समस्या महाकठीण करून टाकली.

स्वतःला प्रश्‍न विचारावे लागतील...

मग मी आपल्या या महान नेत्याला, जो आपला मसीहा बनून आला असल्याचं आपलं मत होतं, त्यानं आपल्याला अंधाऱ्या खाईत लोटलं आहे असं मी म्हटलं तर त्यात काय चूक आहे? आपण २०१४ मध्ये त्यांच्यात पाहिलेला ताकदवान आणि निर्णयक्षम नेता आता दुराग्रही, मनमानी करणारा आणि बेपर्वा झाला आहे, असं मी म्हटलं तर चूक काय? आपल्याला त्यांच्या मेडिसन स्क्वेअर गार्डन येथील भाषणानं मंत्रमुग्ध केलं होतं, ते भाषण आता नाटकी आणि निराशाजनक वाटत आहे, हे माझं मत चुकीचं आहे का? आता एकच प्रश्न शिल्लक राहतो - आपल्याला पैलतीरावर घेऊन जाऊ शकतील असे केवळ पंतप्रधान मोदीच आहेत का? सत्य हे आहे की तसं करू शकणारं दुसरं कुणीही नाही. आपल्याला त्यांचावर विश्वास टाकावाच लागेल. आपल्याकडे त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी आहे व आपल्या फायद्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यात ती योग्यता आहे. आपल्या दिशेनं आणखी एक वादळ येण्याची भीती असताना भर समुद्रात आपण आपल्या जहाजाचा कप्तान बदलू शकत नाही. मात्र, आपण जेव्हा यातून पार होत किनाऱ्यावर पोहोचू तेव्हा आपल्याला स्वतःला दोन प्रश्न विचारावेच लागतील - आपण निर्णय घेण्यात चूक कशी काय केली? आणि अशी चूक पुन्हा होणार नाही याची शाश्वती आपण देऊ शकतो का?

(सदराचे लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

(अनुवाद : महेश बर्दापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com