हॉर्न, सायरन आणि गडकरींचा कल्पनाविलास

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी पत्रकारांचे फारच लाडके आहेत. त्यांना मथळे बनतील अशीच वक्तव्ये करण्याची कला अवगत आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSakal

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी पत्रकारांचे फारच लाडके आहेत. त्यांना मथळे बनतील अशीच वक्तव्ये करण्याची कला अवगत आहे. त्यांच्या डोळ्यात दिसणारी चमक पाहूनच समजते, की त्यांना आपल्या वक्तव्याचा काय परिणाम होणार, हे समजले आहे. मात्र, त्यांच्या कारचे हॉर्न आणि सायरनसंदर्भातील वक्तव्यामुळं ‘लंडन टाइम्स’ही प्रभावित होईल, असं का वाटलं असावं? नाशिकमध्ये एका भाषणादरम्यान गडकरी म्हणाले, ‘‘कारचे कर्णकर्कश हॉर्न व सायरनचे आवाज लोकांना त्रासदायक ठरतात. विशेषतः एखादा मंत्री जाणार असल्यास सायरन अधिक जोरात वाजवले जातात.’’ त्यांचा मुद्दा अगदी बरोबर आहे. मात्र, लंडन टाइम्सनं यावर गडकरींचा हॉर्न आणि सायरनच्या जागी संगीतमय हॉर्न लावण्याचा उपाय आनंददायी वाटत असला, तरी पूर्णपणे मूर्खपणाचा असल्याचं म्हटलं आहे.

हॉर्नच्या जागी भारतीय संगीत

‘पीटीआय’च्या वृत्तानुसार गडकरी म्हणतात, ‘‘मी या समस्येचा अभ्यास करीत असून, लवकरच कायदा करून गाड्यांच्या हॉर्नच्या जागी भारतीय संगीत वाद्ये येतील, जी प्रवाशांच्या कानांसाठी मधुर व आनंददायी ठरतील. मला सायरन सुद्धा बंद करायचे आहेत.’’ गडकरी रुग्णवाहिकांच्या सायरनबद्दल बोलताना मोठाच कल्पनाविलास करतात. सायरनच्या जागी ‘ऑल इंडिया रेडिओ’ची पहाटे वाजणारी विख्यात ‘सिग्नेचर ट्यून’ आणण्याचा त्यांचा विचार आहे. ‘‘एका कलाकारानं ही ट्यून आकाशवाणीसाठी संगीतबद्ध केली आहे व ती दररोज पहाटे वाजविली जाते. मी तीच ट्यून रुग्णावाहिकांसाठी वापरण्याचा विचार करीत असून, त्यामुळं लोकांना आनंददायी अनुभव मिळंल,’’ अशी पुष्टी गडकरी जोडतात. तुम्हाला भारतीय रस्त्यांवरील हॉर्न आणि सायरनच्या गोंधळाचा त्रास होत असल्यास गडकरींची कल्पना तुम्हाला अगदी मधुर वाटलीच. मात्र, यावर टिका करताना टाइम्सच्या लेखात म्हटलं आहे, ‘‘हा निर्णय घेतल्यानंतर भारतीय रस्त्यावरील प्रचंड गोंधळाच्या जागी एखादा ऑर्केस्ट्रॉ सुरू असल्यासारखी स्थिती दिसून येईल. यामुळं गडकरींना वरील वक्तव्य करण्यास भाग पाडलेला त्यांचा एक प्रश्न नक्कीच सुटेल. गडकरी आपल्या अकराव्या मजल्यावरील घरात योगासनं करीत असताना खाली सुरू असलेल्या हॉर्नच्या गोंगाटामुळं त्यांच्या आसनांतील तोल ढळणार नाही. मात्र, हे सोडल्यास ही शहाणपणाची कल्पना वाटते का?’’

टाइम्सचा लेख म्हणतो त्या प्रमाणे, ‘‘हॉर्नचा आवाज तुम्हाला आणीबाणीच्या परिस्थितीची जाणीव करून देतो. हे सायरनच्या बाबतीत अधिकच सत्य आहे. हे आवाज तुम्हाला छान वाटावं म्हणून बनलेलेच नाहीत. हे आवाज तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर थंड पाण्याची बादली ओतल्यासारखं वाटावं म्हणूनच आहेत. मात्र, त्याजागी संगीत आणल्यास उलटाच परिणाम होईल. हॉर्न किंवा सायरन तुम्हाला थांबण्याची किंवा बाजूला होण्याची सुचना करतात, संगीत वाजल्यावर तुम्ही आहे त्याच स्थितीत संगीताचा आनंद लुटत राहाल.’’

या समस्येचं उत्तर हॉर्न आणि सायरनचे आवाज मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आहे, की ते करीत असलेला आवाज बदलण्यात? बहुतांश भारतीय चालक आपला अंगठा कायमच हॉर्नवर ठेवतात आणि पहिला प्रतिक्रिया म्हणून ते हॉर्नच वाजवतात. हीच कृती प्रत्येक जण करीत असल्यानं आपल्याकडं कायमच हॉर्नचे आवाज येत राहतात. या उलट, लंडनमध्ये तुम्हाला कधीही हॉर्नचा गोंगाट ऐकायला मिळणार नाही. इथं तुम्ही हॉर्न वाजवलाच, तरी तो राग व्यक्त करण्यासाठीच असतो. आणि तो ज्याच्यासाठी वाजवला त्या ड्रायव्हरला किंवा पादचाऱ्याला बेचैन करण्यात यशस्वी झाल्याशिवाय राहात नाही.

प्रश्न असा आहे, की भारतीयांना हॉर्न वाजवण्यासापासून रोखायचे कसे? दिल्लीत २०१४ मध्ये रुग्णालये व शाळांच्या जवळ हॉर्न वाजविल्यास दंडाची तरतुद करण्यात आली, मात्र त्यामुळं थोडाही फरक पडला नाही. टाइम्स म्हणते त्याप्रमाणे हाच नियम चीनमधील शहरं, काठमांडू, लामा आदी अनेक शहरांमध्ये आहे. हॉर्नवर बंदी असूनही तिथं नेहमीप्रमाणंच मोठा गोंगाट ऐकायला मिळतो. न्यूयॉर्क शहरातील गरज नसताना हॉर्न वाजवल्यास मोठ्या दंडाची तरतूद केली गेली व शहरभर ‘हॉर्न वाजवू नका,’ असं आवाहन करणारे बोर्ड रंगवले गेले. मात्र, या मोहिमेचा काहीही परिणाम झाला नाही व ही योजना एका दशकापूर्वीच गुंडाळून ठेवली गेली!

त्यामुळं गडकरींसाठी गाड्यांचे हॉर्न बंद करणं हा न सुटणारा प्रश्न ठरू शकतो, मात्र मंत्र्यांच्या गाड्यांचे कर्णकटू सायरन बंद करणं त्यांच्यासाठी खूप सहज शक्य आहे. त्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना तसे आदेश दिले आणि त्यांनी ते ऐकलं, तर हे सायरन बंद होतील. सुदैवानं, त्यांच्या सहकारी मंत्र्यांसाठी गडकरी हे खूप महत्त्वाचे मंत्री आहेत व ते त्यांचा आदेश टाळू शकणार नाहीत.

मात्र, गडकरींनी पोलिसांची वाहनं, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या सायरन वाजवण्यात कोणताही हस्तक्षेप करू नये. त्यांचा उद्देश लोकांचे लक्ष वेधणं आणि स्वतःसाठी त्वरित मार्ग तयार करण्याचा असतो. ‘ऑल इंडिया रेडिओ’ची ती ‘पहाटेच धून’, अगदी माउथवॉर्गनवर वाजवली तरीही हा परिणाम साधू शकणार नाही. आणि पोलिसांच्या गाडीचा किंवा वेगानं जाणाऱ्या रुग्णवाहिकेनं मंत्र्यांच्या योगसनांमध्ये व्यत्यय आणल्यानं खरंच काहीच फरक पडत नाही...

(सदराचे लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

(अनुवाद -महेश बर्दापूरकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com