- स्मिता देव, smitah37@gmail.com
कर्नाटकातल्या अवेरसा या माझ्या आजोळी सणांची व्याख्या थोडी वेगळी होती. ‘नोपी’ (अनंत चतुर्दशी) हा असाच एक छोटा, पण वेगळा सण. दरवर्षी गावातल्या एका कुटुंबाकडे गावजेवणाचा मान असे.
त्या कुटुंबप्रमुखाच्या हस्ते पूजा आणि त्यानंतर जवळपास ६०० लोक प्रसादाच्या जेवणाला असत. या जेवणाचा ‘मेनू’ ठरावीक असे. यजमानांच्या आर्थिक परिस्थितीनुसार १-२ पदार्थ जास्तीचे असत. डाळी तोंय, मुगा घाशी, गजबज्या रांदोइ, उपकारी आणि साबुदाणा खीर हे आमच्याकडचे प्रमुख पदार्थ.
हा स्वयंपाक घरातले पुरुष करायचे किंवा पुरुष आचारी बोलावले जायचे. पूजेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी बायका भाज्या चिरायला, फुलांचे हार करायला बसायच्या. देवाच्या ओव्या, गीतं गुणगुणत काम चालायचं. जवळजवळ १०० किलो भाज्या धुवून चिरायच्या असत. त्याबरोबर १०० नारळ खोवायचे.
पूजेनंतर नैवेद्य दाखवला की प्रसादाच्या पंगती बसायच्या. मुख्य देवळासमोर जुन्या बांधकामातलं मोठं सभागृह आहे. सिमेंटची जमीन आणि थोड्या-थोड्या अंतरानं उभारलेले मोठे, कोरीव खांब. पूजा झाली, की सतरंज्या टाकून भराभर केळीची पानं मांडली जात. एका वेळी १५० पान जेवून उठे. बाहेर दर्शन आणि प्रसादासाठी मोठी रांग असे.
लहान मुलांना कौतुकानं वाढपाची जबाबदारी मिळे. जेवायला सुरुवात होईपर्यंत मोठी माणसं शेजाऱ्याशी गप्पा मारत लग्नं जुळवण्याच्या उद्योगात रमत. काही जणांचं कोवळं प्रेमही या दिवशी समोरासमोर आल्यावर झालेल्या नेत्रपल्लवीतून फुलत असे.
माझा मुलगा युग जन्मला, त्यानंतर पुन्हा माझ्या आजोळच्या कुटुंबाकडे ‘नोपी’ पूजेचा मान आला. त्या वर्षी माझे बाबा आणि बाळूकाका पूजा करणार होते. मी यायलाच हवं असं बाबांना वाटत होतं. आधी जावं की नाही अशी द्विधा मनःस्थिती होती, कारण माझ्या घरी अनेक गोष्टी मार्गी लावायच्या होत्या आणि अभिनय (पती- दिग्दर्शक अभिनय देव) आणि युग येऊ शकणार नव्हते.
पण मी जरूर जावं असा अभिनयचा आग्रह होता. त्यानं मला जाणीव करून दिली, की अशी संधी कदाचित पुन्हा येणे नाही. भावंडं, त्यांचे जोडीदार, मुलं सगळे एकत्र जमलेत, असं किती वेळा घडतं? मग मी एकदम जाऊन धडकले आणि सगळ्यांनी हसत स्वागत केलं माझं! अभिनय आणि युगची मात्र सारखी आठवण येत होती.
इतक्या वर्षांत अवेरसा खूपच बदललंय. धुळीचे रस्ते तसेच आहेत, पण घरं आता प्रशस्त झालेली दिसतात. बालपणीचे खेळगडी ‘मोठी माणसं’ झालेत आणि अनेक मोठी माणसं आता नाहीतच. लहान असताना बघितलेले काही जण आता ओळखताच येत नव्हते.
काही लोक खूपच थकले होते. लहान मुलगी म्हणून मी ज्या घरात खेळले, त्या खोल्यांमध्ये फिरताना उगाच घसा दाटून येत होता. घर किती जुनं झालंय आता! जुन्या घरांची देखभाल करणं खूप अवघड जातं. एकामागोमाग एक खूप भावना जाणवत होत्या. घराच्या भिंतींना स्पर्श करताना वडीलधारी आशीर्वाद देताहेत असं वाटत होतं.
बाबांबरोबर मंदिरात जाऊन सगळी तयारी बघून आले आणि रात्री बाळूकाकांबरोबर पुन्हा गेले. बाबांचा चुलतभाऊ गुंडूकाका समारंभाचा मुख्य आचारी होता. किलोच्या किलो भाज्या! एका बाजूला ८ फुटांचं एक बाकडं मांडलं होतं आणि त्याच्या एका बाजूस ‘सी’ आकाराची विळ्यांची पाती बसवलेली. पात्याच्या दोन्ही बाजूला पाय ठेवून बाकावर बसायचं आणि हातानं जपून भाजी चिरायची. छोट्या विळीचंच हे मोठं रूप. (तिकडे विळीला ‘आदोळी’ म्हणतात.) मीही बऱ्याच भाज्या चिरून दिल्या.
लाल भोपळा, काकडी, दोडका, पडवळ, भेंडी... तो आनंद काय वर्णावा. मदतीला घरातल्या बाकी स्त्रिया होत्याच. काही जणी हारांत फुलं ओवत होत्या. वेळ फार छान गेला. या वर्षी प्रसादाच्या पदार्थांत घोसाळ्या आणि भेंड्या उपकारीची भर पडलेली. (म्हणजे कांदा-लसूण न घातलेली साधी भाजी. इथे ‘घोसाळ्या’चा अर्थ ‘दोडका/शिराळी’.) त्याबरोबर उडीदमेथी (मेथीदाणे व उडीद घातलेली आमटी) होती.
दुसऱ्या दिवशी जरीच्या साड्या नेसून आम्ही सगळ्या जणी तयार झालो. ठेवणीतले दागिने घातले आणि गजरेसुद्धा. सगळे मंदिरात जमले. खूप नवीन लोक १८ वर्षांनी परत भेटत होते. पूजा सुरू होती आणि मंदिराच्या एका बाजूला असलेल्या मुदपाकखान्यातून चविष्ट गंध दरवळायला लागला.
लाकडी चुलींवर भल्या मोठ्या भांड्यांमध्ये प्रसाद तयार होत होता. दुपारी दीडच्या सुमाराला शेवटची आरती संपली आणि सभागृहात पंगतींची तयारी झाली. वाढलेल्या पानाचं रूप डोळ्यांत साठवलं आणि पहिला घास घेतला... जिभेबरोबरच मनही तृप्त झालं !
घोसाळ्या आणि भेंड्या उपकारी
साहित्य - अर्धा किलो दोडका, अर्धा किलो भेंडी, ५-६ हिरव्या मिरच्या (उभी चीर दिलेल्या), १ टीस्पून मोहरी, २ टीस्पून खाण्यायोग्य खोबरेल तेल, कढीलिंब, २-४ कोकमे,मीठ
कृती - दोडक्याच्या शिरा काढून मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करा. भेंडीही मोठी मोठी चिरून घ्या. खोबरेल तेल तापवून त्यात मोहरी तडतडू द्या. मिरच्या आणि कढीलिंब घाला. दोडका, भेंडी आणि मीठ घालून नीट ढवळा. कोकमे घाला. झाकण ठेवून दोन्ही भाज्या शिजू द्या.
आळवती
साहित्य - १ जुडी भाजीचा अळू, पाव कप खोवलेले ओले खोबरे, ३-४ ब्याडगी मिरच्या, २-३ हिरव्या मिरच्या, दीड टीस्पून दाट चिंचेचा कोळ, दीड इंच आल्याचा तुकडा, १ टीस्पून तेल, अर्धा टीस्पून मोहरी, कढीलिंब.
कृती - हातांना थोडे तेल लावून आळू धुवून बारीक चिरा. चिरलेला अळू, चिंचेचा कोळ, हिरव्या मिरच्या, मीठ आणि १ कप पाणी एकत्र करून १० मिनिटे शिजवा. खोबरे आणि लाल मिरच्यांची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट शिजवलेल्या अळूच्या मिश्रणात घालून उकळी आणा. हँड ब्लेंडरने भाजी १० सेकंद ब्लेंड करा. फोडणीच्या भांड्यात तेल तापवून त्यात मोहरी तडतडू द्या. त्यात कढीलिंब घाला आणि ही फोडणी भाजीवर घाला.
कैरीची उडीदमेथी
साहित्य - अर्धा किलो कैरी (कैरीच्या ऐवजी अंबाडेसुद्धा वापरता येतात.), अर्धा कप गूळ, १ टीस्पून हळद, १ टेबलस्पून धने, १० सुक्या ब्याडगी मिरच्या, पाव टीस्पून मेथीदाणे, १ टीस्पून उडीद डाळ, १ टीस्पून तांदूळ, अर्धा नारळ (खोवलेला), १ टेबलस्पून खोबरेल तेल, १ टीस्पून मोहरी, कढीलिंब, मीठ.
कृती - कैरी लहान चौकोनी चिरा. त्याला गूळ, हळद, १ टीस्पून मीठ लावून अर्धा तास ठेवून द्या. खोबरेल तेल तापवून त्यात मोहरी व हिंगाची फोडणी करा. फोडणीत कढीलिंब घाला. मॅरिनेट करायला ठेवलेली कैरी त्यात घालून मिनिटभर परता आणि १ कप पाणी घालून मंद आचेवर शिजवा. दुसरीकडे लाल मिरच्या आणि धने खोलगट तव्यात भाजून घ्या व वेगळे ठेवा. तव्यात १ टीस्पून खोबरेल तेलावर मेथीदाणे, उडीद डाळ, तांदूळ सोनेरी रंगावर परतून घ्या. मिरच्या, धने, मेथीदाणे, उडीद डाळ, तांदूळ आणि ओले खोबरे यांची मध्यम जाडसर पेस्ट करा. ही पेस्ट शिजलेल्या कैरीत घालून आणखी ५-७ मिनिटे शिजवा. ही उडीदमेथी नीर डोशाबरोबर खातात.
(अनुवाद - संपदा सोवनी.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.