
काश्मीरचं मोहक सृष्टिसौंदर्य
राजेंद्र मुठे
नेहमीप्रमाणं जरा वेगळ्या धर्तीचा ट्रेक करावयाचा ठरवलं आणि डोळ्यांसमोर काश्मीरच आलं. काश्मीर ग्रेट लेक्स हा लोकप्रिय आणि नितांत सुंदर ट्रेक असून साधारण जुलै ते सप्टेंबर हा ट्रेककरिता उत्तम काळ समजला जातो. त्यानुसार ठरवाठरवी होऊन आमचा मित्रमंडळींचा १२ जणांचा ग्रुप तयार झाला आणि निघालो काश्मीरच्या दिशेनं.
‘गर फिरदौस बरं रुये जमीं अस्त
हमी अस्तो, हमी अस्तो, हमी अस्त!''
या ओळी सार्थ ठरविणारे काश्मीरचं नितांत सुंदर वातावरण, बर्फाच्छादित शिखरं, हिरवीगार कुरणं, नितळ पाणी आणि उबदार हवामान या सर्वांचा मिलाफ या ट्रेकमध्ये झाला. आम्ही श्रीनगरला पोहोचल्यावर दल लेक, स्थानिक मार्केट, शंकराचार्य मंदिर या नेहमीच्या लोकप्रिय ठिकाणांचा फेरफटका झाला.
दुसऱ्या दिवशी स्थानिक मार्गदर्शकांबरोबर प्रवास सुरू झाला. या ट्रेकमध्ये आपण तीन उंच शिखरं, (ट्रेकरच्या भाषेत त्याला पास म्हणतात) पाच नद्या पार करतो व सरोवरांना भेटी देतो. पहिल्या दिवशी आमचा मुक्काम होता सोनमर्गजवळील निचनाई इथं. या मुक्कामांत ट्रेक फिडर्सनी या परिसराची संवेदनशीलता, घ्यावयाची काळजी व भारतीय सैन्याच्या नियमांचे पालन याबद्दल काटेकोरपणे सविस्तर माहिती दिली. रात्री सैन्याची गस्त, ट्रक्सची वाहतूक यामुळे भारतीय सेना आपल्या संरक्षणास सिद्ध आहे, या जाणिवेनं शांत झोप लागली.
दुसऱ्या दिवशी निचनाई ते विष्णुसर तलाव हा ट्रेकचा अकरा किलोमीटरचा टप्पा होता. वाटेत भारतीय सेनेच्या चेकपोस्टवर सर्व तपासणी, ओळखपत्रांची छाननी व ‘काश्मीर डायरी '' हे ॲप डाउनलोड करून ते फॉलो करण्याचे आदेश देण्यात आले. या ॲपद्वारे भारतीय सेना संपूर्ण ट्रेकच्या प्रवासात आपणास ट्रॅक करू शकते. हे ॲप डाउनलोड करणे आवश्यक असते. देवदारांच्या जंगलातून जाणारा हा रस्ता निचनाई पास ओलांडून विष्णुसर किंवा बिशन सर या पहिल्या लेकशी पोहोचतो.
अत्यंत रम्य कॅपसाईट व जवळच नितळ शांत पाण्याचा विष्णुसर तलाव. हा संपूर्ण रस्ता चढाचा व निचनाई पासनंतर उताराचा होता. रात्री विष्णुसर कँपसाईट जवळून अधूनमधून होणा-या फायरिंगचे आवाज दडपण आणत होते. पुढचा दिवस हा विष्णुसर तलाव ते गडसर तलाव असा दहा किलोमीटरचा होता. रस्त्यात किशनसर तलाव लागतो. उंचावरून विष्णुसर व किशनसर (कृष्णसागर) या दोन्ही तलावांचे विहंगम दृश्य दिसत होते.
गडसर तलावाला जाण्यासाठी गडसर पास हा खड्या चढाचा पास ओलांडणे आवश्यक होते. हा रस्ता अरुंद व पेन्सील रिजवरून जाणारा आहे. गडसर पास हा साधारण १४ हजार फूट उंचीवर आहे. गडसर पासनंतर प्रचंड उताराचा रस्ता होता की जो चढाईपेक्षाही अवघड होता.
गडसर तलावाचे सौंदर्य वर्णनातीत आहे. स्फटिकासारखे नितळ पाणी हे या परिसरातील सर्व तलावांचे वैशिष्ट्य आहे. गडसर येथे पर्वतांच्या बेचक्यात आमचा मुक्काम होता. पर्वतांच्या उंच शिखरांवर रात्री सैन्याच्या गस्तीचे पडणारे प्रकाशझोत, फायरिंगचे आवाज आपल्या सुरक्षिततेची हमी देत होते. चौथा दिवस हा गडसर ते सतसर तलाव हा १२ किलोमीटरचा ट्रेक होता. आजचा ट्रेक हा तुलनेत सोपा व निसर्गरम्य वातावरणातील होता.
पुढचा टप्पा सतसर ते गंगबाल हा १३ किलोमीटरचा टप्पा होता. सतसर कँपसाईट पासून दोन तासांचा संपूर्ण खडकाळ, कातळांमधून जाणारा जाझ पामचा खडा चढ होता. त्यामुळे काळजीपूर्वक पावले टाकणे आवश्यक होते.
रस्त्यांत अनेक धबधबे लागत होते. गंगबाल सरोवराच्या काठावर सर्वांचे फोटो शूट झाले आणि तेथून जवळच असणाऱ्या नंदकोल सरोवराचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या कँपसाईटवर पोहोचलो. नंदकोल सरोवर हे अस्पर्श असल्याने त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. रात्री गप्पा गोष्टी, खेळ यांत वेळ कसा गेला ते कळलेच नाही.
पुढचा दिवस हा ट्रेकचा शेवटचा दिवस होता. गबाल ते नारनांग हे अंतर अकरा किलोमीटरचे असून संपूर्ण उताराचे आहे. कँपसाईट सोडल्यानंतरचा संपूर्ण रस्ता हा देवदार, ओकच्या घनदाट जंगलातून जाणारा होता. कँप सोडल्यानंतर साधारण एका तासाने चेकपोस्ट लागले.
त्या ठिकाणी पुन्हा तपासणी, ट्रेकचे अनुभव, सैनिकांशी गप्पा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून आम्ही मार्गस्थ झालो. हा संपूर्ण प्रवास प्रचंड उताराचा व निसरडा असल्याने अधिकच काळजी घेणे आवश्यक होते. पहाडावरून सतत खाली नारनांग गाव दिसत होते, मात्र लवकर येत नव्हते. वळणावळणाचा रस्ता पार करून अखेर दुपारी एक वाजता आम्ही नारनाग येथे पोहोचलो आणि सर्वांनी एकच जल्लोष केला.
काश्मीर ग्रेट लेक हा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानून एकमेकांचे अभिनंदन केले. १५ ऑगस्ट जवळ आल्याने सर्व घरांवर तिरंगा डौलाने फडकत होता. बदलत्या काश्मीरचे हे एक सुचिन्हच म्हणायला हवे.
नारनांग ते श्रीनगर हा प्रवास करून श्रीनगरला पोहोचलो. ट्रेकमध्ये ‘बफर डे'' न वापरल्याने तो राखीव दिवस श्रीनगरमध्ये भटकंती, खरेदी व काश्मिरी पदार्थाचा आस्वाद घेण्यात घालवला व नंतर पुण्यात परतलो. काश्मीर ग्रेट लेक हा ट्रेक अन्य ट्रेकपेक्षा निश्चितच वेगळा ट्रेक आहे.
या ट्रेकमध्ये काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य नजरेस पडते. सर्वत्र पसरलेली हिरवाई, देवदारांचे वृक्ष, बर्फाच्छादित पर्वत शिखरे, निळजर्द निखळ पाण्याचे तलाव, जंगली फुले या सर्वांनीच या ट्रेकला एक स्वर्गीय सौंदर्य बहाल केले आहे. गेल्या २-३ वर्षांपासून उत्तराखंडात होणारे भूस्खलन, दरडी कोसळणे या कारणांमुळे काश्मीर ग्रेट लेक ट्रेककडे गिर्यारोहकांची गर्दी वाढली आहे. परंतु फक्त हे दोन महिनेच काश्मीरमधील ट्रेक्सकरिता योग्य असतात.
प्रदेशाची संवेदनशीलता, अतिरेक्यांचा धोका विचारात घेता, संपूर्ण ट्रेकमध्ये कुठेही मोबाईल नेटवर्क, वॉकीटॉकी वापरण्यास उपलब्ध नसल्याने जगापासून तुटून आपण एका वेगळ्याच विश्वात रमतो. हा ट्रेक अवघड नाही मात्र लांबलचक निश्चितच आहे. संपूर्ण ट्रेकमध्ये रस्ताभर गिर्यारोहकांबरोबरच घोड्यांची वर्दळ असल्याने दक्षता घेणे आवश्यक आहे. स्थानिकांशी, ट्रेक गाइडशी चर्चा करता,
हेच दिवस स्थानिकांसाठी सुगीचे दिवस असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असल्याने ते देखील मुख्य प्रवाहात सामील होण्यास सुरुवात झाली आहे. पंधरा वर्षापूर्वीचे काश्मीर व सध्याचे काश्मीर यात निश्चितच फरक असून आज तिथलं जनजीवन सुरळीत होत आहे. पर्यटकांची, गिर्यारोहकांची वर्दळ वाढली आहे. पुण्यात पोहोचलो तरीदेखील ट्रेकच्या रम्य आठवणी मनात ताज्या आहेत.
(लेखक अप्पर जिल्हाधिकारी तसेच गिर्यारोहक आहेत.)