
थंडी व धुक्याचे छायाचित्रे काढण्यासाठी सकाळीच बाहेर पडलो होतो. आयर्विन पुलावर काही छायाचित्रे काढली. नंतर मी इस्लामपूर रोडवर गेलो. धुके कमी होऊ लागले होते. या परिसरात ऊस तोडणीचे काम सुरू होते. मी आत शेतात जात असतानाच चार - पाच फुटावरून एक पक्षी माझ्या समोरून झप्पकन पुढे गेला व झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. त्याने माझे लक्ष वेधले. त्याचे छायाचित्र काढण्यासाठी मी टेलीलेन्स लावली पण तो हवेत उडाला. त्यादिशेने मी बघू लागलो तर मला एका ठिकाणी जोरदार हालचाल दिसली.
म्हणून मी तिथे कॅमेरा स्थिर केला तर मत्स्य शेतीच्या कुंपनाच्या जाळीत एक पक्षी अडकलेला दिसला. तो स्वतःला सोडवून घेण्यासाठी धडपड करत होता. या धडपडीत तो जास्तच अडकला जात होता. स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात तो जास्तच त्या जाळ्यात अडकला जात होता. पतंगाच्या मांज्यात अडकलेले पक्षी मी ऐकून होतो, पण आज मी प्रत्यक्ष पाहत होतो ते दृश्य फारच विदारक होते.
मी त्याची छायाचित्रे काढत असतानाच त्याला सोडविण्याचा विचार माझ्या डोक्यात घोळत होता. त्यावेळी त्याच जातीचे दोन पक्षी तिथे त्याच्या शेजारी येऊन बसले व त्याला त्या जाळ्यातुन सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्यांची ही धडपड मी छायाचित्रीत केली. पण मला राहावले नाही. त्याला सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. असे वाटले.
अखेर मी प्राणी व पक्षी मित्रांना फोन केला व बोलावून घेतले. तो येई पर्यंत आपणही काही प्रयत्न करावा असे वाटले.
त्या पक्षांची केविलवाणी धडपड बघवत नव्हती. मी तसाच पुढे जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण क्षारपड जमिनीतील पाणी बाहेर जाण्यासाठी खणलेली चर आडवी होती. त्यामुळे मला तिथेपर्यंत पोचता येत नव्हते.
अखेर पक्षीमित्र मुस्तफा या पक्षाला सोडविण्यासाठी धावत आला. त्याने सांगितले ही कवडा पक्षांची पिल्ले आहेत. पूर्ण वाढ झालेले पक्षी असे सहजासहजी जाळ्यात सापडत नाहीत. पिल्लांना उडताना अंदाज येत नाही त्यामुळे ते त्या जाळ्यात अडकले जातात. हे सांगत सांगतच त्याने पुढे जात या पक्षास सोडवले. पक्षाला जाळ्यातून मुक्त केल्याचा मला प्रचंड आनंद झाला.
कवडा हा स्थानिक पक्षी आहे. पाणथळ, दलदल, ओलसर ठिकाणी राहतो. परिसरातील सूक्ष्म किडे अळ्या हे त्याचे अन्न, नर पक्षी विणीच्या हंगामात गातो. घरटे तशाच परिसरात जमीनीवर अडोसा पाहून करतो. घरटे उन्हाळ्यात होते. गरजे प्रमाणे स्थानिक स्थलांतर करतात. धान्यापेक्षा कीटक खाऊन शेतीला पक्षी मदतच करतात. पण शेतावर फवारलेली कीटकनाशके, संरक्षक जाळ्या त्यांच्या जीवावर बेततात .तसेच पतंगांचे मांजे झाडात अडकल्याने झाडावर बसताना त्या पक्षांचा फास ठरतात. यासाठी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
- शरद आपटे, पक्षीमित्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.