

Writing Journey and Literary Friendship
esakal
डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com
कथा खूपच गाजली. आपल्याला हा सदबाचा रोल कधीतरी करायला मिळायला हवा. किंवा आपण हा सिनेमा दिग्दर्शित करायला हवा. त्या वेळेसच स्वतःचं स्थान बघता या दोन्ही गोष्टी केवळ मनातच उभ्या राहू शकत होत्या... राहिल्याही बऱ्याच दिवस... कार्यबाहुल्यामुळे मन ते धूसर करतं... तसंच झालं... बरीच वर्ष... मग एक बातमी कानावर आली.
‘हे जे पेपरला छापून येतंय हे सगळं तू लिहितोय...? जानेवारीपासून वाचतोय आता मार्च उजाडलाय, कसं विचारू, तुला काय वाटेल म्हणून विचारलं नाही...’ गोष्ट आहे बारा- पंधरा वर्षांपूर्वीची... एका मोठ्या वर्तमानपत्रासाठी ‘कवडसे’ हे सदर लिहीत असतानाची ही एका वाचकाची माझ्यासाठी झालेली घालमेल...
बहुधा मला हे कसं जमतंय किंवा जमत नाही याचं आंदोलन त्यांच्या मनात माजलं असावं. प्रश्न उपस्थित करणारी व्यक्ती तशी काही अगदीच दखल न घ्यावी अशी नव्हती... नगरच्या आकाशवाणी केंद्रात उच्चपदस्थ अधिकारी होते ते. साहित्य कला संस्कृतीची जाण असणारे नगरचे केंद्र बांधण्यात बहुमूल्य योगदान असणारे लियाकत अली सय्यद.
त्यांनी मला हे विचारलं... ‘खरं तू लिहितोस...?’ मी ‘हो’ म्हणालो.
बराच वेळ डोळे आणि कपाळाला एकमेकाशी जोडायचा प्रयत्न करत त्यांनी स्वतःच्या मनाला, हे मी लिहितो हे मान्य करायला लावलं. नंतर आमचा स्नेह वृद्धिंगत झाला तो अखेरपर्यंत टिकून राहिला. आज ते हयात नाहीत. पण त्यांनी जोडून दिलेला अरुण सोळंकी, प्रदीप जारोंडे, भय्या टेकाम, औटी, सुरवाडेसाहेब हा मित्रपरिवार आजही जोडलेला आहे. स्नेहही तसाच उबदार...
कवडसेचं लिखाण छापून येत होतं दर मंगळवारी. याचं आपण पुस्तक करू. पलीकडून राजन खान (प्रसिद्ध साहित्यिक) बोलत होते... तुमचे काही लेख माझ्या वाचनात आले. त्यात पुस्तक होण्याचे पोटेन्शियल आहे. करू मालक आपण पुस्तक... समोरच्याला मालक म्हणायची ही खास राजन खान यांची पद्धत.