Aihole Village Temple
Aihole Village TempleSakal

ऐहोळे : मंदिरांचं गाव

पर्यटनाच्या दृष्टीनं श्रीमंत असणाऱ्या उत्तर कर्नाटकात ऐहोळे हे अतिशय समृद्ध आणि संपन्नशाली गाव आहे. ‘आर्यपूर’, ‘अहिवल्ली’ या नावांनी इतिहासात या गावाचे उल्लेख वाचायला मिळतात.

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

पर्यटनाच्या दृष्टीनं श्रीमंत असणाऱ्या उत्तर कर्नाटकात ऐहोळे हे अतिशय समृद्ध आणि संपन्नशाली गाव आहे. ‘आर्यपूर’, ‘अहिवल्ली’ या नावांनी इतिहासात या गावाचे उल्लेख वाचायला मिळतात. याच नावाचा अपभ्रंश पुढं ‘ऐहोळे’ असा झाला.

आख्यायिकेनुसार, संपूर्ण पृथ्वी निःक्षत्रीय केल्यावर परशुरामांनी रक्तानं माखलेली आपली कुऱ्हाड गावाजवळून वाहणाऱ्या ‘मलप्रभा’ नदीत धुतली. ऐहोळ्याच्या आजूबाजूला असणारी डोंगररांग आणि दगड-मातीचा रंग त्यामुळेच लाल असल्याचं स्थानिक लोक आजही मानतात. एवढंच नव्हे तर, नदीकिनारी असणाऱ्या रामलिंगमंदिराशेजारी असलेला एक दगडही ‘परशुरामांची कुऱ्हाड’ म्हणून दाखवला जातो.

पुराणकथांनी हा भाग संपन्न आहे. इथून जवळच असणाऱ्या बागलकोटचं नातं थेट रावणाशी सांगण्यात येतं. बदामीचं ‘वातापी’ हे पुरातन नाव आतापी-वातापी राक्षसांवरून पडलं असल्याचीही धारणा आहे. आणखी एका आख्यायिकेनुसार, धुळखेड इथं दक्षानं केलेल्या यज्ञाला आपला पती शिव याला न बोलावल्यामुळे सतीनं यज्ञकुंडात आत्माहुती दिली होती.

गावात मंदिरांची संख्या जास्त आहे. शंभरपेक्षा जास्त मंदिरं गावात आणि परिसरात अस्तित्वात आहेत. त्यातली कित्येक आजही उत्तम स्थितीत आहेत. इसवीसनाच्या सहाव्या-सातव्या शतकात उभारण्यात आलेली ही मंदिरं चालुक्यांच्या कला, स्थापत्य आणि आर्थिक-धार्मिक-सांस्कृतिक इतिहासाची संपूर्ण जडणघडण आपल्याला सांगतात.

इसवीसनाच्या सहाव्या शतकात दख्खनवर वर्चस्व प्रस्थापित करणारं सामर्थ्यशाली घराणं म्हणून चालुक्यघराणं उदयास आलं. याच घराण्यातला ‘पुलकेशी दुसरा’ याच्या काळात ऐहोळे गावाचं वैभव वाढीस लागलं. कदाचित चालुक्यांचा ऐहोळ्याला ‘धार्मिक राजधानी’ म्हणून उदयास आणण्याचा मानस होता.

ऐहोळे या गावात हिंदू आणि जैन धर्माची मंदिरं भव्य आणि महत्त्वाच्या ठिकाणी बांधलेली आहेत. एका उंच टेकडीच्या पायथ्याशी संपूर्ण गाव वसलेलं आहे. टेकडीवर ‘मेगुति’नामक जैनमंदिर असून त्यावर रविकीर्तीनं कोरलेला शिलालेख आहे.

इसवीसन ६३४-६३५ मध्ये कोरलेला हा संस्कृत शिलालेख, ‘भारतीय युद्धाची ३,७३५ वर्षं ओलांडल्यानंतर’ म्हणजे महाभारताचं युद्ध झाल्यानंतर ३,७३५ वर्षांनी कोरल्याचं रविकीर्ती लिहितो. कालिदास आणि भारवी यांच्यासारख्या कवींशी तुलना होणाऱ्या या रविकीर्तीनं बाराव्या ओळीत लिहिलं आहे : ‘९९ हजार गावांचं क्षेत्र असलेल्या तीन महाराष्ट्र प्रदेशाचा अधिपती’.

यातलं ‘तीन महाराष्ट्र’ म्हणजे नेमकं काय हे आज नक्की सांगता येत नसलं तरीही ‘महाराष्ट्र’ या शब्दाचा प्राचीन उल्लेख आपल्याला या शिलालेखात पाहायला मिळतो. पुलकेशी दुसरा यानं आपल्या कारकीर्दीत बराच पराक्रम गाजवला. दक्षिणेत कांचीपर्यंत, पूर्वेस बंगालच्या उपसागरापर्यंत, पश्चिमेस कर्नाटक, तर उत्तरेस नर्मदेपर्यंत त्यानं आपल्या राज्याच्या सीमा वाढवल्या. हर्षाला पराभूत करणाऱ्या पुलकेशीच्या आयुष्याचं सार असलेला हा शिलालेख ‘ऐहोळे प्रशस्ती’ म्हणून प्रसिद्ध आहे.

याच मंदिराच्या मागच्या बाजूला ताम्रपाषाणयुगीन मानवाची दफनस्थळं आहेत. या स्मृतिशिळांना ‘डोलमेन्स’ या नावानं ओळखलं जातं. याच टेकडीच्या पुढच्या बाजूला अर्धवट अवस्थेत खोदण्यात आलेली एक लेणी आहे. अभ्यासकांच्या मते, ही लेणी बौद्ध असावी, तर मागच्या बाजूला जैनलेणी आहे. पुलकेशी दुसरा हा जैन धर्माचं पालन करणारा होता.

त्यामुळे मेगुति-मंदिर किंवा जैनलेण्याची निर्मिती ही निश्चितच त्याच्या शासनकाळात झाली होती.

दर दोन घरांमागं एक मंदिर असं प्रमाण असणाऱ्या या गावातल्या मंदिरांची नावंही फार मजेशीर आहेत. ‘हुच्चीमल्ली गुडी’ हे ऐहोळे गावातल्या सर्वात सुरुवातीला बांधण्यात आलेल्या मंदिरांपैकी एक.

नागर शैलीचा प्रभाव असलेल्या या मंदिराच्या नावाचे दोन अर्थ होतात : हुच्चीमल्ली म्हणजे ‘वेडसर बाई’ किंवा ‘जाईच्या फुलांचा गुच्छ’. गेल्या शंभर-दीडशे वर्षांत गावाच्या सामाजिक रचनेची कल्पनासुद्धा काही मंदिरांच्या नावावरून येते. गौडारगुडी (गौड), देसायर गुडी (देसाई), बोयर गुडी (शेतमजुरांचा समूह), नाडार गुडी (नाभिक) अशी समाजाच्या नावांवरून मंदिरांना नावं दिलेली आहेत.

हा मंदिरांच्या नावांतला बदल फारसा जुना नाही. अर्वाचीन काळातल्या ऐहोळे गावाच्या सामाजिक-सांस्कृतिक रचनेवर या नावांमधून प्रकाश पडतो. तीन मंदिरांचा समूह म्हणून ‘कौंत गुडी’, तारकाकृती आकाराची रचना म्हणून ‘चिक्की गुडी’, एका साधूच्या नावावरून ठेवलेलं नाव ‘हुच्चपय्या मठ’ अशी कितीतरी नावं आहेत.

गावाच्या बरोबर मध्यभागी फार मोठा परिसर राज्य पुरातत्त्व खात्यानं संरक्षित केला आहे. तिथं दुर्गमंदिर, लाडखानमंदिर आणि संग्रहालय आहे. काही दशकांपूर्वी इथं ‘लाडखान’ नामक मुस्लिम दरवेश राहत होता, त्याच्याच नावावरून मंदिराला ‘लाडखान’ असं नाव पडलं. विशेष गोष्ट म्हणजे, संपूर्ण ऐहोळे गावात एकही मुस्लिम व्यक्ती राहत नाही.

लाडखानमंदिरावरच्या एका खांबावर बदामी चालुक्यांनी आपलं राजचिन्ह कोरून ठेवलं आहे. गावातलं ‘दुर्गामंदिर’ जगप्रसिद्ध आहे. मंदिराला भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक परदेशांतून येतात. मंदिराची रचना गजपृष्ठकार आहे. गर्भगृहात कोणतीही देवता नाही. तरीही हे मंदिर दुर्गादेवीच्या नावानं ओळखलं जातं. या नावाचा इतिहास थेट जातो अठराव्या शतकात, मराठ्यांच्या कालखंडात.

आजही गावातली सर्वात मोठी आणि उंच वास्तू ‘दुर्गमंदिर’ हीच आहे. याच्या छतावर अठराव्या शतकाच्या अखेरीस एक मोठा टेहाळणीबुरुज उभारण्यात आला. पुढं सन १८७४ मध्ये जेम्स बर्गेस यानं ऐहोळे गावाला भेट दिली. तेव्हा मंदिरावर उभारण्यात आलेल्या बुरुजामुळे त्याला हे मंदिर एका दुर्गाप्रमाणे भासल्याची नोंद त्यानं करून ठेवली आहे. मंदिराच्या पूर्व भिंतीवर बाहेरच्या बाजूला अतिसुंदर अशी महिषासुरमर्दिनी कोरलेली आहे.

काळाच्या ओघात नावाचा अपभ्रंश होत गेला आणि त्या महिषासुरमर्दिनीमुळे मंदिर ‘दुर्गामंदिर’ या नावानं प्रसिद्ध झालं. वास्तविक, हे मंदिर ‘आदित्य-नारायण’ म्हणजे सूर्य आणि विष्णू यांच्या एकत्रित स्वरूपाला समर्पित असल्याचे अनेक पुरावे मंदिरावर आहेत.

ऐहोळे हे छोटेसं, टुमदार गाव आहे. इथून जवळच ‘अमिनगड’ नावाचं गाव आहे. तिथल्या बसस्थानकासमोर एका छोट्या खानावळीत अतिशय सुंदर पुरणपोळी मिळते. ऐहोळ्यात ‘मयूर भुवनेश्वरी’ या ठिकाणी राहण्याची उत्तम व्यवस्था होऊ शकते. गाव छोटं असल्यानं आणि सर्व मंदिरसमूह जवळजवळ असल्यानं चालत पाहणं सोईस्कर ठरतं. सातव्या-आठव्या शतकातली चालुक्य मूर्तिकला, स्थापत्य यांचा सुवर्णकाळ अनुभवायचा असेल तर ऐहोळे या गावाला भेट द्यायलाच हवी.

(लेखक हे सध्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजात पुरातत्त्व या विषयावर पीएच. डी. करत असून, पुरातत्त्वीय पर्यटनाच्या माध्यमातून मंदिर, शिल्प, लोकसंस्कृती, तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com