

Khajinyachi Shodhyatra Book Review
esakal
मनोहर कुलकर्णी - saptarang@esakal.com
हिंदुत्व विचारासह हिंदू जीवनपद्धतीचा प्रभाव आणि मान्यता जसजशी वाढत चालली आहे, तसतशी भारतीय ज्ञानपरंपरा मुळातून जाणून समजून घेण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढीस लागते आहे. केवळ भारतातून नव्हे, तर जगभरातून याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे. भारतातील नव्या तरुण पिढीला भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख करून घेण्याची व पुढे ती खोलात जाऊन अभ्यासण्याची उत्कंठा आहे. याबद्दलच्या साहित्याचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर अत्यंत उपयुक्त ठरणारे पुस्तक म्हणजे, या विषयातील व्यासंगी लेखक व अभ्यासक प्रशांत पोळ यांचे ‘खजिन्याची शोधयात्रा’ हे होय!
या पुस्तकाला मूर्तिशास्त्राचे ख्यातनाम अभ्यासक व तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांची प्रस्तावना लाभली आहे. गुरुत्वाकषणाचे श्रेय न्यूटनला तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते या शोधाचे श्रेय कोपरनिकसला दिले जाते. मात्र, त्यावेळी आर्यभट्ट व भास्कराचार्य यांचे आपल्याला विस्मरण होते, हे दुर्दैव होय. कदाचित हे भारतीयांच्या न्यूनगंडात्मक वृत्तीमुळे घडले असावे, परंतु त्याची दुरुस्ती स्वातंत्र्यांनंतर भारताला करता आली असती. तसेही दुदैवाने घडले नाही. याकडे डॉ. देगलूरकर यांनी लक्ष वेधले आहे.