आलाप : रागाचा महाल

आपल्या भारतीय अभिजात संगीतात आलापांना अतिशय महत्त्व आहे. हे आलाप अत्यंत संथगतीत गायले जातात. संथ गतीत गायलेल्या आलाप रागाचा सुंदर असा महाल तयार करतात.
Classical Music
Classical MusicSakal
Updated on

- किरण फाटक, Kiranphatak55@gmail.com

आपल्या भारतीय अभिजात संगीतात आलापांना अतिशय महत्त्व आहे. हे आलाप अत्यंत संथगतीत गायले जातात. संथ गतीत गायलेल्या आलाप रागाचा सुंदर असा महाल तयार करतात. गायक कलाकाराप्रमाणे आणि त्याच्यातील सौंदर्यदृष्टीप्रमाणे रागाच्या महालाची आकृती ही वेगवेगळी असू शकते. गायक कलाकाराची रागाचा महाल बनविण्यामागची सौंदर्यदृष्टी, राग चितारण्यातील त्याची रंगसंगती, ती रागाकृती घडविण्यामागची त्याने केलेली मेहनत व कल्पनाशक्ती या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे रागाच्या महालाची सुंदरशी आकृती.

रागाचा महाल एकदा उभा राहिला, की वर तानांचा कळस बांधला जातो. आणि त्या रागाच्या आकृतीला पूर्णत्व येते. या आलापांच्या एकंदर रचनेत अनेक नक्षीदार अशा स्वरांच्या रचना असतात. गायनात तीन सप्तके खूप महत्त्वाची असतात. पहिले मंद्र सप्तक, दुसरे मध्य सप्तक आणि तिसरे तार सप्तक.

आपल्या आवाजाचा आवाका हा या तीन सप्तकांना व्यापून उरलेला असतो. काही कलाकारांचे आवाज हे चार सप्तकांनासुद्धा व्यापू शकतात. अर्थात त्यांना आवाजाची ही ईश्वरीय देणगीच असते. आलापांचे गायन सर्वसामान्यपणे मंद्र सप्तकातून अत्यंत संथगतीत सुरू करतात. एक एक स्वराचे सौंदर्य दाखवीत दाखवीत, एक एक पुढचा स्वर त्यामध्ये गुंफत, स्वरांचा एक सुंदरसा हार तयार करतात.

एका स्वराला दुसरा स्वर जोडत जोडत त्याची एक सुंदर माळ तयार करणे म्हणजे आलाप. आलाप हे आरोही आणि अवरोही असे नादप्रवाहाचे सुंदर मिश्रण असून, शेवटी आलापांची श्रवणीय नादवलये तयार होत जातात, ती श्रोत्यांपर्यंत जातात आणि श्रोते त्याचा आनंद घेतात. वादी म्हणजेच रागातील मुख्य स्वराभोवती इतर स्वर फेर धरतात आणि रागातील वादी स्वराचे व्यक्तिमत्त्व खुलवित जातात. वादी स्वराचे महत्त्व प्रस्थापित झाले, की रागाच्या दुनियेतील अनेक रंग हे श्रोत्यांपर्यंत जाऊन त्यांना आनंदित करतात.

आलापांमध्ये गायक कलाकार आपल्या आवाजातील चढ-उतारांमधून आणि विविध स्वरांच्या ठहरावातून, तसेच कमी-जास्त लांबीच्या सौंदर्यपूर्ण स्वररचनातून, त्या रागाचे सौंदर्य श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. आलाप गाताना गायक मींड, स्पर्श स्वर, कण स्वर, खटका, मूरकी, कंपन इत्यादी आवाजाच्या विविध आविष्कारांचा आलापात समर्थपणे उपयोग करतो. या आवाजातील आविष्काराला गमक असे संगीताच्या भाषेत म्हणतात.

यामध्ये स्वररचनांची लांबी आणि गायक कलाकाराच्या श्वासाची लांबी ही जर एकमेकांना पूरक असली, तर तो आलाप अतिशय सुंदरपणे गायक कलाकाराच्या कंठातून बाहेर पडतो. म्हणून गायक कलाकाराला श्वास आणि आलाप यांचे नाते जुळवावे लागते. अन्यथा डोक्यात तयार झालेला आलाप आणि कंठातून निघणारा आलाप यांची लांबी एकमेकांना पूरक होत नाही. आणि तो आलाप गाता गाता मध्येच तुटतो. त्याची जाणीव चाणाक्ष आणि दर्दी श्रोत्यांना होते.

मंद्र सप्तक ही जर रात्र मानली, तर मध्य सप्तक हा दिवस होतो आणि तार सप्तक हा दिवसाचा सगळ्यात उच्च असा प्रहर होतो. रात्री गायले जाणारे राग ( दरबारी कानडा, मालकंस इत्यादी) मंद्र सप्तकात जास्त विस्तारित करून गायले जातात. त्यांचा स्वभाव हा अत्यंत गंभीर आणि चाल अत्यंत संथ असते.

जस जसा सूर्य उदयास येतो आणि आकाशात वर चढत जातो, तसा रागाचा वादी स्वर पूर्वांगातून निघून हळूहळू उत्तरांगामध्ये जाऊन स्थिर होतो. जसजसा सूर्य अस्ताला जातो, तसतसा सकाळच्या रागातील उत्तरांगातील वादी स्वर हळूहळू पुन्हा रागांच्या पूर्वांगांमध्ये प्रवेश करतो. उदा. यमन, बिहाग, जयजयवंती.

म्हणून ज्या रागाचे वादी स्वर ‘सा रे ग म’ या पूर्वांगात असतात. त्या रागांचा स्वरविस्तार मंद्र आणि मध्य सप्तकात जास्त होतो. ज्या रागांचा वादी स्वर ‘प ध नि सा’ या उत्तरांगात असतो, त्या रागांचा स्वरविस्तार मध्य आणि तार सप्तकात जास्त होतो. तीव्र ‘म’ आणि ‘शुद्ध नि’ हे स्वर कधीच कोणत्या रागात वादी स्वर नसतात. कारण तीव्र ‘म’च्या अगदी खेटून शेजारी ‘प’ स्वर आणि ‘शुद्ध नि’च्या शेजारी ‘सा’ हा स्वर असतो.

‘सा’ आणि ‘प’ हे अचल स्वर असून अत्यंत प्रभावी असे असतात. म्हणून कदाचित तीव्र ‘म’ आणि ‘शुद्ध नि’ हे वादी स्वर नसावेत.

सुरवातीला मुक्त असे रागातील आलाप गायल्यानंतर संथ गतीतील बंदिशीला प्रारंभ होतो. स्वर, ताल आणि शब्द यांनी एकत्र बांधलेली एक अत्यंत श्रवणीय, मनोहर आणि राग दर्शन करणारी कलाकृती म्हणजे बंदिश. या संथ गतीतील बंदिशीला बडा ख्याल असे म्हणतात.

यात आलाप, बोलआलाप, बोलबांट, सरगम, ताना आणि बोलताना गाऊन ख्यालाची सौंदर्यपूर्ण आकृती गायक बनवितो. ख्यालाच्या आकृतीत समाविष्ट असलेल्या या सर्व घटकांना ख्यालाची अंगे असे म्हणतात. ही सर्व अंगे ख्याल गाताना प्रमाणशीरपणे वापरावी लागतात. अन्यथा ख्यालाची आकृती बिघडू शकते.

रागाचा स्वभाव, बंदिशीतील शब्द, बंदिशीतील भाव, हे सर्व बघून या अंगांचा ख्यालामध्ये कसा, किती आणि कुठे उपयोग करावा याचा विचार प्रत्येक गायकाने करणे जरुरीचे असते. खयाल याचा अर्थ विचार. शास्त्रीय संगीतात विचारांचे फार मोठे महत्त्व आहे. त्यातूनही तर्कशुद्ध विचार करण्याची बुद्धी विद्यार्थ्यांची विकसित झालेली असली पाहिजे. मुळात संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला तरल, तर्कशुद्ध अशा बुद्धीची आवश्यकता असते.

अन्यथा तो रागाचा विस्तार करण्यास असमर्थ ठरतो. नुसता आवाज मधुर असून चालत नाही, तर एखादी गोष्ट तर्कसंगत विस्तारित करणे त्याला जमावे लागते. यासाठी स्वरांचे लगाव आणि रचना यांचे सखोल ज्ञान त्या विद्यार्थ्याला असावे लागते. जरी बुद्धी असली आणि रोजचा रियाज नसला, तर विद्यार्थी ही संगीताची दुनिया समर्थपणे बघू शकत नाही.

म्हणून रागाची सुंदर आकृती निर्माण करण्यासाठी तरल बुद्धिमत्ता, रोजचा रियाज, सौंदर्यदृष्टी आणि प्रतिभाशक्ती विद्यार्थ्यांमध्ये असणे अत्यंत जरुरीचे असते. यातील एक जरी गोष्ट विद्यार्थ्यांमध्ये नसली, तरी त्याला ही गोष्ट त्याच्या गुरुने निदर्शनास आणून देणे फार जरुरीचे आहे.

आलापांद्वारे रागाचा महाल तयार करण्याअगोदरच तानांचा कळस बांधण्याचा प्रयत्न करू नये. कारण रागाच्या महालावरच तानांचा कळस चढवायचा असतो. आधी तानांचा कळस चढविण्यास गेल्यास रागाची पूर्ण आकृती बिघडते. ती कुरूप, समतोल तसेच सौंदर्यपूर्ण अशी होत नाही. म्हणून भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतात आलापांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे, हे विसरता कामा नये.

(लेखक संगीत विशारद असून संगीत क्षेत्रात गेली चार दशकं कार्यरत आहेत.)

( लेखक हे ‘संगीत अलंकार’ असून संगीतक्षेत्रात गेली चार दशकं कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com