भारतीय कलेचे 'ज्ञानपीठ' (किरण यज्ञोपवित)

किरण यज्ञोपवित
रविवार, 16 जून 2019

आधुनिक भारतीय रंगभूमीची 1960 च्या दशकात जडणघडण होऊ लागली. काही थोर रंगकर्मीनी आपल्या असामान्य प्रतिभेनं याची पायाभरणी केली त्यात गिरीश कार्नाड हे त्यातलं अग्रणी नाव. बादल सरकार, मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि गिरीश कार्नाड हे आधुनिक भारतीय रंगभूमीचे चार आधारस्तंभ मानले गेले. गिरीश कार्नाड हा त्या चौघांच्या कर्मपर्वातला अखेरचा; पण शेवटपर्यंत क्रियाशील असलेला दुवा होता. निखळला.

आधुनिक भारतीय रंगभूमीची 1960 च्या दशकात जडणघडण होऊ लागली. काही थोर रंगकर्मीनी आपल्या असामान्य प्रतिभेनं याची पायाभरणी केली त्यात गिरीश कार्नाड हे त्यातलं अग्रणी नाव. बादल सरकार, मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि गिरीश कार्नाड हे आधुनिक भारतीय रंगभूमीचे चार आधारस्तंभ मानले गेले. गिरीश कार्नाड हा त्या चौघांच्या कर्मपर्वातला अखेरचा; पण शेवटपर्यंत क्रियाशील असलेला दुवा होता. निखळला.

तत्कालीन रंगभूमीवर आधुनिक विचार घेऊन येणारे, पाश्‍चात्य रंगभूमीचा विचार करणारे अनेक नाटककार आले ते नवीन काळाचा आणि बदलत असलेल्या राजकीय- सामाजिक परिस्थितीचा वेध आपल्या लिखाणातून घेऊ लागले. अशा वेळी भारतीय बीजांना महानाट्याच्या रूपात पाहू शकणारा आणि "ययाती', "हयवदन', "तुघलक', "नागमंडल', "तलेदण्ड' अशी बुलंद नाटकं लिहिणारा एक नाटककार आपली वेगळी ओळख निर्माण करतो हे विशेष आहे. भारतीय मिथकं आणि भक्ती याचा कार्नाडांनी आपल्या सर्जनानं वेध घेतला आणि त्यातून उभ्या राहिलेल्या उत्कट नाट्यानं त्यांची नाटकं सजली. या परिचित कथांकडे त्यांनी वेगळ्याच नजरेनं पहिलं आणि अनेकपदरी रचनांचं नाट्य साकार केलं. कार्नाड हे खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय स्तरावरचे भारतीय नाटककार होते.

सत्तरच्या दशकात आधुनिक नाटकाच्या जोडीला नव्या विचारांचा आकार घेत होता. याचं केंद्रस्थान मुंबई होतं. श्‍याम बेनेगल, गोविंद निहलानी, विजय तेंडुलकर आणि गिरीश कार्नाड अशा मंडळींचं हे पर्व होतं. नाटककार कार्नाड इथं अभिनेत्याचा रूपात प्रेक्षकांना दिसले. हिंदी, कानडी, मराठी चित्रपटात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. नंतरच्या टप्प्यावर आलेल्या "उंबरठा' या जब्बार पटेल दिग्दर्शित मराठी चित्रपटातही ते अभिनेता म्हणून आपल्याला दिसले. फक्त हाच चित्रपट नव्हे, तर एकुणातच त्यांचं मुंबईचं वास्तव्य, मराठी नाटकाविषयी त्यांना असलेली आस्था, मराठी रंगभूमीवर त्यांची गाजलेली मैलाचा दगड ठरलेली नाटकं, मराठी कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांच्यासोबत असलेला राबता अशा अनेक कारणांनी कार्नाड कानडीइतकेच मराठी लोकांना आपले वाटत राहिले.

भारतीय परंपरेचा चिकित्सक स्कॉलर, प्रज्ञावान लेखक, इकॉनॉमिस्ट; तसंच शासकीय यंत्रणा ते हौशी कलावंताच्या सोबत कलेच्या प्रांतात निर्मिती आणि उभारणीचं मोठे काम करणारा निर्माता म्हणून कार्नाड यांचं नाव सदैव घेतलं जाईल. केवळ लेखकच नाही, तर बुद्धिमान दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. "उत्सव'सारख्या मुख्य धारेतल्या; तरीही अतिशय भिन्न प्रकृतीच्या सिनेमानं भारतीय चित्रपटाच्या इतिहासात आपली वेगळी मोहोर उमटवली हे सहजी झालेलं नाही. त्यांना प्राचीन भारतीय साहित्याविषयी असलेली आस्था, त्यांच्या त्या विषयीचा अभ्यास हेही विचारात घेण्यासारखं आहे.

इथल्या अनेक रीती रिवाजांचा, प्रथांचा, कलाविचारांचा, त्यात अधिष्ठित असलेल्या तत्त्वविचारांचा अन्वयार्थ लावणारे कार्नाड भारतीय कलेचे ज्ञानपीठच होते. संस्कृती हा शब्द इंग्रजी "कल्चर' या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून आपल्यात रुढ झाला आहे. आपल्याकडे त्याला "कृष्टी' हा आपल्या जीवन व्यवहारात जास्त चपखल शब्द आहे- हा "कृषी'पासून निर्माण आहे, अशी संगती त्यांनी मांडली.

इथल्या लोकाधिष्ठित असलेल्या लोककलेला नंतर उच्च वर्गानं अभिजन वर्गात प्रतिष्ठित केलं आणि या अभिजातकरणात कलेचं सोवळेकरण केलं गेलं असं ठणकावून सांगायला ते कधी कचरले नाहीत. पुण्यात सिंबायोसिस विश्वभवनमध्ये जागतिक रंगभूमीदिनानिमित्त झालेल्या भाषणात त्यांनी मूळ भरतनाट्यममधल्या शृंगाराच्या जागी भक्तीला आणून बसवलं गेलं हे नावानिशी नमूद केलं. परंपरा आवडणारा तरीही कट्टर सुधारणावादी आणि त्यासाठी निर्भीडपणे बोलणारा स्पष्टवक्ता अशी त्यांची ओळख मला जास्त महत्त्वाची वाटते. साहित्य, संगीत, नृत्य, नाटक, चित्रपट असा सर्वत्र फक्त संचार नाही, तर बुद्‌ध्या भरघोस योगदान देणारा हा कलावंत शेवटपर्यंत लिहिता होता. आपल्या म्हणण्यावर ठाम राहणारा फार मोठा कलावंत आपण गमावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kiran yadnyopavit write girish karnad article in saptarang