कबुतर‘खाना’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kishor Rithe writes about Pigeon home mumbai dadar railway

कबुतर‘खाना’

- किशोर रिठे

मुंबईतील दादर रेल्वेस्थानकानजीक कबुतरखाना आहे. त्याने या भागाला ओळख निर्माण करून दिली आहे. चहूबाजूने लोखंडी कुंपण करून येथे कंबूतरांना खाद्य टाकले जाते. १९३३ मध्ये स्थापन झाला तेव्हापासून साधारणतः तीन ते चार हजार कबुतरांना येथे फुटाणे, ज्वारी, मूग, बाजरी आणि मका टाकण्यात येतो. त्यासाठी लागणारे धान्य अनेक लोक देणगी म्हणून देतात. साधारणत: दररोज ५० किलो वजनाची ३० पोती अर्थात दीड हजार किलो धान्य येथे टाकले जाते.

दादर कबुतरखाना ट्रस्ट निधी गोळा करते आणि क्रॉफर्ड मार्केट तसेच वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून ठोक भावात धान्य खरेदी करते. तब्बल ८९ वर्षांपासून ही प्रथा आहे. या कबुतरखान्याच्या समोरच जैन मंदिर आहे. अनेक जैनधर्मीय बांधव मंदिरात येताना घरून कबुतरांसाठी धान्य घेऊन येतात. दादरच्या या कबुतरखान्याच्या स्वच्छतेसाठी जुजबी खर्चात पाणीपुरवठासुद्धा करण्यात येतो. एवढेच नाही तर कबुतरे आजारी पडल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बॉम्बे पशुवैद्यक महाविद्यालयाचे डॉक्टर दररोज सकाळी ८ ते १० या वेळात येथे भेट देतात. येथे आजारी कबुतरांना ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्थाही करण्यात आली आहे. काही कबुतरांना तर दिनशॉ पेटीट पशू वैद्यकीय दवाखाना व इतर नजीकच्या दवाखान्यात दाखल करावे लागते. मुंबईत या सर्व दवाखान्यांमध्ये उपचारासाठी संपूर्ण शहरातून १५ ते २० कबुतर दररोज दाखल होतात.

मागील ९० वर्षांमध्ये आता मुंबईत भायखळा, भुलेश्वर, काळबादेवी, चिराग आणि लालबाग येथेही असे कबुतरखाने निर्माण झाले आहेत. मुंबईतच नव्हे तर इंदूर, हैदराबाद, पावागाढ (गुजरात) येथेही कबूतरांना खाद्य पुरविणारे असे कबुतरखाने आहेत. असे असले तरी या कबुतरखान्यांची दुसरी बाजूही आहे. कबुतरांच्या कृत्रिम संगोपनामुळे मुंबईत किंवा कबुतरखाने असणाऱ्या इतर शहरांमध्ये कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या शहरांमधील उत्तुंग इमारतींच्या बाथरूम, गॅलरी अशा अडगळीच्या जागा या कबुतरांनी बळकावल्या आहे. साहजिकच त्यांच्या विष्ठा आता अशा प्रत्येक उत्तुंग इमारतीमध्ये पोहोचल्या आहे. या विष्ठेमधून क्रीप्तोकोकोसीस, हिस्तोप्लास्मोसीस, प्सिटटाकोसिस अशा जवळपास साठ रोगांचा प्रादुर्भाव संभवतो. विशेषतः वाळलेली विष्ठा झाडताना नाकावाटे श्वसननलिकेत जाऊन या रोगाची लागण होते. ही विष्ठा पाण्यात किंवा खाद्यपदार्थांमध्ये मिसळल्यानेही आजार होतात. असे अनेक रुग्ण आता या शहरांमधून आढळून येत आहेत. त्यामुळे चक्क मानवी आरोग्यच धोक्यात आणले आहे. पाहता पाहता मुंबई शहरासोबतच आता हा प्रश्न नवी मुंबईमध्येसुद्धा पोहोचला आहे. पण हा विषय हाताळायला वाटतो तसा सोपा नाही. एकीकडे मानवाची भूतदया; तर दुसरीकडे यातून मानवी आरोग्यावर येणारे संकट त्यामुळे हे अवघड जागेचे दुखणे झाले आहे. यात आता शहरी कचरा व्यवस्थापनातील समस्यांमुळे कावळ्यांची संख्या वाढल्याने भर पडली आहे. मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या महापालिकांनी आता यावर कठोर पावले उचलणे आवश्यक झाले आहे. वास्तविक पाहता कबुतरांना कृत्रिम खाद्याची अजिबात आवश्यकता नसते. असे असते, तर जंगलात कबुतराच्या प्रजाती आढळल्याच नसत्या.

पक्षीसंवर्धन करायचेच असेल, तर जंगलामधील पक्षी प्रजातींना अभय देणे, त्यांचे क्षेत्र सुरक्षित ठेवणे, त्यांच्या नष्ट होणाऱ्या प्रजातींना शास्त्रीयदृष्ट्या वाचविणे, त्यांचे संवर्धन करणे, संशोधन करणे या प्रयत्नामध्ये जैन समाजातील पक्षीप्रेमींनी सहभागी होणे आवश्यक आहे. त्यासाठी बॉम्बे नेचरल हिष्ट्री सोसायटीसारख्या ख्यातनाम संस्था आपल्या शहरात कार्यरत आहेत. त्यांची मदत घेतली पाहिजे. जंगलातील पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष व्हायला आल्या आहे. त्यांना अशा पक्षी मित्रांची खरी गरज आहे; परंतु केवळ आपल्या वाडवडिलांनी सांगितले म्हणून एखादी प्रथा मानवी आरोग्यापुढे प्रश्न निर्माण होऊनही सुरू ठेवावी हे मुळीच स्वागतार्ह नाही. कबुतरांना ‘खाना’ पुरविण्यासाठी माणसांच्या मदतीची नाही, तर निसर्गाची आवश्यकता आहे. त्यासाठी हेच दाते आपल्या शहरातील किंवा देशातील पक्षी अधिवास वाचविण्यासाठी समोर आले तर त्यांना जास्त पुण्य मिळू शकेल.

Web Title: Kishor Rithe Writes About Pigeon Home Mumbai Dadar Railway

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newsbirdsaptarang