जल-वनाचे अतूट नाते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Forest water

जंगल हे आपण नद्यांची जननी म्हणजे माता मानतो. त्यामागे केवळ आमच्या भावना नाहीत, तर ते विज्ञानाने सिद्ध केले आहे.

जल-वनाचे अतूट नाते

- किशोर रिठे, sakal.avtaran@gmail.com

संयुक्त राष्ट्र संघाने २१ मार्चला जागतिक वन दिन व २२ मार्चला जागतिक जल दिन असे सलग दोन दिवस साजरे करण्याचे ठरवले. ही सलगता निव्वळ योगायोग नाही, तर त्यात संपूर्ण जगाच्या कल्याणासाठीचा जागर आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ रोजी २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानुसार २०१३ पासून दर वर्षी हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा होतो. माणूस या जीवसृष्टीचा एक घटक आहे. मानवी जीवन पूर्णत: जीवसृष्टीवर अवलंबून आहे. या जीवसृष्टीचा ऱ्हास येथे अस्तित्वात असणाऱ्या वन्यप्राणी व मानवजातीसाठीही घातक आहे, असे हे सोपे समीकरण आहे.

वनांचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध, आपली जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली, सोबतच जंगलावर उपजीविका भागविणारे आदिवासी बांधव हे वनांचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. असे असले तरीही पृथ्वीवरील वनांची कटाई व ऱ्हास हा सर्वत्र सुरूच आहे. हा प्रश्न जनजागरण केल्याने सुटेल, असे वाटल्याने जागतिक वन दिवसाचे औचित्य साधून आम्ही वनांच्या वेदना विविध कार्यक्रमांमधून मांडण्याचे काम दर वर्षी करीत असतो.

​२२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करतो. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे १९९३ मध्ये हा दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर झाला. संपूर्ण जगातील समुद्र, नद्या, ओढे, पाणवठे, जलाशय, तलाव, सरोवर या सर्वांचे जतन व संवर्धन व्हावे, त्यांना असणारे धोके वेळीच ओळखले जावेत, त्यावर उपाययोजना आखाव्या आणि त्यातून मनुष्यजातीच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारे हे जलस्रोत अबाधित राखावे, हा यामागचा उद्देश होता.

जंगल हे आपण नद्यांची जननी म्हणजे माता मानतो. त्यामागे केवळ आमच्या भावना नाहीत, तर ते विज्ञानाने सिद्ध केले आहे. ज्या नद्या घनदाट जंगलांमध्ये जन्म घेतात, त्या बारमाही बनतात. त्यांना बारमाही बनविण्याचे कसब केवळ या जंगलांमध्ये असते. अशी वने, गवती माळराने आणि वाळवंटी अधिवाससुद्धा जलसंवर्धनाचे काम करतात. हे सर्व अधिवास ओलावा धरून ठेवतात. सोबतच ते नद्यांना वाहते ठेवतात. या नद्याच पुढे तलाव, सरोवरांना जन्म देतात आणि अखेर समुद्राला मिळतात.

या समुद्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहेच; पण या सर्व पाणथळ जागा त्याहून महत्त्वाच्या असतात. त्या जागा या अधिवासांच्या हृदयस्थानी असतात; पण आज ही हृदयेच निकामी होत आहेत. त्यामुळे या प्रदेशांच्या आरोग्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आज आमची जंगले आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. भारतातील सर्वच राज्यांमधील घनदाट व मध्यम दाट वने वृक्षकटाईमुळे विरळ होत आहेत. राज्यांमधील वनक्षेत्रांमध्ये घट होत आहे. त्यामुळेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या नद्या हंगामी झाल्या आहेत. गोड्या व खाऱ्या पाण्याचे लहान मोठ्या आकाराचे असंख्य तलाव आज मरणासन्न अवस्थेत आहेत. जे काही तलाव, जलस्रोत अजूनही शिल्लक आहेत, त्यांच्या मध्ये प्रदूषके सोडण्यात येत आहेत.

त्यामुळे त्यांच्या अंगाखांद्यावर प्रदूषणाचे दर्शक असणाऱ्या जलपर्णी वनस्पती वाढल्या आहेत. यातील अनेक जलपर्णी किंवा वनस्पती या जलस्रोतांना प्रदूषित घटक शोषून शुद्ध ठेवण्याचे काम करतात. कांदळवनांतील वनस्पती तर समुद्री किनाऱ्यांच्या संरक्षणात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात; परंतु आता समुद्रकिनाऱ्यालगत होणाऱ्या बांधकामांसाठी या कांदळवनांचा बळी दिला जात आहे.

समुद्रकिनाऱ्यानजीक असणारी मिठागरे पाणपक्ष्यांसाठी किती महत्त्वपूर्ण आहेत. तसेच ही सर्व पाणथळ जागा या पृथ्वीवरील परिसंस्थेत माणसाच्या फुप्फुसांप्रमाणे कशा भूमिका वठवितात, हे आपण ‘जन जंगल’मध्ये यापूर्वी स्वतंत्रपणे वाचलेच आहे. निसर्ग परिसंस्थेत जीव ओतणाऱ्या अनेक पक्षी, प्राणी, कीटकांना जागविण्याचे काम हे सर्व जलस्रोत करीत असतात. ते भूगर्भातील जलस्तर वाढवून भूजल पुनर्भरणाचे काम करतात. पृथ्वीवर मानवी जीवन व वन्यजीवन फुलविण्याचे महत्त्वपूर्ण काम हे जलाशय किंवा पाणथळ ठिकाणे करीत असतात. महाराष्ट्रात दख्खनच्या पठारावरील नद्या-उपनद्या, धरणांमागील जलाशय आणि पाझर तलावांच्या आसपासची पाणथळ ठिकाणे आज संपन्न परिसंस्था म्हणून ओळखली जातात.

महाराष्ट्रात विदर्भातील लोणारचे प्राचीन सरोवर, भंडारा जिल्ह्यातील नवेगांवचा तलाव, उजनी जलाशय, नंदुर मध्यमेश्वर जलाशय, भिगवण, औरंगाबादमधील जायकवाडी तलाव, जळगाव जिल्ह्यातील हातनुर जलाशय अशी भली मोठी यादी मांडता येईल. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा महत्त्वपूर्ण जलाशय सांगता येतील. नेदरलँड्सस्थित ‘वेटलँड्स इंटरनॅशनल’ या जागतिक संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात पाणथळ जागांच्या आकारात व दर्जामध्ये घट किंवा ऱ्हास झाल्याचे म्हटले आहे. ‘वेटलँड्स इंटरनॅशनल’ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार गेल्या ३० वर्षांत भारतातील अनेक पाणथळ जागांनी त्यांचे नैसर्गिक अस्तित्व गमावले आहे. त्यामुळे येथील पाणथळ जैविक परिसंस्था धोक्यात आली आहे. झपाट्याने होणारे नागरीकरण, पाणथळ प्रदेश आणि त्यांच्या परिसंस्थेबद्दल लागणाऱ्या ज्ञानाचा अभाव व विकास योजनांमध्ये त्यांना मिळणारे दुय्यम स्थान यामुळे या पाणथळ जागा धोक्यात आल्याचे म्हटले आहे.

भारतात सध्या २.२ हेक्टरपेक्षा अधिक आकाराची सुमारे २.२ लाख पाणथळ क्षेत्रे आहेत. याव्यतिरिक्त ५.५ लाख लहान पाणथळ जागाही आहेत. यातील जवळपास ६० हजार मोठी पाणथळ क्षेत्रे ही संरक्षित वनक्षेत्रांत असून ही क्षेत्रे सुरक्षित मानली जाऊ शकतात. त्यापैकी उर्वरित पाणथळ जागांपैकी १५० ते २०० पाणथळ जागांच्या संवर्धनाचे कार्यही हाती घेण्यात आले आहे. श्रीनगरमधील दल सरोवर आणि पंजाबमधील हरिके पाणथळ यांसारख्या काही महत्त्वपूर्ण पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत; परंतु इतर पाणथळ जागांच्या नशिबी मात्र शासकीय अनास्था आणि दुर्लक्ष आले आहे. त्यामुळे गेल्या ३० वर्षांत भारतातील दर पाच पाणथळ ठिकाणांपैकी दोन पाणथळ जागांनी आपले नैसर्गिक अस्तित्व गमावले आहे, तर तब्बल ४० टक्के जलस्रोतांमधील पाणी येथील जलचरांसाठी चक्क घातक झाले आहे.

मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, गृहनिर्माण योजनांचा विस्तार आणि पर्यायी धोरणांचा अभाव यामुळे पाणथळी कोरड्या पडत आहेत. यातील अनेक पाणथळ जागांचा तर कचरा विल्हेवाटीची किंवा सांडपाणी विसर्जनाची ठिकाणे म्हणून वापर केला जातो. अनेक ठिकाणी तर या पाणथळ जागांना जन्म देणाऱ्या ओढ्यांसारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण केले गेले; अथवा या ओढ्यांचा मार्ग बदलला गेला. या जलस्रोतांना जन्म देणारे अनेक ओढे भूगर्भातून निर्माण झाले आहेत; परंतु भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याने व भूजल पुनर्भरणाचे काम न झाल्याने पर्यायाने या पाणथळ जागांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.

पायाभूत विकास, गृहनिर्माण योजना करताना तसेच पाण्याचा उपसा करताना प्रत्येक प्रदेशातील पाणथळ जागांना नख लागणार नाही, हे पाहणे आता आवश्यक झाले आहे. सोबतच आमचे सांडपाणी किंवा कचरा या पाणथळ क्षेत्रांमध्ये जाणार नाही, याची खबरदारी प्रत्येक ग्रामपंचायत, नगर परिषद व महानगरपालिकेने काटेकोरपणे घेणे आवश्यक आहे.

(लेखक ३० वर्षांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)