
काही लोक सर्रास जंगलामध्ये जाऊन वन्य प्राणी आणि पक्षी यांची अंडी, पिल्ले हे मानवी वस्त्यांमध्ये आणत आहेत. काही ठिकाणी ते जखमी झाले, या सबबीखाली आणले जातात. मग त्यांना बंदिस्त ठेवले जाते.
- किशोर रिठे, sakal.avtaran@gmail.com
काही लोक सर्रास जंगलामध्ये जाऊन वन्य प्राणी आणि पक्षी यांची अंडी, पिल्ले हे मानवी वस्त्यांमध्ये आणत आहेत. काही ठिकाणी ते जखमी झाले, या सबबीखाली आणले जातात. मग त्यांना बंदिस्त ठेवले जाते. असे अनेक लोक या वन्य पक्षी आणि प्राण्यांना पाळून, वाढवून त्यांच्या इच्छेनुसार प्रसिद्धीसाठी, पैशांसाठी खेळ करीत आहेत. असाच प्रकार उत्तर प्रदेशात ‘सारस’ पक्ष्याबाबत घडला, त्याची ही कथा...
उत्तर प्रदेशात एका पाळीव सारस पक्ष्याने मुख्यमंत्री ते वनाधिकारी या साऱ्यांच्या नाकी नऊ आणले. कारण त्याचे राजकारण केले गेले. या प्रकरणाच्या खोलात गेल्यास वन्यप्राणी आणि पक्षी यांना पाळीव बनविण्याचा गोरखधंदा आपल्या देशात कसा फोफावला आहे, याचे भयानक वास्तव समोर येते.
गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील. येथे एका गावात आरीफ नावाचा व्यक्ती राहतो. आरीफला एक दिवस एक सारस पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. त्याने त्या पक्ष्याला आपल्या घरी आणले व त्याची सुश्रूषा करून त्याला आपल्यासोबत पाळणे सुरू केले. हळूहळू त्या पक्ष्याला आरीफची सवय झाली. अन्न-पाणी आणि खेळणे, बागडणे या सर्व गोष्टींसाठी तो आरीफवर विसंबून राहू लागला. आता तो पक्षी आरीफशिवाय राहू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग आरीफने त्याच्या जोरावर अमाप प्रसिद्धी मिळवली. त्यासाठी त्याने व्हिडीओ बनविणे आणि समाज माध्यम व्यावसायिकरीत्या हाताळण्यासाठी एक तज्ज्ञसुद्धा ठेवला. आरीफची महती रातोरात जगभर पसरली.
यानंतर खरा प्रश्न निर्माण झाला. आता प्रसिद्धीचा हा धंदा पाहून आणखी एक युवक समोर आला. त्याने आपणच या सारस पक्ष्याला वाढविले, मोठे केले, प्रशिक्षण दिले, त्यामुळे हा पक्षी आपला असल्याचा दावा केला. आता हा वाद माध्यमांमुळे चर्चेत आला. त्याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न झाला. आणि असे वन्य प्राणी किंवा वन्य पक्षी प्रजातींना पाळणे अवैध असताना सारस पक्ष्यासारख्या दुर्मिळ वन्य पक्ष्याला कसे पाळू दिले व यावर वन विभागाने पूर्वीच कारवाई का केली नाही, असा प्रश्न समोर आला.
सारस हा वन्य पक्षी आहे. तो दुर्मिळ आहे. नर आणि मादी असे जोडीने राहतात. त्यातील एक जोडीदार संपल्यास दुसराही प्राण सोडतो, असे समजले जाते. त्याला पुराणामध्येही स्थान मिळाले आहे; पण असे असतानाही सारस पक्ष्यांची संख्या संपूर्ण देशभर प्रचंड प्रमाणात कमी झालेली आहे. त्यामुळे सारस पक्ष्याच्या संरक्षणाचे काम केंद्र व राज्य सरकारने हाती घेतले आहे. अशा परिस्थितीत एक दुर्मिळ सारस पक्षी कोणीतरी युवक घरी आणतो, पाळतो आणि त्याचा खेळ करतो हे आक्षेपार्ह होतेच. त्यामुळे हे सर्व लक्षात आल्यानंतर वन विभागाने साहजिकच कारवाई सुरू केली. खरे म्हणजे अशा प्रकरणात कारवाई करणे खूप कठीण जाते, कारण कारवाई या पक्ष्याच्या मालकावर होते आणि या पक्ष्याला किंवा प्राण्याला माणसाळल्याने त्या मालकासोबत जगण्याची सवय झालेली असते.
वन विभागाने या प्रकरणात कारवाई सुरू केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आरोप केले. हा युवक मुस्लिम समाजातील असल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनी वन विभागाला कारवाईचे आदेश दिले, असा काहीसा हा आक्षेप होता. त्यामुळे या प्रश्नाला राजकीय स्वरूप आले. पुढे हा पक्षी वन विभागाने कानपूर येथील प्राणिसंग्रहालयात पाठविला आणि मग आरीफ नसल्याने वन विभागापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. हा पक्षी वन विभागाच्या ताब्यात मेला तर त्याचे आणखी मोठे राजकारण होईल, या भीतीने मग वन विभागाने तज्ज्ञांना पाचारण करणे सुरू केले. असाच काहीसा प्रकार खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका प्रख्यात समाजसेवकाच्या खाजगी प्राणिसंग्रहालयाबद्दल झाला होता. तेव्हा वन विभागाला या समाजसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून, सर्व प्राणी, पक्षी जप्त करून पुन्हा सुपूर्द नाम्यावर याच समाजसेवकाकडे सुपूर्द करण्याची पाळी आली होती.
सध्याच्या उत्तर प्रदेशातील प्रकरणातही मूळ प्रश्न बाजूला राहण्याची खूप शक्यता आहे. या प्रश्नाच्या खोलात गेल्यास हा विषय यापेक्षा खूप वेगळा आहे, असे लक्षात येते. इंटरनेटवर आपण माहिती घेतल्यास उत्तर प्रदेशमध्येच आणखी आमीर नावाच्या एका युवकाने सारस पक्ष्याचे पिल्लू घरी आणून त्याला त्याने कसे मोठे केले व आज तो त्या परिवाराचा कसा भाग झाला हे यू-ट्युबवर पाहायला मिळते; परंतु उत्तर प्रदेशमध्ये निदर्शनास आलेल्या या फक्त दोन घटना नाहीत. आणखी अनेक घटनांचा शोध घेतल्यास हा प्रश्न खूप मोठा आणि देशव्यापी असल्याचे आपल्याला लक्षात येईल. लोक वन्य पक्ष्यांची अंडी त्यांच्या अधिवासातून उचलून आणतात. मग त्यांना कोंबडी, बदकासारख्या पाळीव पक्ष्याच्या घरट्यात टाकून उबवितात. त्यातून मोर, सारस यांसारखे वन्य पक्षी मानवी वसाहतींमध्ये निर्माण होतात. आणि मग त्यांना जसे पाळले, प्रशिक्षण दिले तसे ते पक्षी वागू लागतात. त्यातून ते पक्षी किंवा वन्य प्राणी त्यांचे वन्य जीवन विसरतात. आता ते मानवाच्या इशाऱ्यावर वागायला लागतात. हा एकूणच गंभीर प्रश्न झाला आहे.
काही राज्यांमध्ये किंवा दुर्लक्षित प्रदेशांमध्ये लोक सर्रास जंगलामध्ये जाऊन असे वन्य प्राणी आणि पक्षी यांची अंडी, पिल्ले हे मानवी वस्त्यांमध्ये आणत आहेत. काही ठिकाणी ते जखमी झाले या सबबीखाली आणले जातात आणि मग त्यांना बंदिस्त ठेवले जाते. असे अनेक लोक या वन्य पक्षी आणि प्राण्यांना पाळून, वाढवून त्यांच्या इच्छेनुसार प्रसिद्धीसाठी, पैशांसाठी, उपजीविकेसाठी खेळ करीत आहेत. यामध्ये गरीब कुटुंबांपासून तर अगदी नामांकित, प्रतिष्ठित, पुरस्कृत व्यक्तींपर्यंतचा समावेश आहे. सरकार जेव्हा जेव्हा अशा व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारते तेव्हा तेव्हा हे लोक कधी जातीच्या, कधी धर्माच्या, कधी प्रतिष्ठेच्या व कधी पुरस्काराच्या आड जाऊन आपल्या भोवती संरक्षण कवच निर्माण करतात.
एकीकडे देशात मुंबई, इंदूर, हैदराबाद, पवागाढ (गुजरात) येथे कबुतरांना खाद्य पुरविणारे कबुतरखाने पोसले जात आहेत. त्यामुळे कबुतरांची संख्या वाढून मानवी आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या अधिवासांमधून वन्य प्राणी नष्ट करून त्यांना माणसाळण्याची वृत्ती वाढीस लागत आहे. हा गोरखधंदा कुठेतरी थांबणे गरजेचे आहे, अन्यथा आमचे वन्य पक्षी व वन्य प्राणी जंगलापेक्षा मानवी वसाहतीतच मोठ्या संख्येने पाहायला मिळतील आणि हे निश्चितच वन्य प्राणी आणि वन्य पक्ष्यांसाठी, तसेच मानवासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
पक्षी संवर्धन करायचेच असेल तर जंगलामधील पक्षी प्रजातींना अभय देणे, त्यांचे क्षेत्र सुरक्षित ठेवणे, त्यांच्या नष्ट होणाऱ्या प्रजातींना शास्त्रीयदृष्ट्या वाचविणे, त्यांचे संवर्धन करणे, संशोधन करणे या प्रयत्नामध्ये सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा गोरखधंदा थांबवून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसारख्या संस्थांमार्फत लोकांनी योगदान दिले पाहिजे.
(लेखक तीन दशकांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ, तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.