जटायू पुराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vulture

पुराणात जटायू गिधाडांचा उल्लेख आहे. रामायणामध्ये याच जटायू पक्ष्याने सीता मातेला लंकापती रावणापासून वाचविण्यासाठी प्राण पणाला लावल्याचा उल्लेख आहे.

जटायू पुराण

- किशोर रिठे sakal.avtaran@gmail.com

पुराणात जटायू गिधाडांचा उल्लेख आहे. रामायणामध्ये याच जटायू पक्ष्याने सीता मातेला लंकापती रावणापासून वाचविण्यासाठी प्राण पणाला लावल्याचा उल्लेख आहे. पारशी समाजामध्ये प्रेतांना दफन करण्यापेक्षा निसर्गातील गिधाडांना खाऊ देण्याची प्रथा होती, पण आज गिधाडेच नामशेष होऊ लागल्याने ती मोडीत निघाली. पुराणातील जटायूंची प्रजातीच अशी संकटात सापडली असताना आम्ही मात्र ढिम्म आहोत...

‘भारतातून नामशेष झालेले चित्ते पुन्हा येणार’ या नुसत्या बातमीने आम्ही केवढे हुरळून गेलो; पण मेलेल्या प्राण्यांवर जगणारे आमच्याच देशातील जटायू नामशेष व्हायला निघाले त्याचे आम्हाला तितकेसे सोयरसूतक नाही. पुराणात ‘संपाती’ आणि ‘जटायू’ या दोन गिधाडांचा उल्लेख आहे. रामायणामध्ये याच जटायू पक्ष्याने सीता मातेला लंकापती रावणापासून वाचविण्यासाठी आपले प्राण पणाला लावल्याचा उल्लेख आहे. तेव्हापासून गिधाडांना हिंदू धर्मासह अनेक धर्मांमध्ये विशेष स्थान मिळाले आहे. गिधाडे मेलेल्या प्राण्यांवर जगतात, त्यामुळे त्यांना निसर्गचक्रामध्ये स्वच्छतादूत म्हणून ओळखले जाते.

धर्म आणि रितीरिवाज, प्रथा यांचं एक अतूट नातं आहे. पारसी समाजात प्रेतांना पुरल्याने किंवा जाळल्याने निसर्गाची हानी होते, प्रदूषण होते असा समज आहे. त्यामुळे या समाजामध्ये प्रेतांना दफन करण्यापेक्षा निसर्गातील गिधाडांना खाऊ देण्याची प्रथा होती. त्यासाठी पार्थिवावर अखेरचे संस्कार करण्यासाठी मुंबईजवळ डोंगरवाडी जंगलात एका उंच टेकडीवर पारसी टॉवर ऑफ सायलेन्स बांधण्यात आले. येथे मृत्यूनंतर गिधाडांना खायला प्रेत/पार्थिव ठेवले जायचे. एकाचवेळी साधारणतः २५० पार्थिव ठेवण्याची व्यवस्था या खुल्या दालनात होती. पण सुरुवातीस गिधाडे येणे कमी झाल्याने व नंतर बंद झाल्याने पारसी समाजास अडचण निर्माण झाली. गिधाडे येत नसल्याने मग पारसी समाजाला १९८० च्या दशकात येथे सौर ऊर्जेवर चालणारे कॉन्सेंट्रेटर लावावे लागले. पण ते प्रेत नष्ट करण्यास गिधाडाएवढे प्रभावी नव्हते. शिवाय कावळ्यासारख्या पक्ष्यांना त्याच्या आवाजाने त्रास होतो. जे काम गिधाडे अगदी काही तासांत करायचे त्यास आता काही आठवडे लागतात. त्यात मुंबई आता खूप पसरली. शहरातील टोलेजंग इमारती अगदी या ठिकाणाच्या आसपास पोहोचल्या. काही इमारतींवरून आता हे ठिकाण दिसू लागले तर प्रेतांची दुर्गंधीही या इमारतींमध्ये येऊ लागली. हे पाहता आता एक टॉवर बंद करण्यात आले आणि दुर्गंधी टाळण्यासाठी एक हवा शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले. तरीही हे कृत्रिम उपाय कुचकामी ठरत आहेत.

अशीच काहीशी व्यथा देशभर मरणाऱ्या गुरांचीही आहे. मेलेल्या गुरांना गावाशेजारी फेकून देण्यात येते. या गुरांचे मृतदेह विविध रोगांना आमंत्रण देणारे ठरत आहे. गिधाडांचे स्वच्छतेचे काम करणे बंद झाल्याने पृथ्वीवरील मनुष्य व इतर प्राण्यांपुढे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा विपरीत परिणाम होऊन निसर्ग चक्रातील उंदीर आणि भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता कुचकामी कृत्रिम उपाय आखण्यापेक्षा गिधाडांचे संरक्षण व संवर्धन करून त्यांची संख्या वाढविणे हाच एकमेव रामबाण उपाय आहे. त्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने गेल्या तीन दशकांपासून जोरदार प्रयत्न चालविले आहेत.

पांढऱ्या पाठीची गिधाडे ही संपूर्ण जगात सर्वत्र सहज दिसून यायची. महाराष्ट्र, आसामसह इतर राज्यांमध्ये वीस वर्षांपूर्वी ही गिधाडे मोठ्या संख्येत दिसायची. झाडावर घरटी करून ते अंडी द्यायची. लांब मानेची गिधाडे ही गंगेच्या खोऱ्याच्या दक्षिणेपासून तर पश्चिम बंगालच्या पश्चिमेकडे संपूर्ण भारतभर आढळून येतात. ते उंच डोंगराच्या कपारीमध्ये घरटी करून अंडी घालतात. ही मातकट बदामी रंगाची गिधाडे या दगडांच्या रंगात मिसळून जातात.

पांढऱ्या पाठीची आणि लांब मानेची गिधाडे तशी वर्षभर दिसतात. हिवाळ्यात त्यांच्या सोबतीला हिमालयीन गिधाडे दिसायची. आज पांढऱ्या पाठीची आणि लांब मानेची ही दोन्ही गिधाडे अति संकटग्रस्त झाली असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तर त्यांच्यासोबत हिवाळ्यात दिसणारे हिमालयीन ‘ग्रीफोन’ हे जवळपास संकटग्रस्त झाले आहेत.

युरेशियन ग्रीफॉन ही आपल्याकडे हिवाळ्यात स्थलांतर करून येणारी प्रजाती आहे. ते आकाराने आपल्याकडील हिमालयीन ‘ग्रीफोन’ एवढेच मोठे असतात; परंतु त्यांच्या गर्द रंगाची चोच, काळे पाय आणि राखाडी रंगामुळे ते इतर गिधाडांपेक्षा अधिक सुंदर दिसतात. ‘दाडीधारी’ हे हिमालयात आढळून येणारे गिधाड आज जवळपास संकटग्रस्त झाले आहे. याच्या चोचेजवळ असणाऱ्या पिसांच्या पुंजक्यामुळे त्याला दाडीधारी गिधाड (बिअरडेड गिधाड) असे म्हणतात. अगदी चितळसारख्या भक्ष्याची टणक अशी हाडेसुद्धा तो खाऊ शकतो, हे त्याचे वैशिष्ट्य! अशी हाडे तो आकाशात उंच नेऊन खडकावर आपटतो आणि मग फुटलेल्या हाडातील बोनमेरो खातो. इजिप्शियन गिधाड (संकटग्रस्त) आणि सिनेरस गिधाड (जवळपास संकटग्रस्त) हेही आपल्याकडे आढळून यायचे. आता या सर्वच गिधाडांच्या संख्येत प्रचंड घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी डॉ. विभू प्रकाश यांच्या नेतृत्वात गिधाडांच्या संख्येतील घासरणीमागची करणे शोधली. गुरांना आजार झाल्यावर डायक्लोफेनाकनामक वेदनाशामक औषध दिले जाते. ते शरीरात राहून या गुरांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर जगणाऱ्या गिधाडांच्या शरीरात जाते. त्यामुळे गिधाडांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतो. अशा काही कारणांमुळे गिधाडांची संख्या अगदी ९९ टक्के इतकी खाली घसरली. मग त्यासाठी या शास्त्रज्ञांनी हरियाणामधील पिंजोर, आसाममधील रानी, मध्य प्रदेशातील भोपाळमधील केरवा धरण, पश्चिम बंगालमधील राजाभातखावा अशा चार ठिकाणी गिधाडांना औषध मुक्त स्वच्छ खाद्य मिळण्याची व्यवस्था केली. भारत सरकारच्या मदतीने डायक्लोफेनाक या औषधाच्या गुरांच्या रोगांवरील वापरावर बंदी आणली. ही बंदी येथील राज्य सरकारांच्या मदतीने या चार राज्यांमध्ये गावस्तरावर राबविली. गिधाडांचे बंदिस्त प्रजनन करून त्यांची संख्या वाढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यात त्यांना यश मिळाले.

आज या चार केंद्रांवर सुमारे ६०० गिधाडे आकाशात पुन्हा विहार करण्यासाठी वाट बघत आहेत. सोबतच हरियाणा, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड व उत्तर प्रदेश या राज्यांमधील गुरांची औषध विकणाऱ्या दुकानांचे सर्वेक्षणही करण्यात आले. आता बंदिवासात वाढलेल्या गिधाडांना निसर्गमुक्त करण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी देशभरातील जंगलांनजीक काही सुरक्षित ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. काही गिधाडांना निसर्गमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपग्रहाच्या माध्यमातून निगराणी ठेवण्यात येत आहे. आकाशातून फिरत ते नजीकच्या देशात गेल्यास त्यासाठी भूतान, नेपाळ, बांगला देश येथील पक्षी शास्त्रज्ञांसोबतही समन्वयाने काम सुरू आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास रामायणातील जटायूला खरा न्याय मिळेल. सोबतच पारसी समाजातील परंपरा जपण्यास व पाळीव गुरांच्या मृतदेहांचा, तसेच मानवी आरोग्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल.

(लेखक गेल्या तीन दशकांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून, केंद्र व राज्य वन्यजीव मंडळ, तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)