वन्यजीव कत्तलीचा ‘ब्रॉडगेज’!

गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून बालाघाट- गोंदिया- चंद्रपूर बल्लारशहा हा रेल्वेमार्ग जातो.
railway broad gauge
railway broad gaugesakal
Summary

गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून बालाघाट- गोंदिया- चंद्रपूर बल्लारशहा हा रेल्वेमार्ग जातो.

- किशोर रिठे sakal.avtaran@gmail.com

ताशी २० कि. मी. वेगाने वन्यजीव संचारमार्गातून धावणारी नॅरोगेज रेल्वे तुरळक अपवाद वगळता वन्यजीवांच्या जीवावर उठली नव्हती. किंबहुना, कान्हा-पेंचचे सौंदर्य अनुभवण्यासाठी ती उत्तम साधन होती. प्रवास करताना सातपुडा-मैकल पर्वतरांगेतील कुकडीखापा धबधबा, शिकरा, गौरीघाट, भेडाघाट हे प्रेक्षणीय थांबे लागायचे. आता ब्रॉडगेज रेल्वे मार्ग गाड्यांच्या वेगामुळे वन्य प्राण्यांचे खुले कत्तलखाने बनू पाहत आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून बालाघाट-गोंदिया-चंद्रपूर बल्लारशहा हा रेल्वेमार्ग जातो. यावर बल्लारशहा ते गोंदिया दरम्यान वाडेगाव ते अरुणनगर या गावांच्या दरम्यान ११ जून रोजी एका चार वर्षीय तरुण वाघाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला. हा वाघ ताडोबा बफरमध्ये दिसणाऱ्या ‘डब्ल्यू’ या वाघिणीचा बछडा होता. ही धडक इतकी भयंकर होती, की वाघाचे मागचे दोन्ही पाय तुटून गेले. शरीर सोलून निघाले. चंद्रपूर-गोंदिया रेल्वेने मागील काही वर्षांमध्ये वाघांचा घेतलेला हा सहावा बळी होता. यापूर्वी ८ मार्च २०२१ मध्ये एका मालगाडीने याच वनक्षेत्रातील पिंडकेपार गावाजवळ एक वर्ष वयाच्या नर वाघाचा बळी घेतला होता. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी रेल्वेगाडीने जुनोनानजीक वाघांच्या तीन बछड्यांना; तर १३ जुलै २०१७ रोजी एक अस्वल व तिच्या दोन पिल्लांना मूलजवळ उडवले होते.

१५ एप्रिल २०१३ रोजी याच रेल्वेने चंद्रपूर-गोंदिया रेल्वेमार्गावरील केळझरजवळ दीड वर्षीय वाघीण व एका पिल्लाचा जागीच मृत्यू झाला होता. यात १० महिने वयाचे मादी शावक जखमी झाले होते. या रेल्वे लाईनने गोंदिया-चंद्रपूर-बल्लारशहा दरम्यान २००१ ते ऑक्टोबर २०२१ या २० वर्षांमध्ये वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, रानकुत्रे, नीलगाय, हरीण अशा तब्बल १३० वन्यप्राण्यांचा बळी घेतला आहे. २०१८ मध्ये वाघाच्या तीन बछड्यांच्या मृत्यूनंतर या रेल्वेमार्गावरील मामला, जुनोना, सिंदेवाही, चीचपल्ली, तळोधी, नागभीड, बाळापूर असे वन्यप्राण्यांच्या संचाराच्या दृष्टीने १९ संवेदनशील ठिकाणे वनविभागाने रेल्वे विभागाला कळवली होती. या ठिकाणांवर रेल्वेचा वेग ४० कि.मी. प्रतितास व तसेच चालकांना वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना रेल्वे बोर्डाकडून देणे अपेक्षित होते; परंतु रेल्वे बोर्डाने या सूचनांवर काहीच निर्णय न घेतल्याने आणखी एका वाघाचा मृत्यू झाला.

रेल्वेमुळे झालेला हा काही पहिला अपघात नव्हता किंवा देशाच्या जंगलांमधून जाणारा हा काही एकमेव रेल्वेमार्ग नाही. म्हणजे असे शेकडो अपघात जंगलांमधून व वन्यजीव अधिवासांमधून जाणाऱ्या बहुतांश रेल्वेमार्गांवर होत असतात; पण त्याबद्दलची संवेदनशीलता पूर्णतः हरवल्यामुळे या गंभीर अपघातांची दखल रेल्वे खाते घेताना दिसत नाही. भारतीय रेल्वे ही जगात तिसऱ्या क्रमांकावर असून, ती आपल्या ६४ हजार कि.मी.च्या पसाऱ्याद्वारे भारतातील विविध बाजारपेठा जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. यासाठी ती मीटरगेज, नॅरोगेज व ब्रॉडगेज मार्गाचा वापर करून दररोज साधारणतः १२ हजार प्रवासी गाड्या व सात हजार मालवाहू गाड्यांची वाहतूक करते.

​२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या स्टेट ऑफ एन्व्हायर्नमेंट अहवालानुसार २०१७-१८ या एका वर्षात संपूर्ण देशात रस्ते आणि रेल्वे अपघातांमध्ये तब्बल १६७ वन्यप्राणी मृत्युमुखी पडले आहेत. यापैकी हत्ती हे प्रामुख्याने रेल्वे अपघातात मारले जातात. वाघ, बिबटे, सिंह व इतर वन्यप्राणी रस्ते तसेच रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात. केंद्र सरकारच्या वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार २०१५ ते २०१८ या तीन वर्षांमध्ये संपूर्ण देशात रेल्वे अपघातात ४९ हत्ती, रेल्वे व रस्ते अपघातात १९४ बिबटे, ११ वाघ व ५ सिंह मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात आले. रानकुत्रे, अस्वल, तडस, रानगवे, चितळ, सांबर, नीलगाय या प्राण्यांची तर मोजदादच नाही. माकडे, साप इतर उभयचर प्राणी, रानमांजर, सायळ, पक्षी यांचे या अपघातांमध्ये असणारे प्रमाण खूपच जास्त आहे, परंतु त्यांची सहसा नोंदच होत नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळात मध्य भारतात रेल्वेने प्रवासी व मालवाहतूक सुलभ व्हावी यासाठी काही नॅरो गेज (अरुंद) रेल्वेमार्ग तयार करण्यात आले. बेंगाल नागपूर रेल्वे (बी. एन. आर) द्वारे तयार केलेल्या या रेल्वे मार्गांना ‘सातपुडा रेल्वे’ किंवा अतिदुर्गम वनाच्छादित गावांची जीवनरेषा म्हणून ओळखले जायचे. चंद्रपूरचा चांदा फोर्ट, गोंदिया, मंडलाचा मंडला फोर्ट, छिंदवाडा या प्रमुख ठिकाणांना जोडणे तसेच या भागातील सागवान, साल, कोळसा, मॅंगनीज व इतर खनिजांची वाहतूक करण्याचा यामागे उद्देश होता.

१९०३ ते १९१३ यादरम्यान गोंदिया ते नागपूर, नैनपूर ते छिंदवाडा आणि पुढे जबलपूरपर्यंत तसेच छिंदवाडा ते पेंच कोळसा खाण, नैनपूर ते मंडला फोर्ट, दक्षिणेकडील गोंदिया ते चांदा फोर्ट, नागभीड ते नागपूर, नागभीड ते चांदा फोर्ट असे हे जवळपास एक हजार कि.मी.पर्यंत रेल्वेजाळे वाढवण्यात आले. यावरून एकूण २२ चाकांची प्रवासी रेल्वे गाडीची वाहतूक व्हायची. हिच्या ताशी २० कि.मी. अशा वेगामुळे शेवटच्या दोन थांब्यांमधील अंतर कापायला सातआठ तासांचा वेळ लागायचा, पण तो वन्यजीवांसाठी घातक नव्हता. वन्यजीव संचारमार्गातून धावणारी ही नॅरोगेज रेल्वे तुरळक अपवाद वगळता त्यांच्या जीवावर उठली नव्हती. किंबहुना, कान्हा-पेंच वन्यजीव संचारमार्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी ती उत्तम साधन होती. यातून प्रवास करताना प्राचीन अशा सातपुडा-मैकल पर्वतरांगेतील कुकडीखापा (धबधबा), शिकरा, गौरीघाट, भेडाघाट हे प्रेक्षणीय थांबे लागायचे.

​हळूहळू वन्यजीवांचे महत्त्व वाढल्याने मंडला जिल्ह्यातील मंडला फोर्टपेक्षा कान्हा व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन वाढले. सिवनी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प, जबलपूरहून बांधवगढ, होशंगाबादमधील बोरी-पचमढी-सातपुडा, गोंदियाचा नवेगाव-नागझिरा आणि चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी हे व्याघ्र प्रकल्प देशभरातील पर्यटकांना आवडू लागले. मध्य भारतात प्रवासी वर्दळ वाढली तशी गोंदिया ते चांदा फोर्ट (२४० कि.मी.) ही रेल्वेलाईन व त्यापुढे नागभीड ते चांदा फोर्ट आणि चांदा फोर्ट ते बल्लारशहा (१९९९) सुद्धा ब्रॉडगेज झाली. अलीकडे मध्य प्रदेशातील बालाघाट-नैनपुर-मंडला फोर्ट ते हवाबाघ (१८६ कि.मी.) तसेच बालाघाट ते कटंगी (४७ कि.मी.) अरुंद रेल्वेमार्ग २००९-१० मध्ये ब्रॉडगेज झाला. २०१५ मध्ये जबलपूर ते नैनपुर आणि नैनपूर ते बालाघाट ब्रॉडगेज करण्यात आले. या जवळपास ६२८ कि.मी.च्या रेल्वेलाईनचे काम तुकड्यांमध्ये झाल्याने मध्य भारतातील कान्हा, पेंच, सातपुडा, नवेगाव-नागझिरा व ताडोबा-अंधारी हे व्याघ्र प्रकल्प व त्यांना जोडणारे वन्यजीव संचारमार्ग यांचा विचार रेल्वे विभागांनी केल्याचे दिसत नाही. त्यामुळे ब्रॉडगेज रेल्वेमार्गावरून होणारी वाहतुकीची गर्दी, रेल्वे गाड्यांचा वेग, कचरा व्यवस्थापन, प्रभावी वन्यजीव उपशमन योजना यांचा विचारच झालेला दिसत नाही. पर्यायाने हे सर्व रेल्वेमार्ग वन्यप्राण्यांचे खुले कत्तलखाने बनू पाहत आहेत. याशिवाय ब्रॉडगेज करताना सातपुडा-मैकल पर्वतरांगेतील प्राचीन निसर्गरम्य स्थळे, तेथील पर्यटन विकासाद्वारे निर्माण होऊ शकणारा रोजगार याचा विचार केल्याचे दिसत नाही.

मध्य भारतातील अकोला-खंडवा ते रतलाम ही मीटरगेज रेल्वे लाईन मेळघाट ते खंडवा या पर्वतीय प्रदेशामधून जाते. या रेल्वेने मेळघाट व सातपुड्याचे जंगल अगदी आतमधून पाहण्याची संधी मिळायची. रेल्वेच्या निवडक फेऱ्या व पर्वतीय नागमोडी वळणांमुळे संथ वेग यामुळे इथल्या वन्यजीवांसाठी ही रेल्वे वाहतूक धोकादायक नसली तरी सातपुड्यातील वनसंपदेसाठी मात्र ती घातक ठरल्याचे पुरावे आहेत. २००१ मध्ये या रेल्वेमार्गावर आदिलाबाद पॅसेंजर गाडीने होणारी सागवान लाकडांची तस्करी, मुसळी व अश्वगंधासारख्या दुर्मिळ वनस्पतींचा अवैध व्यापार, वाघाची कातडी व हरिणाची शिंगे यांची तस्करी उघडकीस आली. मागील दहा वर्षांत मेळघाटच्या कोअर क्षेत्रातून नऊ गावच्या सुमारे १७ हजार परिवारांचे पुनर्वसन झाल्याने या निर्मनुष्य क्षेत्रात वाघांचा व वन्यजीवांचा संचार वाढला. त्यामुळे ब्रॉडगेज रेल्वेलाईन व्याघ्र प्रकल्पाबाहेरून सपाट भागातून वळवल्यास तीन जिल्ह्यांमधील सुमारे ६० गावे जोडली जाऊन वेगही ताशी ६० कि.मी.पेक्षा जास्त ठेवता येईल, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली. सर्वोच्च न्यायालयाची केंद्रीय सशक्तता समिती, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, राज्य वन्यजीव मंडळ व केंद्रीय समन्वय समिती या सर्वांनी त्यास सहमती दर्शवली.

​नुकताच वडसा ते गडचिरोली हा नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग केंद्र सरकारने मंजूर केला. सदर ५२ कि.मी. लांबीचा व २६ मीटर रुंदीचा रेल्वेमार्ग वडसा वनविभागाच्या आरमोरी तहसील व गडचिरोली तहसीलमधील वडसा, आरमोरी व पोरला या संपन्न व्याघ्र अधिवासातून जातो. ताडोबातील वाघ वैनगंगा नदीच्या आश्रयाने येथे स्थिरावले आहेत. वडसा व आरमोरी या वनपरीक्षेत्रांमध्ये २०१७-१८ च्या फक्त पाच महिन्यांत वाघाने २० गुरे फस्त केलीत. २०१० ते २०१८ मध्ये वाघांच्या हल्ल्यात सहा माणसांचे मृत्यू, १११ लोक जखमी, सुमारे १०७६ पाळीव गुरांचे मृत्यू आणि १५०५ गुरे जखमी झालेत. वाघ व वन्यजीवांचा मोठा वावर दर्शवणाऱ्या या आकडेवारीवरून हा रेल्वेमार्ग झाल्यास तो वाघ व वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे. वन्यप्राण्यांना भुयारी मार्ग उपलब्ध करून देणे, काही ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलांवरून नेऊन खालचे जंगल अखंड ठेवणे अशा वन्यप्राणी उपशमन योजना केल्यास रेल्वेविस्तार व वन्यप्राणी संरक्षण दोन्ही साधणे शक्य होईल.

(लेखक मागील तीन दशकांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून, मध्य भारतातील जंगलांमधील वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाच्या विविध प्रकल्पांचे ते अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com