ओ मेरे राजा...खफा न होना

चोरीचा मामला - मग तो हिऱ्यांच्या चोरीचा असो नाही तर प्रेमातल्या चोरीचा असो - निभावणं जरा कठीणच. नाही का? इथं तर दोन्ही चोऱ्या एकदमच होताहेत आणि हे दोन तथाकथित प्रेमिक हा मामला मस्तपैकी निभावून नेताहेत.
kishore kumar asha bhosle o mere raja khafa na hona song movie johny mera nam
kishore kumar asha bhosle o mere raja khafa na hona song movie johny mera namSakal

- डॉ. कैलास कमोद

ओ मेरे राजा...खफा न होना

देर से आई, दूर से आई

मजबूरी से फिर भी मैं ने

वादा तो निभाया, वादा तो निभाया

चोरीचा मामला - मग तो हिऱ्यांच्या चोरीचा असो नाही तर प्रेमातल्या चोरीचा असो - निभावणं जरा कठीणच. नाही का? इथं तर दोन्ही चोऱ्या एकदमच होताहेत आणि हे दोन तथाकथित प्रेमिक हा मामला मस्तपैकी निभावून नेताहेत.

काळ आहे सत्तरच्या दशकातला. हाँगकाँगहून जहाजातून आलेले स्मगलिंगचे हिरे मुंबईत पोहोचले आहेत. हिऱ्यांची किंमत असावी साधारणत: ऐंशी लाख रुपये. स्मगलिंगच्या टोळीचा म्होरक्या आहे नेपाळमध्ये काठमांडूत.

मुंबईहून काठमांडूला हिरे पोहोचवण्याची जबाबदारी टोळीकडून त्या सुंदरीवर सोपवली गेली आहे. नंतर तिला अनपेक्षितपणे एक अनोळखी जोडीदार देण्यात आला आहे. तिनं त्याला बिहारच्या पाटण्याजवळ विशिष्ट स्थळी भेटायला सांगितलं आहे.

काठमांडूला जाणारं विमान पाटण्याहून निघणार आहे. मुंबई ते पाटणा प्रवास ट्रेननं. साहजिकच तिला तो ट्रेनमध्ये आपल्याबरोबर नको आहे. मुंबईच्या पोलिसांना तिच्यावर वहीम आहेच. त्यांनी बिहारच्या पोलिसांना टिप देऊन ठेवल्यानं बिहारचेही पोलीस तिच्या मागावर आहेत.

ट्रेनमधून उतरून आत हिरे असलेली बॅग हातात घेऊन ती नियोजित स्थळी पोहोचली आहे. ते स्थळ आहे प्राचीन काळातल्या नालंदा विद्यापीठाचा भग्न परिसर. मुंबईत भेटलेला तो जोडीदार तिच्या आधीच त्या ठिकाणी हजर आहे.

बिहारचे पोलीस पाठलाग करत आहेत हे तिच्या लक्षात येतं. त्यांना हुलकावणी देण्याच्या विचारानं पोलिसांकडे दुर्लक्ष केल्यासारखं करून, तो अनोळखी जोडीदार हा जणू आपला बॅायफ्रेंड आहे, अशा थाटात ती गाऊ लागते : ‘ओ मेरे राजा, खफा न होना...’ चलाख असलेला तो अनोळखी जोडीदार तिची चतुराई समजून चुकतो आणि तोही तिला साथ देत गाऊ लागतो.

इंतजार के इक इक पल का बदला लूँगा

ऐसा भी क्या?

ये न समझना आज भी ऐसे जाने दूँगा

ऐसा भी क्या?

कितना सताया पहले इस का हिसाब दो

अखियों में अखियाँ डाल के जबाब दो

तिला उशीर झाल्याचा फायदा घेत ‘तुझा हा उशीर नेहमीचाच आहे’ असं सांगत तो रुसल्याचा बहाणा करतो, तर ‘मी अगतिक असून तुला भेटायला कशी लपत-छपत इथवर आले ते माझं मलाच ठाऊक’ अशी मखलाशी ती करते.

कहो, ये गालों के अंगारे किस के लिये है?

अजी तुम्हारे

होटों पे ये शहद के धारे किस के लिये है?

अजी तुम्हारे

असं तिच्याकडून कबूल करून घेत तो तिला आपल्या मिठीत येण्याची गळ घालतो; तेव्हा, ‘बदनामी से डर लगता है’ असं म्हणत ती त्याची मागणी धुडकावून लावते. एकंदरीत, प्रेमिकांचे लटके रुसवे-फुगवे, आणि ते दूर करण्यासाठी मान्य केलेले दावे,

तिच्या सौंदर्याची महती असं सगळं काही असलेलं मस्त रोमॅंटिक गीत लिहिलंय राजेंद्रकृष्ण यांनी. लाल लाल गालांना खरं तर नाजूकपणा असतो; पण तीसुद्धा काहीशी रागावली आहे, त्यामुळे तिच्या सौंदर्याचं वर्णन करताना राजेंद्रकृष्ण यांनी ‘गालों के अंगारे’ असा शब्दप्रयोग केला आहे,

तर तित्या ओठांचा गोडवा सांगताना ‘ओठांवरच्या मधाच्या धारा’ असा गोड शब्दप्रयोग त्यांनी योजला आहे. तिला दमात घेतल्याचा आविर्भाव करत गायक किशोरकुमार यांनी खट्याळ स्वर काढलाय, तर आशा भोसले यांनी त्याच्यावर कडी करत, ती जणू काही खरोखरच त्याला घाबरली असल्याचा सूर लावलाय.

एके ठिकाणी ‘मुड जाएगी मेरी कलाई, हाथ न पकडो’ अशी तिची विनंती धुडकावत ‘हम पकडेंगे’ असं तो म्हणतो तेव्हा आशा भोसले यांनी ‘छोडो ना ऽऽऽ’ या ओळीचा उच्चार असा काही केला आहे की, आता ती त्याच्यावर रागावली आहे हे लक्षात येतं.

गाण्यातलं हे सौंदर्यस्थळ आशा भोसले यांच्या त्या उच्चारांसाठी खास ऐकण्याजोगं आहे. त्याचे प्रश्न आणि तिची उत्तरे यांचा समन्वय साधत योग्य त्या ठिकाणी पॅाझेस घेऊन संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांनी मस्त उडती चाल दिली आहे; पॅाझेसमध्ये ॲकॅार्डियनचे जे लहान लहान पीसेस वाजतात त्यानं गाण्याची रंगत वाढलीय.

देव आनंदनं वाढत्या वयातसुद्धा प्रेमवीराचा नटखटपणा नजाकतीनं दाखवलाय. तिरक्या चालीनं पायऱ्या झपझप उतरण्याची त्याची तऱ्हा केवळ तोच करू जाणे. पिवळा शर्ट, त्यावर चॅाकलेटी रंगाचं लेदरचं जर्किन

त्याला मॅच होईल अशी पिवळट खाकी पॅंट आणि गळ्याभोवती काळा स्कार्फ असा कॅास्च्युम त्या प्रणयी वीराला शोभतो खरा. पोलीस पाठलाग करता करता त्या दोघांचं प्रणयगान पाहण्यात एका क्षणी स्वत:च मग्न होतात, ही आणखी एक गंमत. इन्स्पेक्टर जगदीश राजच्या चेहऱ्यावर तसे भाव स्पष्ट दिसतात.

‘जॉनी मेरा नाम’मधल्या (१९७०) या गाण्यात हेमा मालिनी किती सुंदर दिसते! स्लीव्हलेस ब्लाऊज, गडद काळी साडी, तिच्यावर मोरपंखी निळी किनार आणि तिला मॅचिंग गळ्यातले-कानातले अलंकार अशा वेशात तिला पेश करून त्या स्वप्नसुंदरीचं सौंदर्य दिग्दर्शक विजय आनंद यांनी आणखीच उठावदार केलं आहे.

बॅग हातात घेऊन भिंतीवर चालतानाची तिची चाल आकर्षक वाटते. पोलीस दिसल्यावर घाबरंघुबरं होत लगेच स्वत:ला सावरून चेहऱ्यावर स्मित आणणारे भाव, तसंच त्यानं मिठी मारल्यावर कृतक् कोपानं रागावल्याचे भाव तिनं छान व्यक्त केले आहेत.

अगदीच नवखी असूनही देव आनंदसारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोर तितकाच कसदार अभिनय आणि त्याच्याइतकाच नखरेलपणा करण्यात ती कुठंही कमी पडलेली नाही.

हे गाणं नालंदाच्या पार्श्वभूमीवर चित्रित करण्याची कल्पना जरा हट के आहे. नालंदा विद्यापीठाच्या भग्नावशेषांचा परिचय त्यामुळे प्रेक्षकाला होतो. भारतात रोप ट्रॅाली फारशी परिचित नव्हती तेव्हा,

नालंदाजवळ असलेल्या राजगीरच्या रोप ट्रॅालीमध्ये त्या दोघांना बसवण्याची कल्पकता या गाण्यात दाखवण्यात आली आहे. ट्रॅालीची जमिनीवर पडलेली आणि पुढं पुढं सरकणारी सावली छान दिसते. एकुणातच, विजय आनंद यांनी गाण्याचं टेकिंग वेगवान आणि मस्त घेतलंय.

रोप ट्रॉलीवरील चित्रीकरण सुरू असताना कुणी तरी खोडसाळपणानं ट्रॉलीचं बटण बंद केल्यानं ट्रॉली वाटेतच खूप वेळ थांबली होती. त्या ठिकाणी ऊन्ह फार असल्यानं भयंकर उकाडा जाणवत होता. जेमतेम एका खुर्चीवजा रोप ट्रालीवर देव

आनंद-हेमा मालिनी यांना फार ऑकवर्ड स्थितीत खूप वेळ अधांतरी बसावं लागलं होतं. ‘‘खाली बघून भीतीनं माझी गाळण उडाली होती. अशा परिस्थितीत अभिनय करणं फार जड गेलं होतं,’’ असा या गाण्याविषयीचा अनुभव हेमा मालिनीनं आत्मचरित्रात सविस्तर लिहिला आहे.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com