
ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला खडक कोरून मुंबईजवळ बांधलेल्या कोंडीवीटे लेणी. या लेणींचे खरे सौंदर्य पावसाळ्यात खुलून दिसते. वर निळे आकाश आणि जमिनीवरील हिरव्यागार गालिचातून एक सुंदर कलाकृती पृथ्वीच्या पोटातून बाहेर आल्याचा भास होतो. मुंबई शहराच्या मध्यभागी असलेला हा परिसर एकेकाळी घनदाट अभयारण्य होता. आता एक प्राचीन वारसा म्हणूनच त्याचे महत्त्व शिल्लक राहिले असले, तरी आपले गतवैभव काय होते, याची कल्पना येण्यासाठी म्हणून इथे एकदा तरी जरूर भेट द्यायला हवी.
गतवैभवाचा प्राचीन वारसा
मुंबईमधील लेणींचा उल्लेख आला की सर्वप्रथम बोरिवली येथील कान्हेरी आणि त्यानंतर मुंबईनजीकच्या घारापुरी बेटावरील एलिफंटा लेणी आठवतात; मात्र या दोन प्रमुख लेणींव्यतिरिक्त मुंबईच्या उपनगरात प्राचीन बौद्ध स्थापत्यशैलीतील अनेक लेणी आपले अस्तित्व टिकवून आहेत. कान्हेरी हे प्राचीन काळापासून एक प्रमुख बौद्ध केंद्र होते आणि पंधराव्या शतकापर्यंत टिकून राहिले. या कान्हेरीशी साधर्म्य सांगणारी लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनीशेजारच्या अंधेरी पूर्व येथील सुंदर नगर परिसरात आहेत. इ. स. दुसरे ते सहावे शतक या काळात बांधण्यात आलेल्या या लेणी महाकाली किंवा कोंडीवीटे लेणी नावाने ओळखल्या जातात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला खडक कोरून या लेणी बांधल्या गेल्या आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानकापासून सहा किलोमीटरवर महाकाली लेणी आहेत. बस, रिक्षा अशा कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून इथपर्यंत पोहोचता येते. एकूण १९ लेणींचा हा समूह उत्तर-पश्चिमेला चार आणि दक्षिण-पूर्वेला १५ लेणी असा विभागला गेलाय. मरोळ, मूलगावसहित हा संपूर्ण परिसर एकेकाळी याच टेकडीचा भाग होता आणि आजूबाजूला गोड्या पाण्याचे स्रोतदेखील उपलब्ध होते; मात्र काळाच्या ओघात ते आता नष्ट झालेले आहेत.
मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या हाताला एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या तीन लेणी दिसतात. यातील मधली लेणी मुख्य लेणी असून, चार चौकोनी मोठे खांब, पायऱ्या आणि समोरील खुले अंगण दिसते. आतमध्ये आयताकृती सभागृह आहे. समोरच असलेल्या आसनाच्या मागच्या भिंतीवर एक स्तूप कोरलेला दिसतो. बाहेरील चार चौकोनी खांबांच्या खाली वेदिकापट्टीचे नक्षीकाम केलेले आहे. चौथ्या क्रमांकाच्या लेणीकडे जाण्यासाठी मोठ्या पायऱ्या आहेत. चौथ्या क्रमांकाच्या लेणीच्या भिंतीवर कोरलेला नाग आपले लक्ष वेधून घेतो. त्याच्या बाजूला पाण्याचे टाके आहे. ही लेणी एक विहार असून, या लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे या लेणीचे खांब अष्टकोनी आहेत. या लेणीला ओसरी असून, आतील दालनात प्रवेश केल्यावर समोर तसेच उजव्या आणि डाव्या बाजूला खोल्यांची रचना केलेली दिसते. पाचव्या क्रमांकाची लेणी ही सर्वांत जुनी लेणी असल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे. त्याचे तोंड पूर्वेकडे असून प्रवेशद्वार आयताकृती सभागृहामधून दिलेले आहे. सामान्यतः अशा प्रकारच्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर खांब असतात, परंतु पूर्वेकडे अतिशय रुंद पसरलेल्या या सभागृहाला कोणत्याही खांबांचा आधार नाही. अशाप्रकारची रचना संपूर्ण भारतात केवळ आणखी दोन ठिकाणी आढळते, जी बिहारमध्ये आहेत. लोमास ऋषी गुहा आणि गयाजवळील बाराबर टेकड्यांमधील सुदामा गुहा. आतील बाजूस स्तूप असलेला आतील कक्ष गोलाकार भिंतीने बंद केलेला आहे, हे वैशिष्ट्य इतर कोणत्याही ठिकाणी दिसत नाही. त्याच्याभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. हॉलच्या भिंती मूळतः उघड्या होत्या, परंतु महायानच्या उत्तरार्धात तिथे बुद्धाच्या मूर्ती कोरल्या गेल्या. इथेच पाली भाषेतील शिलालेखदेखील आहे.
नऊ, दहा आणि अकरा क्रमांकाच्या लेणी पहिल्या तीन लेणींसारख्या एकत्रित असून सर्व गुहांना त्यांच्या संबंधित अंगणात प्रवेशद्वार आहे. येथील कोणत्याही खांबांवर कलाकुसर नाही. बाराव्या लेणीत सध्या फारसे काही उरलेले नाही. तेरावी लेणी आकाराने मोठी आहे. अंगण, पायऱ्या, व्हरांडा, मोठाले खांब आणि आतमध्ये सभामंडप आहे. अंगणाच्या उजव्या बाजूला दगडी बाक दिसतो. मुख्य सभामंडपात तीन प्रवेशद्वार आहेत. या सभागृहाच्या मध्यभागी एक उंच व्यासपीठ आहे. त्याच्या चारही बाजूंना असलेल्या अष्टकोनी खांबांना गोलाकार पाया आहे. सभामंडपात एकूण आठ कक्ष आहेत, तीन डाव्या आणि उजव्या बाजूला आणि दोन मागील भिंतीवर मंदिराच्या दोन्ही बाजूला आहेत. पुढील सर्व लेण्यांची रचना जवळपास सारखी आहे. अनेक लेणींची पडझड झाल्याचे आणि पाऊस, ऊन, वाऱ्याच्या आघाताने दगड ठिसूळ झाल्याचे दिसून येते.
पुरातत्त्व विभागाने लेणीचा परिसर सुभोभित केला आहे. काळ्या पाषाणामध्ये कोरलेल्या या लेणींचे खरे सौंदर्य पावसाळ्यात खुलून दिसते. वर निळे आकाश आणि जमिनीवरील हिरव्यागार गालिचातून एक सुंदर कलाकृती पृथ्वीच्या पोटातून बाहेर आल्याचा भास होतो. मुंबई शहराच्या मध्यभागी असलेला हा परिसर एकेकाळी घनदाट अभयारण्य होता. बौद्ध धर्माचे केंद्र असलेला हा लेणीसमूह भिक्खूंचे प्रमुख निवासस्थान होता. नंतरच्या काळातही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. आता मात्र एक प्राचीन वारसा म्हणूनच त्याचे महत्त्व शिल्लक राहिले असले, तरी आपले गतवैभव काय होते, याची कल्पना येण्यासाठी म्हणून इथे एकदा तरी भेट जरूर द्यायला हवी.
Web Title: Kondivite Caves Near Mumbai Ancient Legacy Of Past Glory
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..