#सोशलमीडिया : नवमाध्यम साक्षरतेच्या दिशेचं पाऊल 

कुणाल गायकवाड 
रविवार, 18 ऑगस्ट 2019

‘सोशल मीडिया’ ही टर्म आपण सहजरित्या वापरून अगदी गुळगुळीत करून टाकली आहे. ‘समाजातल्या विविध घटकांना जोडणारी किंवा माहिती आणि मनोरंजनाचं आदानप्रदान करणारी यंत्रणा’ अशा ढोबळ समजुतीच्या पलीकडं तिचं काही राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. सोशल मीडिया- इंटरनेटनं आपला जगाशी कनेक्ट होण्याचा वेळ आणि अवकाश यांची परिमाणंच बदलून टाकली आहेत. मानवी अस्तित्वाशी निगडित अनेक मूल्यव्यवस्थांचं प्रारूपही त्यानं बदलून टाकले आहे.

‘सोशल मीडिया’ ही टर्म आपण सहजरित्या वापरून अगदी गुळगुळीत करून टाकली आहे. ‘समाजातल्या विविध घटकांना जोडणारी किंवा माहिती आणि मनोरंजनाचं आदानप्रदान करणारी यंत्रणा’ अशा ढोबळ समजुतीच्या पलीकडं तिचं काही राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. सोशल मीडिया- इंटरनेटनं आपला जगाशी कनेक्ट होण्याचा वेळ आणि अवकाश यांची परिमाणंच बदलून टाकली आहेत. मानवी अस्तित्वाशी निगडित अनेक मूल्यव्यवस्थांचं प्रारूपही त्यानं बदलून टाकले आहे.

जगभरात याविषयी विविध संशोधनं आणि ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेनं जोर पकडला आहे. तुलनेत भारतीय विद्यापीठांमधून, एकीकडे हा विषय आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाला जवळ करणारा असला, तरीही समाजमाध्यमं आणि इंटरनेटसंबधीचा अभ्यास आणि संकल्पनात्मक ज्ञानाबाबत आपण आजही अमेरिकन आणि युरोपियन विद्यापीठांवरच अवलंबून आहोत. या परिस्थितीत प्रादेशिक भाषांमध्ये अशा विषयांवर लिखाण होत नाही, अशी खंत आपण नेहमीच व्यक्त करत असतो. या पार्श्वभूमीवर प्रा. योगेश बोरोटे लिखित ‘सोशल मीडिया’ हे पुस्तक माध्यमांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते नव्यानं सोशल मीडिया वापरणाऱ्या युजर्सपर्यंतच्या प्रत्येक घटकाला उपयोगी ठरणारं आहे. किंबहुना या पुस्तकाचा वाचक कोणता आहे, त्याच्या सोशल मीडियासंबधीच्या समजुती आणि गैरसमजुती काय आहेत, सोशल मीडियाचा परिणामकारक वापर कसा करावा, सोशल मीडियाच्या संकल्पनात्मक काय व्याख्या आहेत आदी बाबींचं आणि सुलभ भाषा; तसंच वाचनीयतेचं भान ठेवून हे पुस्तक मराठी भाषेत येणं, ही स्वागतार्ह बाब आहे. 

नव्या माध्यमांसंदर्भात अनेक संकल्पना वापरल्या जातात. उदाहरणार्थ, सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन, की-वर्डस, चंकिंग, गुगल बॉट, कंटेंट मॅनेजमेंट सिस्टिम्स वगैरे. मात्र, त्यांचा नेमका अर्थ काय आहे, याची तितकीशी जाणीव नसते. यासंबधीची माहिती या पुस्तकामधून मिळतेच, शिवाय त्याचा उपयोग कसा करता येईल, याचीही माहिती हे पुस्तक आपल्याला देतं. सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यांची व्याप्ती याचा अंदाज या पुस्तकामधून येतो. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नव्यानं अकाऊंट क्रिएट करताना आपण प्रायव्हसी सेंटिग्जबाबत वाचतो का, इथपासून ते कंटेंट क्युरेशन करत असताना आपण नेमक्या कोणत्या ट्रिक्स वापरल्या पाहिजेत, याविषयी किचकट तपशीलात न जाता हे पुस्तक सहजसुलभ मार्गदर्शन करतं. 

सोशल मीडियावर निर्माण होणाऱ्या कंटेंटचा काही सामाजिक आणि राजकीय-सांस्कृतिक संदर्भही असतो, या माध्यमांची एक विशिष्ट पॉलिटिकल-इकॉनॉमी आहे, म्हणूनच त्यांना भांडवली उद्योग रचनांच्या संदर्भातही पाहावं लागतं. या संदर्भातल्या अनेक व्यापक प्रश्नांनाही पुस्तकात स्थान मिळायला हवं होतं, असं जाणवतं. मात्र, पुस्तकाचा मूळ ग्राहकवर्ग विचारात घेता, राजकीय पक्ष आणि नवमाध्यमांचा प्रपोगंडासाठीचा वापर या विषयालाही पुस्तकांमध्ये काही प्रमाणात स्पर्श केला आहे.
 
आज इंटरनेटचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वापकरकर्ते चाळीस कोटींपर्यंत पोचले आहेत. या आकडेवारीतून आपल्याला इंटरनेटमुळं निर्माण झालेल्या नवमाध्यमांतला ऑडियन्स, कंटेंट कन्झ्युमर, कंटेंट क्युरेटर आणि आशय-विषयापासून ते विविध कंटेंट फॉर्मचा आवाका किती आहे, याची फक्त कल्पना करता येते. त्यामुळं या मोठ्या प्रतलात घडणाऱ्या अनेक बहुमितीय प्रक्रिया समजून घेणं तितकंसं सोपं काम नाही. त्यासाठी आंतरविद्याशाखीय संशोधनाचे प्रकल्प राबवण्यापासून ते ज्ञाननिर्मिती करणं, हे अपरिहार्य ठरतं आहे. या विषयासंबधी आपल्या आवाक्यात येणाऱ्या घटकांवर आशय निर्माण करणं, हे माध्यमांच्या अभ्यासकांच्या प्राधान्यक्रमावर आलंच पाहिजे. मात्र, त्याहीपेक्षा हा आशय विद्यार्थी ते सर्वसामान्य वाचक यांच्यापर्यंत सुलभतेनं आणि वाचनीयतेनं पोचवणंही महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे हे पुस्तक सोशल मीडिया आणि इंटरनेटकडं डोळसपणे पाहायला शिकवतं. हे पुस्तक तुमची सोशल मीडियाविषयीची जिज्ञासा निर्माण करण्यासाठीही उपयोगाचं ठरेल, याविषयी शंका नाही. 

पुस्तकाचं नाव : सोशल मीडिया 
लेखक : योगेश बोराटे 
प्रकाशक : अथर्व प्रकाशन, जळगाव 
पानं : , किंमत : १५० रुपये 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kunal Gaikwad writes about Social Media Book written by Yogesh borate